Shubhangi Dalavi

Tragedy

3  

Shubhangi Dalavi

Tragedy

एक रात्र मंतरलेली

एक रात्र मंतरलेली

5 mins
343


"यापुढे एकही शब्द ऐकून घेणार नाही मी..! बस्स ! झालं ! थांबवा आता हे सारं....!" याक्षणी तिचा नेहमीचा याचक स्वर आज चढाला लागला.


"एsssss ! गप बसायचं हा ! नको तिथं तोंड उचकटायचं नाय अजिबात !" त्याने तशीच नेहमीचीच दादागिरी करत तिच्यावर भंडारा उधळला.....!


तिने चेहऱ्यावरील तो "पिवळा थर" झटकला.


"आता ऐकून घेणार नाही हं ! सरळ पोलीस स्टेशन गाठणार.....! कायदा मलाही समजतो तसेच तो कसा हाताळायचा हे ही समजतेय..! नाहीतर त्या शेजारच्या शहरातल्या अंधश्रद्धा निर्मुलन अॉफिसातच जाते....!" त्याच्यावर हात उगारतच तिने त्याला खडसावले.


तसा तो दचकलाच.....! झटकन त्याने स्वतःचा तिच्यावर उगारलेला हात काठीसह खाली घेतला. काहीसा अंदाज घेत तो थोडा बाजूला जाऊन बसला. ती अमावस्येची रात्र होती. मंत्र-तंत्रांच्या "कारस्थानासाठी" ती खोली कुलूप लावून बाहेरून बंद करण्यात आली होती. अन् त्या बंद खोलीत हे दोघे अडकले होते.....! खरं तर त्यानेच कर्मकांड करुन स्वतःचा पुरुषी अहंकार जपण्याची स्वतःचीच चेष्टा केली होती. यात त्याच्या घरचेही सामील होते.


पाहता पाहता रात्र पुढे सरकत होती. ते दोघेही त्या अमावस्येच्या रात्री स्वतःला सावरत परस्परांपासून स्वतःला लपवत राहिले. त्याचा अहंकार लपवून तो.. तिची नजर चुकवत राहिला व ती.. पुन्हा कधीही ,तो हेच शस्त्र वापरून आपल्याला परत एकदा एकांताच्या दरीत ढकलून देईल या विध्वंसक जाणिवेने स्वतःच्या भविष्याचा सावधपणे विचार करत राहिली. फक्त स्वतःच्या.....!


तो....पद्मनाभ ! व ती....रमा ! ती उच्चशिक्षित तर पद्मनाभ पदवीधर असूनही बुरसटलेल्या विचारांचा.....! लग्नाला वीस वर्षे पूर्ण होऊनही त्या दोघांचे मनोमिलन झालेच नव्हते. कारण सहजीवनाला मते , विचार जुळणेही तितकेच महत्त्वाचे नाही का...? पदरी मुलबाळ नव्हते पण एखादे तरी फुल आपल्या संसारवेलीवर फुलावे व त्याला वाढवताना त्याआधारे पुढील जगण्याचा मार्ग सुखकर करावा इतकी साधी अपेक्षा रमाने ठेवली होती.


"मी आता आणखी दवाखाने फिरणार नाय...! आता बास ! ! आता ,मी सांगणार आणि तु ऐकायचं.....! कळलं का ? एssss ! तुला सांगतोय मी....!" तो चांगलाच तावातावाने रमाला फटकारत होता.


"पण......! अहो.....! आता एकदाच......!" तिचे केविलवाणे आर्जव......!


"एsssss ! तुला आता सांगितलं ते इसरलीस का लगेच...? त्यो सांगंल त्येच कर बाय...!"


पद्मनाभची आई सुनावून गेली.


"अहो....! पण तुम्ही म्हणताय ते उपचार नाहीत. शुद्ध अडाणीपणा आहे. अशा ढोंगी लोकांच्या बोलण्याला फसू नका हो.....!"


