हरविलेलं चांदणं
हरविलेलं चांदणं
मराठी कथा -
ट्रिंग...ट्रिंग... दारावरची बेल वाजली आणि बेलच्या आवाजाने मी दचकून जागा झालो. ती दुपारची वेळ होती. आणि आज रविवार म्हणून मी पलंगावर आडवा पडून पुस्तक वाचत होतो. मात्र पुस्तक वाचत असताना कधी झोप लागली ते कळलेच नाही आणि आता जाग आली नी घड्याळाकडे एक नजर टाकली तर घड्याळाचा काटा दुपारचे चार वाजले असल्याचे दर्शवत होता. मी दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय दारावरती अमोल आणि ऋतुजा उभी होती. अर्थात अमोल हा माझा मित्र आणि ऋतुजा ही त्याची अर्धांगिनी.
ऋतुजा अर्थात सुंदर...अमोल पेक्षा एक दोन वर्षांनी लहान... सुंदर गोरापान रंग...काळेभोर केस... नाजूक जिवणी... बोलके डोळे... पाहता क्षणी ती कुणालाही आवडावी अशीच... मात्र माझा मित्र अमोलही थोडाथोडका देखणा नव्हता... तो सुद्धा ऋतुजाच्या स्पर्धेत टिकून होता... म्हणूनच दोघांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा कसा शोभून दिसत होता. दोघेही दारात उभे होते. अमोल बऱ्याच दिवसानंतर आणि ऋतुजाला सोबत घेऊन आल्याने मला जरा आश्चर्य वाटले. मी त्यांना आत बोलावून घेत आत बसायला सांगितले.
ऋतूजाच्या हातात कसला तरी गठ्ठा दिसत होता.
मी तिला म्हणालो, "ऋतुजा, कसला ग हा गठ्ठा ?"
होय ऋतुजा माझ्या बरोबरीची असल्याने मी तिला नावानेच हाक मारत असे. ऋतुजा त्या गठ्ठयातील एक कार्ड माझ्या हातात ठेवत म्हणाली...
"ही घ्या निमंत्रण पत्रिका... उद्याला आमच्या निशांतचा पाचवा वाढदिवस...यायला विसरायचं नाही... नक्की यायचं..."
"नक्की येणार..."
"विजय माया कुठे दिसत नाही ?" अमोल
"अरे हो, ती जरा बाहेर तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे."
पत्रिका पाहता पाहता मी अमोलच्या आवडीचे पोहे करावे म्हणून उठलो आणि त्यांना म्हणालो...
"अमोल, नसली माया तर काय झाले ; मी तुझ्या आवडीचे झक्कास पोहे बनवतो."
मला अडवतच अमोल समोर बोलला...
"नको विजय आम्हाला अजून पुन्हा एवढा गठ्ठा संपवायचा आहे. पुन्हा कधीतरी येऊ आम्ही... कार्यक्रमाला यायला मात्र विसरू नका... जेवायला तर नक्की यायचं... आणि हो विजय, मायाला सोबत आणायला मात्र विसरायचे नाही."
"अरे हो बाबा, मी आणि माया नक्की येईल."
त्यांनी पुन्हा-पुन्हा आग्रहाचे निमंत्रण दिले आणि निरोप घेतला.
कार्यक्रमाची वेळ उद्या सायंकाळची होती... मी आणि मायाने कार्यक्रमाला जायचे निश्चित केले.
दुसरा दिवस उजाडला... आज सोमवार होता. त्यामुळे ऑफिसला जाऊन मी जरा लवकरच परत आलो आणि भेटवस्तू घेऊन मोठ्या उत्साहाने अमोलकडे पोहोचलो.
अमोलनी आपलं घर फार छान सजवलं होतं. वाढदिवसाचा स्टेज रंगीबेरंगी फुलांनी आणि फुग्यांनी सुंदर सजवला होता. आणि अमोलने आपल्या निशांतला देखील चांगला सफारी सूट घालून देऊन कार्यक्रमासाठी तयार केलं होतं. कार्यक्रमासाठी अमोलने चांगली रंगसंगती साधली होती. स्टेजवरती गुलाबाच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या कुंड्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. त्याच्या मागील पडद्यावर हॅपी बर्थडे टू यू निशांत असे थर्माकोलच्या अक्षरांनी सुंदर लिहिलं होतं. तो स्टेज म्हणजे अगदी स्वर्ग नगरी वाटत होती. आणि शेवटी त्या नगरीत अमोल-ऋतुजा आणि त्यांच्या प्रेमातून उमललेले फूल निशांतचे आगमन झाले. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. निशांतने समोर ठेवलेल्या केकवरील मेणबत्त्या फुंकर मारून विझविल्या आणि केक कापून आपल्या आई-बाबांना भरविला. पुनःश्च टाळ्यांचा कडकडाट झाला. निशांतवर शुभेच्छांचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव झाला.
शेवटी भोजनाचा कार्यक्रम चालु झाला. भोजनासाठी बुफे पद्धतीचा वापर करण्यात येऊन मंडपात जेवणासाठी टेबल-खुर्च्या व्यवस्थित लावण्यात आल्या होत्या. सर्वत्र खाद्यपदार्थांचा सुगंध सुग्रास दरवळत होता. आता आम्हाला देखील भूक लागली असल्याने आम्ही हातानेच वाढून घेत जवळच असलेल्या एका टेबलावर ताटं ठेवून माया आणि मी जेवायला बसलो.
जेवायला सुरुवात केली आणि जेवन चालू असतांनाच माझं लक्ष सहजपणे बाहेर गेलं... दोन-तीन छोटी-छोटी मुलं आडोश्याला उभी होती... पहिला सात-आठ वर्षाचा, दुसरा सहा-सात वर्षाचा आणि तिसरा पाच ते सहा वर्षांचा असावा... बहुतेक ते भाऊ-भाऊ असावेत असे त्यांच्या चेहऱ्यावरून भासत होते. त्यांचे कपडे ठिकाणी फाटलेले आणि मळलेले होते. त्यांच्या शर्ट मधून त्यांचं खपाटी गेलेलं पोट स्पष्ट दिसत होतं. ते तिघेही बहुतेक भुकेले असावेत असे वाटत होते. ते येणाऱ्या-जाणाऱ्यांना हात समोर करून केविलवाण्या चेहऱ्याने गयावया करून खायला काहीतरी मागत असावेत. ध्वनी प्रक्षेपकाच्या मोठ्या आवाजात काहीही ऐकायला येत नव्हतं. येणारे-जाणारे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना निर्दयतेने धक्का देऊन बाजूला करीत होते.
शेवटी त्यांच्यातील सर्वात लहान मुलगा रडायला लागला. पोटामध्ये उसळलेला भुकेचा आगडोंब कदाचित त्याला सोसवत नव्हता... तो रडत-रडत आपल्या मोठ्या भावाला जीव तोडून काहीतरी सांगत होता.
अखेर दबकत-दबकत ते मंडपात आले. दुसऱ्या आजू-बाजूच्या लोकांकडे पाहून त्यांनी जरा भितभीतच त्या लोकांचं अनुकरण करीत ताट घेतलं... त्यात खाद्य पदार्थ वाढून घेतले... आता ते बसण्यासाठी जागा शोधू लागले... त्यांना समोर खाली असलेल्या खुर्च्या दिसल्या पण बसण्याची त्यांची हिंमत झालीच नाही. ताटातील सुग्रास जेवण पाहून लहान मुलाच्या डोळ्यात आनंद लकाकू लागला. शेवटी ते एका कोपऱ्यात जाऊन बसले आणि तोंडात घास टाकणार तोच तिघांच्याही पाठीत धपकन धपाटा बसला... आणि या अनपेक्षित बसलेल्या धपाट्यामुळे ते घाबरले...त्यांचे सर्व अंग थरथरू लागले... त्यामुळे ताटातील भाजीचा रस्सा त्यांच्या तोंडावर आणि कपड्यांवर सांडला... ताटामधील पदार्थ अस्ताव्यस्त झाले... त्या माणसाने त्या तिघांच्याही हातातली ताटं हिसकावून घेतली. त्यातल्या-त्यात लहान मुलानी आपल्या छोट्या-छोट्या नाजुक हातानी ते ताट घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ...पण त्या निर्दयी धिप्पाड माणसाच्या हातातून ते कितपत अडवून ठेवणार होतं... अखेर त्या माणसाने त्यांच्या हातातील ताटं हिसकावून घेतली... ते तिघेही रडू लागली... आणि दीनवाण्या स्वरात ती विनवणी करू लागले, "काका आम्हाला एवढे खाऊ द्या हो ; आम्ही दोन दिवसापासुन उपाशी आहोत...." पण त्यांनी त्यांची ताटे भांड्यांच्या ढिगार्यावर भिरकावून दिली आणि त्यांना धपाटे देत आणि पुन्हा इकडे फिरकलात तर पाय तोडून टाकीन... जाने कहा-कहा से चले आते है परेशान करने के लिए...असं बरळत त्याने त्यांना बाहेर हाकलून लावले.
आता बहुदा त्यांना कळलं असावं की आता इथे जेवणाची अपेक्षा करणे उपयोगाचे नाही आणि म्हणूनच मोठा भाऊ त्या छोट्या भावांच्या गळ्यात हात घालून त्यांची समजूत घालू लागला. शेवटी मोठ्या भावाने लहानांचे आपल्या फाटक्या सदऱ्याने डोळे पुसले आणि शेवटी हातात हात घालून ते तिघेही हळूहळू दूर निघून गेले.
अमोल आणि ऋतुजा आलेल्या पाहुण्यांना आग्रहाने वाढत होते. पण माझ्या घशाखाली घास उतरत नव्हता... डोळे पुन्हा पुन्हा त्या विचारांनी भरून येत होते... शेवटी जेवण तसेच ठेवून मी त्या मुलांना खाण्यासाठी काही तरी द्यावे किंवा त्यांना नाश्ता करण्यासाठी निदान काही रुपये तर देऊया... या विचाराने मी उठून बाहेर मंडपाच्या गेट जवळ आलो आणि त्या मुलांवर माझी नजर भिरभिरू लागली... मात्र ती मुले माझ्या नजरेस आली नाही. ती मुले येथून केव्हाचीच गडप झाली होती. माझ्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू तरळले पण मी काहीच करू शकत नव्हतो. वाटलं माझ्या अश्रूंना जर त्यांच्या पोटातील भुकेच्या आगीचा डोंब शांत करता आला असता तर...
शेवटी कार्यक्रम आटोपून आम्ही घरी परतलो आणि मी झोपण्यासाठी म्हणून अंग शय्येवर झोकून दिले. पण मला झोप लागत नव्हती. सारखा त्या मुलांचा विचार माझ्या मनात राहून राहून डोकावून जात होता. आपण त्याच वेळी मदत न केल्याचे दुःख मनाला बोचत होते. अगदी त्याच विचारात मी पूर्णपणे गडून गेलो होतो. त्याच वेळी माया माझ्या शेजारी येऊन बसली. आणि म्हणाली,...
"विजय, कोणत्या विचारात गढला आहेस तू ?"
"अग माया...."
मी तिला सर्व हकीकत सांगितली... मायाला देखील या गोष्टीचे वाईट वाटले.
वाटलं आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन अर्धशतक उलटले तरी आजही आपल्या देशातील गरिबी दारिद्रय संपलेले नाही. अजय टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी बालकांना शिक्षण घेण्याच्या, खेळण्याच्या, आनंद घेण्याच्या काळात भीक मागत फिरावे लागत आहे आणि शासन सुद्धा या मुलांकडे दुर्लक्ष करते आहे. तेव्हा कधी संपणार आहे गरिबी आणि दारिद्र्याचा प्रश्न ? आणि कसा निर्माण होईल उद्याचा सदृढ वस्तू संपूर्ण देशाचा आधारस्तंभ ? याच विषयावर आम्ही बराच वेळपर्यंत चर्चा करीत होतो. शेवटी मी आणि माया अंगावर पांघरुन झोपी गेलो.
