जबाबदारीचं आयदान!
जबाबदारीचं आयदान!


काही गोष्टी मनात फार घर करून जातात, मनाला पोखरत राहतात, अशीच एक गोष्ट किंबहुना हा प्रसंग अजूनही डोळ्यासमोर उभा राहतो आणि कडा आपसूक ओल्या होतात... मनात अंधार दाटतो...
काय करत असेल तो?
म्हणजे या जगात असेल तरी का तो?
काय झालं असेल त्याचं?
राहून राहून मागच्या २-४ वर्षांत त्याची फार आठवण येत होती, काही मनसलगी नाही सांगत माणूस कोणाला... नाही व्यक्त होता येत... त्या मनातच राहतात!
खरंतर त्याचं नाव मी विसरलोय, किंबहुना मुद्दामच नाव नसेल ठेवलं ध्यानात, उगाच आठवण येत राहील की काय म्हणून...
पण त्याचा चेहरा मात्र अजून लक्षात आहे... चांगलाच लक्षात राहिलाय, पटकन डोळ्यापुढे त्याची आकृती उभी राहते... आता तसा दिसतही नसेल तो... पण तो आत्ताही डोळ्यासमोर तसाच उभा आहे!
आम्ही सर्व, साधारणपणे दुसरी-तिसरीमध्ये असू कदाचित. आमची शाळा खरंतर पहिली ते दहावीपर्यंतची... पण पहिली ते चौथीची शाळा वेगळ्या इमारतीत आणि पुढचे दहावीपर्यंतचे वर्ग मोठ्या इमारतीत...
या मोठ्या मुख्य इमारतीच्या बाजूला एक उतरंडी होती, कच्या रस्त्याची, तिथून उतरून थोडं पुढे गेलं की उजव्या हाताला वळायचं... छोटीशी गल्ली ती पण...
तिथे एक मंदिर होतं, मंदिरापेक्षा जास्त, ते जुनाट ओस पडलेलं खंडरच वाटायचं. मंदिराच्या आवारात वडाचं घनदाट झाड, असंख्य पारंब्या खालपर्यंत लोंबत असायच्या...
पुढच्या भागात एक मोठी इमारत या वडाला आणि मंदिराला कव्हर करत असे, झाकून टाकत होती, त्यामुळे थंड काळोख असायचा नेहमी तिथे... त्यामुळेच भीती वाटायची तिथून जाताना... पटकन पळत धावत तो २० पावलांचा पल्ला सर करायचो... कोण मागे तर नाही लागणार ना असंच वाटत राहायचं...
मंदिर फार गजबजलेलं नव्हतं, तुरळक दर्शनासाठी कोणी येत असे, पुजाऱ्याचा पेहराव, टिळा वगैरेने आणखीन तो नेहमीच गूढ मनुष्य वाटायचा, त्याची नजर चुकवत मार्ग काढायला लागायचा...
मंदिर जीर्ण होतं, बऱ्याच वर्षांपासून असावं कदाचित तिथे, मंदिराला फक्त सिमेंटचं लिंपन, त्यातही बरेच ठिकाणाहून पापुद्रे निघाले होते, आतल्या झिजलेल्या विटा मंदिर रंगवत होत्या! बऱ्याच भिंतीला तडे गेले होते, देव कुठला होता तिथे, ते अजूनही माहीत नाही मला!
याच मंदिराला लागून आमची शाळा होती, फक्त पहिली ते चौथीचे वर्ग भरत असत तिथे. वर्गात जाईपर्यंत धडधड व्हायचं, एकदाचा वर्गात पाय पडला की गोष्टीतल्या राक्षसाला मारून आल्यासारखं वाटायचं, आणि मोकाट उड्या मारायचो...
आमच्यामध्ये 'तो' पण असायचा!