रमा परत परत विनवणी करत राहिली. पण ते सारेच व्यर्थ होते.


"एsssss ! गप की आता...! मला शहाणपण शिकवायचं नाय बरं का ! ते तुजं ज्ञान तुझ्यापशी ठेवायचं...! हिथं ह्रायाचं आसलं तर निमुट तिथं कोपऱ्यात बसायचं...! आणि सांगंल तेवढंच करायचं....!आली मोठी मला शिकवायला....! वांजोटी ! मेली.....!"


जाता जाताच त्याने तिच्या सिद्ध न झालेल्या "आईपणावरच" ओरखडा ओढला. तिच्या निशब्द देहाला लाथेने भिंतीकडेला ढकलले व जोराने दार आपटून तो पाय झाडत निघून गेला.

रमा तिथेच भिंतीच्या आधाराने डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करुन देत पडून राहिली. निःश्चल ! न जाणो कित्येक तास....! उपाशीच...........!


"वो....! महाराणी ऊठा आता. दिवस उगवलाय. कामं कोण तुजी आय-बाप करणार हाईत का ईवून हिथं...?" पद्मनाभची आई फर्मान सोडून गेली.


रमा कसेबसे स्वतःला सावरत उठली. न्हाणीघरात जाऊन आपल्या कोमेजलेल्या शरीराला जलसंजिवनी देऊन आली व कपभर चहाने घसा ओला करुन कामाला लागली. मुल न होण्याचे खापर तिच्या माथी मारुन पद्मनाभमधील तो "नपुंसक" मात्र ताठपणे त्याचा अहंकार मिरवत होता. डॉक्टरांनी त्याच्यातली उणीव स्पष्टपणे दाखवूनही पुरुषीपणाचा खोटा आव त्याने धारण केला व मंत्र-तंत्र , जादूटोणा यातच स्वतःच्या मनाचे सांत्वन करत राहिला.


रमाला मात्र हे सारे गंडे-दोरे ,अंगारे धुपारे जाचक वाटू लागले. तिने त्याला अनेकदा या चुकीच्या कृत्याची जाणीव करुन देण्याचा असफल प्रयत्न केला.


"अहो ! मी काय म्हणते ! मुलाची आस व आपले आयुष्य असं वाया नको घालवायला..! त्यापेक्षा आपण एखादे मुल दत्तक घेऊ ना..!"


"बोललीस ? आता हे शेवटचं हा...! पुन्हा नाव काढलंस तर कायमचं तोंड बंद करीन मी तुजं"

पद्मनाभ नेहमीप्रमाणेच गुरगुरला तसे ती ही शांत बसली. शेवटी प्रत्येकालाच स्वतःचा जीव तर प्रिय असतोच....! आणि ती जाऊन तरी कुठे जाणार होती. बाईच्या जातीला दोनच जागा...! एक बापाचे "अंगण" व दुसरी नव-याची "चौकट" पण माहेरात जिव्हाळ्याचे कुणीच उरले नव्हते तिचे...!


मागच्याच वर्षी ती माहेरी गेली होती. तिच्या वडिलांना शेवटचे पहायला...! हो शेवटचेच..! रमाचे वडील गेले अन् तिचा भक्कम आधारही गेला. विनाचौकशी आपण आपल्या उच्चशिक्षित मुलीला अशा सुशिक्षित अडाणी माणसाच्या पदरी बांधून मोठे पाप केलेय या अपराधी भावनेनेच शेवटी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रमाची आई तिथे असली तरी मुलगा व सुनेच्या ओंजळीने पाणी पीत होती मग अडचणीत सापडलेल्या आपल्या लेकीला ती कशी आधार देणार,....? त्यातच आई जुन्या मताशी ठाम असणारी...!


"बाईच्या जातीनं लावलेल्या चुलीला च जळावं शेवटपर्यंत.....!"


हे ती सतत रमाला सांगत राहायची तसेच ती ही मुलगा व सुनेच्या विरुद्ध जाऊन बेघर होण्याच्या कल्पनेने रमाशी जास्त संबंध ठेवत नसावी.


अशा त-हेने मुक जीवन जगत रमा स्वतःच्या निरुत्साही शरीर व मनाला जगवत होती. स्वतःला सतत एखाद्या कामात गुंतवून ठेवत होती. तसेच पद्मनाभच्या अत्याचारी कर्मकांडालाही बळी पडत होती. रमा कित्येकदा देवघरातल्या त्या अचल , निर्विकार परमेश्वरासमोर निशब्द टाहो फोडत असे ,


"का रे असा छळवाद मांंडलायस माझ्या आयुष्याचा....? संपवून का टाकत नाहीस या यातनामयी देहाला....? सुख-समाधानाचे एखादे कारणही नसावे का रे माझ्या आयुष्यात....?"


एका वळणावर हे सारे कर्मकांड तिला एखाद्या शापासारखे बोचत गेले. त्या फसव्या थोतांडामुळे तिचे शरीर आधीच खिळखिळे झाले होते. त्यातच आता तिच्या स्वप्नाळू मनानेही मान टाकली होती. ती पूर्णतः उध्वस्त होत चालली होती.


"ऊठ ! रमे....! अगं जागी हो. अशीच निष्प्राण होऊन जगणार का तु....? तुझी स्वप्ने अशीच धुळीला मिळताना निमूटपणे पाहणार...? या फालतू श्रद्धेत "अंध" बनलेल्या नव-याच्या त्रासाला बळी पडून निष्कारण मरुन जाणार...?"


तिला एके रात्री पडलेल्या स्वप्नात तिचेच एक मन तिला साद घालत होते. ती खडबडून जागी झाली. स्वप्नातील प्रश्नांच्या व सद्य परिस्थितीच्या विचाराने हैराण झाली. परंतु एका क्षणी काय अघटित घडले कुणास ठाऊक…? रमाने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि सा-या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा तिचा ध्यास परिणामकारक ठरला. नियतीचा डाव म्हणतात तो काय ,तिने उधळून लावला व एक निश्चय करत तिची छाती अभिमानाने फुलून आली. नव्हे तर त्यावेळी तिचा "स्वाभिमान" जागृत झाला होता. त्याने केलेला तो जादूटोण्याचा आघात तिने शेवटचा ठरवला. मोठ्या निकराने तिने तो भंडारा विस्कटून टाकला. त्याने मारहाण करताच त्याच्यावर प्रतिकारासाठी हात उगारला आणि स्वतःची सुटका करुन घेतली. तिचे ते रौद्र रुप पाहून तो मागे सरकला.

आता पहाट झाली होती. रमाच्या आयुष्यात आज नवे स्वप्न ,नवा ध्यास ,नवी दिशा घेऊन आदित्य आपली तेजस्वी किरणे पसरवू पहात होता. तिने नव-याकडे दुर्लक्ष करतच ऊठून जोरात दार वाजवले. बाहेरून कुणीतरी कडी काढताच तिने "बाहेरच्या" जगात प्रवेश केला. काही जुजबी गोष्टी बॕगेत भरुन ती घराबाहेर पडली. स्वतःचे नवे जग शोधायला.....! नव्या दिवसाचे स्वागत करत.......! तिचे मन 'एकला चलो रे' चा नारा देत राहिले. प्रसन्न सुर्यकिरणे तिचा चेहरा अभिमानाने तेजाळून काढत राहिली...! ती पुढे....पुढे....आणखी पुढे....! ! चालतच राहिली...! स्वशोधात तिला न जाणो अजून किती चालायचे होते....!


Rate this content
Log in

More marathi story from Shubhangi Dalavi

Similar marathi story from Tragedy