sneha gade

Tragedy Others

3  

sneha gade

Tragedy Others

हरवलेले व्यक्तीमत्त्व

हरवलेले व्यक्तीमत्त्व

4 mins
93


लॉकडाऊन एक माझ्या डोळ्यासमोर उभे राहिलेले आव्हान होय. माझा समज असा होता की, लॉकडाऊन फार तर फार दहा दिवस राहणार. पण झाले वेगळेच! रोजचा एक नवीन दिवस उगवायचा त्यात तर सुरुवातीला मजाच मजा वाटायची. सर्वजण एकत्रित राहत होते. रोजच वेगवेगळे नवनवीन पदार्थ करायचो व आनंदाने खायचे. वेळेचे तर कुणालाच बंधन नसायचे. सकाळचा चहा, नाश्ता, गप्पा-गोष्टी, जास्तीची कामे व आवडते जेवण. वेळेप्रमाणे रामायण व महाभारत हे तर आवर्जून बघायचं. त्यावेळेस सर्व कामाला येणारी बाईपण बंद झाली होती, तरीपण कामे आवडीने करायचो.

      

पण काही व्यक्तींकरता हा लॉकडाऊनचा काळ वाढत गेला, तशा काही गोष्टी अशक्य व्हायला लागल्या. कुणाचे पगार बंद झाले, कुणाची नोकरी गेली, कोणी क्वारंटाईन व्हायला लागले. ऑटो बंद, टॅक्सी बंद, अशा अनेक प्रकारच्या अडचणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. हळूहळू सर्व व्यथांना सुरुवात झाली, ती आजतागायत सुरूच आहे?


मला काहीसा माझा प्रसंग लॉकडाउनच्या काळातला व्यक्त करावासा वाटतो. मी तर ३ जून 2020, ही तारीख कधीच विसरू शकणार नाही. कारण जीवनात आईचं हृदय कोणीच जिंकू शकत नाही. माझी आई आपल्या खोलीवर राहायची. तशी तिची तब्येत चांगलीच होती. पण लॉकडाऊनच्या काळात तिला कोणी भेटायला फारसे जाऊ शकत नव्हते. आम्ही तिच्या दोन कन्या अधून मधून भेटण्याकरता जायचो. तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ पाठवायचो. माझी मुलं तर रोजच तिला भेटून यायचे. पण कुठेतरी उणीव निर्माण झाल्यासारखी वाटायची. तिचे फोनवर बोलणे व्हायचे पण ते काही मनाला रुचायचे नाही. तिच्यासमोर एकच ध्येय निर्माण झाले होते, ते म्हणजे पैसा होय, माझे पैसे कोणी घेतील का? मला कोणी विचारणार नाही का? तुमचा पैसा मी विचारते का? आपण तिच्याकडे गेलो तर ती वेगळीच बोलायची. आपल्याला भेटायला आले आहे, हा विचारच करीत नव्हती.


अर्थात ती म्हातारी झाली होती. उलट सुलट बोलून आमचेही मन दुखवायचे. पण काय करणार मुलगा नसल्यामुळे आम्हालाच सर्व काही सहन करावे लागणार होते. तिच्या आयुष्यात मात्र घटनाही तशाच घडल्या होत्या. पण आम्ही मात्र वेळोवेळी तिची बाजू घेऊन सावरून घ्यायचो व तिच्या इच्छा पूर्ण करीत होतो. तिच्या मुलाच्या मुलीमध्ये, म्हणजेच नातीमध्ये फारच जीव होता, पण सुन व नात तिच्याजवळ राहत नव्हत्या. त्या तिच्या आजीकडे असायच्या. आमच्या आईचा स्वभाव तसा शांत नव्हताच हे आम्हाला माहिती होते. ती मात्र एकटी पडल्यामुळे जरा जास्त चिडचिड करायची. मला फोन आल्यावर म्हणायची, माझ्याकडील किराणा संपला आहे. इलेक्ट्रिक बिल भरायचे आहे. आज बाई आली नाही. तू मला डब्बा पाठव. मी आता नर्सला सोडून देणार आहे. तुम्ही माझं करा, असं एक ना अनेक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आणून ठेवायची. त्यातच मी कधी चिडायचे. कधी समजावून घ्यायची व तिला सांगायची, आई जरा शांत राहा. पण ती ऐकत नव्हती. अशी परिस्थिती तिने निर्माण केली होती.


माझ्या घरी राहात होती, तिचे सर्वकाही व्यवस्थित चालले होते. सर्वजण तिला विचारीत होते. भेटायला यायचे. सर्वांची विचारपूस होत होती. पण घरात उगीचच कुठलाही राग कुणावर काढून संतापायची व जिवाचा त्रागा करून घ्यायची. मला तर फार रडायला यायचं. तिकडे पतीदेव व इकडे आई यामध्ये माझी चांगली सुपारी कुटल्या जायची. एके दिवशी तिने फारच जिद्द केली व म्हणाली, मला माझ्या खोलीवर जायचे आहे. मी तिथेच राहील. तुमच्याकडे राहात नाही. आत्ता मला पोहोचवून द्या.


मला काही सुचेनासे झाले. मी माझ्या बहिणीला, वहिनीला फोन केला. त्यांना बोलावून घेतले, खूप समजावले पण व्यर्थ. जिद्दी स्वभावाला कधीच औषध राहात नाही. शेवटी कारमध्ये तिला घेऊन गेलो. खोलीवर लाईटही नव्हते. मग आठ हजार रुपये देऊन लाईन आणली. अशाप्रकारे तिथे आनंदात राहायला लागली. आम्ही अधून मधून जात होतो. काही दिवसातच तिथे पायाच्या भारावर पडली व तिचे दुसरे ऑपरेशन झाले. त्यातून ती बरी झाली पण लॉकडाऊनच्या काळात मात्र विचित्र बोलायची. आवाज तसा तिचा कणखर होता. थोडी अशक्त झाली होती. पण काळाचा पडदा तिच्यावर पडेल असे कधी वाटले नाही. कधीही फोन करायची, शेजारच्या मनीषाला त्रास द्यायची. तिचे फोन मला वारंवार यायचे.


आम्ही तिला समजवायचं, "अगं आई तू अशी बोलू नको बरं..." तर ती म्हणायची, "तुम्हाला मी नाही आवडत, दुसरे दुसरे लोक गोड आहेत तुमच्याकरता." पण मला मात्र मनात यायचं की ही रोज अशी करते? आज सगळ्यांची छान बोलली होती. माझ्याकडील इडली-सांबार व बहिणीकडे शेवयाची खीर खाल्ली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. बाईंनी आंघोळ करून दिली, नाश्ता दिला व दुपारी बारा वाजता जेवण घेतले. नंतर आपले औषध घेऊन ती झोपी गेली साधारण दोन वाजता. झोपली होती, चार वाजता तिला चहा पिण्याकरता उठवले तर तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. आवाज दिला, चहा घ्या म्हटले तर ती बोलतच नव्हती. आम्हाला फोन आला, आम्ही लगेचच तिथे पोहोचलो पण तिची प्राण ज्योत मात्र मावळली गेली होती. मला धक्काच बसला, मी काय करू काय नाही असे झाले. पण मी मोठी असल्यामुळे सर्व निर्णय मला घ्यावे लागत होते, ते मी घेत गेली व तिचे सर्व विधी तिच्या पुतण्याकडून व आम्ही सर्व मिळून तिच्या खोलीवरच केले व तिच्या आत्म्याला शांती मिळावी असे ईश्वरचरणी प्रार्थना केली.


माझी आई फार चांगली होती. तिने कष्ट करून आम्हाला आमच्या पायावर उभे केले व आम्हाला तिने आपल्या ऋणात ठेवले आहे. अशी माझ्या आईची कहाणी. लॉकडाऊनच्या काळात तयार करून हरवलेले व्यक्तिमत्व मला कधीच आता मिळणार नाही आणि आई हा शब्द उपभोगायला मिळणार नाही याची खंत वाटत राहील. केवळ लॉकडाऊनमुळे हा प्रसंग माझ्यावर आला म्हणून म्हणावेसे वाटते-

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, असे मी म्हणू इच्छिते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy