STORYMIRROR

Riya Pawar

Tragedy Inspirational Others

4  

Riya Pawar

Tragedy Inspirational Others

नाते जन्मांतरीचे

नाते जन्मांतरीचे

7 mins
478

ऊल्का आज सकाळ पासूनच ऊदास होती. कशातच मन रमत नव्हतं. रात्री छान झोप होता होताच बाबांची प्रेमळ छबी स्वप्नात दिसली होती. बाबा स्वप्नात दिसले की, ऊल्का दिवसभर टिपं गाळत बसते हे एव्हाना नवरा ,मुलं यांना माहीतच पडलं होतं. तरीही उल्काला आज वेगळीच हुरहुर लागुन राहीली होती. काय होतय हे तीलाच कळत नव्हतं. सकाळी मुलांच्या शाळा, नवऱ्याचं औफिस, मुलांचा चवीचा डबा, मधल्या वेळेतला खाऊचा डबा ,आशिष म्हणजेच नवऱ्याच्या मागे लागलेल्या मधुमेहाचा त्रास आणि त्याचं सकाळपासूनचं पथ्य, त्याचा पथ्याचा डबा , दुपारच्या जेवणाची थोडी पुर्वतयारी , तितक्यातच दुधवाल्या दादाचं आगमन, मध्येच कचरा ....अस मोठ्यानं ओरडुन आपल्या येण्याची वर्दी देणारी कचरेवाली अम्मा, पेपरवाला तर कधीच पेपर नीट टाकत नाही.. ऊलट ३६५दिवसातले ६५ दिवस पेपर जागेवर आणि ३०० दिवस पेपर पैसेजमध्ये अनाथासारखा पडलेला असतो. तो आपलाच पेपर शोधुन आणुन जेवणाच्या टेबलावर ठेवणं ,आशिषला बिनसाखरेच्या चहा सोबत या शिळ्या बातम्यांना ताजी फोडणी दिलेला पेपर हातात कोंबणं ,  मध्येच त्याने पेपरवरुन नजर फिरवता फिरवता कुठल्याही बातमीवर टिप्पणी केली तर त्याला हुं, हुं करुन दुजोरा अथवा नाराजी व्यक्त करणं , मध्येच मुलांना किती ही घाई झाली तरी शांतपणे अंथरुणावरुन ऊठवणं, गिझरच गरम पाणी सोडुन देणं , टुथब्रशला टूथपेस्ट लावुन देणं, शाळेच्या वेळेची आठवण करून देत मुलांना घाईगडबडीत आंघोळ ,नाष्टा करवुन ,शाळेची तयारी करुन ,डबे, दप्तर, पाण्याची बाटली , काही प्रोजेक्ट असतील तर त्या प्रोजेक्टची वेगळी पिशवी तयार करुन ती मुलांच्या हातात व्यवस्थित कोंबुन शाळेपर्यंत व्यवस्थित घेऊन जा ही आठवण मिनीटा मिनीटाला करुन देणं , आणि या गडबडीत ईमारतीच्या गेट समोर मुलांची स्कुल बस येण्या अगोदर दोन मिनिटं तरी लवकर जाऊन थांबणं.. आणि स्कुलबस आल्यानंतर मुलं सीटवर नीट बसल्याची खात्री क्लिनरदादा कडुन चारवेळा करुन घेऊन, मुलांना वेळेत डबा संपवण्याची सुचना करणं, स्कुलच्या वौशरूम चा वापर टिचरची परवानगी घेऊनच करा ही सुचना वारंवार देऊन बस जागची हलल्यावरच ऊल्का ही शांत मनाने घरची वाट धरायची. ऊल्काची सकाळची घाई, आशिष, मुलं ,यांच्या अंगवळणी पडली होती.

स्कुलबसचे ड्रायव्हर आणि क्लिनर काकांच्या अंगवळणी ऊल्काच्या सुचना पडल्या होत्या.  आताही स्कुलबस दिसेनाशी झाली आणि परत थकल्या देहाने, ऊदास मनाने ऊल्का घराची वाट चालू लागली. घराचा दरवाजा हातातल्या किल्लीने अलगद ऊघडुन किल्ली रैकला लावुन स्वयंपाक घर गाठती झाली. आशिषचा नाष्टा संपला होता. औफिसची घाई तो करत होता. ऊल्काचं गप्प गप्प असणं त्यालाही खटकलं होतं. एकदोनदा त्याने विचारल ही, काय झालं? गप्प का आहेस? काही दुखतय का? डॉक्टर कडे जातेयस का? उल्काला तो ही प्रश्नांचा भडीमार सहन झाला नाही आणि तिने फक्त नकारार्थी मान हलवुन कामात व्यस्त आहे अस दाखवु लागली. आशिषच्या हातात डबा, रुमाल, फोन, पेन, औफिसची बैग, आणि पाण्याची बाटली देताना ही ती खूप दमलीय हे आशिषच्या नजरेतून सुटलं नाही. शेवटी बुट घालता घालता तो उल्काला म्हणालाच.. आज घरीच थांब. औफिसमध्ये फोन करून सांग तब्येत ठीक नाहीय. हे ऐकून "बघते कस काय ते "! फार कष्टाने ऊल्काच्या तोंडुन चार शब्द बाहेर पडले. आशिष औफिसला निघुन गेला. ऊल्काने विसाव्याचा मोठा निश्वास सोडला. कोचवर थोडा वेळ शांत बसुन तीने भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली. आतासे आठ वाजत आले होते. तीचं औफिस घरापासून फार दुर नव्हत. ऊल्का स्कुटी वरुन दहा ते पंधरा मिनिटांत पोचायची. कामवाल्या मावशी येईपर्यंत कोचवरच लवंडायचा मोह ऊल्काला सुटला नाही. कोचवर पडल्या पडल्या, डोळे शांतपणे मिटुन ऊल्का विचार करत राहीली. आज बाबांची खुप खुप आठवण आली. आणि अर्थातच सीताईची पण...  विचारांच्या गर्तेत अडकलेल्या ऊल्काचा झोपमोड कामवाल्या मावशीनी केली. दारावरची बेल दाण्णकन वाजवुन मावशीनी ऊल्काला झोपेतुन ऊठवल.  छान झोप लागली असताना, आधीच मन कावरंबावरं झालं असताना, बाबांची आठवण येत असताना बेलचा कर्णकर्कश आवाज ऊल्काच्या छातीची धडधड वाढवुन गेला. धडपडत तीने दार उघडून मावशीना आत घेतलं. घड्याळाकडे परत एकदा नजर टाकली. आता आपल्याला आवरायला हव याची ऊल्काला जाणीव झाली.  मावशी नित्याची कामं करु लागल्या. ऊल्काची स्वतःची तयारी होत असताना 'आजच्या ताज्या सुचना' या सदराखालच्या सुचना ऊल्का मावशीना देऊ लागली. आणि 'माका सगळा येता ' या अर्थानं मावशी ऐकुन न ऐकल्या सारखं करु लागली. ऊल्काची घाई आणि मावशींची 'हातचा मळ' असणारी कामं एकाच वेळी संपत आली. दोघींसाठी परत एकदा फक्कड चहा टाकुन मावशी लादीवरच मांडी ठोकुन बसली. चहाला ऊकळी फुटली. आलं, गवती चहा ,तुळशीचा वास उल्काच्या नाकातुन मनात पोचला. मनापासून ऊल्का ताजीतवानी झाली.

