लॉटरीचे टिकिट
लॉटरीचे टिकिट


लहानपणी माझे आयुष्य म्हणजे अगदी तोंडात घास घातल्याप्रमाणे बिनधास्त होतं. म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात माझे तर गुण आईने अगदी माझ्या जन्मानंतर लगेच दोन-तीन दिवसात ओळखले म्हणे. खुप जास्त आगाऊ होतो मी. खुप रडायचो, मस्ती करायचो, कुणासोबतपण दंगल करायचो, खुप उगरट असे बाबा नेहमी सांगत. बाबांची आपली सारखी किटकिट 'काय होणार याच ?' आत्ताच सांभाळ याला... '. पण रोज रोज हे ऐकून आईचे अन् माझे कान पार पिकले होते. मी घरात लाडका शेंडफ़ळ होतो. घरी सगळे भाऊ-बहीण काम करायचे, कॅरीबॅगेत वह्या-पुस्तक-पेन घालुन शाळेला न्ह्यायचे, शाळेत चालत जात व चालत घरी येत. पण माझं असं न्हवतं, मी अगदी थाटात रहायचो, पाहिजे तेव्हा शाळेला जायचं, त्यातही माझ्यासाठी बाबा खास दप्तर आणायचे. तरी मी शाळेत कुणा ना कुणाशी भांड़ायचो, दप्तर-डबा हरवून घरी यायचो, तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी मोठे बाबा माझ्यासाठी नविन करकरीत दप्तर आणायचे. मला शाळेला न्ह्यायला खास टांगा लावला होता. अगदी राजेशाही थाट होता माझा. शाळेत शिकायच कमी अन भांडण ,मारामारी जास्त करायचो. मास्तरला देखील शाळा शिकवत होतो. मला पेपर मध्ये एक शब्द ही ना लिहिता चांगले गुण मिळायचे. कारण, मास्तर मला नापास करण्याची हिम्मतच करत नव्हते. एकदा मास्तर बाबांकडे माझी complaint करायला सुद्धा आले होते, त्यानंतर मी मास्तर ला एवढा त्रास दिला की , माझ काय होण ना जाण म्हणून त्यांनी माझ्याकडे लक्ष्य द्यायच सोडून दिलं. आयुष्य कसं, अगदी रातराणीच्या फुलाप्रमाणे सुवासीत होतं. तेव्हा इतका जास्त आगाव होतो मी,की वाचमनला पैसे देऊन, दारु देऊन, पेपर चोरायचो, रात्री-अपरात्री बाबांची एकुलती एक खटारा लुना घेऊन गावभर हिंड़ायचो. अन बाबाना वाटे आम्ही मुलं गच्चीवर अभ्यासच करतोय. सगळं आयुष्य वर्तमानाच्या आनंदात, सुखात चाललं होतं, जिथे दु:खाची, कष्टांची जाणच नव्हती किंबहुना मला माझ्या वागण्यात काही चुक वाटावी इतका समजुतदारच नव्हतो कधी. माझी मित्रमन्डळीही अगदी उडाणटप्पुच होती. माझं दिसण म्हणजे एखादा गल्लीतला गुंड, खांद्यापर्यंत वाढलेले केस, आडवातिडवा वाढलेलो मी, अन या अशा दिसण्यावर मला वेगळीच ऐट वाटायची. गावात वळू सोडल्याप्रमाणे मी आयुष्य जगत होतो . पण म्हणतात ना रातराणीचा सुवास फक्त क्षणापुरता असतो, त्याचप्रमाणे माझही झालं. माझ्या आयुष्याचा, माझ्या जगण्याचा पार नक्षा बदलला तो एका घटनेमुळे. आयुष्याने लाथ मारली माझ्या बेफिकीरपणे जगण्यावर. वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्या हातून वीस हजार रुपये हरविले. या घोडचुकीमुळे बाबांनी मला गज ने हाणलं , माझा पार पाणउतारा केला. हे कमीच होतं की मोठ्या भावाने पटट्याने मारुन माझी चमडी चमडी लाल केली, त्यात भर ती आई-बाबांच्या बोचक, टोकदार टोमण्यांची. या सगळ्यामुळे माझ्यावर मानसिक परिणाम झाला. दिवाही शांत जळत नाही , मग हे तर आयुष्य होतं , कसं शांत जगु देणार . मनात जिद्द निर्माण झाली. कुठे कधी एकेकाळी बाबांचे पैसे पत्ते खेळण्यात उडवणारा मी त्याच बाबांना पैसे कमविण्यात झटून मदत करु लागलो. माझा नशिबावर अन देवावर विश्वास उडाला होता. यात आणखीन भर म्हणजे मोठ्या भावावर करणी झाली. देव देतो तेव्हा दोन हात भरुन देतो म्हणतात, कदाचित मला शंभर हात भरुन दु:ख दिलं होतं त्याने. कित्येक दु:खाचे पहाड मी रोज सर करत होतो, कोण जाणे ? आमच्या दुकानात गिऱ्हाईक कमी होऊ लागले. मोठा भाऊ त्याच्या वेडेपणामुळे जो काही उरला-सुरला माल होता तो फुकट विकु लागला .आमची परिस्थीती आर्थिकदृष्टया फार बिकट झालेली, अन या दुष्काळात तेरावा महिना म्हणजे माझी मोठी बहिण आणि मोठी वहिनी गर्भवती होते. या सगळ्यांचा भार माझ्या वीस वर्षांच्या खांद्यावर आला. अचानक एक सुवर्ण संधी चालून आली . मला सुरत ला जाऊन बिजनेस करण्याची ऑफर आली ,पण मोठ्या वाहिनीच्या हट्टापायी माझ्या हातातील सोनेरी संधी निघुन गेली. काय अन कुठे चुकतंय ह्यापेक्षा आता हे भलंमोठं संसार कसं सांभाळू याचा ताण वाढू लागला. मुंबईला जाऊन मी लॉटरीची टिकिट विकू लागलो, त्यातून जे पैसे गोळा होइल त्यातून साड्या आणुन दुकानात विकायचो. अस पै पै जमवून मी आज भलं मोठं दुकान उभ केलं. आपलं मोठं घर असावं अशी बाबांची खुप ईच्छा होती. अपार कष्टाने मी बाबांची ही ईच्छा देखिल पुर्ण केली, मात्र बाबांना अचानक कॅन्सर झाला अन वर्षात बाबा गेले. आज माझ्याकडे स्वत:च घर आहे , गाडी आहे पण याहून जास्त म्हणजे माझी माणसं आहेत जी माझ्यावर जीवापाड प्रेम करतात ज्यांना माझ्या सुखदुखाची, माझ्या त्यागाची जाण आहे. सगळं अगदी सुरळीत चाललं असताना लग्नाच्या चौथ्या वर्षी माझी पत्नी वारली. हेही सुख कदाचित नव्हतंच माझ्या नशिबी, माझी आठ महिन्यांची मुलगी मात्र मला नेहमी माझ्या अर्धांगिनीची आठवण करुन देते. इतकं सगळं कमीच होतं की अचानक माझ्या दुकानात शॉर्ट सर्किट झाला. तब्बल अर्धी दुकान जळुन खाक झाली. अख्या घराचा उदरनिर्वाह या दुकानावर व्हायचा, आता पुढ काय? काहीच सुचेनासं झालं. कशीबशी याही आपत्तिवर मात केली. आज माझ्याकडे सगळं आहे, पण आयुष्यात जो त्याग केला, जे दु:ख भोगलं त्याचे चटके अजुनही हृदयावर झेलत आहे . आयुष्याच्या ह्या सुख-दु:खाच्या खडतर प्रवासात मी स्वत:साठी जगायचच विसरलो, किंबहुना माझी मुलं, माझी आई ह्यांच्यसाठी झटणं म्हणजेच स्वत:ला आनंद मिळवण अस वाटायचं . ह्या चढउतराच्या आयुष्यात लॉटरीच टिकिट विकताना एवढं मात्र लक्षात आलं, की खरंच आयुष्य लॉटरीच्या टिकिटाप्रमाणे आहे. आपण सहजच टिकिट तर विकत घेतो, जगायच तर ठरवतो पण ह्या जगण्यात कधी तरच लकीली लॉटरी लागते नाहितर अक्ख आयुष्य लॉटरी कधी लागेल याची वाट बघण्यात जातं. मला माझी लॉटरी लागली माझ सुख गवसल ते माझ्या परिवारातील हसऱ्या चेहर्यांमध्ये!