नियतीचे खेळ
नियतीचे खेळ


गौरी सकाळ पासूनच उदास होती. स्वतःच्या नशिबावर वैतागली होती. भांडी घासतांना जोराजोरात आपटत होती. ती स्वतःच्या दुःखातच बुडून गेली होती. आपल्यामुळेच तर हे घडलं... आयुष्यात घडलेल्या घटनांना आपणच जबाबदार आहोत. हे तीला मान्यच होतं....
किती सुंदर होत आयुष्य ... आई वडीलांची अतिशय लाडकी... भावापेक्षा काकणभर सरसच लाड करायचे आई वडील... कारणही तसंच होतं.. अतिशय हुशार , आणि दिसायलाही अतिशय सुंदर , गोरीपान... तिच्या जन्मानंतर तिला कुठे ठेवू अन कुठे नको.. असं झालं होतं आई वडीलांना.. कृतकृत्य झाल्याची भावना होती , दोघांच्याही मनात.
बारावी पर्यंत गाडी सुसाट चालली होती .....प्रत्येक परिक्षेत पहिला नंबर कधीच सोडला नाही तिने...नंतर मात्र तिची आयुष्यातील सगळीच गणिते चुकत गेली.
आई वडीलांनी कौतुकाने घेतलेला मोबाईल हाती आला. ती समाज माध्यमांशी जोडली गेली. हरतर्हेचे लोक तिच्या संपर्कात आले... प्रकाशच्या अस्तित्वाने ती पार बदलून गेली.. सारख्या त्याच्याच पोस्ट वाचू लागली.. ध्यानी मनी , स्वप्नी सारखा त्याचाच फोटो समोर दिसू लागला.. खरंतर तिच्या अगदी विरूध्द व्यक्तीमत्व होतं त्याच.. रंगाने काळा कभिन्न , रूपही यथातथाच... फक्त सुंदर फोटोग्राफी करायचचा.. अर्थात मोबाईल मधुनच... पोट भरण्याचे साधन नव्हें... सारखे त्याने पोस्ट केलेले फोटो.., आणि त्याचा फोटो डोळे भरून पहात रहायची.. त्यातच रमुन जायची... जणू त्याचा ध्यासच लागला होता ...
एक दिवस त्याची फेसबुकवर फ्रेन्डरिक्वेस्ट आली... तिचा आनंद गगनात मावेनासा झाला... काय करू , काय नको असं होवून गेलं....मेसेंजरवर गप्पा सुरू झाल्या... हळूहळू फोन नंबरची देवाण घेवाण झाली.. भेटही ठरली.. पहिल्याच भेटीत दोघं खूपच जवळ आली... अशा अनेक भेटी झाल्या. लग्नाच्या आणाभाका घेतल्या गेल्या. त्याने तिला एकदाही घरी नेले नाही.. ती त्याच्यात इतकी बुडाली होती , कीं तीला ही जाणीवही झाली नाही. त्याला भेटल्या शिवाय तिचा दिवस जात नव्हता.
आई वडिलांना प्रश्न पडला होता कीं... ती अशी कां वागत आहे.. घरातही असून नसल्यासारखी असायची. अभ्यासावरील तिचे उडालेले लक्ष त्यांच्या ध्यानात आलेच होते. काही होतयं कां तुला ? या प्रश्नाचेही उत्तर तिने दिलेच नाही.. आणि बारावी पर्यंत पहिल्या नंबरवर असणारी मुलगी जेंव्हा नापास झाली , तेंव्हा मात्र ती दोघंही काळजीने हबकुनच गेली.... पाठोपाठ तिने त्यांच्यावर एक बाॅम्ब टाकला.... तो म्हणजे ... " एक मुलगा आहे , आणि मी त्याच्याशीच पुढच्याच आठवड्यात लग्न करणार आहे " हे ऐकल्यानंतर दोघांच्याही पाया खालची जमिन सरकली.. त्यांनी मुलाची योग्य ठीकाणाहुन माहिती काढली.. त्यांची मनस्थिती आणखीच बिघडली..
