STORYMIRROR

sayali kulkarni

Tragedy

2  

sayali kulkarni

Tragedy

माझं बाळ माझी कमजोरी नाही

माझं बाळ माझी कमजोरी नाही

5 mins
228

"पाच वर्षे झाली की ओ आता ह्यांच्या लग्नाला...अजून कसलं बाई ह्यांचं प्लॅनिंग? आता शेजारीपाजारीसुद्धा विचारू लागलेत कधी देताय नातवंडाची गोड बातमी? कधी विचार करणार हे दोघे देवालाचं माहीत..." भाग्यश्रीताई वैतागून विवेकरावांना म्हणाल्या.

"अगं उशीर होईल पण नक्की त्यांना गोंडस, गोजिरवाणं बाळ होईल बघ तू. आणि तू एवढे उपासतापास, व्रत वैकल्य करतेस मग तुझा देवावर विश्वास नाही का? एक दिवस नक्की चमत्कार होईल बघ." आपल्या पत्नीला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न विवेकराव करत होते.

असेंच काही महिने उलटले, नवस उपास आणि विविध डॉक्टरांच्या प्रयत्नांनी अखेर श्वेता आणि सोहमने गोड बातमी दिली आणि भाग्यश्रीताईंना अक्षरशः आकाश ठेंगण झालं. श्वेताला कुठे ठेवू अन कुठे नको असं त्यांना होई. तिचं खाणंपिणं, औषधं सगळं त्यांनी जपलं. आपलं संधिवाताचं दुखणं विसरून त्या ओट्यापाशी पदर खोचून उभ्या राहिल्या. श्वेताला घरचं सकस अन्न मिळावं म्हणून त्यांचा प्रयत्न असे. पोटातल्या बाळासोबत श्वेतालाही सगळं पौष्टिक मिळेल असं त्या नेहेमी पहात. संपूर्ण नऊ महिने श्वेताला त्यांनी अगदी अलगद फुलाप्रमाणे जपलं. तिला एकही काम करून नं देता संपूर्ण आराम कसा मिळेल ह्याकडे त्यांनी लक्ष दिलं.


आपल्या सासूबाईंच्या बदललेल्या पण हव्याहव्याशा ह्या रुपाकडे पाहुन खरंतर श्वेता मनातून खुलली होती. आपल्या बाळाच्या येण्याने सगळं मंगल होतंय हे लक्षात आल्यावर तर तिला अजून अश्वस्थ वाटे.

दिवस सरत गेले. आणि अखेर श्वेताला बाळंतकळा यायला सुरुवात झाली. पाहिलं बाळंतपण असलं तरी तिला माहेरी नं पाठवता भाग्यश्री ताईंनी सगळी जबाबदारी स्वतः पार पाडण्याचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे श्वेताला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. ऐनवेळी स्ट्रेचरवर बसतांना तिचा पाय घसरला आणि ती पोटावर पडली. बाळंतकळा आणि त्यात हा अपघात श्वेताची शुद्ध हरपू लागली होती.

"काहीही करा डॉक्टर पण माझ्या सुनेला वाचवा...." एवढं बोलून भाग्यश्रीताई दवाखान्यातल्या बाकावर कोसळल्या. त्यांच्या हातापायातलं अवसान गळून पडलं होतं. पुढे दिसत होता काळोख....

एवढयात ऑपरेशन थेटरमधून बाळाचा टाहो ऐकू आला आणि सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. स्थिरस्थावर झाल्यावर डॉक्टरांनी गुलाबी कपड्यात गुंडाळून एक चिमुकली गोजिरी बाहुलीसमान मुलगी आणून सोहमच्या हातात दिली आणि आनंदाला पारावार उरला नाही. सिझेरियन डिलिव्हरी झाली होती आणि बाळही अतिशय नाजूक होतं. आई आणि बाळाच्या आरोग्याची काळजी म्हणून दोघांनाही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं.

आठवडाभरात श्वेताला बऱ्यापैकी हुशारी आली होती. पण जवळ आपलं बाळ नाही म्हणून ती चिंतेत असे. त्यामुळे दिवसेंदिवस तिची तब्बेत ढासळत चालली होती. एकीकडे बाळ आणि एकीकडे नवं प्रसूती झालेली नाजूक अवस्थेतली सून....! भाग्यश्री ताई नुसती धावपळ करत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एक आठवडा उलटला तरी बाळाच्या प्रकृतीत म्हणावी इतकी सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्या चिमुकल्या जिवाच्या बाकी टेस्ट करणं आता अवश्य होतं. ह्यासाठी हवी होती बाळाच्या आईबाबांची खंबीर साथ....!

पहिल्यांदा हे सारं समजल्यावर श्वेताला मोठा धक्का बसला होता. मरणातीक कळा सोसून जन्म दिलेल्या पोटाच्या गोळ्याची काचेच्या पेटीत बंद असलेली इवलीशी छबी तिच्या डोळ्यासमोरून हलेचं ना.... काहीही झालं तरी आपल्या छकुलीला ह्यातून बाहेर काढायचं ही जिद्द आता श्वेताने धरली. तिच्यातील आई आता जागी झाली होती.

एकीकडे आपण सगळी पथ्यपाणी सांभाळून, औषधे आणि बाकीही गोष्टी व्यवस्थित सांभाळून घेऊनही श्वेताला झालेलं बाळ असं अबनॉर्मल का असावं..? ह्या प्रश्नांनी भाग्यश्रीताईंभोवती पिंगा घातला होता. आपल्या मुलाच्या सुनेच्या आयुष्यात अपत्य सुख नाहीच का असंही त्यांना वाटून गेलं...

आपलं बाळ कसंही असलं तरी त्याच्या आईला ते प्राण प्रिय असतं हे अगदी खरं. श्वेता आणि तिच्या छकुलीच्या बाबतीतही हे अगदी लागु होतं. असह्य कळा सोसून आणि डिलिव्हरीच्या दरम्यान गंभीर दुखापत झालेली असतांनाही ही ओली बाळंत आई आपल्या पिल्लासाठी भक्कमपणे उभी राहिली.

दवाखान्यातले हेलपाटे... बाळाला टोचलेल्या असंख्य सुया आणि छकुलीच्या नाकातोंडातून घातलेल्या त्या वायर्स.... आईपणाच्या सुंदर जगात पाऊल ठेवतांना आपल्या तान्हुल्याचे लाड करायचे सोडून हे पाहावं लागेल ह्याची कल्पनाही त्यांना नव्हती. फक्त सोहमचा घट्ट पाठिंबा आणि छकुलीवरचं तिचं प्रेम हिचं तिची प्रेरणास्त्रोत होती. रोज नवनवीन आव्हानं त्यांच्या समोर उभी राहत. कधी छकुली उपचारांना प्रतिसाद देई कधीकधी तर निपचित पडून राही. इवलीशी ती पण किती मोठी स्ट्रगलर आहे हे पाहून मात्र श्वेता आपल्या बाळावर मनोमन प्रेम करी.

अखेर श्वेताची परीक्षा संपली. तो दिवस आला...ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते. छकुलीच्या जन्मानंतर आज बरोब्बर तीन महिन्यांनी ती घरी जाऊ शकणार होती. जन्माच्या वेळी कमी पडलेल्या ऑक्सिजन मुळे चिमुकल्या छकुलीला आता आयुष्याभर ऑक्सिजन मास्क आणि बाकी काही अत्यावश्यक औषध सोबत वागवावी लागणार होती. छकुली ही सामान्य मुलीप्रमाणे कधी बरी होईल हे काही सांगता येणार नाही असेही डॉक्टरांनी स्पष्ट सांगीतलं.

पण काहीही झालं तरी आपलं बाळ मृत्यूच्या दाढेतून वाचलं आणि आज आपल्या कुशीत आहे हे पाहून श्वेताचं उर भरून येत होतं. असेंच दिवस सरत होते. छकुलीही चंद्रकोरीप्रमाणे मोठी होत होती. सगळं घर सांभाळून श्वेता आपला सगळा वेळ छकुलीसाठी देत होती. तिची बौद्धिक क्षमता इतर नॉर्मल मुलांच्या तुलनेत जरी कमी असली तरी तिच्या डोळ्यांत आसलेली चमक श्वेताला तिच्यात गुंतवुन ठेवी. दरम्यान भाग्यश्रीताईंनी दुसऱ्या बाळाचा विचार करण्याचं श्वेता सोहमला अडून अडून सुचवलंही होतं. पण आता छकुली हेंच आयुष्याचं ध्येय आहे असं ठामपणे श्वेताने त्यांना समजावून सांगितलं होतं. शेवटी आयुष्यातले अंतिम क्षण सुखाने व्यतीत करावेत म्हणून भाग्यश्री ताई साऱ्यापासून अलिप्त राहत. तसही तिच्या जन्माच्या वेळी हे घडलं त्या वेळेपासूनचं त्यांना छकुलीबद्दल फारशी काही प्रेम माया वाटलीचं नव्हती. आता तर इच्छा आणि शारीरिक परिस्थिती दोन्ही साथ देइनात. त्यांनी ह्यातून अंग काढूनचं घेतलं होतं.

पण घरातलं सगळं व्यवस्थित सांभाळून श्वेता मात्र छकुलीला निगुतीने मोठी करत होती. तिची औषधं, दवाखान्याच्या फेऱ्या सोबतचं सासू सासऱ्यांचं आजारपण आणि नवऱ्याची सारी कर्तव्य ती यथायोग्य पार पाडत होती. छकुली एक स्पेशल मूल होती त्यामुळे सगळ्यांपेक्षा तिच्याकडे लक्ष देणं ही श्वेताची प्रायोरीटी होती.

"श्वेता बाळ थकत नाहीस का गं? दिवसभर पळत असतेस ह्या वेडीच्या मागे...! हे बाळ म्हणजे तुझी कमजोरी बनून राहीलं आहे. छकुलीमुळे नाही तू तुझ्या करियर कडे लक्ष देऊ शकतेस नाही दुसऱ्या बाळाचा विचार करू शकतेस... हे बाळ तुझ्यासाठी फक्त एक बंधन आहे. अवजड बेडी...!" नं राहून भाग्यश्री ताई म्हणाल्या.

"आई काहीही काय बोलताय तुम्ही. छकुली फक्त सहा महिन्यांची आहे. तिला वेळ देणं ही माझी आणि तिचीही प्राथमिक गरज आहे. आणि राहिली गोष्ट वेडेपणाची. तर त्यातूनही एक दिवस ही नक्की बरी होईल. मला विश्वास आहे. मेडिकलशास्त्र प्रगत आहे. आपण थोडा पेशन्स ठेवायला हवा नं आई. आणि छकुलीला मी कळा सोसून जन्म दिलाय. आमची नाळ जोडलेली होती आई... तर छकुली माझी कमजोरी नाही तर माझी ताकद आहे. जीवनात संघर्ष काय असतो ते शिकवणारी माझी इवलीशी लेक माझ्या आयुष्यातली सगळ्यांत महत्वाची व्यक्ती आहे...तिच्याकडे पाहून मला लढण्याची हिम्मत मिळते. आत्ता आपल्या परीक्षेची वेळ आहे आई...एक कठोर परीक्षा... बहुतेक त्यानंतर सुख दरवाज्या आड आपली वाट पाहत असेल नाहीका....? " आता श्वेताच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या होत्या.

श्वेताचं बोलणं ऐकुन भाग्यश्री ताईंना आपली चूक उमगली. एक आई आपल्या बाळासाठी किती आणि काय संघर्ष करू शकते हे त्यांना कळलं. आपली सून फक्त एक आदर्श सून नाही तर एक गोड आणि जबाबदार आईही आहे ही जाणीव त्यांना सुखावून गेली. प्रत्येक आईची ताकद तिची बाळं असतात आणि ते मातृत्व स्त्रीला अजून समृध्द करत जातं....अगदी छकुलीच्या आईसारखं!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy