नात्या पलीकडले नाते
नात्या पलीकडले नाते


ऑफिस मधुन दमून आल्यावर सारंगची पार्टीला जायची मुळीच इच्छा नव्हती. पण मित्राचा वाढदिवस असल्यामुळे जावं लागणारच होत. पार्टी म्हणजे काय? कोणत्या तरी फाईव्हस्टार हॉटेलमधे एकत्र डिनर. ह्या असल्या पार्टीचे सारंगला अजिबात आकर्षण नव्हते. कारण कॉलेजमध्ये असताना ते सर्व मित्र खूप धमाल करायचे. रात्र - रात्र कोणाच्या तरी घरी जमून नुसती धुमाकूळ. फाईव्हस्टार हॉटेल मधलं जेवण नसलं तरी रात्री दोन-तीन वाजता बनवलेल्या म्यागीतही एक वेगळीच मजा होती. कधीतरी " मी मस्त बिर्यानी बनवतो" असं म्हणून मित्राने बनवलेली 'खिचडी' ही खास लागायची. काहीच नसेल तर ब्रेड आणी जॅम वर पण भूक भागायची. महागड्या हॉटेलमध्ये ही मज्जा येत नाही. तिथे पोट भरलं तरी खाण्याचं समाधान नाही . जास्त गडबड नको म्हणून बोलणं ही मोजकंच होतं. पण अमितने खूप आग्रह केला म्हणून सारंगला जावे लागले.
"बाकी मित्र नाही आले? "सारंगने विचारले.
"नाही रे... सगळ्यांना बोलावले होते पण सगळे आपापल्या संसारात बिझी...! असो, आपण चार जण काही कमी आहोत का? माझ्या जवळचे मित्र माझ्या सोबत आहेत हेच समाधान."
जास्त कोणी नाही म्हणून सारंगला बरे वाटले. ऑफिस ,बिझनेस , मुंबईची वाढती गर्दी अशा अनेक वैचारिक विषयांवर गप्पा चालू झाल्या...सारंग आपल्याच तंद्रीत होता. पण अमित सारंगला मुद्दाम गप्पांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. अमितचा हा स्वभाव सारंगला काही नवीन नाही. अमितच्या अशा वागण्या मागचं कारण कळायला त्याला जास्त वेळ लागला नाही. सारंगने मागे वळून पाहिले तर स्वाती तिच्या नवऱ्यासोबत डिनरला आली होती. सारंगने हे बघू नये म्हणून अमित आटोकाट प्रयत्न करीत होता. तरीही जे घडायला नको होते ते घडलेचं!
भुतकाळ काही दिवसांनी विसरतो आपण... वर्तमानात जगू लागतो. पण आपला भुतकाळ अचानक आपल्या समोर येऊन उभा राहिला तर...? तर त्याला सामोरे जाणेही कठीण आणि तो प्रसंग टाळणेही तितकेच कठीण.
पण काही लोकांना ते चांगलच जमते. स्वातीने आधी लांबूनच ओळख दाखवली नंतर ती टेबलापाशी आली. अमितला Birthday wish केलं आणि तिच्या नवऱ्याची सगळ्यांशी ओळख करून दिली. तिच्या वागण्यात इतकी सहजता होती की तिच्या नवऱ्याला शंकाही आली नसेल, तिला कधीतरी सारंग किती आवडायचा ह्याची...पण सारंग मात्र नजर टाळत होता. हा सगळा प्रसंग लवकरात लवकर संपावा असं त्याला वाटत होतं.
कॉलेज मध्ये असताना सारंग आणि स्वाती Love birds ची जोडी म्हणून फेमस होते. कुठेही जा दोघेही नेहमी एकत्रच . नाटक, डान्स, ग्रुप प्रोजेक्ट पासून ते अगदी सबमिशन सुद्धा एकत्रच. कोणालाही अगदी हेवा वाटावा अशी त्यांची जोडी होती. एकमेकांसाठी एकदम परफेक्ट! सारंग पहिल्यापासून स्वातीच्या बाबतीत खूपच हळवा आणि तितकाच प्रेमळ. स्वातीही त्याला खूप समजून घेत असे. तो चिडल्यावर त्याला हँडल करण फक्त स्वातीलाच जमायचं. सारंगचा स्वभाव थोडा रागीट असला तरी त्याचा परिणाम कधी त्यांच्या रिलेशन वर झाला नाही. कारण कठीण प्रसंगात एकमेकांना कसं सावरायचं हे त्यांना चांगलंच जमायचं.
इतकं सगळं चांगलं असताना स्वाती असं सारंगला दूर सारून दुसऱ्याशी लग्न करेल याची कोणालाच कल्पना नव्हती.
पण सारंगला ह्याची आधीच कल्पना होती की त्याचं स्वाती सोबत लग्न होऊ शकत नाही... कारण दोघांच्याही जाती वेगळ्या होत्या...
आपल्याकडे अनेक लव्हस्टोरी चालू होण्यापूर्वीच संपतात फक्त Cast मुळे...
पण तरीही त्या दोघांनी एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम केलं. कॉलेजच्या चार वर्षात ते मनसोक्त जगले. कोणाचीही पर्वा न करता. त्यांच्यासाठी ते एक स्वप्नच होत... एक सुंदर स्वप्न... पण आता...???
ह्या समोर आलेल्या सिच्युएशनचं काय? सारंगला तेथे दोन क्षणही थांबणं शक्य नव्हतं. प्रत्येक क्षण हा तासासारखा वाटतं होता.
आपण ज्या मुलीवर प्रेम केलं तिला असं दुसऱ्या पुरुषा सोबत बघणं ह्यापेक्षा मोठं दुःख नाही.
" आज आपण पार्सलच घेऊया. मला थोडं बरं वाटत नाहीये, घरी जाऊया आपण." स्वाती तिच्या नवऱ्याला म्हणाली...
स्वाती सारंगची बायको नसली तरी ती त्याची प्रेयसी होती. त्याचं मन ती चांगलचं जाणत होती. तिला असं नवऱ्यासोबत बघणं सारंगला किती जड जात असेल हे तिला कळत होतं. म्हणूनच तिने घरी जाण्याचा पर्याय निवडला. हसऱ्या मुखाने तिने सगळ्यांचा निरोप घेतला... निघताना एक क्षण सारंग कडेही पाहिलं...त्या तिच्या एका नजरेत खूप काही सांगून गेली ती...
तिच कर्तव्य... तिचा नाईलाज... तिची जबाबदारी... आणि...आणि तिचं अजूनही सारंगवर असणारं प्रेम...!