झेप
झेप
वृंदा विमनस्क स्थितीत किती वेळ तशीच बसून होती, तिला समजतच नव्हते की आपण आशा परिस्थितीत काय निर्णय घ्यावा, नियतीने तिला एका विचित्र परिस्थितीत अडकवले होते, तिच्या समोर तिच्या दोन मुलींचे भविष्य नाचत होते तर एकीकडे नवरा ह्या प्राण्याचे भूत मानगुटीवर बसले होते, नवऱ्याचा विचार येताच तिचे मन कडवट कडवट झाले, तिचे मन एकदम भूतकाळात गेले..
वृंदा एका लहानश्या गावात वाढलेली एका ब्राम्हण कुटुंबातील बाळबोध वातावरणात रमलेली मुलगी, हुशार चुणचुणीत अशी, थोडी स्वप्नाळू पण जमिनीवर पाय घट्ट रोवून असलेली,
वृंदाचे वडील शाळामास्तर होते यथातथाच उत्पन्न होते त्यांचे त्याच शाळेत वृंदाने आपले 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व मूळच्या अंगभूत हुशारी व मेहनतीने पूर्ण जिल्ह्यात आपले व गावचे नाव 12 वी मध्ये मेरिटमध्ये येऊन झळकवले तेंव्हा तिच्या वडिलांना तिला कुठे ठेवू कुठे नको असे झाले, तिला सहजपणे स्कॉलरशिपवर मेडिकलला ऍडमिशन मिळत होती पण जरी स्कॉलरशिप मिळाली तरी बाकीचा खर्च पेलणे तिच्या वडिलांना शक्य नव्हते तेंव्हा वृंदाने सूज्ञपणे निर्णय घेवून कॉमर्सला ऍडमिशन घेतली व एका CA क्लासेसच्या ओनरने तिची हुशारी पाहून फ्री मध्ये ऍडमिशन दिली आणि वृंदाने पण ही संधी न गमावता CA परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली पण आता तिच्या वडिलांना तिच्या लग्नाची चिंता सतावू लागली. एवढी देखणी हिरकणी कोणाला द्यावी ही गोष्ट त्यांना कुरतुडू लागली , वृंदा हुशार व देखणी होती पण लग्नाच्या बाजारात फक्त दामाजीना महत्त्व असते हे ते जाणून होते आणि जर रुपाला हिऱ्याचे कोंदण नसेल तर तो हिरा काही कामाचा नसतो हे पण ते जाणून होते, पण वृंदाच्या नशिबाने वृंदाला लवकरच एक स्थळ चालून आले,
मुलाची पन्नास साठ एकर शेती होती व घराण्याचा पिढीजात सोन्याची पेढी होती गावात मोठा वाडा होता व घरात इनमीन तीन माणसे, मुलगा व त्याचे आई वडील बाकी कुठलाही बाडबीस्तरा मोठा नव्हता. कोचिंग क्लासच्या सरानीच हे स्थळ आणले होते नाही म्हणायला जागाच नव्हती, पत्रिका तेवढी खास जुळत नव्हती पण दोन्ही घरांना स्थळ एकदम पसंत होते त्यामुळे ह्या गोष्टीकडे थोडे दुर्लक्ष करून मुलाकडच्यानीच पुढाकार घेऊन लग्न दणक्यात केले, वृंदाचे वडील कृतकृत्य झाले साश्रुपूर्ण नयनांनी वृंदाची रवानगी झाली...
वृंदाने अगदी सोन्याचा तांब्या ओलांडून धान्याच्या राशीवरून फुलांच्या पाकळ्यावरून एखादया राणीसारखा गृहप्रवेश केला, बाळबोध वृंदा ते सर्व वैभव बघून हरकून गेली, माधव तिचा पती एकदम देखणा असा तरुण होता, तीला सारे ते स्वप्नवत वाटत होते , अतिशय सुखाचे दिवस तिचे जात होते घरात कशाला काही कमी नव्हते घरात दूध तूप धान्याच्या राशी ओसंडून वाहत होत्या वृंदाला फक्त ह्या साऱ्यावर देखरेख करण्याचे काम होते. सगळेच तिला फुलांच्या पाकळीप्रमाणे जपत, महिन्यातून कामानिमित्त माधव पंधरा पंधरा दिवस बाहेर राहत असे हे मात्र तिला खटकायचे. तिने सुमतीबाईना बोलून पण दाखवले पण त्यांनी आपल्या बिझनेस किती वाढला आहे तो टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी असे फिरणे आवश्यक आहे हे पटवून दिले ते कारण वृंदाला पण पटले, त्यात माधव येताना भरमसाठ तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येत असे व आपल्या प्रेमाच्या वर्षावाखाली तिला गुदमरुन टाकत असे. तिला पण ते सर्व सुख हवेहवेसे वाटायचे मग ती पण आपल्या मनातील शंका व सल त्या वर्षावाखाली दाबून टाकायची, त्यातच तिला दिवस गेले व जुळ्या मुलींनी तिच्या आयुष्यात रिद्धी सिद्धी होऊन पाऊल टाकले व तिचे जीवन त्या दोन बाहुल्या मध्ये गरगर फिरत राहिले, व माधवकडे तिचे दुर्लक्ष होत गेले.
जो माधव महिन्यातून एकदा जायचा तो आठ आठ दिवसांत बाहेर जाऊ लागला, पण येताना मुलींसाठी खूप सारी खेळणी कपडे आणायचा त्यांच्यात अगदी मूल होऊन रमून जायचा, वृंदावर प्रेमाचा वर्षाव करायचा, म्हणजे वृंदास कधीकधी प्रश्न पडायचा सुख सुख म्हणजे ते हेच असते का.... पण नियतीला हे सर्व मान्य नव्हते व तिने पहिला फटका दिला, वृंदाचे सासरे तडकाफडकी हार्ट अटॅक येऊन गेले आणि घराचे पूर्ण वासे हलले, सुमतीबाई सुन्न होऊन गेल्या, माधव पण दिवसेंदिवस बसून राहायचा मग वृंदानेच कठोर होऊन माधवला पेढीवर पाठवण्यास सुरुवात केली व हळूहळू घराची घडी बसू लागली पण माधवला पेढीचे काम जमेना त्याला ते किचकट वाटायचे त्यात त्याला बाहेर फिरण्याचे व्यसन लागले होते. त्यावरही बंधन येऊ लागले त्यामुळे तो चिडचिडा होऊ लागला, तो मधेच पेढि बंद करून फिरायला निघून जायचा व पेढी बंद असल्याने धंदा पण हळूहळू बसू लागला नौकर होते पण मालकच नसल्याने ते पण चालढकल करू लागले त्यात दुकानात चोरी झाली व धंदा अजूनच बसला सुमतीबाईनी सर्वातून अंग काढून घेतले होते त्यामुळे त्यांना बोलण्यात अर्थ नव्हता पण वृंदाला ही स्थिती बघवत नव्हती तिने माधववर अंकुश ठेवण्याच्या खूप प्रयत्न केला पण तो अपुरा होत होता आता तिच्या लक्षात माधव बाहेर का जात होता हे लक्षात आले होते ते ऐकून तर तिच्या पायाखालची जमीन सरकली होती, माधवला पहिल्यापासून बार व क्लब मध्ये जाऊन पैसे उधळण्याची सवय त्यात थोडी ड्रिंक, मादक नशा करण्याची पण सवय होती.
माधवशी तिचे लग्न करण्याच्या मागे एकच हेतू होता ती अतिशय सुंदर होती व निदान लग्न करण्यामुळे तरी माधवची सवय बंद होईल ही त्यामागील योजना होती, थोडा फार त्याच्या सवयीवर अंकुश लागला पण ती सवय पूर्णपणे सुटली नाही आणि आता अचानक पडलेल्या जबाबदारीने तो सैरभैर झाला त्याला कधीही जबाबदारी घेवून पूर्ण करण्याची सवय नव्हती आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला व परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाऊ लागली, वृंदाचे ह्या गोष्टीवरून सुमतीबाईशी भांडण पण झाले पण त्यांच्या डोळ्यावर पुत्रप्रेमाचे झापड लागले होते त्यांनी वृंदालाच बोल लावले, तिलाच त्याच्यावर अंकुश ठेवता आला नाही त्यामुळे तो अजूनच वाहवत गेला असे त्या म्हणाल्या, त्याचीच इस्टेट आहे तो पाहिजे तसे वापरेल तरी तुला व मुलींना काही कमी पडणार नाही एवढी तजवीज आहे हे पण बोलण्यास त्यांनी कमी केले नाही
पण वृंदाचे खरे दशावतार अजून सुरू व्हायचे होते एक दिवस माधवने न सांगता पेढी व काही जमीन मातीमोल भावात विकून टाकली व त्यामधील काही पैसे घर खर्चासाठी म्हणून वृंदाच्या तोंडावर फेकले आणि आता तर हे रुटीन झाल्यासारखे झाले, दर सहा महिन्यात जमिनीचा तुकडा बाजाराचा रस्ता पकडू लागला, ज्या घरात दुधातुपाच्या हंडी सांडत होत्या तिथे मुलींना दूध पाजवण्यासाठी शेजारून दूध आणावे लागतं होते, मुलींच्या अंगावर धड कपडे दिसेनात वृंदा ह्या बदलत्या परिस्थितीने हतबल झाली काय करावे ते तिला सुचत नव्हते , माधवशी किंवा सुमतीबाईना बोलून फायदा होणार नाही हे ती जाणून होती आता मुलींच्या भविष्यासाठी तिलाच निर्णय घेणे भाग होते.
