दरवळणारा सुगंध व तरळणारे अश्रू
दरवळणारा सुगंध व तरळणारे अश्रू
वाढदिवस म्हणजे प्रत्येकासाठीच एक खास दिवस. आयुष्यातल्या एका नव्या टप्प्याची सुरुवात. हे ओळखून आईने वाढदिवसानिमित्त त्याच्या आवडीची मेजवानी करायचं ठरवलं. त्याला अनपेक्षित भेट म्हणून ! खूप दिवस त्याचा हट्ट होताच म्हणा तसा.
पतीच्या स्वर्गवासानंतर तीच खस्ता खात संसाराचा गाडा ओढत होती. आपल्या परीने मुलासाठी जमेल ते सगळं काही करण्याचा तिचा अट्टहास होता. अन्य गरजांना चिमटे काढून, थोडी जास्तीची कामं करून तिने मेजवानीच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली.
त्याचा वाढदिवस तिच्यासाठी कोणत्याही सणापेक्षा कमी नव्हता. संध्याकाळी मित्रांन
ा भेटायला बाहेर जातोय असं सांगून तो निघाला. बाहेर जाताना तिने, " जेवायला लवकर घरी यायचं, मी वाट पाहतेये ! " असा शब्द त्याच्याकडून घेतला. बाहेर जाताना त्याच्याकडे डोळे भरून ती बघत होती. संध्याकाळी घरी आल्यावर मेजवानी पाहून केवढा खूष होईल तो , हाच विचार तिच्या मनात सारखा चालला होता. त्याच्याशिवाय कोण होतं दुसरं तिला ?
संध्याकाळी तिचा फोन खणखणला...
" आई, मित्रांसोबत मी बाहेरच जेऊन येतोय. तू जेवून घे, माझी वाट पाहू नकोस " असे शब्द तिच्या कानावर पडले.
घरभर मेजवानीचा सुगंध दरवळत होता. परंतू, तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते!