मार्केट
मार्केट
अंगावर अगदी डबडबून घाम येऊ लागला होता. नाही म्हणायला पुण्याच्या मार्केट यार्डातली गर्दी पाहून मला आधीतर मनात फारच कमीपणा जाणवला. असं होतं, सहसा आमच्या गावठी लोकांच तरी हेच होतं. मी आणि माझा मित्र इथे आलो होतो. इथे दोन किलो सफरचंद तेवढी खरेदी केली. बाकी मार्केटचा अंदाज लावत फिरत बसलो. सर्वात पहिले इथे आल्यावर किलोनी गोष्टी मिळतील तरी का इथपासून आमची सुरूवात झाली. कारण सगळीकडे कॅरेट भरलेले दिसू लागले होते. पण इथे असलेला गलिच्छपणाही फार विचित्र वाटू लागला होता. एवढ्या पिकाची नासाडी काही केल्या खरा शेतकरी कधीच होऊ द्यायचा नाही. पण मुद्दा हा होता की इथे कोणीच शेतकरी नव्हता. आणि इथे एखाद्या शेतकऱ्याला कोणी मेळ लागूही दिला नसता. सकाळीच फार काही पाहिलं आणि पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या हलाखीच्या परिस्थितीवर विषय येऊन पोहोचला. कधी शेतकऱ्याला मार्केट उपलब्ध होत नाही, कधी अवकाळी पाऊस, दुष्काळ, पिकावर रोग तर कधी ना कधी इतर काही गोष्टी चालूच राहिलेल्या असतात.
बऱ्याच गोष्टी पाहून सारकाही मनात धुसमुसत होतं. खास करून नुकतेच पाडलेले सोयाबीनचे भाव मनात सर्व लोकांविरूद्ध रोष निर्माण करू लागले होते. फक्त सरकारविषयी नसून सर्व लोकांविषयी का? या प्रश्नाचं साध उत्तर आहे, आपणही कुठेतरी नकळत का असेना शेतकऱ्यांच्या परिस्थितीला जबाबदार ठरतो आहोत. आपली बाजारपेठ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली का नाही? खरतरं इतरही काही प्रश्न आहेत, जे मांडू लागलो तर कदाचित संपादकीय लेख लिहण्याप्रमाणे हे कथानक वाटू लागेल. मी ज्या मित्रासोबत इथे आलो होतो त्याच नाव रामा. रामाकडे सुमार अशी एकूण चाळीस एकराची शेती आहे. त्याच म्हणणं आहे, त्याला स्वकर्तृत्वाने आणखी खुप काही गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे तो चाळीस एकराला अजूनतरी स्वत:चा हिस्सा समजत नाही. ही गोष्ट फार वाखाणण्याजोगी आहे.
रामाच्या आयुष्यात कधी एके काळी एक मुलगी येऊन गेली. तिच्याबद्दलच्या कोणत्या गोष्टींची चर्चा इथे करावी हा प्रश्न मर्यादेत अडकून पडल्यासारखा जाणवू लागला आहे. पण नाईलाजाने जे घडलं ते एका शेतकरी कुटुंबात घडलं आणि शेतकऱ्यांशी त्याचा संबंध होता म्हणून त्याच वर्णन करणं मला इथे भाग पडलं आहे. त्या मुलीचं नाव होतं, रती. रती त्यावेळी इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती आणि तिचा बाप तिच्या हुशारीवर फार खुश राहत होता. तिच्या बापाने आपल्या शेतीच्या जोरावर मुंबईसारख्या ठिकाणी एका भागात छोटीशी जागाही स्वत:च्या नावाची घेऊन ठेवली होती, हे विशेष होतं. रतीला मोठा एक भाऊ होता, दत्ता. ज्याचं शिक्षण नुकतचं ग्रॅज्युएशनचं सुरू होतं. आणि एके दिवशी एक बाका प्रसंग या घरावर ओढावल्या गेल्या. रतीचा बाप सर्वांना सोडून स्वर्गवासी झाला. तो मेला, मरताना पुढच्या भविष्याची सारी चिंता रती तिचा भाऊ आणि रतीची आई यांच्या माथी देऊन गेला. शेतकऱ्याच्या नशीबी कायम संकट असतचं की नाही कोण म्हटलं? पण थेट मृत्यू यावा? शेतात पाणी देण्यासाठी विजेच्या तारा नीट करायला त्याला विजेच्या डिपीची दुरूस्ती स्वत: करायची वेळ आली. गावातल्या लोकांनी तीन दिवस लाईटमनकडे तक्रार करूनही त्याने दुर्लक्ष केलं होतं. शेतीतल्या पिकाला पाण्याला उशीर झाला तर पिकाचं नुकसान होईल या भितीने शेवटी रतीचा बापचं वायर नीट करायला गेला. रातीच्या बाप खमखा होता, याआधी त्यान अशी काम बरीच केली होती. पण यावेळी मात्र घात झाला. विजेनं भयान झटका दिला आणि तो जागीच ठार झाला.
रतीच्या आयुष्यात पुढे तिला अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. गावातल्या लोकांच्या नजरा कधी एखाद्याच्या वाईटावर फिरतील हे सांगता येत नाही. दत्ता नित्यनेमाने कॉलेजला न जाता शेती पुर्णवेळ पाहू लागला. आई बैलं, गाय, म्हैसं यांच्याकडं लक्ष देऊ लागली होती. रती तिला आणि प्रसंगी आपल्या भावाला अर्थात दत्ताला शेतातही मदत करायला जाऊ लागली होती. रतीच्या भर जवानीच्या दिवसांमधे तिचं रूप चांगलच खुललेलं होतं आणि त्या रूपावर कितीतरी पारावर बसणारी रगेल बोड्याची पोरं भाळली होती. रती मात्र सारकाही दुर्लक्ष करत आपला लढा चालू ठेवत जगू लागली होती. पुढच्या सहा महिन्यांमधे एक प्रचंड आघात त्या कुटुंबावर झाला. आईला कॅन्सरसारख्या आजाराने घेरलं होतं. आणि ते समजायला फार उशीर झाला होता. आईला वाचविण्याचे थोडथोडके प्रयत्न करण्याच्या उद्देशाने मुंबईतली जागा अखेर विक्रीला काढल्या गेली. दत्ता म्हणतं होता शहरात जाऊन राहू, शेती विकून टाकू आणि पैसा जमा करू. पण शहरी जीवन प्रचंड प्रमाणात आणखी हालाकीच करून सोडणारं, याची जाणीव रतीला वेळीच आली होती. तिने शेती विकायची नाही हा ठाम निर्णय केला. शेवटी काही दिवसांनी जागा तर गेलीच शिवाय आईवर उपचारांचा परिणाम न झाल्याने तिलाही हे जग सोडावं लागलं.
रतीचा बाप जिवंत होता तवा गावातल्या कुणाची त्या घराकडं जराही वाकड्या नजरेनं बघायची काहीच टाप झाली नव्हती. बाप आणि आई
गेल्यानंतर रतीसाठी दत्ताला पाच सहा टोळक्यांनी एकत्र गाठून दोन तीनवेळा चोपला. दत्ता तालुक्याला पोलीसांची मदत घ्यायला गेला खरा पण कुणीही त्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही. रतीच्या घराशेजारीच एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या घराला आजवर आपलं घर समजूनच नेहमी मदत केलेली होती. रतीच्या बाबतीत बाहेरची पोरं माजलीच हे समजतात याच घरातल्या मोठ्या कर्त्या पुरूषाने पंचायत बोलावली आणि त्या सर्वांचा चांगलाच निकाल लावला. परिणामी रतीच्या वाट्याला दुर पण तिच्याकडे पाहणाऱ्या नजराही आता गपगुमान झाल्या. रतीच्या उर्वरित आयुष्याची ज्योत प्रज्वलित राहिली आहे. तिला आणि तिच्या भावाला खुप काही टप्पे अजूनही पार करायचे आहेत. विशेष म्हणजे, रती सारखी खंबीर व संयमी मुलगी आणि दत्तासारखा सतत कितीही कष्ट करायची जिद्द बाळगणारा पुरूष एका नव्या पद्धतीचं समीकरण आपल्या नजरेत उभं करतात. पण या समीकरणांना करावा लागलेला त्याग, वाट्याला आलेला अंधार, फार अस्वस्थ वाटतं राहतो.
