"मी शाळा बोलतेय" - बंद शाळेचे आत्मवृत्त
"मी शाळा बोलतेय" - बंद शाळेचे आत्मवृत्त
"चिमुकल्या वाचूनी, शाळा लागे सुनी सुनी...
कधी ऐकू येतील रे देवा,बोबडे बोल ते कानी...
ओसाड झाली शाळेची मैदाने, अडखळली पाऊल वाट....
कधी दाटेल ती वर्दळ, हसऱ्या बोबड्या बोलांनी....
संपव रे देवा हा ,कोरोनाचा कहर
पुन्हा नव्याने गुंजू दे शाळेत,प्रार्थनेचे नवे सुर".......
"विसरलात का रे माझ्या लेकरांनो,तुम्ही तुमच्या 'शाळाई'ला? आता तुमच्याजवळ तुमची आई आहे ना रात्रंदिवस, मग कशी येईल माझी आठवण तुम्हाला? 'कोरोना' नावाच्या आलेल्या महाभयंकर संकटानं तुम्हाला नेलय रे माझ्या लेकरांनो माझ्यापासून तुम्हाला दूर,तुमच्या कुटुंबातील प्रेमाच्या माणसानं सोबत. पण माझ्या बोलक्या पाखरांनो, तुमच्याशिवाय एकटीच पडलीये रे मी माझ्या लाडक्यांनो.
तुमच्यावाचून भिंतींनीही अबोला धरलाय माझ्याशी,फळाही रुसलाय माझ्यावर,खडूही कित्येक काळ निघाला नाही बाहेर त्या खोक्यातून,तुमचीही पाऊले बरीचीकाळ फिरकलिही नाहीत माझ्याकडे, खूप एकटी पडल्येय रे मी तुमच्याशिवाय माझ्या लेकरांनो".
" ये मला ओळखलं का? हो बाळांनो, मी तुमची...तुमची शाळा बोलत्येय. कुठे हरवलाय रे सगळे?हे वर्गातले बाक वाट पाहत आहेत तुमची, कसलीच किलबिल वर्गात,कसलाच दंगा नाही,भांडण नाही,सगळं कसं ओस झालंय रे माझ्या लेकरांनो. तुम्हाला सुट्टीच्या वेळेची आठवण करून देणारी घंटा कित्येक दिवस वाजलीच नाहीये.तुमच्या जेवणाच्या सुट्टीतील जेवतानाचा गोंगाट ऐकून माझे कान बहिरे झाले होते माझ्या बाळांनो,पण तोच गोंगाट ऐकण्यासाठी मी खूप आतुरले रे माझ्या पाखरांनो".
"हो रे माझ्या चिमुकल्यांनो, मी तुमची शाळा बोलत्येय. मला तुमची खूप आठवण येत्येय.शाळेत आल्याबरोबर तुम्ही बोबड्या बोलात आपल्या गुरूजींना 'गुडमॉर्निंग सर'आणि आपल्या बाईंना 'गुडमॉर्निंग मॅडम'म्हणायचात. पायातील चप्पल ठरवलेल्या जागेवर ठेवून, पाठीवरच्या दप्तराला वर्गात नेऊन ठेवल्यावर वर्ग सुशोभीकरण करायला लागायचात.फळ स्वच्छ पुसून आपल्या वाकड्या तिकड्या येईल त्या अक्षरांत वार, तारीख,सुंदर असा सुविचार लिहायचात".
"परिपाठाच्या वेळी तुमची ठरल्याप्रमाणे पंचांग पाठ करतानाची तुमची लगभग खुप जवळून पाहिलीये रे मी माझ्या लेकरांनो. तेव्हा कधी कधी मला तुमचा राग यायचा.पण आता ...आता तेच आठवून दिवसरात्र रडते रे माझ्या बाळांनो. तुमच्या गोड आवाजात 'राष्ट्रगीत','प्रार्थना', ऐकण्याची सवय झाली होती रे पिल्लांनो. तुम्ही जेव्हा जोरात छाती फुगवून 'भारत माझा देश आहे' ही प्रतिज्ञा म्हणताना तुमच्या चेहऱ्यावरचा मला आता दिसेनासा झालाय. मला तुमची खूप ..खूप आठवण येत्येय रे माझ्या बोलक्या पाखरांनो. या कोरोना नावाच्या कधीही न आलेल्या संकटानी आपली ताटातूट केल्येय रे. मला बंद केलंय बाळांनो,कधी होईल आपली भेट कोण जाणे?"
' माझ्या पाखरांनी माझं जाऊद्या,मी तर आहे आता बंदिस्त; पण तुम्ही खुपच हट्टी आहात, तुम्हीं कुणाचं ऐकत नाहीत.स्वतःची काळजी घेताय ना? काळजी घ्या लेकरांनो स्वतःची.तुम्हाला खेळताना, हसताना पहायचं आहे मला. ऐकाल ना रे माझं माझ्या बाळांनो"..
"आपल्यावर हे जे महामारीचं संकट आलंय ते घालवण्यासाठी ते पोलिसमामा,डॉक्टर काका,नर्सताई,सफाईकामगार हे सारेच रातरणदिवस लढतायेत रे जीवतोडून बाळांनो आणि या महामारीच्या संकटाशी लढताना जात आहेत कित्येक हे जग सोडून आपले काळजी घेणारे. आपल्याही आजूबाजूला काहींच्या घरातील व्यक्ती या महामारीचा शिकार होतोय रे माझ्या लेकरांनो. जपा स्वतःला,काळजी घ्या आपल्यांचीही".
"हो बाळांनो, आपणच जिंकणार आहोत ही कोरोनाची लढाई. आपल्या प्रयत्नांपुढे या कोरोनाला हरावच लागणार आहे कायमचं. तुमची चिमुकली पाऊलं येणार आहेतच माझ्याकडं, माझ्या अंगा खांद्यावर खेळण्यासाठी. वर्ग पुन्हा भरून वर्गातील दंगामस्ती,अभ्यास जोमाने सुरू होणार आहे लवकरच माझ्या लेकरांनो".
"आजवर तुम्ही लिहिलात माझ्यावर निबंध,'माझी आवडती शाळा',पण आजच्या घडीला या कोरोनाच्या महामारीमुळं मला बंदिस्त अवस्था आलीये आणि म्हणूनच माझ्या सर्व लाडक्या लेकरांच्या आठवणीत मी आज लिहिणार आहे निबंध,'माझे आवडते विद्यार्थी'म्हणून तुमच्यावर,तुमच्यासाठीच".
" तुम्ही या ना रे बाळांनो लवकर. मी तुमची शाळा वाट पहात्येय लेकरांनो तुमची. सर्व सुरळीत होईल ,पुन्हा नव्याने गुरुजींचे शिकवणे,बाईंच्या गोड आवाजातील कविता ,तुमचा किलबिलाट माझे सारे वातावरण मंत्रमुग्ध होईल.तुम्ही माझ्या अंगा खांद्यावर खेळालं,रडाल -हसाल नव्याने. तुमच्या येण्याने ओसाड झालेलं मैदान पुन्हा माझ्या बोलक्या चिमण्यांच्या आवाजाने हादरून जाईल".
"हो रे माझ्या प्रिय.. लाडक्या विद्यार्थ्यांनो मी तुमची...तुमचीच शाळा बोलत्येय.मला तुमची खूप आठवण येत्येय....खूप खूप आठवण येत्येय रे लेकरांनो"....
"तुमचीच लाडकी शाळा"......
