"लोकल जिंदगी""
"लोकल जिंदगी""


नेहमी प्रमाणे संध्याकाळी सहा च्या सुमारास कामावरून निघालो.मुंबई म्हटली की' "लोकल जिंदगी"थोडक्यात मुंबईची "लाईफ लाईन" म्हणता येईल.अशी लोकल ट्रेन ज्यासाठी सकाळ ते संध्याकाळ गर्दीचा आणि धक्काबुक्कीचा खेळ चालूच असतो.
म्हणून,त्या दिवशी मी रोजच्या प्रमाणे संध्याकाळी कामावरून निघाल्यावर ट्रेन साठी धावत पळत स्टेशनला आलो.योगा योगाने ६.४२ ची ट्रेन उशिरा होती.तसा मी थोडा मनात खुश झालो.त्यावेळी धावत आल्यामुळे माझ्या श्वासांचा वेग थोडा वाढला होता..म्हणून फलाट ला असलेल्या बाकावर मी दम घेण्यासाठी बसायला गेलो आणि.. बाकावर बसतो न बसतो समोरून उशिरा धावत असलेली ६.४२ची ट्रेन येताना दिसली.तसाच मी पुन्हा उठलो आणि बॅग पुढे घेऊन ट्रेन मध्ये चढायचा तयारीत फलाट ला उभा राहिलो .समोर ट्रेन येऊन थांबताच क्षणाचा विलंब न लावता मी ट्रेन मध्ये चढलो आणि बसायला जागा पाहू लागलो.तशी माझी नजर खिडकीकडे रिकाम्या असलेल्या जागेवर गेली आणि मी त्या जागेवर जाऊन बसलो त्यादिवशी ट्रेन मध्ये फारशी गर्दी दिसत नहोती जेमतेम तीस चाळीस लोक असावेत.मी बसल्यावर पुन्हा एकदा माझी नजर संपूर्ण डब्याभर फिरवली.आणि मग मी खिशातून मोबाईल काढुन आपल्या मोबाईलच्या दुनियेत येऊन स्थिरावलो.
ट्रेन पुढच्या स्थानकावर येऊन थांबली तेव्हा आमच्या डब्यात एक चाळीस-पंचेचाळीस वय वर्ष असणाऱ्या काकू चढल्या आणि त्या अगदी माझ्या समोरचा बाकावरील जागेवर येऊन बसल्या.त्यांचाकडे पाहता त्या पेशाने शिक्षक असाव्यात अस दिसंत होते कारण त्यांचा जवळ असलेल्या एका मोठ्या कापडी पिशवीत शाळेत असणारे फळा-फुलांच्या नावांचे तक्ते त्या पिशवीतू डोकं वर काढून पाहत होते आणि ते स्पष्ट दिसत होते यावरून त्या शिक्षक आहेत असा अंदाज बांधणे सोपे झाले. डब्यात बरेचजण आपल्या मोबाईल विश्वात जणू मग्न झाले होते.समोरचा काकूं मात्र पिशवीतून एक पुस्तक काढुन वाचू लागल्या.आज मोबाईलच्या दुनियेत पुस्तक काढुन वाचणे जणू काही हरवलेच आहे.आज प्रत्येकजण पुस्तकांपेक्षा मोबाइलाच मित्र बनवु लागला आहे. कदाचित कोणी चांगल्या बाबींसाठी तर कोणी वाईट बाबींसाठी त्याचा उपयोग करत असेल.त्याला आपला मित्र बनवत असेल.
तेवढ्यात,सर्वजण मोबाईल विश्वात मग्न असताना एक आवाज कानावर पडला तो म्हणजे ,एका आठ नऊ वर्षाच्या चिमुकलीचा "भूक लागली हाय,कायतरी मिळलं का खाआयला?" सर्वजण त्या चिमुरडी कडे दुर्लक्ष करत होते .त्या चिमुरडीचा आवाज व्याकुळ होऊन आर्ततेने पुन्हा पुन्हा विचारत होता"भूक लागली हाय कायतरी मिळल का खाआयला?.ती मुलगी आता संपुर्ण डब्बा फिरून आम्ही बसलेलो तिथे आली अणि व्याकुळ स्वरात आणि त्याच आर्ततेने विचारू लागली.ट्रेन मध्ये पैसे मागणारी छोटी मुले मी बऱ्याचदा पहिली तशी ही एक असेल असा समज करून मी तिच्या कडे दुर्लक्ष करून माझ्या मोबाईल मधील वॉट्सपवर मित्रांसवेत संडे पार्टी चा प्लॅन करत बसलो.तेवढ्यात माझ्या समोरील काकूंनी तिला दहा रुपये दिले.तर त्या मुलींनी ते पैसे नाकारले आणि पुन्हा व्याकुळ होऊन म्हणाली "मला पैक नको,भूक लागली हाय कायतरी खायला द्या".हे चिमुकलीचे शब्द ऐकताच सर्वजण त्या मुलीकडे आश्चर्याने पाहू लागले.मी ही क्षणभर थबकलो,तिच्याकडे पाहू लागलो आणि विचार करू लागलो.ट्रेन मध्ये बरीच मूल पैशासाठी फिरतात आणि ही मुलगी चक्क पैसे नको बोलते अस का? तेवढ्यात त्या काकूंनी आपल्या बॅग मधून बिस्कीट पुढा आणि काही चॉकलेटस काढून त्या चिमुकलीच्या हातात दिले.त्या क्षणी त्या चिमुकल्या चेहऱ्यावरील आनंद काही विलक्षण होता.मीही आता माझ्या मोबाइलच्या दुनियेतुन बाहेर येऊन तिचा विलक्षण आनंदी चेहऱ्याकडे स्तब्धपणे पाहू लागलो आणि विचार करू लागलो.तेवढ्यात ती मुलगी दरवाज्याच्या दिशेने धावत गेली आणि डोळ्याची पापणी लवते न लवते ती मुलगी खाली बसली...त्या काकू सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहु लागले आणि मीसुद्धा .
तेवढयात नेरुळ स्टेशन येणार होते.नेरुळ स्टेशनला मला उतरायचे होते म्हनून मी उठून दरवाजाजवळ आलो आणि मी एका क्षणी स्तब्ध झालो मन सुन्न झाले.कारण जेव्हा मी दरवाजवळ आलो तेव्हा व्याकुळलेली छोटी चिमुकली आपल्या इवल्याशा हाताने शारीरिक अपंगत्व असलेल्या आपल्या आईला बिस्कीट भरवत होती आणि तिची आई आपल्या छोट्या एका वर्षाच्या पिलाला दूध पाजत होती.हे चित्र सरळ काळजाचा ठाव घेत होते.मी ते चित्र पाहून थक्क झालो. आई ने बाळाची भूक भागवावी आणि त्याच चिमुकल्यानी आईच्या भुकेसाठी आर्त हाकेने डब्याभर फिरायचे आणि मिळालेलं खाऊ आईला भरवायचे हे एक वेगळच शिकवून जात होतं.मी माझे भान विसरून त्या विलक्षण आणि बरेच काही शिकविणाऱ्या दृष्याकडे एकटक पाहत राहिलो.तेवढ्यात मागून कोणीतरी आवाज दिला."चलो भाय उतरो स्टेशन आया। उतरना है तो उतरो नही तो बाजू हो जावं।"त्या आवाजाने मी लगेच भानावर येऊन मी ट्रेन मधून खाली उतरलो आणि त्या थक्क करणाऱ्या दृश्याकडे पुन्हा पाहू लागलो तेवढ्यात ट्रेन हळू हळू वेग घेऊ लागली आणि क्षणात ट्रेन सुसाट निघुन गेली.
मात्र त्या ट्रेनचा वेगासारखे माझ्या मनातील विचार वेग घेऊ लागले.अनेक प्रश्नांना उसंती मिळाली.एकीकडे शारीरिक अपंगत्व असलेल्या आईचा भुकेसाठी पूर्ण डब्याभर आर्ततेने फिरणारी चिमुकली आणि एकीकडे आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारी काही डॉक्टर,इंजिनिअर,वकील असणारी अनेक शिक्षित माणसे अशा या समाजाच्या दोन बाजू डोळ्यासमोर उभ्या राहिल्यात आणि मग प्रश्न पडला यात श्रेष्ठ कोण,यात आई वडीलांची जाणीव असणारी व्यक्ती कोण?ती चिमुकली की एकीकडली शिकलेली माणसे??? तसेच भीक मागणारी काही चिमुकली मुले पैशासाठी नाही तर घरचाच्या पोटासाठी भीक मागत हे कळून चुकले मला.त्यावेळी मी फक्त त्या चिमुकलीच्या आणि तिच्यासारख्या अनेक चिमुकल्यांच्या जिंदगीला सोनेरी वळण मिळुन त्यांची जिंदगी सोनेरी व्हावी एवढ्याच मंगल कामना देऊ शकलो. खरच अशी चिमुकली प्रत्येक आई वडिलांच्या पोटी जन्मला यावी असे वाटते.
त्यादिवशी मुंबईचा "लोकल"ने मनाला नवीन दिशा नवीन विचार आणि नवीन शिक्षण दिले.त्या चिमुकलीचा "जिंदगी"चा रूपाने ...खरोखरच या "लोकल जिंदगीला" सलाम...