कोरं पत्र
कोरं पत्र
उन्हाची किरणं डोळ्यावर येऊ लागली होती.महादू ने सकाळची दिनचर्या आटोपली होती. पिराजी अंथरुणावर लोळत होता. सुट्टीचा दिवस असल्याने अंगात त्याचा आळस भरला होता. आपल्या आशाळभूत नजरेनं बापाकडे बगत होता,तेवढ्यात महादू डाफरला "ऊठ रं गड्या, आरं किती झोपतोस? दिसवर आलाय अन आज तुला माझ्या संगठ येवयचं हाय. किती दिस हे रोज म्या एकटा करणार हाय? आज मी आहे तर उद्या नसेल मग काय करशील? हितंन पुढं तुलाच करायचं हाय हे समद
पिराजीने आपलं मन मोडत, होकारार्थी मान डोलावली.
महादूनं आपलं पत्रांचे गाठोडं घेतलं आणि नेहमीची सायकल काढली, सायकली ची कॉटर पिन निखळ्यामूळे पॅडल चा आवाज च्योक-च्योक असा येत होता,
पिराजीं न लगोलग आपलं आवरून घेतलं नी बापाच्या मागोमाग निघाला.
नागमोडी वळणं घेत सायकल धावू लागली. नद्या, नाले डोंगर पार करून महादू घामानं ओलाचिंब झाला होता.
"आरं पिऱ्या पाण्याची बाटली तरी दे तेवढी, कोरड पडली हाय माझ्या तोंडाला," महादून फर्मान सोडलं
लगेच पिराजीं न पाणी दिल. गार गार पाणी पोटात गेल्यावर महादूला कसं बर वाटल!
दुपारचे बारा वाजले होते, चढण संपल्यावर सायकल एका झोपडी पाशी येऊन ठेपली. आडरानात तेवडी एकच झोपडी होती,झोपडीच्या बाजूला एक कुत्रं उन्हाच्या धापा टाकत बसलं होत.कुत्रं आणि झोपडीला टेकून बसलेली म्हातारी सोडली तर रानात चिटपाखरू पण नव्हतं, पिराजी जड पावलाने महादूच्या पाठी मागे येऊन उभा राहिला. म्हातारी एकदम थकलेली दिसत होती, गालावरच्या सुरकुत्यांनी तिची पार आबाळ झाली होती, नजर कमी झालेल्या एका चष्म्याच्या काचेला तडा गेला होता.जुन्या पुराण्या लुगड्यात म्हातारी भिकारनि सारखी दिसत होती.
तेवढ्यात कुत्रं भुंकल म्हातारी सावध झाली.
"आरं कोण हाय तिकडं?" म्हातारी नं आवाज दिला
" मी महादू टपालवाला!" महादू उद्गागरला
एवढा शब्द ऐकल्यावर म्हातारीच्या चेहऱ्यावचा दुःख, चिंता एकदम गायब झालं, गुलाबाच्या कळीवणी चेहरा खुलला.
ये पोरा किती दिसांनी वाट चुकला? किती वाट म्या बगतेय तुझी?
काय शिरपाची निरोप बातमी? काय धाडलं माझ्या शिरपानं?
शिरपा म्हातारीचा एकुलता एक लेक, अमेरिकेतल्या कॅलिफ
ोर्निया या शहरात शिक्षणा साठी गेलाय. पाच वर्षे झालीय,गेला तसा आलाच नाही.
"अरं मावशे कशापरिस काळजी करतेस व्हय?तुझा लेक म्हंजी हिरा हाय हिरा बग किती मोठं पत्र धाडलं त्यानं. त्याला तुझी काळजी नाय व्हय?कामाचा व्याप वाढलाय लेकाचा." महादू खाडकन बोलला
म्हातारी मन लावून ऐकत होती
पुढं महादू नं पत्र काढलं घाई घाई न पिशवीतुन आणि वाचू लागला.
माझ्या लाडक्या माईस ,
शिरपतरावचा साक्षात दंडवत!
"मी शिरपा इकडं मस्त आहे,तू पण ठणठनित आहे असं समजतो, काळजी करण्याचं काही काम नाही. इकडं बर्फ पडतोय , आपल्याला धोबेवाडी ला कडक उन्हाळा असल नाही?इकड खूप येगळ वातावरण हाय, लाल मानस सगळी, खाणं येगळ सगळंच येगळ हाय.पण तुझ्या हाताच्या कोथींबीर च्या वढ्याची सर नाही यायची इथल्या कोड्स्याला, आणि आता तुझं रड -गाणं थांबावं , मी पुढच्या महिन्यात येणार हाय सुट्टी टाकून दोन महिन्याची .तु सूनबाई बगायची तयारी कर आलो की बार उडवुन देऊ मग मी तिला आणि तुला घेऊन कॅलिफोर्निया ला येईल,
पत्रा सोबत पाचशेची नोट आहे बग मी पाठवलेली.
आपल्या लाल मातीला माझा सलाम
तुझाच लाडका शिरपा!"
पत्र संपलं ,आईला आनंदाचा पारावर उरला नाही.
"माझा शिरपा येणार हाय?आता मी समद्यासनी निरोप धाडेल."
महादून आपल्या खिशातील पाचशे ची नोट काढली आणि म्हातारीच्या हातात सोपवली, नोट हातात येताच म्हातारी नोटेच मुके घेऊ लागली आणि आपल्या काळजाला लावली.
पिराजी मात्र खूप अस्वस्थ झाला होता, कधी न डोळ्यात पाणी आणणारा आपला बाप आज चक्क डोळेभरून मनातल्या मनात रडतोय? चेंतेच्या पावलांनी तो पुढे सरसावला आणि पिराजी पायाखालची माती सरकली आणि ह्रदयाचा ठोका वाढला, कारण आपला बाप जे पत्र वाचतोय ते एक कोरं पत्र होत, बापाने आपल्या कल्पनेतून
तयार केलेलं कोरं पत्र! कोणासाठी फक्त एका आईसाठी.
हेच पत्र बाप कित्येक वर्षे वाचत होता.आता वयोवृद्ध झालेल्या बापाच काम पिराजी ला करायचं होतं आणि इतर माय माउलींना आनंदात ठेवायचं होतं
थोड्या वेळाने दोघांनी ही म्हातारीचा निरोप घेतला