गोरा-भुरा रंग, हलके घारे डोळे, केस अगदी विंचरल्यासारखे रेखीव पण त्याच्या केसांची ठेवणच तशी होती, तेल नसायचं केसात, हसत राहायचा नेहमीच, हाफ चड्डी, गुलाबी रंगाचा सदरा सूट व्हायचा त्याला... हे सर्व कधी लक्षता नव्हतं आलं, पण फक्त एकदाच डोळे भरून बघितलं होतं, तसाच चेहरा आज पण आठवतो.
तो पण आमच्या मधल्या सुट्टीत सोबत हुंदडायचा, बोंबलत फिरायचा, पण कधी कधी नसायचा...
अशाच एका मधल्या सुट्टीत, ५ मिनिटांत डब्बा संपवून उरलेली २५मिनिटे टवाळकी करायला बाहेर पडलो, त्या दिवशी तो नव्हता आमच्यात, शाळेत नव्हता आला तो...
वर्गाच्या बाहेर येऊन सामायिक बाल्कनीमधून समोरच रस्ता दिसायचा, रस्त्याच्या पलीकडे छोटं मैदान, कधी कधी आमच्या कवायती व्हायच्या तिथे! मैदानाच्या बाजूला लागून एक जुनी इमारत, खाली एक रेशनचं दुकान, नेहमी भली मोठी रांग!
ती इमारत आणि मैदान यांच्यामधून एक कच्चा रस्ता कुठल्याशा वस्तीकडे जायचा, म्हणून नेहमी वर्दळ असायची तिथे!
बाहेर आलोच होतो, मैदानाकडे नजर गेली!
त्याला माहिती होतं, मधल्या सुट्टीची वेळ झालीये, आपले मित्र दिसतील सगळे, म्हणून तो तिथे आला होता!
पण तो एकटा नव्हता तिथे, त्याच्या सोबत जबाबदारीचं ओझं होतं!!!
एक विणलेल्या काड्यांची (आयदान) टोपली होती, मोठीशी! त्याच्या कमरेपेक्षा उंच होती! त्यात छोटे रंगबिरंगी चेंडू, ज्यात नाही का वाळू भरलेली असते आणि एक रबराची दोरी बोटाला लावण्यासाठी - ते चेंडू!
हे चेंडू विकण्यासाठी शाळेला दांडी मारून फिरत होता!
तो मात्र हसत होता, त्याच्यासाठी कदाचित नवीन नव्हतं, मन मेलं असेल कदाचित, सुरुवातीला त्रास झालाही असेल नक्कीच त्याला, पण, पोटाच्या प्रश्नापुढे कसलं आलं हे मन नि कसली लाज... त्याला सवय पडली असावी!
तो हसत होता, हवेत हात हलवत आमच्याकडे इशारे करत होता, आम्ही पण बघितलं होतं त्याला... हात आपसूकच वर गेला, पण त्याचा अर्थ वेगळा होता, सहानुभूतीचा होता, पण त्याला सहनुभूती नको असावी, त्याने ती घेतलीही नसावी... फक्त मित्रांना भेटायला आला होता तो... माझी भावना पोहोचली असेल काय त्याच्यापर्यंत???
फार वाईट वाटलं होतं! का आली असेल ही वेळ, वडील नसतील की पैसेच मुळात कमी असतील घरी, की अजून काय..?
५ मिनिटांत डब्बा खाऊन त्याचं नसेल का मन झालं हुंदडायला??
झालंच असेल म्हणूनच तर त्याच्या कामातून उसंत काढून आम्हाला बघायला आला होता तो..!
फक्त डोळ्यांनीच भेटलो, आणि डोळ्यांनीच बोललो!
नंतर टोपली उचलून निघून गेला तो!!!
परत नाही आला तो कधी शाळेत, रुखरुख लागली होती तेव्हा पण आणि आज पण!
काय करत असेल तो? छोट्या छोट्या कामातून फार मोठा झालेला असावा!!
मित्रा कधीतरी भेट रे सहज!!!