सुदैवाने वृंदाला त्याच गावातील एका बँकेत रिसेप्शनिस्ट ची नौकरी लागली व तिने त्या संधीचा फायदा घेतला, त्या नौकरिवरून माधवने व सुमतीबाईनी खूप आंकडतांडव केले पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली, निदान त्या नौकरीमुळे ती आपल्या मुलींना एक चांगले भविष्य देऊ शकत होती, एक दिवस माधवने 10 एकर जमिनिपैकी सहा एकर जमीन परस्पर विकली त्यामधील काही पैसे सुमतीबाईना देऊन तो गायब झाला. पहिले तो दोन तीन महिन्यातून एकदा तरी घरी यायचा पण ह्यावेळी तो गायबच झाला फक्त फोन करून सांगितले मी आता घरी येणार नाही मी दुसरे लग्न करत आहे वृंदाला ह्या बातमीने फारसा फरक पडला नाही कारण माधवचे व तिचे सबंध संपल्यात जमा झाले होते फक्त कपाळावर शोभा म्हणून ती कुंकू लावत होती एवढेच..
पण सुमतीबाईनी खूप रडून तिला शिव्याशाप दिले. तिच्यामुळे तो घर सोडून गेला त्याला जे पाहिजे ते बायको असून तू देत नव्हतीस म्हणून नवरा सोडून गेला व माझा मुलगा तू माझ्यापासून तोडलास असे म्हणून त्या तिला वाटेल तशा बोलत, पण वृंदा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असे आज तिची नौकरी होती म्हणून ती घरात दोन वेळा जेवू शकत आहे हे ती बोलून दाखवायची.
खरतर माधव गेला तेंव्हा तीपण बैचेन झाली होती स्वतःसाठी नाही तर मुलींना बापाची गरज होती त्यासाठी तरी तो वापस यावा असे वाटायचे पण हळूहळू घराची घडी बसू लागली ती पण बँकेत परीक्षा देत चांगल्या पोस्टवर गेली त्यात ती सीए असल्याने तिला जम बसवणे अवघड नाही गेले मुलीपण हुशार होत्या त्या पण माधवशिवाय आता रमल्या होत्या फक्त सुमतीबाईना सहा महिन्यात एखादा त्याचा फोन यायचा तेवढाच त्याचा सबंध राहिला होता.
पण अचानक माधव दहा वर्षाने दत्त म्हणून दरवाज्यात उभा टाकला आणि वृंदाचे विश्व पुन्हा ढवळून निघाले, माधव आला तो आजारी होवुनच त्याच्या अंगात प्रचंड ताप होता त्याची हालत पाहून ती हादरून गेली, आता काही भावना राहिल्या नसतानाही ती माणुसकी म्हणून त्यास दवाखान्यात घेऊन गेली त्याच्या तपासण्या वैगरे केल्या व थोडा बरे वाटल्यावर घरी घेऊन आली आणि त्याचे रिपोर्ट समोर आल्यावर मात्र ती संतापाने पेटून उठली, त्याला एड्स झाला होता
ती पेपर समोर नाचवत म्हणाली,
" तुम्हाला लाज नाही वाटली, बाहेर शेण खाऊन घरी येण्याची, जिच्याशी लग्न केले होते तिच्याकडे जायचे ना, का ती फक्त मजा मारायला व मी तुमच्या सर्वांचे करायला का?"
सुमतीबाई मध्ये कडमडत बोलल्या, " त्याला बोलू नकोस तुझ्यामुळेच त्याला असा रोग लागला, तू पाहिजे तस, हवं तेंव्हा त्यास देत नव्हतीस, मग घरात जेवायला मिळत नसेल की माणूस बाहेर जाऊन जेवतोच ना, तस माझ्या मुलाने केलं, तू अवदसा आहेच तशी"
वादाला तोंड फुटतच गेले पण वृंदाला कळून चुकले आपल्या आयुष्याला लागेलल माधव नावच जळमट, गोचीड एवढया सहजपणे निघणे शक्य नाही, तिने शांतपणे त्यास सांगितले मी थोडे फार तुझे करेन पण थोडे बरे वाटल्यावर येथून निघून जा..
त्या दिवशी रविवार होता, मुली ट्रीपला गेल्या होत्या, माधवमध्ये बराच फरक पडला होता त्याची अवस्था खूप सुधारली होती, ती सर्व आवराआवर करून रूममध्ये झोपली होती तेवढ्यात तिच्या अंगावर एक अनोखा पण परिचित स्पर्श रेंगाळू लागला आणि ती ताडकन उठून बसली तर माधव तिच्याजवळ बसून तिच्या अंगावरून हात फिरवत होता त्याचा स्पर्श त्याचे डोळे वेगळीच भाषा बोलत होते, ते बघून तिला किळस आली तिने त्याचा हात झिडकारून टाकला पण तो आता अंगचंटीला येऊ लागला तिला आवरेना, शेवटी तिने एक सणसणीत थप्पड त्यास ठेवून दिली मग मात्र तो बडबड करत खोलीबाहेर गेला आणि तिच्या नावाने अर्वाच्य शिव्या देऊ लागला ते बघून सुमतीबाईना पण जोर चढला,
"अग, बायको आहेस का हैवान, दे की त्याला पाहिजे ते"
वृंदा तर हतबद्ध झाली ही बाई आहे का कोण हाच प्रश्न तिला पडला,
"तुम्हाला काही कळत का? काय बोलत आहात?अहो त्याला एड्स झाला आहे त्याच्यामुळे मला पण होईल मग मुलीचं तुमचं काय होईल काही तरी विचार करून बोला"
"आणि आता ह्या वयात तुम्ही अस बोलणं शोभत नाही, थोडं स्वतःच्या वयाचा मान राखून तरी बोलत जा"
पुन्हा सुमतीबाई बोलल्या, "अग तू पण त्याची बायकोच आहेस, थोडं उपाय वापरून असे सबंध ठेवता येतात अस मी ऐकलं आहे"
आता मात्र वृंदाची कपाळाची शीर मस्तकात गेली , ती म्हणाली,
"आता जर एक शब्द जरी बोललात तरी माधवबरोबर तुमचा पण बिस्तरा आवरा व चालू लागा"
तेवढ्यात माधव तिरमिरीने हात उगारत तिच्यावर आला तिने तोच त्याचा हात पकडला व मागेच्यामागे पिरगळला व म्हणाली,
"माझ्यावर हात उगरण्याची चूक नका करू, इथेच तुमचा सोक्षमोक्ष करेन, आता ताबडतोब इथून निघून पडायचं पुन्हा येथे येण्याची चूक करायची नाही, खूप सहन केले आता नाही"
माधव गुर्मीत म्हणाला, " माझं घर आहे, अजूनही तू माझी बायको आहेस"
"घर तुमचं कधीच नव्हतं, ते फक्त तुमच्या आरामाच ठिकाण होत, आणी हे घर बाबा मुलींच्या नावे करून गेले म्हणून टिकलं नाही तर ह्याची पण कधीच वाट लागली असती, माणुसकी म्हणून तुम्हाला घरात घेतले हेच चुकले, आणि मी बायको होते पण जेंव्हा तुम्ही दुसरे लग्न केले त्याच दिवशी माझ्यावरचा हक्क गमावला आहे, त्यावरून मीच तुम्हाला जेलमध्ये टाकू शकते हे विसरू नका"
"आणि आताच्या आता निघायचे घरामधून"
"अग आता तो कुठे जाणार ह्या अवस्थेत"
सुमतीबाई रडत म्हणाल्या
"तो विचार त्यांनी करायचा आहे, मी नाही"
"मुली मोठ्या होत आहेत, मला त्यांच्यासमोर हा तमाशा रोज नको"
शेवटी बराच वेळ शांत बसून ती म्हणाली,
"सुदैवाने अजून शेतात एक घर आहे तिथे तुम्ही जाऊन राहा, आई पण सोबत राहतील व घराचं थोडाफार भाड व शेताच उत्पन्न ह्यात भागवत जा, पण माझ्याकडून कशाचीही अपेक्षा करू नका"
आणि ती खोलीत जाऊन बसली
कालच तिच्या हातात बदलीची ऑर्डर आली होती तिला घरात हे सांगायचच होत पण त्या आधीच दैवाने तिचा मार्ग सुरळीत करून दिला होता, आता ती मुलींना घेऊन हे गाव लवकरात लवकरच सोडणार होती व नवीन सूर्य तिच्या आयुष्यात येणार होता, ती त्या सूर्याकडे आता सर्व शक्तीनिशी मागचे सर्व बंध तोडून झेप घेणार होती.....
