Smita Rai

Tragedy

4  

Smita Rai

Tragedy

माझी अलेक्झांडर

माझी अलेक्झांडर

8 mins
1.0K


 “काकू, आता मी तुमच्याकडे कामाला येऊ शकणार नाही” सविता, माझ्याकडे काम करणारी मुलगी एक दिवस मला म्हणाली. ते ऐकून माझ्या मनात राग, काळजी, चिडचिड अशा अनेक भावना एकाचवेळी निर्माण झाल्या.


“का?” आणि “किती दिवस?” मी तिला विचारले.


“कायमचच” तिने उत्तर दिले.


“कायमचच? म्हणजे?” मी तिला विचारले.


“माझं लग्न ठरलंय” तिचे कुठल्याही भावभावनांचा समावेश नसलेले भावनाशून्य कोरडे उत्तर.


“काय?” मी जवळजवळ ओरडलेच.


“हो, माझ्या घरच्यांनी ठरवलंय” तिचे आता अजूनच कोरडे उत्तर.


अशा काही उत्तराची अपेक्षा नसल्‌याने मला काय बोलायचं तेच सुचेना. 


हा साधारण सहा सात वर्षांपूर्वीचा प्रसंग. सविता माझ्याकडे काम करणारी सतरा अठरा वर्षांची मुलगी. काळीसावळी, पण नाकी-डोळी निरस, शांत स्वभाव. अत्यंत टापटिपीची अशी “सविता”. बोललेले जरा उशीरा समजायचे पण लाघवी होती. तिच्‌या घरी तिची धाकटी बहिण, मोठा भाऊ व एक धाकटा भाऊ अशी भावंडं व आई-वडील. आई तिच्यासारखीच घरकाम करत असे व वडील भंगार गोळा करत व लग्नसराईमध्ये सनई वाजवायला जायचे. भाड्‌याने एका वस्तीत पत्र्याच्या खोलीत सहा जणांचे कुटुंब राहायचे. उत्पन्न कमी आणि खायची तोंडे जास्त. त्यामुळे एका अतिसामान्य कुटुंबाप्रमाणेच विचारसरणी व राहणीमान. आजचा दिवस साजरा करायचा एवढेच एकमेव ध्येय असलेले असे कुटुंब. दोन मुलांना व्यवस्थित शाळा शिकवायचे का तर ती मुले होती पण दोन वर्षांनी लहान बहिण चौथीतच शाळा सोडलेली आणि ही चौथी नापास झाली म्हणून शाळा सुटलेली. दोन्ही भाऊ, दोघी बहिणीपण छोटी-छोटी कामे करून वडिलांच्या संसाराला हातभार लावत होते.


शेवटी मी विचारलेच, “ठिक आहे, पण मुलगा? तू बघितलंस का? काय शिकलाय? कुठे राहतो? काही व्यसन नाही आहे ना?” या माझ्या सर्व प्रश्नांना तिचे एकच उत्तर मिळाले, “आई-बाबांनी ठरवलंय आणि सगळं ठरलंय”.


“त्या मुलाने किंवा त्याच्या घरच्यांनी तुला बघितलंय का?” माझा प्रश्न.


“फोटो बघितलाय माझा” तिचे उत्तर.


एकंदरीत मी समजून गेले की हे लग्न होण्यामागचा एकमेव उद्‌देश म्हणजे हिच्या घरच्यांच्या दृष्टीने एक खाणारे तोंड कमी करणे आणि एका मुलीच्या जबाबदारीतून मोकळे होणे आहे आणि हेच भाव तिचा चेहरापण सांगून गेले. मला अत्यंत वाईट वाटले. एक सोळा सतरा वर्षांची मुलगी , जी अजून कुठलीही जबाबदारी स्विकारण्याच्या शारीरिक वा मानसिक अवस्थेत नाही, तिला परिस्थितीमुळे असे जबरदस्तीने, “लग्न” अशा आयुष्‌यातील सुंदर प्रसंगाला नाईलाजाने सामोरे जावे लागत आहे. 


“उद्या आईला बरोबर घेऊन ये, मी तिच्याशी बोलते”, मी तिला म्हणाले.


दुसऱ्या दिवशी तिची आई जी आमच्याच इमारतीत दुसरीकडे काम करायची ती नाखुषीनेच आली.


“का एवढ्‌या लवकर सविताचे लग्न करताय?” माझा जरा चिडलेला प्रश्न.


“अहो सतरा अठरा वर्षांची आहे, लग्नाचे वय झालंय. किती दिवस घरी ठेवायचे ? त्यात परत ती काळीसावळी, कुठुन नंतर मुलगा मिळेल, आताच मिळतोय तर कशासाठी उगाच थांबायचं?” एक व्यावहारिक उत्तर मिळाले.


आणि पुढच्याच महिन्यात लग्न होऊन ती दूर गेली. जायच्या आधी तिला आहेर म्हणून पैसे दिले आणि सांगितले.


“सविता तुझे लग्न तर मी थांबवू शकले नाहीे, पण परत पुण्यात आलीस की भेट येऊन, आणि हो, काहीही अडचण आली तर मला फोन कर किंवा ये कधीही.”


“हो काकू” ती डोळ्यातले पाणी थोपवून उत्तरली.


त्यानंतर एक वर्षांने ती एकदा आली तेंव्हा कडेवर एक वर्षाची मुलगी घेऊन अतीशय काळवंडलेली रोडावलेली अशी. तिची विचारपूस केल्यावर ती म्हणाली,  "काकू, आला दिवस ढकलतीय, आतातर पोरीचीपण जबाबदारी आहे.” एवढेच बोलून ती गेली दोन वर्षांनी तिच्या आईकडून कळाले कि तिला अजून एक मुलगी झालीय.


“अहो ताई,” तीन वर्षांपूर्वी रस्त्यावरुन जाताना एक ओiखीचा आवाज आला. “अहो ताई, अहो मी, सविता”. बघते तर सविताच होती ती. ओiखण्याच्या पलीकडली. एक मुलगी कडेवर आणि एक बोटाशी धरुन ती समोर उभी राहीली. काळा रंग अजूनच काळवंडलेला, अजून बारीक कृश आकृती झालेली सविता पुढयात उभी. तिच्या दोनही मुलींकडे बघून कiत होते की त्यांचे शारिरिक आरोग्य काही ठीक दिसत नाहीये.


“मग, कधी आलीस? “कशी आहेस?” 


“मी आता कायमचीच आलीय, मुलींना घेऊन नवऱ्याला कायमचे सोडून आलीय” तेच भावनाशून्य, कोरडे उत्तर. तिच्या दृष्टीने “लग्न ठरणे” आणि “मोडणे” या फक्त आयुष्यात घडणाऱ्या दोन क्रिया होत्या.


“काय?” मी किंचाळेच.


“हो, कुठे काही काम असेल तर सांगा ताई, मला गरज आहे”. त्या उत्तरात मला जाणवले की सविता आता मोठी झालीय. जबाबदारीच्या ओझ्याने आणि परिस्थितीने वाकलेली.  


आधी मला “काकू” म्हणणारी आता मला “ताई” म्हणतेय म्हणजेच दोन मुलींमुळे तिलाही आता उगीचच मोठे झाल्यासारखे वाटतेय.


“हो, ये तू माझ्याकडे. तसेही मला दुसरं कोणीतरी हवंच आहे” मी म्हणाले.


आता परत तीन-एक वर्षानंतर पूर्वीसारखीच, म्हणजेच लग्नाआधी जशी कामाला यायची तशीच ती कामाला येतीय. दोन वर्षांची झालीय या गोष्टीला पण तेव्हाच्या आणि आताच्या दोन सवितामध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे.


आधीची सतरा अठरा वर्षांची सविता आणि आता तेवीस चोवीस वर्षांची झालीय आणि वयाने नाही तर मनानेपण एक समर्थ, परीपक्व विचारांनी भरलेली म्हणजे जे शहाणपण तिला शिक्षणाने नाही येऊ शकले ते परिस्थितीने शिकवले. कामाला आल्‌यावर पहिल्याच दिवशी तिने मला सर्व कहाणी सांगीतली. “ताई, तुम्ही म्हणत होता तसंच झालं. त्याची एक बायको असण्याची शारिरीक गरज म्हणून मला त्यांनी लग्न करुन घेतले. तो काही चांगला कमावता नव्हता. प्रेमही कधी नाही केले मनापासून. मी फक्त त्याची एक शारिरीक गरज होते आणि ती गरज फुकटात भागवली जावी म्हणून त्यांनी मला खाऊ-पिऊ घातले. 


लग्नानंतर काही महिन्यांनी तर त्याच्याबरोबर एक गोरी-गोमटी बाईपण माझ्या डोळ्यांदेखत घरी यायची. “ताई, काय सांगु तुम्हाला, तिला घेऊन तो यायचा आणि मला आणि सासूला घराबाहेर जायला सांगायचा. माझी सासू मला म्हणायची “तू एक काळीकुंद्री माझ्या पोराला नाही खुष ठेवत, म्हणून त्याला असं करावं लागतंय ” आणि गप्पा टाकायला निघून जायची. तिला एक बाई म्हणूनही माझ्याबद्दल कधीही सहानुभूति वाटली नाही. अशा वेळी जीव द्यावासा  अनेकदा वाटले, पण हिम्मत नाही झाली” 


“पहिली मुलगी झाल्यानंतरच त्यांने मला मुलगी झाली म्हणून दोष दिला. पण मी सहन करत राहिले कारण मला इकडेही कुणी विचारणारे नव्हतेच. निसर्गनियमानुसार सक्तीच्या प्रेमाने मला परत दिवस गेले अन माझं नशीब इतक फुटक की दुसरीही मुलगीच झाली, पण त्यानंतर मला मानसिक त्रासाबरोबरच तो खूपच शारिरीक अत्याचार करु लागला. माझे, माझ्या मुलींचे हाल सुरु झाले आणि मला शेवटी मुलींना घेऊन जीवन संपवावेसे वाटले पण पोरींकडे बघून धीर नाही झाला.” 


त्यानंतर, रडत रडत आपली कर्मकहाणी सांगताना पुढे ती म्हणाली, “पण ताई त्यानंतर आपले कुणीच नाही हे जेंव्हा मला पूर्ण उमजून चुकले तेव्हा मी आतून पार कोरडी-कोरडी होऊन गेले. नवरा आता फारच बाहेर-बाहेर राहू लागला. हातात एक रूपया नाही, दोन जीवांना कोणाच्या बळावर पोसायचे, आणि त्यात कहर म्हणून की काय छोट्याछोट्या गोष्टींवरून नवरा आणि सासूपण मला मारायला लागले”.


ती सांगत होती आणि ऐकताना माझ्या अंगावर सरसरून काटा येत होता.


“मी निर्णय घेतला, त्याला सोडण्याचा” ती म्हणाली. एके दिवशी आईला फोन केला आणि माझा निर्णय सांगितलं त्यावर आई म्हणाली, “आता इथे खाणारी तोंडे कमी आहेत का, की त्यात तू भर टाकती आहेस.” त्यावर मी आईला सांगितले की “मी इथेतर आता राहणार नाही. तू मला माझ्या दोन मुलींसकट घेणार नसशील तर आता जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे नाही.” माझी दया येऊन का प्रेमापोटी कशामुळे काय माहिती नाही, पण मग ती काही बोलली नाही. मी तिला सांगितले, “माझा आणि माझ्या मुलींचा भार तुला होऊ देणार नाही तर तुझ्या संसाराला पण मी थोडा हातभार लावीन” आणि मग ती केारडया स्वरात म्हणाली “ठीक आहे.” आयुष्यातला अती अवघड निर्णय बस त्या “ठीक आहे.” या शब्दांच्या आधारे मी घेतला. नवरा आणि सासूला मी सांगितले “आता मी काही इथे राहू शकत नाही, मी मुलींना घेऊन घर सोडून जातीय.” मला वाटले कि मुलींची दया येऊन तरी नवरा आणि सासू “थांब” म्हणतील पण उद्वेगाने दोघेही म्हणाले, “जा, तोंड काळं कर तुझं. आणि मी परत आले आणि आज तुमच्यासमोर उभी आहे”. तिच्याकडून तिची ही कहाणी ऐकून मी हतबुद्ध झाले. तिची जगण्याची आणि मुलींना जगवण्याची जिद्द पाहून मी तिच्यापुढे नतमस्तक झाले.


तिची कहाणी ऐकून मी ठरवले की तिला आता स्वयंपूर्ण होण्यासाठी शक्य ती आणि तेवढी मदत करायची आणि मग सुरु झाला एक नवा प्रवास जो तिला आणि मलासुद्धा खूप काही शिकवून गेला. आजही ती तिच्या आई वडिलांवर अवलंबून आहे कारण तिला फक्त त्यांचाच आसरा आहे. मी तिला एकदा असेच म्हटले, “अगं, मी तुला खोली बघून देते, तू स्वतंत्र तुझ्या मुलींबरोबर रहा” त्यावर तिचं अतिशय समजूतदार उत्तर होतं, ती म्हणाली, “ताई, दोघी-दोघी पोरींना या घाणेरड्या जगापासून सुरक्षित ठेवायच असेल तर आई-वडिलांच्या घराइतकं दुसरं सुरक्षित काहीच नाही”. हे ऐकून वाटते, बापरे, कुठुन आलं हे शहाणपण हिच्याकडे. 


आता रोज काम करता करता आमचे ट्रेनिंग सुरु असतेे. भाजी चिरताना ती तिचे अनुभव सांगते मग त्यावर आम्ही चर्चा करून त्यासाठी काय-काय करायला पाहिजे, मुलींच्या आणि तिच्यासुद्धा शिकण्याची गरज कशी आहे, मुलींना कशा सवयी लावायच्या, स्वतच्या वागण्यातून, बोलण्यातून त्यांच्यावर कसे संस्कार करायचे, अशा सर्व काही गोष्टींवरती आम्ही चर्चा करतो आणि मला जाणवत राहते की, ती लक्षपूर्वक ऐकतेय आणि समजण्याचाही प्रयत्न करतेय. कधी-कधी तिला आजही रडू येत आणि म्हणते, “काकू, माझ्या नशिबीच हे सगळं का? ” आणि मी तिला उत्तर देते, “अगं, देव पण त्यालाच दुःख देतो ज्याच्याकडे ते झेलायचं आणि त्यातून पार व्हायचं बळ असतं”. हा दिलासा तिला बऱ्याच प्रमाणात बळ देऊन जातो. 


सविता आता अजूनच कणखर होतीये. तिला आधी शिकण्याचे महत्व कळत नव्हते, पण मुलींसाठी तिने आता ठरवले होते की त्यांना चांगले शिकवायचे का तर आपल्यासारखे कष्टमय आणि घाणेरडे आयुष्य त्यांच्या वाट्याला यायला नको. 


आता ती चार घरी काम करुन महिनाकाठी सात-आठ हजार कमावते. आता तिच्या दोनही मुली महानगरपालिकेच्या शाळेत जातात. सकाळपासून स्वतःला कामाला जुंपत आणि कष्ट करत ती त्यांना शिकवतीय. तिची मोठी मुलगी आता दुसरीत आहे आणि धाकटी बालवाडीत. त्यांच्याकडून ती बरेच शब्द इंग्रजीचे शिकतीय. माझ्याकडून रोज मराठी पेपर घरी नेऊन वाचते. प्रयत्नपूर्वक ती तिची भाषा शुध्द होईल याची काळजी घेतीये, दुचाकी शिकतीय. आता ती जुनी दुचाकी विकत घेणार आहे, त्याचा उद्देश म्हणजे ती मला म्हणाली, “काकू, त्यामुळे माझा वेळ वाचेल आणि चार काम जास्त करुन पैसे मिळतील”. 


तिने आता मासिक हफ्त्यांवर एक स्मार्टफोन घेतलंय. तिला फेसबुक, व्हॉट्सअप वरून जगातल्‌या नवीन-नवीन गोष्टी कळतायेत आणि अस काही असत याचं तिला अप्रुप वाटत राहतंय, त्यावरूनच तिला आधार कार्डबद्दल माहिती मिळाली आणि आता तेही ती काढायचा प्रयत्न करतेय. जेणेकरुन तिला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल त्यानंतर ती तिचे बँक खाते काढणार आहे आणि हे सर्व तिने स्वतः हुन चार लोकांशी बोलून विचारून स्वतःच ठरवले.  


असंच एकदा ती मला म्हणाली, “ताई, एक मुलगा, नात्यातला, मला विचारतोय लग्नासाठी. पण यावेळी मला फसायचं नाहीये. मला माझ्या मुलींसह स्वीकारणारा नवरा पाहिजे. त्याचे मूल असेल तरी त्याला मी संभाळीन”. असा परिपक्व विचार कदाचीत कुठलीही शिकलेली मुलगी करणार नाही. आजही ती स्वाभिमानाने जगण्यासाठी वेगवेगळ्या वाटा शोधत आहे. त्यासाठी ती कोणावरही अवलंबून नाही. परिस्थितीने तिला स्वतंत्र विचार करायला शिकवले, निर्णय घेण्याइतके कणखर बनवले. आज ती एक स्वतंत्र विचारांची, मुलींच्या आणि स्वतःच्या भविष्याचा विचार करणारी एक परिपक्व स्त्री आहे, जिला आशा आकांक्षा सर्व आहे, जिला माहितीय की आपण स्वतःच स्वतःचे आयुष्य सुंदर करु शकतो, त्यामुळे आता तिची राहणी एकदम नीटनेटकी झाली आहे आणि या सगळ्यांचे समाधान तिच्या चेहऱ्यावरही दिसून येते. पूर्वीच्या परिस्थितीने गांजलेली आणि जगावर चिडलेली अशी ही सविता आता स्वतःच्याच आनंदात मग्न असते. तिच्या स्वतःच्याच प्रयत्नांनी काही आनंदाचे क्षण तिच्याही आयुष्यात येत आहेत.


माझ्या दृष्टीने ती जग जिंकायला निघालेली "अलेक्झांडर" आहे.  


आयुष्यापासून हरलेली ती "जिंकत" पुढे जात आहे 


अवलंबत्वापासून "स्वावलंबी" ती आता होत आहे 


असते आता ती आपल्याच आनंदात दंग 


"पराधीन" नाही उरलं आता तिचं जगणं... 



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy