कुणाकुणाला धडा शिकवणार रे
कुणाकुणाला धडा शिकवणार रे


बाळासाहेब पवार खून पूर्ववैमनस्यातून झाला असा पोलिसांचा अंदाज आहे.या मातब्बर नेते म्हणून गणल्या गेलेल्याची न्यूजव्हॅल्यू इतकी होती की वृत्तपत्रीय रकाने भरले जात. त्यात मारेकऱ्याचं नाव आलं होतं राघवेंद्र साने. साने सरांचा परागंदा झालेला मुलगा. राघ्या माझा बालमित्र. हुशार तल्लख पण एककल्ली. त्याचं निवेदन आलं : ”मी जे कृत्य केलय नि:शंकपणे त्यास मी जबाबदार आहे. मी ज्या व्यक्तीस यमसदनी धाडले त्याची अश्लाघ्य दुष्कृत्ये त्यास कारणीभूत. पुरावा व चश्मदीह गवाह मागणारा आंधळा बूर्झ्वा कायदा, कायदा करण्याआधी चोरवाटा ठेवणारी बूर्झ्वा व्यवस्था काय दहशत बसवणाऱ्या शिक्षा देणार, मी काही ही परंपरा जोपासत नाही केवळ एक आत्मिक शांति……..”
मी राघ्याची भेट ठरवली. खुन्याला भेटायला जाणार म्हणून की नातं गोत्यात आणेल म्हणून कोणी सोबत नाही माझ्या. ’तुझ्यावर आळ आलाय कां’ असं विचारता त्यानं नाकारार्थी मान हलवली. जे.’पवाराचाच कां रे’ ला उत्तरला ‘माझी डायरी याचं उत्तर देईल’ मग तोंडी पत्ता सांगितला व समय हो गया हा पुकारा होण्याआधीच माझ्यावर डाफरला 'अबे,जा तेरा कौन है ना दोस्त गया भाड मे….” आणि हात उगारला. मी निघालो पण संदेश पोहोचला होता. तो मला त्रास देऊ शकतो म्हणून ओळख नाकारत होता.
कंपनीने पाठवले बडोद्याला आणि गुप्तांकडून एका खंब्याच्या आमिषाने डायरी मिळवली. एका रविवारी सकाळी वाचायला घेतली. डायरी म्हणजे वहीची पानं. रेपाने सुई दोऱ्याने शिवून एकत्र ठेवलेल्या पानांची चळत. ती आधी सुसंगत तारीखवार लावून घ्यावी लागली. आणि ती काही रोजची टिपणं नव्हती…. सकाळी उठलो...च्चा पिली….अंघोळ केली…..इ इ ...काही पानं त्रोटक तर काही विस्तृत
१९ जुलै
बाबा आमटे यांच्या कार्यात…….
५ नोव्हेंबर
६ महिने इथे घालवले……...
१३ एप्रिल
७जून
काल श्रीधर शेंडेनी आश्रम सोडला…...
१० जून
आज मी आश्रम सोडला आणि शनिवार पेठ पुणे येथे श्रीधर जोशीस गाठले. सोबत हिंगमिरे व रवि जतकर सुध्दा. मग आम्हा नवशिक्या टोळीला घेऊन श्रीधरने काका देशमुख, ज्यांचं वाचन अफाट होतं, ना भेटवलं. मंदिरप्रवेश, जाती तोडो, रोटी बेटी यासारखे कार्यक्रम दिले. श्रीधरनी माझं नाव सुचवलं. आता काका दाखवतील तोच मार्ग तीच दिशा…………
…………………….
……………………………..
मधली पाने टरकावली होती कुणी तरी
८ जून
सरपोतदार, मी व प्रकाश संसारे भेटलो. व्यक्तिमत्व सर्वसामान्य. विचारानी प्रगल्भ ठाम मतं. हेकटपणा नाही. आहे रे नाही रे मधली दरी कमी केली पाहिजे जाणीवपूर्वक प्रयत्न करत हे समजावून सांगताना भांडवलदार व श्रमजीवी हे शब्द वापरले. हा भेद इतका जहरी आहे की जाति धर्म संस्कृती विचारधारा ज्ञान...भेद गौण ठरतात. ते ऐहिक सुखाच्या आड येत नाहीत.
२१जून
आज प्रकाश आणि मी चर्चा केली. मी आता जे करतोय त्यात अवतीभवती आहेत ते उदासीन आहेत. सुरवातीची उत्साही उमेद विरजली आहे कां हा प्रश्न मला पडला आहे. शिक्षणाचं महत्व पटवावं लागे. बळेबळे गावकऱ्यांना देवळातल्या शाळेत आणावं लागतं आणि पदरी निराशाच! हो, अंगठेबहाद्दरचे सहीबहाद्दर घडले हे श्रेय!! सांगावं असं माझ्याकडून या वर्षाच्या अवधीत काय झालं आहे? झपाटून टाकेल असं काही तरी… सरपोतदार यांचा कॉम्रेड प्रकाश व आता हा राघवेंद्र साने…….. झिंदाबाद
१६ नोव्हेंबर
संप १००% यशस्वी... एकही कामगार कामावर नव्हता. आसमंत घोषणाबाजीनी दुमदुमून गेला होता. व्यवस्थापक गुणारी नी २ वाजता गेट मिटिंगमध्ये आवाहन केलं की आधी कामावर हजर व्हा आम्ही विचार करत आहोत. कामगारानी लेखी हमी मागितली. बोलणी करायला मलाच जावं लागलं. शुभ्र परीटघडीचा झब्बा धोतर व गोल्डन फ्रेमचा चष्मा. रूबाबदार बाळासाहेब तोंडानं मात्र शिवराळपणा. ” ह्योच कां रे लीडर?” “सांगा त्याला कायबी मिळनार न्हाई. ओवरटाईम न्हाई. शाश्वती मिळाली तर माजत्याल साले…..”
मी चर्चा थांबवली.
गेटमिटिंग घेऊन सविस्तर वृत्तांत दिला तर कामगार गरम झाले. आतताईपणा करायला निघाले. त्याना मोठ्या कष्टाने आवरले व संयमाने वाट पहायला राजी केले संधीची वाट पहायला.
२ जानेवारी
कंपनीला खूप मोठी ऑर्डर मिळाली. ऑर्डरचं महत्त्व व ते पूर्ण करण्यासाठी निकड लक्षात घेऊन गुणारीनी बाळासाहेबांना तयार केलं व मागण्या मान्य झाल्या.पण “पश्चात्ताप करावा लागेल” हे जहर कानात ओतलंच.
३ फेब्रुवारी
शब्दांच्या पलीकडले काही आज प्रत्यक्षात उतरले. बाळासाहेबांचा नूर काही औरच होता. एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि कडाडले,”आम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलास काय?” मी उसळून काही बोलणार तोच सरपोतदार यांनी हात दाबून रोखलं. बाळासाहेब बडबडत होते,”ऑर्डर पूर्ण झाली नव्हती म्हणून नायतर सरळ केला असता…” माझा संयम संपला मी ओरडलो ”शट अप! एक शब्द आणि थोबडा रंगवीन.” सरपोतदारनी मलाच समजवायला सुरवात केली.
रात्रीच्या सत्रात चक्क माफी मागितली सरपोतदारनी व सूत्र आपल्या हाती घेतली. प्रपोजल आलं की वीस हजार रुपये घेऊन मी त्याना हवा तसा करार करून द्यायचा. सरपोतदारांची सम्मती! अरे, हे काय चाललंय? पोटात शिरल्यावर कळलं की सरपोतदार हा दलालांचा धंदा करतो. हलकट भडवा!
५ मार्च
आज मी कुठं आहे? कोण आहे? व हे सर्व कशामुळे आहे? या प्रश्नाची उत्तरे धुंडाळली तर”मी कुणीही नाहिये” “कुठेही मला स्थान निर्माण करता आलेले नाही” “हे सर्व माझ्याच स्वभावामुळे घडलं आहे”. मी राघवेंद्र साने. मिरजेत ख्यातनाम असलेल्या शिक्षण महर्षी नाना सानेंचा मुलगा. पण तो अधिकार मी गमावलाय त्याच वेळी जेव्हा नानानी बजावूनही मी घर सोडून निघून गेलो. बाबांचा शिष्य? जेव्हा आश्रम सोडला तेव्हाच... मायणी गावचा प्रौढशिक्षण प्रसारक? गोडी निर्माण व्हावी यासाठी जनजागृती करण्यासाठी लागणारी चिकाटीचा अभाव... हां, पवार & पवार इंजिनियर्सचा कामगार नेता? खरं समोर आल्यावर शॅटर्ड राघवेंद्र तोही नाही. मग मी आहे तरी कोण? चटकन् भावनेच्या आहारी जाऊन भडक डोक्याने वागणारा इंपल्सिव्ह इडियट! येताना एकटा येतो पण जोडत जातो पण अरे मी तर तोडत गेलो कळत-नकळत. आज सर्व सामान्य माणसाला मी समाधानी पाहतो त्यांचा हेवा करतो. पूर्ण एकाकी… आणि अशा टोकावर की तोल सांभाळणे अवघड नि परतीचा मार्ग… हे जग असंच चालणार सुष्टदुष्ट प्रवृत्ती घेऊन…गरीब असेच पिळले जाणार; धनको ऋणकोना नाडवणार आणि हजारो संवेदनशील राघवेंद्र हताशपणे बघत बसणार. नाही नाही मी त्यापेक्षा मरण जवळ करेन.
३० ऑक्टोबर
आत्महत्या करणं पाप आहे…दिशाहीन जीवन व्यतीत करून मी काय साधणार? भावनिक नात्यांपासून वंचित आहे. पण मी माझं जीवन संपवण्यापूर्वी १० कारखाने काखेत बाळगणाऱ्या, कामगार हिताचा सत्यानाश करणाऱ्या, कामगार पुढाऱ्यांना विकत घेऊन मिंधे करणाऱ्या, आपल्या सुखासाठी-राक्षसी हावेसाठी शेकडो कामगार कर्मचारी यांना छळ छळ छळणाऱ्या या बाळासाहेब पवार नामक राक्षसाला मी धडा शिकवणार असा धडा की ज्याची आठवण जमाना ठेवेल आणि दखल तर समाज घेईल...”
डायरी संपवली आणि मी सुन्न झालो. अश्रूधारांना वाट करून देताना मन म्हणालं राघ्या, तू कुणाला कुणाला धडा शिकवणार रे!