कारण तो एक झोपडपट्टीत रहाणारा गुंड मुलगा होता. त्याला दारूचे व्यसन होते.. जातीतला एकवेळ नसला तरी चालेल , पण चांगला शिकलेला सुसंस्कृत मुलगा असता तर गोष्ट वेगळी.. आणि पैशाचाही काही प्रश्न नव्हता... कारण ज्याच्यात धमक आहे , तो कसाही पोट भरू शकतो. जोडीला शिक्षण असेल तर मग काही प्रश्नच नाही.. .. हे त्याच्याकडे काहींच नव्हंते...
गौरी काहीही ऐकुन घेण्याच्याही मनःस्थितीत नव्हती. हरतर्हेने समजाऊन सुध्दा तिने ऐकले नाही. एक दिवस दोघं लग्न करून घरी आली. आई वडिलांना नमस्कार करायला... आता मात्र आई वडिलांनी डोळ्यातले पाणी मागे सारले.. काळजावर दगड ठेवून तिला सांगितले .. "तुझा आमचा आता काहीही संबंध नाही. तू सज्ञान आहेस. समर्थ आहेस.. तेव्हा आता तू येथून जा... आम्हाला एक मुलगाच आहे असे आम्ही समजतो. एव्हढंच नाही तर माझी जी संपत्ती आहे , ती स्वकष्टार्जीत आहे.ती कुणाला द्यायची हा माझा प्रश्न आहे. तुझा मात्र त्यावर काहीही अधिकार नाही. जशी आलीस तशी, निघून जा...
तिला माहिती होते कीं हे सांगतांना आई वडिलांना किती क्लेष झाले असतील... पण त्याच बरोबर वडिलांचा निश्चयी स्वभावही तिला चांगलाच माहिती होता.. त्याक्षणी ती प्रकाशच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती त्यामुळे ह्या गोष्टीकडे तिने दुर्लक्षच केले....
घरी पोचल्यावरच प्रकाशचे खरे रंग दिसू लागले. तुझ्या बापाच्या पैशाकडे पाहून मी लग्न केलं... काय उपयोग तुझा !! तिला मारहाण करायला तेव्हांच सुरवात झाली.
आपण पार बुडालो ..हे तीला कळून चुकले..
एक दिवस ती आई वडिलांकडे पळून गेली. पण.... त्यांनी तिला घरात घेतलेच नाही. आणि घरी परत आल्यावर नवर्याने झोडपले ते वेगळेच.... वर सिगरेटचे चटकेही दिले.. स्वतःची एव्हढी दहशत निर्माण केली कीं परत बाहेर पडायचे धारीष्ट होणार नाही. असेच रोजचे मरणे ती जगत होती. शरीरावर होणारे अत्याचारही सहन करीत होती. त्यातच तिला दिवस गेले.
आईकडे असलेली मोलकरीण कधीमधी पैसे आणून देत असे.. म्हणून जेवायला चार घास मिळत होते.. अर्थात तिला माहिती होते कीं हे पेसे आईकडूनच येतात. म्हणून तिला अन्न तरी मिळत होते. आज मात्र तिची जगण्याची उमेदच संपली होती.. स्वतःलाच दोष देत होती. कारण किती सुंदर अयुष्य जगत होतो आपण.. ते आपणच उधळून लावलं याची पावला पावलावर जाणीव होत होती. कसं आपण याच्यावर प्रेम केलं.... हेच तिला समजत नव्हंत..
भांड्यांचा आवाज ऐकुन नवरा बाहेर आला. नेहमी प्रमाणेच घाणेरड्या शिव्या घालू लागला.. बेदम मारू लागला... ती मात्र निपचित पडून मार खाऊ लागली.. यातच आपल्याला मरण येईल... याची वाट पहात राहिली...