मासिक पाळीच्या व्यथा…
मासिक पाळीच्या व्यथा…
सर्वांना दंडवत…
आज काहीतरी वेगळं लिहावं असं ठरवलं,खूप विचार केला लिहावं की नाही लिहावं,आपल्या लिहिण्यातून कोणाला त्रास तर होणार नाही…?
पण शेवटी लिहावं हाच निर्णय घेऊन लिहायला सुरुवात करतोय.
आज समाजात सर्वत्र एक विषय खूप गाजतोय,नव्हे चघळल्या जातोय तो विषय म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी.
जुनं ते सोनं म्हणून त्याला सन्मान देण्याची आमची महाराष्ट्र परंपरा आहे,आणि हीच प्रथा जपत जपत आमचे पूर्वज आले,आणि आता पुढील पिढी सुद्धा ते पाळण्याचा प्रयत्न करत आहे.त्यात एक कुप्रथा खूप जपल्या जाते,ती प्रथा म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी.
परंपरा प्रथा जपताना ही नको असलेली प्रथा खूप जपल्या गेली.
लहानपणी मुक्त खेळणारी एक सोनपरी जेव्हा तारुण्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवतं असते,तेव्हाच तिच्या माथी नको असलेली ही प्रथा मारल्या जाते.
तिला त्या दिवसांत ४-५ दिवस सर्वांपासून दूर ठेवल्या जाते
वेगळं ठेवल्या जाते.धार्मिक क्रिया विधिनिषेध सर्व तिच्या विरहित होतं असतात. ज्या विधात्याने ही समग्र सृष्टी तयार केली,किडा मुंगी पासून तर हत्ती उपलक्षणे समग्र जीवजंतू तयार केले त्याच विधात्याला कोडं पडावं असे हे कार्य.
परंतु आज मी एक सत्य विज्ञानाच्या दृष्टीने प्रस्तावित केलेलं खरं कारण मांडण्याचा प्रयत्न करतोय…
जेव्हा स्त्रियांना मासिक पाळी येते तेव्हा तिला खूप रक्तस्त्राव होत असतो,ती खूप थकलेली असते आणि म्हणून तिला आराम मिळावा म्हणून या साठी काहीच काम करू देत नाही…
पण याचा उलट अर्थ धार्मिक पंडितांनी काढला आणि त्या काळात देवाला सुध्दा हात लावू नये असे फर्मान यांनी काढले.असे केल्यावर दोष घडतो आणि नियम उल्लंघन होते.
मात्र यात प्रत्यक्ष परमेश्वराने कोणतेच नियम नाही लावले एक सर्वांना पटेल असे महाभारताचे उदाहरणं देतो
पहा पटतंय का…?
जेव्हा पाच पांडव द्यूत खेळून सर्व संपत्ती राजपाट हरतात,तेव्हा युधिष्ठिर द्रौपदीला पणाला लावतो त्यात सुद्धा हरल्यावर मग द्रौपदीस भरसभेत ओढत आणायला दुर्योधन सांगतो.
मुख्य भाग तर इथेच आहे,जेव्हा दु:शासन द्रौपदीला आणायला जातो तेव्हा द्रौपदी एक वस्त्रात असते,रजस्वला झालेली असते,ती हे सांगते सुद्धा तरीपण तिला ओढत फरफट दु:शासन भर सभेत घेऊन येतो.
तिला निर्वस्त्र करावं अशी आज्ञा दुर्योधन देतो.
सर्वांची आशा करत करत द्रौपदी हताश होते शेवटी एकच आशेचा किरण तिला दिसतो तो किरण म्हणजे जगनियंता अनाथांचा नाथ भगवान गोवर्धन धारी श्रीकृष्ण.
त्यांचा आर्त मनाने तिने धावा केला,देव आले कपड्यांचे ढिगार पडले आणि एका भावाने आपल्या बहिणीची लाज वाचवली.
आशा करतो की आपण ही कृष्ण लीला वाचली असेल पण यात खरं काय ते पाहिलं का…?
द्रौपदी जेव्हा महालात आली तेव्हा ती नुकतीच रजस्वला झालेली होती,एक वस्त्रांत होती मला फक्त इतकेच सांगायचे जर मासिक पाळीत देवाला हात लावणं दोष मानलं जातं तर मग त्या वेळेस श्रीकृष्ण कसे आले,त्यांनी द्रौपदीला मदत का केली…?
मला काय म्हणायचं ते आपल्याला कळलं असेलच.
मला जे मांडायचे ते मी मांडलं सांगितलं.
प्रत्यक्ष परमेश्वराने जर हा भेद नाही केला तर ते करणारे आपण कोण आहोत.
मला गर्व आहे मी महानुभाव पंथीय आहे कारण माझ्या देवाने श्री चक्रधरांनी स्त्री,पुरुषांच्या बाबतीत असा कोणताच भेद नाही केला,सर्वांना सम दर्जाची वागणूक दिली.
मासिक पाळी अंधश्रद्धा बुवाबाजी ढोंगी यांच्या पासून कितीतरी लांब आमचं ब्रम्हविद्या शास्त्र आहे.
जे शास्त्र फक्त मोक्षप्राप्ती कशी होईल याचीच माहिती देतं.
आशा करतो की मला आहे सांगायचं होतं ते आपल्याला कळलं असेल.
पुन्हा एकदा दंडवत…