आज चार दिवस उलटून गेले होते तरी माझ्या डोक्यातून त्या मुलांचा विचार जात नव्हता. मी ऑफिसमध्ये असो की घरी सतत ती मुलं माझ्या डोळ्यासमोर यायची... सारखं वाटायचं त्यांचा शोध घेऊन त्यांना मदत करावी... त्यांना पोटभर खाऊ घालावं... पण या एवढ्या मोठ्या शहरात ती भेटणार तरी कुठे हा प्रश्न होताच...
आज रविवार होता. आज त्या गोष्टीला आठ दिवस लोटून गेले होते. त्यामुळे ती घटना मी हळूहळू विसरू पाहत होतो. दुपारची वेळ होती मी आणि माया काही तरी गप्पा करीत बसलो होतो. तोच समोरून दोन मुले येतांना मला दिसली... होय... तीच... ती.... त्या दिवशीच... असावी... मी त्यांच्याकडे एकटक बघत होतो. ती मुले आमच्या दारात येऊन उभी ठाकली आणि काका आम्हाला काहीतरी खायला द्या हो... काकू आम्हाला अर्धी चपाती तरी खायला द्या हो... अशी विनवणी करू लागली... मी त्यांना जवळून न्याहाळले... होय ती मुले हीच होती... जी त्यादिवशी उपाशी परतली होती... पण दोनच...? मी मात्र विचारात पडलो आणि त्यांना विचारावे म्हणून त्यांना म्हणालो,...
"बाळांनो, आणखी एक छोटा मुलगा होता ना तुमच्या सोबत?"
"होय साहेब, लहान भाऊ आमचा तो..."
"मग आज कुठे आहे तो ?"
"नाही साहेब, आज तो आमच्यात नाही."
मी त्यांच्या बोलण्यावरून ओळखलं की त्यांच्या लहान भावासोबत काहीतरी अघटित घडलं आहे.
मी पुन्हा विचारले ,...
"काय झाले त्याला ?"
ती रडायला लागली व सांगू लागली,...
"साहेब, आम्ही आठ दिवस अगोदर एका ठिकाणी कार्यक्रम होता म्हणून काही तरी खायला मिळेल या आशेने जेवायला गेलो होतो. आम्ही त्या दिवशी दोन दिवसापासून जेवलो नव्हतो. म्हणून आम्ही आत शिरलो... जेवणाची ताटं घेतली... आणि आम्ही जेवणार त्याच वेळी कुणी-तरी मागून येऊन आमचे पाठीत लाथ घातली... आम्हा तिघांनाही मारतच बाहेर काढलं... शेवटी आम्हाला त्याही दिवशी उपाशीच राहावं लागलं होतं...
आमचा लहान भाऊ सारखा रडत होता... पण आम्ही त्याला काहीही खायला देऊ शकत नव्हतो. मी त्याला समजावत होतो. शेवटी त्याला कसे-तरी उपवाशीच झोपवून दिले. तोही झोपी गेला. दुसरा दिवस उजाडला आम्ही त्या उठविण्याचा प्रयत्न केला परंतु तो आता कधीच न उठण्यासाठी झोपी गेला होता... तो मेला होता.
हे सर्व सांगत असतांनाच त्या दोन्ही मुलांनी मोठा हुंदका दिला... आणि मोठ्याने रडायला लागली. मी त्या दोघांनाही समजावू लागलो ; म्हणालो,...
"बाळ रडू नकोस, जे व्हायचं ते तर झालं... आता तुम्ही जेवणार ना ?"
"होय साहेब, होय आम्हाला काहीतरी वाढून द्या हो..."
"बाळांनो, मी तुम्हाला वाढवून देणार नाही...
माझं हे वाक्य अर्धवटच ठेवतच ती मुलं बोलती झाली,...
"साहेब, खरंच आम्ही उपाशी आहोत हो... शिळं-पाकं कसही असेल ना तरी आम्हाला वाढून द्या हो साहेब...
"अरे बाळांनो, मी तुम्हाला वाढून देणार नाही म्हणजे आपण सर्व एकत्र जेवण करूया... या आत या बाळांनो... म्हणतंच मी त्यांना आत घेतले आणि मायाला म्हणालो माया ही आपली पाहुणे मंडळी आहेत.
लगेच मायाने त्यांना न्हाऊ-माखू घातले आणि आमच्यासाठी तिने पानं वाढून घेतली. सर्वजण वर्तुळाकारात जेवायला बसलो. मात्र ती मुलं... ती ताटं उचलून घेत उभी झाली आणि दरवाज्याच्या मागील कोपऱ्यात जाऊन बसली.
मी त्यांना म्हणालो,...
"बाळ काय करताय तुम्ही हे ?"
ती मुलं आम्हाला भित होती...
ती म्हणत होती,...
"साहेब तुम्ही मोठी माणसं... आम्ही तुमच्या सोबत कसे बसणार... नाही साहेब ; आम्ही इथेच बसू..."
मी त्यांचे न ऐकता त्या दोघांनाही पकडून आणले व दोघांच्याही मध्ये बसवून जेवणास सुरुवात केली.
त्या मुलांच्या बोलण्यावरून ती मुले फार चांगल्या घरातील आहे. हे मी पूर्वीच ओळखलं होतं. पण त्यांच्या बाबतीत आणखी काही माहिती करून घ्यावी म्हणून मी त्यांची चौकशी सुरू केली...
"बाळ, तुमचे आई-वडील कुठे असतात ?"
"साहेब, आमची आई तर आम्हाला लहानपणीच सोडून गेली... आमचे बाबा खूप दारू प्यायचे... त्यांनी दारू साठी सर्व काही विकून टाकले आणि एक दिवस बाबांनी नकळत दोघांचे खुनही केले. आज ते तुरुंगात आहेत."
"मग तुम्ही राहता कुठे ? झोपता कुठे ?"
"आमची झोपडी आहे ना तिकडे... तिथेच राहतो आम्ही..."
जेवतांना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता... मुलांनी पोटभर जेवण घेतले आणि ते तृप्त झाले. मलाही खूप समाधान मिळाले.
मी त्यांना म्हणालो,...
"बाळ पुन्हा या हं उद्याला..."
ती मुलं दुसर्या दिवशीही आली. मी त्यांना चांगले कपडे घालायला दिले. पोटभर जेवायला दिले. ती मुले तिसऱ्या दिवशीही आली आणि आज तर मायाने त्यांना न सांगताच न्हाऊ-माखू घातले... त्यांना पोटभर जेवायला दिले... आता ती मुले नियमित येऊ लागली. जेवण करून जाऊ लागली. मला तर पूर्वीच मुलांविषयी लळा लागला होता... आणि आता तर त्यांचा लळा मायाला देखील लागला होता. आता ती त्यांच्यात चांगलीच रमत चालली होती. आता ती मुलं सुद्धा तिला काकू-काकू करायचे... काही वेळ आमच्याकडेच थांबायचे त्यामुळे आता दुपारच्या वेळी मायाला कंपनी मिळायला लागली. तिलाही त्यांचं येणं-जाणं आवडायला लागलं.
एके दिवशी मी आणि माया झोपण्यासाठी म्हणून अंथरुणावर पडलो होतो. त्याच वेळी मायाने त्या मुलांचा विषय छेडला व म्हणाली,...
"विजय, मी तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का ?"
"सांग ना, एका का अनेक सांग ना..." मी तिच्या ओठांवरून बोट फिरवत म्हणालो.
ती बोलू लागली,...
"मी म्हणते, आपण या मुलांना दत्तक घेतले आणि आपले म्हणून त्यांना शाळेत घातले व त्यांना शिक्षण दिले तर..."
"काय म्हणतेस माया तू हे ? खरच इच्छा आहे तुझी ? का तू या मुलांची आई म्हणून भूमिका पार पाडू शकतील ? "
"होय विजय, मी खरच आईचे प्रेम त्यांना देईल."
"माया, तू माझ्या मनातले बोललीस..."
माझ्या होकाराने मायाला अत्यानंद झाला. नाही तरी आम्हाला तीन-चार वर्ष मूल नकोच होते... आणि आता तर मुलांची आवश्यकताच राहणार नव्हती. आम्ही त्या मुलांना दत्तक घेण्याचे ठरविले.
"विजय, किती चांगला आहेस रे तू..." असं म्हणतच मायाने माझ्या अंगाशी मिट्टी घट्ट केली. आणि आम्ही झोपी गेलो.
दुसरा दिवस उजाडला. आम्ही त्या मुलांना दत्तक घेण्याचे ठरविल्याने मी आज मुद्दामच ऑफिस मधून सुट्टी घेतली आणि मी आणि माया पोलीस स्टेशनला पोहोचलो. त्या मुलांना दत्तक घेण्याबाबत सर्व माहिती आम्ही ठाणेदार इंद्रजित यांना सांगितली. त्यांनीही ही मुले आमच्या जेलमध्ये असणाऱ्या नारायणची असल्याचे सांगितले. तेव्हा या संदर्भात नारायणशी चर्चा करावी म्हणून ठाणेदार इंद्रजितसह आम्ही नारायणला भेटायला गेलो. त्याच्याशी या संदर्भात बोललो.
आमचे बोलणे ऐकून बिचारा नारायण रडायला लागला. गयावया करीतच दीन स्वरात बोलू लागला,...
"साहेब, आमचं गरीब ब्राह्मण घराण... चांगला संसार होता आमचा... पण दारूने सर्व सत्यानाश केला माझ्या जीवनाचा... साहेब, फार पापी आहे मी... मी मुलांना तर जन्म दिला ; एका नाही तर तीन-तीन मुलांना जन्म दिला... पण त्यांचे संरक्षण त्यांचे पालन-पोषण करण्यास मी पूर्णपणे असमर्थठरलो. मला माझं एक मूल गमवावही लागलं... अन्नावाचून तडफडत प्राण सोडला त्याने... होय साहेब, मी या मुलांचा गुन्हेगार आहे. घोर पापी आहे मी... असे म्हणत त्याने रडण्याचा मोठा हुंदका दिला. मात्र स्वतःला सावरत पुढे बोलू लागला,...
"ठीक आहे साहेब, तुम्ही मुलांना दत्तक घेऊन त्यांना मातापित्यांचं प्रेम देणार आहात हे बघून मला आज असं वाटतंय की आजही या जगात माणुसकी, आपुलकी आणि जिव्हाळ्याची माणसं आहेत. खरंच ! साहेब तुमच्यामुळे माझी मुलं तरी शहाणी होतील. नाव काढील साहेब ही मुलं तुमची... त्यांना तुमच्यामुळे नवीन आई-वडील सुद्धा मिळतील... आणि त्यांना माझ्यासारखं खितपत पडावं लागणार नाही. उपकार होईल साहेब तुमचे... तुम्ही माझ्या मुलांना दत्तक घेताय ना...? तुम्ही माझ्या मुलांना सांभाळणार आहात ना ? घ्या साहेब घ्या त्यांना दत्तक घ्या.
असं म्हणून तो पुन्हा जोराने रडू लागला... अखेर बापाचं काळीज होतं त्याचं... त्याला वाईट वाटणं स्वाभाविकच होतं... शेवटी तो रडतच बोलून गेला,...
"साहेब, पण मला माझ्या मुलांना कधीमधी भेटता येईल ना ?
मी म्हणालो,...
"अरे का नाही ? तुम्ही मला तुमचा लहान भाऊ समजा... समजा की आपली मुलं आपल्या भावाकडे आहे..."
त्याच क्षणी नारायणनी मला घट्ट मीठी मारली. मी त्याचे अश्रू टिपले आणि अखेर त्या मुलांना रीतसर दत्तक घेतले.
आज आम्ही फार आनंदात होतो. आज ती मुले आमची झाली होती. आज साऱ्या सुखाची अनुभूती आम्हाला मिळत होती.
वाटलं, या मुलांना दत्तक घेऊन आम्हाला जसा आनंद होत आहे तसाच आनंद ज्यांना मुलं नाही अशी माणसे अनाथ, रस्त्यावर खितपत पडलेल्या मुलांना दत्तक घेऊन नाही का उपभोगू शकणार ?
सूर्याची सोनेरी पालवी घेऊन नव सूर्योदय झाला... आज ती मुले जरा लवकरच आमच्या घरला आली. त्या दोघांनाही पाहताक्षणीच मायाने त्यांना हृदयाशी धरले आणि म्हणाली,...
"बाळांनो, तुम्हाला इथे रहायला आवडेल ?
लहान म्हणाला,...
"काय काकू, आम्ही राहू येथे ? काकू काकांना आवडेल आम्ही इथे राहलेलं ?"दुसरा बोलता होत म्हणाला.
"नाही आम्ही नाही राहू शकणार इथे... बाबा शिव्या देतील आम्हाला...रागावतील आम्हाला...."
मध्येच मी म्हणालो,...
"होय बाळ, मला तुम्ही इथेच राहलेलं आवडणार आहे आणि आता आम्ही तुम्हाला इथेच ठेवून घेणार आहोत. शिवाय ही गोष्ट मी तुमच्या बाबांना देखिल सांगितली आहे. त्यांनी सुद्धा तुम्ही इथेच राहावे अशी इच्छा व्यक्त केली आहे."
"खरंच, काका तुम्ही आमचे बाबांना भेटलात?"
"होय बाळ..."
"होय काका-काकू आम्ही राहू इथे..."मुले आनंदाने म्हणाली.
झालं एकदाची मुलं आमच्याकडे राहायला तयार झाली. आज पुन्हा एकदा रविवार उजाडला. आज मला सुट्टी होती. त्यामुळे सकाळीच बाहेर पडलो आणि त्या मुलांसाठी नवीन ड्रेस आणि केक वगैरे घेऊन आलो. आज त्यांचे नामकरण व वाढदिवस करण्याचे आम्ही दोघांनी ठरविले होते. त्यामुळे सर्व तयारी मी आणि मायानीच केली. आमच्या घरामध्ये आज एक प्रकारे आनंद आणि चैतन्य संचारले होते. आणि यास जबाबदार होती ती ही केवळ दोन मुलं ! आणि म्हणूनच आम्ही त्या दोघांची नावं आनंद आणि चैतन्य ठेवायची ठरविले. आणि त्यांना केक भरवून त्यांचा वाढदिवस आम्ही घरच्या-घरी पण मोठ्या आनंदाने साजरा केला.
खरंच या दोन छोट्या मुलांमुळे साऱ्या जगीचा आनंद आमच्या घरात आला होता. संपूर्ण घरांचा आसमंत या मुलांमुळे पुलकित होऊन उठला होता. खरंच ! आम्हाला या रस्त्यावर भीक मागत फिरणाऱ्या अनाथ मुलांनी सर्व विश्वाचा आनंद आमच्या लहानशा घरामध्ये आणून भरला होता आणि आमचे छोटे घरटे या मुलांच्या येण्याने जिवंत आणि बोलके झाले होते आणि आनंद आणि चैतन्य माझ्या आणि मायाच्या प्रेम छायेत नव्याने बहरू लागले होते आणि त्यांच्या जीवनातून हरविलेलं चांदणं त्यांना पुन्हा परत मिळालं होतं.
