काय कसं चाललंय तुमचं जीवन?
काय कसं चाललंय तुमचं जीवन?


या प्रश्नाचं उत्तर अता जवळपास सगळेच देतील, कारण आता कोरोना व्हायरसमुळे जे लॉकडाऊन सुरू आहे ना त्यामुळे. आता प्रत्येकाजवळ तेवढा वेळ आहेच विचार करायला. माझंच बघा ना, मी तब्बल 18 दिवसांपासुन मुंबईमध्ये एकटा अडकलोय, रोज एक वेब सीरिज संपवतोय तरीपण माझ्याकडे मुबलक प्रमाणात वेळ आहे विचार करायला. अहो यू ट्यूबवर येणारे सगळे शिफारस केलेले चित्रपट बघायला लागलो आहे मी तर. सगळे साऊथ इंडियन डब केलेेले चित्रपट संपत आले आहेत माझे. माझ्याकडेतर इतका फावला वेळ आहे की मी पोळ्या बनवायला शिकलोय.
खरंच आता मला कंटाळा आलाय या लॉकडाऊनचा तर. सगळीकडे भयानक शांतता आहे, रस्त्यावर तर चुकून एखादी गाडी जाताना दिसते बाहेर पडलं तर सगळे अनोळखी चेहरे दिसत आहेत, मित्रांना पण भेटलो नाहीये, पार बोर व्हायला लागलंय. आणि मग चुकून नैराश्य घर करून बसायला लागलंय, तो दिवस तर संपतच नाही मग. खरंच कधीकधी असा वाटतं की निघुन जावं कुठेतरी बाहेर, मग कोरोना झाला तरीही चालेल मला, पण मग कसंतरी स्वतःला सावरत, मित्रांशी बोलून तो दिवस संपवावा लागतो.
पिंजऱ्यामध्ये असलेल्या प्राण्यांची अन् आता आपली सारखीच स्थिती आहे. विचार करा मी 18 दिवस एकटा अडकलो आहे तर निदान विचार मांडू शकतो, लोकांना कदाचित समजेलही माझी व्यथा, पण तो प्राणी/पक्षी त्यांचं सगळं आयुष्य त्या पिंजऱ्यामध्ये काढतो त्याला किती त्रास होत असेल. त्याला साधं कुणी विचारतपण नाही की, का रे बाबा काही त्रास होतोय का तुला, बाहेरचं जग बघायची इच्छा होत नाही का तुझी... कसा जगत असेल तो सगळं आयुष्य त्याचं एवढ्या छोट्याश्या पिंजऱ्यामध्ये. असला विचार डोक्यात आला ना की मग वाटतं की निसर्गाने कदाचित आपल्याला हीच जाणीव करून देण्यासाठी घरात कोंडलंय. थोडेसे हसून मग परत मी पण माझं काम करायला सुरुवात करतो. अजून माहित नाही किती दिवस हा चोर पोलिसचा खेळ खेळावा लागेल, लवकर संपला तर चांगलंच आहे नाहीतर आपल्यालापण पिंजऱ्यात राहायची सवय करूनच घ्यावी लागेल.