मैत्री
मैत्री


आज अचानक मार्केटमधून येताना प्राचीला स्नेहा दिसली. कितीतरी वर्षांनी प्राची व स्नेहाची भेट झाली होती. दोघींना पण खूप आनंद झाला. पण स्नेहा प्राचीकडे स्मितहास्य करून काहीही न बोलता तिच्या गाडीमध्ये बसून निघून गेली. प्राचीला तिचे असे वागणे आवडले नाही. तिच्या मनात विचारांनी गोंधळ घालणे सुरू केले. तिला अगोदरचे दिवस आठवले. दोघींची मैत्री आठवली.
प्राची व स्नेहा दोघीही नागपूरच्या एकाच कॉलनीत राहणाऱ्या बालपणीच्या मैत्रिणी. दोघी एकमेकींसाठी जीव की प्राण असणाऱ्या. स्नेहाला डॉक्टर व्हायचे होते आणि ती डॉक्टर झाली. तर प्राचीने स्नेहाच्या आग्रहाखातर law केले आणि ती पण वकील झाली. दोघींचेही लग्न झाले. स्नेहाने तिच्याच क्षेत्रातील एका डॉक्टर मुलाशी लग्न केले व पुण्यामध्ये स्थायिक झाली. तर प्राचीने एका सरकारी नोकरीत प्राध्यापक असणाऱ्या मुलाशी लग्न केले व ती नागपूरलाच होती. दोघीही मैत्रिणी खुश होत्या. अधून मधून भेटी होत होत्या. फोन कॉल्सही सुरू होते. त्यातच प्राचीने न्यायाधीशाची परीक्षा पास केली होती. आता ती न्यायाधीश झाली होती. हे सर्व सांगण्यास तिने स्नेहाला फोन केला पण तिचा फोन स्वीचऑफ दाखवीत होता. त्यानंतरही तिने बरेच फोन केले पण तिचा काही प्रतिसाद येत नव्हता. अचानक डोअरबेल वाजली आणि प्राची तिच्या विचारातून जागी झाली.
प्राचीने दार उघडले. तिचा नवरा घरी आलेला होता. तिने तिच्याशी घडलेली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. त्यालाही आश्चर्य वाटले. पण त्या दिवसापासून प्राचीला करमेना. केवळ स्नेहाचा विचार करायची. एके दिवशी प्राचीला स्नेहाचा फोन आला. तिने प्राचीला भेटण्यास बोलावले. प्राची तिला भेटण्यास गेली व तिच्या आवडीची नारळाची बर्फी नेली. प्राचीला पाहून स्नेहा खूप खुश झाली व तिच्या जवळ रडू लागली. प्राचीने तिला समजावले व तिला सर्व विचारले.
तिने संगितले की, माझा नवरा माझा मानसिक व शारीरिक छळ करतो. माझं हॉस्पिटलमध्ये जाणं बंद केले कारण हे की एका दुसऱ्या डॉक्टरसोबत मी बोलत होते. त्या दिवसापासून त्यांनी मला मारहाण सुरू केली. त्यांना आताच मूल नको म्हणून माझे दोन गर्भपात केले. माझे बाहेर येणे-जाणे बंद केले. मला त्याची खूप भीती वाटते प्राची. मी त्याला न सांगता त्याच्या चोरून माहेरी आली आहे. त्याचे रोज फोन येतात. आई-बाबांना मी आली आहे का म्हणून, पण आई-बाबांनी ती इथे नाही म्हणून सांगितले आहे. त्यांनी मला शोधण्यासाठी सर्वकडे पोलीस लावले आहेत. त्यामुळे मी त्या दिवशी तुझ्याशी बोलली नाही. मला त्याच्यापासून घटस्फोट पाहिजे. प्राची प्लीज माझी मदत कर. प्राचीने स्नेहाची अवस्था पाहून तिला न्याय मिळवून द्यायचे ठरवले.
प्राचीच्या सांगण्यावरुन स्नेहाने कोर्टात केस केली व तिच्या नवऱ्याकडून घटस्फोट घेऊन वेगळी झाली. आता स्नेहा खूप खुश आहे. तिने आता परत लग्न न करण्याचे ठरविले आहे. तिने एका अनाथ मुलीला दत्तक घेतले आहे व परत स्वतःचा दवाखाना सुरू केला आहे.
आता परत प्राचीची व स्नेहाची मैत्री आणखी घट्ट झाली आहे. जी काही कारणामुळे दुरावली होती. खरंच मैत्री असावी तर प्राची व स्नेहासारखी. संकटकाळी नेहमी साथ देणारी.