सकाळपासूनची ऊदासी खुप लांब पळाली... मावशीनी चहात दुध ओतुन परत एकदा चहाला ऊकळी काढुन गॅस बंद केला. दोन कपात, चहाच्या गाळणीने दोघींसाठी चहा गाळला. एक कप स्वतःकडे ठेवून दुसरा कप ऊल्काच्या हातात दिला. मनापासून आभार मानत ऊल्काने अगदी चवीचवीने घोट घोट करुन चहा संपवला. बेसीनजवळच्या नळाखाली दोन्ही कप विसळुन लगोलग मांडणीवर ठेवत मावशी जायल्या निघाल्या. ऊल्कानेही आरशासमोर ऊभं राहुन तोंडावर शेवटचा पावडरचा थर चढवला. लिपस्टिक व्यवस्थित केली आणि दार काळजीपूर्वक लावुन मावशींपाठोपाठ ऊल्काही घराबाहेर पडली. ईमारतीच्या आवारातली तीची स्कुटी तीची वाटच बघत होती. स्कुटी चालु करुन अगदी हळुवार पणे ऊल्का मुख्य रस्त्यावर आली. मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. ऊल्का कधीच गाडी स्पीडने चालवायची नाही. कितीही ऊशीर झाला तरी. आता ही ती अगदी काळजीपूर्वक गाडी चालवत औफिस जवळ करु लागली.  जसजस औफिस जवळ येऊ लागलं तसतशी तीची अनामिक हुरहुर वाढु लागली.  औफिसची मुख्य कमान, त्यावरचं मोठ्या अक्षरातलं ,सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल * नातं जन्मांतरीचं * हे नाव ऊल्काच्या नजरेत भरलं. आपसुक तीचे डोळे पाणावले. हे औफिस नव्हतच मुळी. तीला स्वतःची मुलगी मानणाऱ्या देसाई दांपत्याने ऊभं केलेलं साम्राज्य होतं. अनाथालय आणि वृद्धाश्रम यांच एकत्रीकरण म्हणजेच * नातं जन्मांतरीचं * होतं. ऊल्का या कुटुबांची देसाई ऊभयांताच्या मागे एकमेव प्रमुख होती. निष्ठेने सांभाळत होती. अनाथ मुल मुली, वृद्धांची प्रेमानं देखभाल करत होती. एकंदरीत नातं जन्मांतरीच मनापासून निभावत होती. औफिसमध्ये पाऊल टाकल्या बरोबर तीची नजर पुर्ण परिसरावर फिरु लागली .एखादं खोडकर लेकरु एखाद्या आजी आजोबांना त्रास देत नाही ना? याचा अंदाज घेऊ लागली. सगळं आलबेल असल्याचे लक्षात आल्यावर ती आपल्या केबिन मध्ये शिरली. समोर देसाई दांपत्याचा भला मोठा फोटो हसऱ्या चेहऱ्याने तिच्या कडे बघत होता. तीला तो भास नक्कीच व्हायचा की आऊ आणि आबा तिच्या कडे बघुन हसतायत. सौ. देसाईंना ती आऊ म्हणायची. देसाई काकांना आबा म्हणायची. आता ही आऊ आणि आबांच्या फोटो कडे बघुन तीने भक्तीभावाने हात जोडले. नामदेवने आधीच अगरबत्ती आणि टपोरी गुलाबाची फुलं फोटो समोर ठेवली होती. ती शांत शांत झाली.  वातावरण प्रसन्न होतं. खुर्चीत बसुन तीने शांतपणे हाताजवळची बेल वाजवली . अदबीने नामदेव समोर येऊन उभा राहिला. हातातली फाईल टेबलावर ठेवुन जाण्याची आज्ञा कधी होतेय याची वाट पाहु लागला. ""मॅडम आज सकाळी चार नविन ऐडमिशन झाली वृद्धाश्रमात "" न विचारताच नामदेवने माहीती पुरवली.  आणि उल्काला खरच राग आला. स्वतःची लहान मुलं, आईवडील जर सांभाळता येत नसतील तर त्यांच्या कमावत्या माणसाने सरळ जीव द्यावा. या विचारांची ऊल्का होती. नविन सदस्य या वास्तूत आले की ऊल्काच्या मनात घालमेल सुरू व्हायची. का सोडतात ही मुलं आईवडीलांना अशा ठिकाणी? का पोसताना त्रास होतो या मुलांना?? आणि जर लहान मुलं आली तर ती घळघळ रडायचीच. तीला तीचं बालपण आठवायच...  आता ही तीने त्रासिक मनाने नविन सदस्यांच्या नावाची फाईल जवळ ओढली. नामदेवला काही जुजबी सुचना देऊन ती नावं वाचु लागली. नामदेव नविन सदस्यांची यादी बनवायचा, संपुर्ण माहीती लख्ख ठेवायचा. पदाने शिपाई असला तरीही.. पुर्ण औफिस छान सांभाळायचा. आताही लगबगीने नामदेव नविन सदस्यांच्या रहाण्याच्या सोयीकडे लक्ष देण्यासाठी निघुन गेला.  ऊल्का नावं वाचु लागली. नविन सदस्यांत एक आजोबा आणि तीन महीला होत्या. एक एक नाव नजरेखाली घालता घालता चौथ्या नावावर ती थबकली. दोन तीन वेळा नाव वाचून ती खात्री करून घेऊ लागली. तीला विश्वास वाटत नव्हता तरी ही ती नाव ,पत्ता डोळे फाडून वाचु लागली.  नावाची, पत्त्याची खात्री पटताच खोली क्रमांक सात मध्ये ऊल्का लगबगीने निघाली. तीची केबिन ते खोली क्रमांक सात हा प्रवास तीला खुप लांबचा वाटला. तीच्या जन्मापासून ते आता पर्यंत ईतका...  ऊल्काने दारावर टकटक केली. दार अर्धवट ऊघडच होतं. आतील स्त्रीने कोण आहे अस कंप पावल्या आवाजात विचारल आणि ऊल्काची खात्री पटली. ती तीची सावत्र आई होती.

ऊल्काने अधीरतेनं दार उघडलं. समोरच्या कॉटवर ती वृद्ध स्त्री झोपली होती. आजारी असावी असा अंदाज उल्काला आला. उल्का आवेगानं त्या वृद्ध स्त्रीच्या जवळ गेली. मायेनं डोक्यावर हात फिरवू लागली. त्या वृद्धेला कळतच नव्हतं की ही मॅडम मला अशी का माया लावतेय? डोळ्यात पाणी भरुन... ऊल्कानं त्या वृद्धेला हाक मारली..'' माई ईथं कशी काय आलीस तु??'" ""कोणी सोडलं तुला ईथे?? " ""आणि अजय विजय कुठे आहेत??"" माई तीच्या या प्रश्नांनी भांबावून गेली. आपलं नाव, आपल्या मुलांची नावं या मॅडम ला कशी काय माहीत या विचारात पडली. ती एकटक ऊल्का कडे बघत राहिली. शेवटी माईच्या मांडीवर डोकं ठेवून ऊल्का बोलुन गेली... ""माई मी ऊल्का.. ओळखल नाहीस तु मला?? हे ऐकल्यावर माईच्या पायाखालची जमीन सरकली. माईच्या अंगातली थरथर वाढली .ओक्साबोक्शी रडत माई ऊल्का समोर हात जोडुन ऊभी राहीली. रडता रडता एकच वाक्य कशीतरी बोलुन गेली ""मुली मला माफ कर ,,तुझ्या या कर्मदरीद्री माईला माफ कर ! तुझे मी छळ केले याचीच शिक्षा मला देवाने दिली. माईला खुप वेळ पोटाशी धरुन ऊल्का हमसुन हमसुन रडु लागली. सकाळ पासून आपल्या मनाला जो ऊदासीपणा आला होता त्याचं कारण तीला कळलं.  माईची चोख व्यवस्था करुन ऊल्का लवकरच घरी पोचली. मुलं, नवरा यांच्या येण्याअगोदरच ऊल्का येऊन बसली होती. पण मन मात्र ' नातं जन्मांतरीच' मध्येच सोडून आली होती. माईला आपल्या घरी आणण्याचं तिने मनाशी पक्कं केलं आणि निश्चिंत मनाने बेडवर पहुडली. माई डोळ्यासमोरून जात नव्हती. बघता बघता ऊल्काच्या नजरेसमोर तीचा जीवनपट ऊलगडु लागला. जो भुतकाळ तीने गाडला होता तोच आज तीच्या समोर उभा होता. 

ऊल्का.... रामराव आणि सुनिता यांची एकुलती एक कन्या. ऊल्का जन्मास आल्यापासून सुनीताबाई आजारी पडु लागल्या. अनेक ऊपचार करुनही सुनिता बाई बरी होण्याचं नाव घेत नव्हत्या. रामराव एका प्रथितयश कंपनीत काम करत होते. विश्वासु आणि मेहनती रामराव कंपनीत आणि समाजातही सज्जन गृहस्थ म्हणुन ओळखले जात होते. सुनिता गृहकृत्यदक्ष स्त्री होती. हसमुख चेहरा आणि प्रेमळ सुनिता शेजार्‍यांच्या ऊपयोगी पडत होती. सुनिता ,रामराव आणि त्यांची वृद्ध आई तिघांचा छान संसार चालु होता. त्यात आता लहानग्या ऊल्काची भर पडली होती. सुखाने ओंजळ भरत असतानाच सुनिताचं आजारपण घरावर दुःखाची छाया पाडीत होतं.  ऊल्का जेमतेम दोन वर्षांची असताना सुनीताबाईंनी ऊल्काचा , रामरावांचा, भरल्या संसाराचा , या जगाचा भरल्या कपाळाने ,भरल्या गळ्याने दुःखद निरोप घेतला. रामरावांचा आधार गेला. ऊल्काचं आईचं छत्र हरपल. रामराव अगदी एकटे पडले.  ऊल्काला छातीशी कवटाळुन रात्रंदिवस अश्रु ढाळु लागले. सुनीताबाईंना जाऊन आता पुरता महीना झाला होता. रामराव हळुहळू घडल्या प्रसंगातुन बाहेर यायचा प्रयत्न करत होते. घराला मृत्युच्या सावलीतुन सावरायचा प्रयत्न करत होते. काळ हा सगळ्याच दुःखावरचं मोठ औषध आहे म्हणतात त्याप्रमाणे ... रामराव ऊल्का, वृद्ध आई,संसार ,कंपनी यांत गुंतुन गेले . ऊल्का आता जवळजवळ तीन वर्षांची झाली होती. रामरावांची आई आता अधुनमधुन आजारी पडु लागली होती. आपल्यापाठी या दोघांचे काय होणार या काळजीने झूरत राहीली. एके दिवशी न राहवून तीने रामरावांना समोर बसवुन त्यांना दुसर्‍या विवाहाची गळ घालुन शप्पथ घातली. आधी प्रचंड आढेवेढे घेऊन रामरावांनी दुसर्‍या विवाहाला मान्यता दिली. रामरावांचा दुसरा विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या आईने ही या जगाचा निरोप घेतला. उल्का ला सावत्र आई आली. उल्काला सीताच्या हाती सोपवून रामराव कंपनीत जाऊ लागले. आता हळुहळू रामराव सीताच्या नविन संसारात गुंतुन गेले. सीता ऊल्काला काही त्रास देते आहे की नाही याचा विचार ही त्यांच्या मनात येत नव्हता. पण अस नव्हतं.. सीता म्हणजेच माई ऊल्काचा प्रचंड छळ करायची. मारझोड, ऊपाशी ठेवणं हे नित्याचच होतं. यातच दिडवर्ष गेलं आणि सीताच्या पोटी अजय विजय या जुळ्यांनी जन्म घेतला. रामराव संसारात अजुनच खुश झाले.  वर्ष सरली ,अजय विजय आता दोन वर्षांचे झाले होते. ऊल्का चांगली सात आठ वर्षांची झाली होती. एके दिवशी कंपनीतुन रामरावांचा हृदयक्रिया बंद पडुन मृत्यु झाल्याचा निरोप आला आणि ऊल्का खऱ्या अर्थानं अनाथ झाली.  आधीच आईच छत्र हरपलेलं ,वडील नाहीत ,त्यामुळे कंपनीने सीता, आणि ऊल्का यांच्या नावावर बँकेत काही रक्कम जमा केली. जेणेकरून तीन मुलांचा सांभाळ सीता योग्य तर्‍हेने करेल. सीताने मात्र ऊल्काच्या नावावरची सगळी रक्कम काढुन घेऊन ऊल्काला घराबाहेर हाकलुन दिलं.  आठ वर्षांची ऊल्का देसाई काकांना एका रस्त्याकडेला भुकेने व्याकूळ होऊन पडलेली दिसली.  प्रेमळ देसाईंनी तीला घरी आणुन तीचा सांभाळ केला. तीला कायदेशीर दत्तक घेऊन 'नाते जन्मांतरीचे ' या वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमाची भावी वारसदार बनवली. ऊल्काचं योग्य शिक्षण ,योग्य वेळी लग्न आणि योग्य मुलाशी लग्न करुन देऊन देसाई काका आणि काकी यांनी या जगाचा निरोप घेतला.  दुसर्‍या दिवशी ऊल्का *नातं जन्मांतरीच * मध्ये एक ठाम निर्णय करुनच गेली. भले माईने तीला लहान वयात हाकलुन देऊन अनाथ केल असलं तरी ती माईला वृद्धाश्रमात ठेवुन बेघर करणार नव्हती.  पोटच्या मुलांनी माई ला हाताला धरुन रस्त्यावर सोडलं होतं. आता ऊल्का माईला स्वतःचा आधार देऊन * नातं जन्मांतरीचं *सार्थ करणार होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy