Shailaja Khade Patil

Tragedy

4.5  

Shailaja Khade Patil

Tragedy

लॉकडाऊन...!

लॉकडाऊन...!

6 mins
148



   सकाळची कोवळी ऊन्हं केव्हाच सरली होती. परड्यात दावणीच्या गाईची चाऱ्यासाठी धडपड सुरु झाली होती...तरी ‘तो’ अजुनही गोधडीत तसाच पहुडलेला होता. पहाटेच त्याचा डोळा खुलला, पण रोजच्या जगण्याची भ्रांत त्याच्या जीवाला अशी काही बैचेन करीत होती की, तो तास न तास तसाच पडुन रहायचा. त्याचे खोलवर गेलेले डोळे तो सताड ऊघडे ठेवून एकेकाळी ऊराशी फुलाप्रमाणं बाळगलेलं आणि आता मात्र तेच भंगलेलं स्वप्न काळजात साठवून तो ठेवायचा. शेतात हिरीरिनं करण्यासारखं काहीच काम नसल्याकारणानं तो गेले पंधरा दिवस चुळ भरुन पुन्हा गोधडीचं मुळकुट करुन ऊन्हं तळपेतोवर त्या मुळकुटाला टेकुन बसुन रहायचा...

   “आओ ऊठा वाईच च्या तरी घ्या की. किती दिस असं दगडागत बसुन ऱ्हाणारा? नुसकान तर झालया, पर आपला जीव तरी शाबूत हाय न्हवं? ह्यातच त्या पांडुरंगाला हात जोडायचं. ऊठा चाटदिशी. पोरगं बी तुमच्याकडं बगुनशान कावरंबावरं हुतया. तेच्याकडं तरी प्हाय तुम्ही”. चुलीवरच चहाच आधणं वाटीत ओतत त्याची बायको त्याला बोलली. तसं त्याची कोरडी नजर खेळतेल्या पोरावर फिरली व चाऱ्यासाठी आसुसलेल्या गाईवर येऊन थांबली. त्यांना पाहुन त्याला थोडीफार तरतरी आल्यासारखी झाली, आणि ती चहाची वाटी पुढ्यात ओढुन त्यानं त्याचे दोन्हीं हात दोन्हीं गुडघ्यावर टेकले आणि पुन्हा गोधडीच्या मुळकुटाला तो टेकुन बसला. “आपल्याला आपलं लेकरु तसंच शेतातली फुलं व्हती...ह्या ह्या हातानं घास भरवावा तसं त्यानला पाणी-लागवड दिली पर आज ती मातीत पार रयाला जातेली बगुन कोणला सुखं वाटल बाय? मला तर हे जिणं सुदीक मयतासमान वाटायलय. आगं कस नुसकान भरुन काडायचं दोन लाखाचं? सगळं किडुक-मिडुक झेंडवांच्या मशागतीला इकलं..आता तर इक खायाला बी पैकं न्हाईती...!” असं बोलुन तो बसल्याजागी टपटप आसवं गाळु लागला. तशी त्याची बायकोही डोळ्यांना पदर लावुन मुसमुसु लागली. काही क्षण असेच गेले केवळ हुंदक्यांचा आवाज! पुन्हा ती पुढे सरसावली व चहाची वाटी त्याच्या तोंडासमोर धरली. तसा तो भानावर आला व वाटीतला गारगीच चहा त्यानं फटकन एका घोटात पोटात ढकलला. पुन्हा तो शांत होऊन शुन्यात नजर लावुन बसला. तिनं चुलीतला पेटता निखारा वाया जाऊ नये म्हणुन पटकन त्या चेपक्या डब्यातले पार तळाला गेलेले तांदूळ धुऊन चुलीवर भात चढवला...नि एक हात डोक्याला लावुन निखाऱ्यातल्या ऊष्ण धगीकडं ती कितीतरी वेळ पाहत राहिली...

   परमुलखातुन साऱ्या जगभर फैलावलेला ‘कोरोना संसर्गजन्य विषाणु’ राज्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातल्या शेतकऱ्यालाही गिळु पाहत होता. यामुळे होणारी महामारी रोखण्यासाठी सरकारने कितीतरी दिवस पुर्ण राज्य न्हवे तर देश ‘लॉकडाऊन’ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरचे दिवस मात्र गावातल्या शेतकऱ्यांसाठी ‘एक दर्दभरी कहाणी’ घेऊन येणारे ठरले. पुण्या-मुंबईतल्या खुराड्यातली माणसं आता गावाकडच्या शुध्द, पवित्र हवेत झेपावली होतीत. त्यांच्यातला रोग आता गावात मुक्काम ठोकु पाहत होता. त्यांच्यामुळंच गावातले २-३ जणं ह्या कोरोना संसर्गाला बळी पडले होते. त्यामुळं इतर जीवांसाठी पोलिसांची खास कुमक रुजू होऊन ते स्वतःचा जीव धोक्यात घालुन, कित्येक दिवस गावात चिटपाखरुही फडफडु देत न्हवते.

   हिंदु नवीन वर्षाची बहर घेऊन येणाऱ्या चैत्राच्या पाडव्याला मोठ्या आनंदानं, ऊत्साहानं ज्या फुलांची आरास, ऊधळण केली जाते त्या झेंडुंच्या फुलांची शेती पार ऊध्वस्त व्हायच्या मार्गाला होती. त्यांपैकीच कोरडवाहु जमिनीवर झेंडुचं हे ‘पिवळं सोनं’ पिकवुन सर्वसामान्य जिणं जगणारा हा शेतकरी हैराण झाला होता. आजचा दिवस मावळला तरी तो पुन्हा ऊगवूच नये असं ‘त्याला’ वाटत होतं. कारण, हिरव्यागार रोपांवर हे पिवळं सोनं पिकुन कितीतरी दिवस लोटले होते. त्याची तोडणी केव्हांच ऊलटुन गेली होती. शहराप्रमाणं गावातही कडेकोट बंदोबस्त केल्याकारणानं गावातला प्रत्येक माणुस पिंजऱ्यातल्या पक्ष्याची कैद जगत होता. दारा-खिडक्यांतुन केवळ नि केवळ निस्तेज चेहरे नि भेदरलेली नजर असं चित्र होतं. एरवी पार चुलीपर्यंत येणारं गावातल माणुस घराचा ऊंबरठाही ओलांडायला धजावत न्हवतं. त्यामुळं त्यानं त्याच्या शेतात केलेल्या या झेंडुंच्या फुलांची तोडणी करायला, त्याचे शिस्तीत वाटे करुन भरायला नि ती विक्रीसाठी नीटमार्गी वाहनाने वाहुन न्यायला माणुस मिळणं तर लांबच, तर असं माणुस डोळ्यांना दिसतही न्हवतं. तोडणीला मजुर मिळत न्हवतेच शिवाय स्वतः तोडणी करुन ढीग भरावेत तर तो शेतमाल नेणार कुठं? व कसा? त्यामुळं फुलांच्या अशा निर्जीव अवस्थेचा विचार करुन, आज मात्र त्याचं आवसान पार गळालं होतं.

   निसर्गाला आव्हान न देता त्याची नेहमीच पूजा करणारा बळीराजा नियतीसमोर पुरता हतबल झाला होता. म्हणुनच, या निराशेच्या गर्तेत तो खोल डुंबून बुडून मरेल की काय? या भितीनं त्याची सहचारिणी त्याला रोज धीर देत होती...तिचा घरधनी मनानं पार चिंबून गेला होता, याची तिला जाणीव होती. आजवर शेतातल्या त्या निर्मळ फुलांवर तिचा आखीव रेखीव संसार गोड फुलावानी चालला होता. पण यंदा या विषारी रोगामुळं तिच्या या फुलाप्रमाणं दरवळलेल्या संसाराची निर्माल्यासारखी अवस्था व्हायची वेळ आली होती. जर तीच खचली तर त्याचं नि लेकराचं कसं होणारं? या काळजीनं तिचा जीव खात होता म्हणुन तर शेतीतलं कितीही नुकसान अंगावर पडुदे पण ती मात्र नियतीसमोर अजिबात ढळणार न्हवती...

  “आये लगट भात व्हाढ. इतक्या दिसानं आपुण आपल्या शेतात जायाचं हाय न्हवं?” पोराचा हा भुकेला आवाज कानावर पडताच निखाऱ्याकडं डोळं लावुन बसलेली घरची लक्ष्मी भानावर आली. चुलीवरचा भात ऊतरुन तिनं तव्यात लसुण-बेसनाचा झुणका गरगटला, आणि जर्मलच्या तीन थाट्यांत भाताचे तीन ढीग रचले नि त्यावर तव्यातला झुणका निववला. बसल्याजागी डोळं मिटलेल्या धन्याला तिनं जागं केलं. थाटीतले चार घास दाटल्या ऊरानं संपवले, आणि त्या मुक्या जनावराला साठवणीतला चारा-पाणी दावुन ते तिघंही शेताच्या पाऊलवाटेनं चालु लागले...एरवी या वाटेनं चालताना तिघांच्याही गप्पा-खेळ रंगायचेत, लाडक्या लेकराला खांद्यावर ऊचलुन घेऊन आजुबाजूला पसरेललं पिकांच शिवार तो मोठ्या हौसेनं दाखवायचा...या वाटेवर त्या तिघांच्याही मनातल्या इच्छांची स्वप्नं रंगवली जायचीत..यंदा फुलांच्या किती ट्रॉल्या होतील? त्यांची किती विक्री होईल? किती बेगमी होईल? याचा हिशेब करुन, पाडव्याला नवीन बैलजोडी घ्यायची, दसऱ्याला गावदेवीच्या ऊरुसात समद्यांना गावजेवाण द्यायचं, नेहमी रफु केलेला सदरा घालणाऱ्या लेकराला नवीन जीन्सकुडती घ्यायची नि लग्न झाल्यापासुन गळ्यात एका वाटीचं काळं मणी घालणाऱ्या अर्धांगिनीला यंदाच्या दिवाळसणात सोनसाखळी करायची...अशा छोट्याशा स्वप्नांच्या लाटेवर स्वार होऊन क्षणिक का होईना पण एक ‘सुखाची आभासी’ सफर ते करुन यायचेत...पण अशा वाटेवर चालताना, एरवीचे दिवस आनंदाने भारलेले होते व आजचा दिवस मात्र जीवाची काहिली करणारा होता.

   जसजसं शेत जवळ येत होते, तसतसं त्यांची पाऊलं जड होत चालली होती...इतका वेळ निःशब्द राहुन तिघंही शेताच्या बांधावर आले. त्यांनी मोठ्या जड काळजानं चहुबाजूंनी पसरलेल्या त्या ‘पिवळ्या सोन्यावर’ नजर फिरविली. जवळपास महिनाभर ती गोंडस, गोजिरवाणी झेंडुची फुलं तोडणीविना तशीच झाडाला लटकुन होतीत. कितीतरी कोस पसरलेल्या त्या वावरात सगळ्या पिवळ्याशार फुलांनी झाडावरच माना टाकल्या होत्या. त्यात पुरेसं पाणीही नसल्यानं व कडक ऊन्हानं ते पिवळधमक सोनं आता पार काळवंडुन गेलं होतं. नुसता हात जरी लावला तरी पाकळ्या गळुन पडाव्यात अशी केविलवाणी अवस्था त्या फुलांची झाली होती. तीन महिन्यांपुर्वी ह्याची सुरुवात करताना त्या बळीराजाच्या ऊरात स्वप्नांची अशी काही दाटी झाली होती की तो ऊत्साहानं पार हरखुन गेला होता. वेळच्यावेळी केलेली मशागत-लागवड-पाणी त्याला त्याची पोटची भाकरी मिळवुन देणार होते. पण यावेळी काळाचा फास त्याच्याभोवती घट्ट आवळला होता. डोळ्यांनी न दिसणाऱ्या त्या भयावह विषाणुने या कष्टाळु शेतकऱ्याच्या डोळ्यांतले भाकरीचे स्वप्न पार धुळीला मिळवले होते...

   ऊन्हं आता माथ्यावरुन कललेली होतीत. त्याच्या साक्षीनं ती तिघंही बांधावर ऊभा राहुन मयतासमान फुलांकडं एका भकास नजरेनं पाहत होतीत. अशा दिनवाण्या फुलांकडं पाहुन त्यांच्या काळजाच पाणी पाणी झालं. त्यानं ऊभ्या ऊभ्या त्या एकेकाळी बहरुन ओंसडणाऱ्या पण आता विरुन गेलेल्या त्या वावराला हात जोडले...बांधावरुन थोडं पुढं होऊन त्यानं खिशातली माचिस काढली व त्यातली काडी पेटवुन वावरात टाकली...निम्म्याहुन अधिक वाळलेल्या, सुकलेल्या फुलझाडांनी काही वेळातच पेट घेतला. मयताला अग्नी द्यावा तसा अग्नी त्यानं आज आपल्या वावराला दिला होता. हे अग्नितांडव पाहुन चिमुकल्याच्या डोळ्यांतही पाणी दाटुन आलं. त्यानं एकवार पेटत्या फुलांकडं पाहिलं व आपल्या मायला घट्ट मिठी मारली व तिच्या पदरात तोंड खुपसुन तो ओक्साबोक्शी रडु लागला. तसा मायेनं दाटलेल्या आईलाही तिचा हुंदका आवरेनासा झाला व तिचे अश्रुही पोराच्या अश्रुमध्ये मिसळुन गेले. आता बळीराजाच्या अश्रुंचाही बांध फुटला. वावरातल्या त्या स्मशानशांततेत तिघांच्या हुंदक्याचे आवाज घुमु लागले. शेजारच्या आंब्याच्या झाडावरचे पक्षीही पंखांची केविलवाणी धडपड करुन फडफडु लागले. भावनांचा हा पसारा साक्षात परमेश्वरालाही आटोपता न येण्यासारखा होता म्हणुनच इतके दिवस शेताचा धनी शेताकडं यायला धजत न्हवता. पण त्याला रोजची वाट विसरुन चालणार न्हवती. त्याची काळी आई त्याला सारखी साद घालत होती. संसारापेक्षा अधिकचे प्रेम तो आपल्या शेतावर करीत होता. तिच्या पोटी जन्मलेल्या या पेटत्या फुलांकडं पाहुन त्याचं आतडं आज तिळं तिळं तुटत होतं. त्याच्या यंदाच्या भविष्याची राखरांगोळी ऊभ्या डोळयानं तो पाहत होता. नशीबाचे हे हारलेले भोग सोसुन सोसुन बळीराजा शेवटी मनानं व भावनेनं बधीर झाला. काही क्षणांसाठी तो स्तब्ध झाला नि आता तिघांनीही काळजावर दगड ठेवुन तिथुन परतीची वाट धरली...

   घरच्या छताखाली जाऊन टेकल्यावर, शेजारच्या दोस्तानं लांबुनच ‘आज लॉकडाऊन’ संपल्याची बातमी त्यांना दिली. पण आता काळाचे काटे कधीच पुढं सरकले होते कारण,तिकडं वावरात पेटलेली वाळकी फुलं आता राखेत विलीन झाली होती..कदाचित देवाच्या पायी जाण्याचं भाग्य घेऊन ती जन्माला आलेलीच न्हवती. लोकांचे जीव वाचावेत म्हणुन सरकारनं जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊननं’ आज बळीराजाचं भविष्यच ‘लॉक’ करुन टाकलं होतं...आणि तिकडं राखेत फुलं निवल्यानंतरची जी भयाण शांतता दाटली होती तीच भयाण शांतता त्याच्या घरावरतीही कब्जा करुन होती...!


Rate this content
Log in

More marathi story from Shailaja Khade Patil

Similar marathi story from Tragedy