MITALI TAMBE

Tragedy Others

2  

MITALI TAMBE

Tragedy Others

दृष्टी

दृष्टी

3 mins
717


विशाल आणि रूपा म्हणजे कॉलेजची जान. त्यांच्या साध्या उपस्थितीनेही कॉलेजच्या वातावरणात चैतन्य निर्माण होई. कुणावरही कोणताही प्रसंग येवो त्यांच्या मदतीला ही दोघं हजर असणारच. 

   रूपा साने ही नावाप्रमाणेच रूपवान अन श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक मुलगी. तर विशाल भोसले हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधा , सरळ आणि नजरेत विलक्षण चमक असलेला मुलगा.

दोघांची एकमेकांशी ओळख कॉलेजच्या पहिल्या वर्षी झाली. एका सांस्कृतिक कार्यक्रमात दोघेही सहभागी झाले होते. विशालचा स्वभाव हळूहळू रुपाला आवडू लागला होता. हा मुलगा म्हणजे एक वेगळेच समीकरण आहे असे तिला विशालच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होते.

विशाललाही रूपाचा शांत स्वभाव आवडू लागला आणि नकळतपणे दोघेही एकमेकांच्या प्रेमातच पडले. विशालच्या सहवासात आता रुपाही सामाजिक कार्यात रस घेऊ लागली. अर्थात हा बदल फक्त आणि फक्त विशालमुळेच झाला होता याची तिला जाणीव होत होती.

   बघता बघता कॉलेजचे ते मंतरलेले दिवस संपले. विशालने शेवटच्या वर्षात देखील कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. रुपाही विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाली होती.

रूपा खूप खूश होती. पण तिच्या या आंनदावर विरजण पडले जेव्हा तिने विशालचा तो निर्णय ऐकला. तिने विशालला खूप समजावले पण तो समजूनच घेत नव्हता. त्याचा निर्णय पक्का झाला होता. तो निर्णय म्हणजे भारतीय लष्करात भरती होण्याचा. रुपाला काहीच सुचेना. पण हेच आपले लहानपणापासूनचे स्वप्न आणि आपल्या जीवनाचे ध्येय आहे असे विशालने सांगितल्यावर रुपाही त्याच्या या निर्णयापुढे हतबल झाली.

     लवकरच विशाल लष्करात भरती झाला. रूपा आणि विशाल एकमेकांना पत्र पाठवत होते. पत्रावरून विशाल फार खूश वाटत होता. रूपा मात्र आता सारखी लग्नाचाच विषय घेऊन विशालबरोबर पत्ररूपाने भांडत राहायची. पण लग्नाचा विषय टाळून विशाल बाकी सर्व काही लिहायचा आणि आपल्या प्रेमावर विश्वास ठेव असेही सांगायचा. इतक्यात लग्न न करण्याचा विशालचा हा निर्णय रूपाचे आयुष्यच बदलवून गेला. रूपाच्या आईवडिलांना लष्करात सैनिक असलेला विशाल आपला जावई म्हणून पसंतच नव्हता मुळी. तिच्या वडिलांनी तिचे लग्न एका श्रीमंत व्यावसायिक मुलाशी लावून दिले आणि रूपा वडिलांच्या या निर्णयापुढे काहीही करू शकली नाही. 

लग्नाआधी तिने विशालला शेवटचे पत्र पाठवून आपल्या प्रेमाला तिलांजली दिली.

विशाल फार बेचैन झाला ते पत्र वाचून. पण रूपाच्या निर्णयाचा आदर ठेवून त्याने हे दुःख पचवायचे ठरवले. आता फक्त देशाची सेवा हेच आपले ध्येय त्याने ठरवले . 

      हळूहळू रूपाही आपल्या संसारात रुळू लागली. सुरुवातीला तिने माधवचा , तिच्या नवऱ्याचा खूप राग राग केला पण माधवने फार समंजसपणे ही परिस्थिती हाताळली कारण रूपाने लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याला विशालबद्दल सर्व काही सांगितले होते . तिचा हा प्रामाणिकपणा त्याला आवडला होता. हळूहळू माधवने आपल्या प्रेमळ स्वभावाने रूपाचे मन जिंकले आणि पती म्हणून तिने माधवचा मनापासून स्विकार केला. एक नवरा म्हणून माधवने तिच्यावर कसलीही जबरदस्ती केली नाही की अधिकार गाजवला नाही उलट तिला त्याचा स्विकार करण्यासाठी वेळ दिला. या सर्व प्रकारावरून रूपा माधवचा आदर तर करीत होतीच पण या आदराची जागा प्रेमाने कधी घेतली हे तिला कळलेच नाही.

त्यांच्या या सुखी संसाराचा हेवा वाटावा इतका त्यांचा संसार सुरळीत चालू होता. 

      आणि एक दिवस असा आला ज्याने रूपाच्या संसारात कायमचा अंधार पसरला. एका मिटिंगसाठी जात असताना माधवच्या कारला मोठा अपघात झाला . या अपघातात त्याची दृष्टी गेली . आता आता कुठे त्यांच्या संसारात प्रेमाचा प्रकाश पसरत होता तर आजच्या ह्या वाईट बातमीने त्यांच्या संसारात कायमचा अंधार दाटला. 

    आता पुढे काय? माधवच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येणार नाही , माधव आंधळा झालाय ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. पण आता माधवसाठी आपण कणखर बनले पाहिजे हा विचार करून ती धैर्याने या

प्रसंगाला तोंड देण्यास सज्ज झाली. रूपा मनापासून माधवची सेवा करत होती. आता रूपाच माधवचे डोळे बनली.

    या दरम्यान सर्व उपचार करून झाले पण काही उपयोग झाला नाही आणि एक दिवस हॉस्पिटलमधून अचानक डॉक्टरांनी फोन केला. माधवला नेत्रदान करणारी व्यक्ती त्यांना सापडली होती त्यामुळे डॉक्टरांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले.

     माधवचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि पुन्हा एकदा माधव हे जग पाहू लागला. रूपाच्या आनंदाला तर पारावार राहिला नाही.

तिने डॉक्टरांचे पायच धरले. डॉक्टर म्हणाले , " हे बघा ताई , माझे आभार मानू नका. आभारच मानायचे असतील तर त्या थोर शहीद जवानाचे माना ज्याने देशासाठी तर आपला प्राण दिलाच पण नेत्रदान करून एका दृष्टिहीनाला नवी दृष्टी दिली."

   रूपा झटका लागावा तशी ताडकन उठली आणि तिने त्या शहीद जवानाचे नाव विचारले. डॉक्टरांनी ते नाव सांगताच ती कोसळीच. ते नाव होते ' शहीद मेजर विशाल भोसले.'


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy