धागा राखीचा..
धागा राखीचा..


#कथा - धागा राखीचा..
गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. झाडावर,पानांच्या घसरगुंडीवरून ओघळणारा जलमोती थेट ओल्या मातीच्या काळजात शिरत होता. सकाळचे सहा वाजले होते. अनुष्काने पापण्याची कवाडे उलघडली अन् अंगणात फेरफटका मारत ओल्या आसमंतात दिर्घ
श्वास घेतला. तिने मोठ्या आवडीने लावलेल्या गुलाबाच्या गोंडस रोपट्याला आज इवलेसे गुलाबाचे फूल उमलले होते. लालबुंद गुलाबाच्या ओलसर मऊशार पाकळ्या तजेलदार दिसत होत्या.अनुष्काने त्या गुलाबाला हलकासा स्पर्श केला. इतक्यात,घरातून हाक ऐकू आली, "अगं अनुष्का आवर पटापट. बागेत काय रेंगाळत बसली आहेस, काँलेजला जायला ऊशीर होतोय तुला." आईचा आवाज ऐकून अनुष्का लगबगीने घरात परतली. सर्व आवरा आवर करून अनु घाईत काँलेजला जायला निघाली. पुन्हा आईने हाक मारली "अग अनु काहितरी खाऊन जा गं, उपाशी पोटी घरातून निघू नये बेटा." मग काय आईचा हूकुम...तिला थांबावच लागलं. चहाचा कप ओठांना लावताच अनुची नजर आईने स्वयंपाक घरात बनवलेल्या नारळाच्या वड्यांवर गेली. "आई गं, आज काय खास मुहूर्त आहे का? सकाळी सकाळी एकदम नारळ बर्फीच बनवलीस...!
हो सोन्या, आज रक्षाबंधन आहे. तुझ्या मामाकडे जायचे आहे. राखी बांधायला"
अनुचा चेहरा उतरला. गळ्याशी आलेला हुंदका मुकाट गिळून आईला म्हणाली, "चल आई, मी निघतेय. काँलेजला जायला उशीर होतोय." आज लवकर घरी ये..आईचे शब्द तिच्यापर्यंत पोहचायच्या आत स्वारी अंगणा बाहेर रस्त्याच्या दिशेने निघून गेली होती.
अनुष्का वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकत होती. काँलेज मध्ये पाऊल ठेवताच. अनुच्या मैत्रिणींनी तिच्या भोवती फेर धरला.
"अनु आज आपण कँन्टीन मध्ये बसून गप्पा मारूया, लेक्चरला बसायचा मूड नाही बघ" असे प्रणाली म्हणाली.
"नाही मला लेक्चरला बसायचे आहे. माझ्या नोट्स पूर्ण करायच्या आहेत." अनुने वैतागून प्रणालीला उत्तर दिले.
मेघनाने नजरेने खुणावत प्रणालीला शांत राहण्यास ईशारा केला.
अनुष्का वर्गात निघून गेली. प्रणाली आणि मेघना मध्ये संवाद सुरू झाला..
"तुला माहिती नाही का प्रणा? आज रक्षाबंधन आहे. तिची मन:स्थिती बरी नाही. म्हणून ती अशी वागतेय."
'साँरी मेघे,लक्षात नाही आले माझ्या'
'ठीक आहे. चल आपण कँन्टीन मध्ये जाऊ'.
अनुष्का इको चा तास पूर्ण करुन कँन्टिनपाशी आली. समोरच्या टेबलवर प्रणाली आणि मेघना बसल्या होत्या. अनु जरा बिचकतच त्या दोघीं जवळ आली अन् त्यांना साँरी म्हटलं.
"साँरी प्रणा, मेघू.."
'ठीक आहे गं अनु चालतं मैत्रीत सर्व'
'ए प्रणा हा विश्या का असं तोंड पाडून बसलाय?'
'हा..हा..हा..अगं अने,त्याचे दोन्ही हात बघ. राखीने भरले आहेत. आज त्याला सर्व मुलींनी बकरा बनवलाय'.
'हा..हा..प्रणा हे बरे झाले. छान जिरवली त्याची सा-यांनी.मेघू तुला काय वाटतं?'
'होय अनु तो उगाच इकडे तिकडे शायनिंग मारत भटकत असतो. इथे कोणतरी झुरतय त्याच्यासाठी हे कसं कळत नाही त्याला..!' मेघनाने लाजून उत्तर दिले .
'अं......मेघू.....?'
अनुष्का, प्रणाली आश्चयाने मेघनाच्या चेह-याकडे पाहतात. ती पुन्हा लाजून कँन्टीनच्या बाहेर निघून जाते. मग दोघीही तिच्या मागोमाग वर्गात जातात. काँलेजचे तास संपवून अनुष्का मैत्रिणींचा निरोप घेऊन घराकडे कूच करते.
आज परतीचा रस्ता लवकर संपू नये असे तिला वाटत होते. पावलं जड झालेली. मनात कालवाकालव,डोक्यात आठवणींनी थैमान घातले होते. घराच्या उंब-यापाशी आली. मनाचा हिय्या करून घरात पाऊल टाकले. आई स्वयंपाक घरातून बाहेर आली. "हे बघ अनु, साडे दहा वाजलेयत.मी मामाकडे जातेय राखी बांधायला. तू पण दादाला ओवाळून घे पाहू.आणि हो
स्वयंपाक करून ठेवलाय. मला यायला उशीर होईल तू जेवून घे.' आईने अनुष्काच्या पाठीवर मायेने हात फिरवत म्हटले.अनुने होकारार्थी मान हलवून ती तिच्या खोलीत निघून गेली. तिच्या खोलीतील खिडकीपाशी येऊन उभी राहिली. बागेतल्या गुलाबाच्या फुलाकडे एकटक पाहत होती. गुलाबाच्या रोपट्याच्या अंगाखांद्यावर खेळणारे इवलेसे नाजूक फूल सकाळचे हलके ऊन पिऊन वा-याच्या झोक्यावर डुलत होते. अनुला प्रसन्न वाटले. मग अचानक आईचे शब्द आठवले. दादाला ओवाळून घे. ती स्वयंपाक घरात गेली. छानश्या चांदीच्या तबकात खोब-याच्या वड्या, चांदीचे निरांजन त्यात साजूक तुपाची फुलवात, कुंकवाचे तबक, सुंदरशी मोत्यांची राखी सर्व मांडणी करून औक्षणाची तयारी केली व ती किरण दादा च्या खोलीच्या दिशेने निघाली. 'किरण दा मी आलेय तुझी लाडकी अनुडी..' असे म्हणत दरवाज्यावर हळूच थाप मारली अन् दरवाजा आतल्या दिशेला लोटला. तिचे डोळे क्षणार्धात पाणावले.
चहुबाजुला भिंतीवर आपल्या भारत देशाची महती सांगणारी चित्रं, विविध प्रांतातील संस्कृतीचे दर्शन घडविणारी भिंतीपत्रकं, नजीकच्या टेबलावर शिस्तीत घडी घालून ठेवलेला सफेद कुर्ता,त्यावर भारत देशाची प्रतिकृती असलेला व रंगीत धाग्यांनी विणलेला छाप.आणि एक सुरेख फोटोफ्रम त्यात तिच्या रूबाबदार, देखण्या किरण दा चा फोटो. किरण भारतीय सैन्यात जवान होता.अतिशय कर्तव्यदक्ष,कणखर, मायभूसाठी प्राणाची बाजी लावणारा. दोन वर्षांपूर्वी भारत मातेचे संरक्षण करताना परराष्ट्रा विरुद्ध लष्करी चकमकीत किरणदा सिमारेषेपलिकडे, शत्रू राष्ट्रात बेपत्ता झाला. त्यानंतर त्याची काहीच खबरबात नाही. आज अनुष्काला त्याची खूप आठवण येत होती. किरण च्या काळजीने जीव कासावीस झाला होता. परंतु, दुस-या क्षणी तिला आठवले ते किरणने सैन्यात भरती व्हायच्या वेळी उद्गारलेले तडफदार शब्द. "मी आधी या भारत मातेचा मुलगा आहे. मग कोणाचातरी मुलगा,भाऊ वा इतर नाती आहेत. माझ्या मातेचे रक्षण करत असताना जर माझ्या प्राणाची, आयुष्याची बाजी लावावी लागली तर मला खरे अमरत्व प्राप्त होईल. तेव्हा मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी तुमच्या अवतीभवती असेन." म्हणूनच...किरण शरीराने परिवारा सोबत नसला तरी..किरणची आई,अनुष्का यांच्याकरीता तो जवळच आहे असे समजून त्या आयुष्य जगत होत्या. कारण..
किरण-अनुष्काचे बाबा भारत मातेचे ऋण फेडताना हुतात्मा झाले होते. त्या घराला सवय होती वीरांच्या परंपरेची.
अनुष्काने किरण च्या छायाचित्राला ओवाळले, जवळ सुंदरशी मोत्यांने
सजवलेली राखी ठेवली अन् तू जिथे असशील तिथे सुखरूप असशील, जिद्दीने झुंज देत असशील. आम्हाला तुझा अभिमान आहे. अशी मनोमन प्रार्थना केली व किरण दा च्या फोटोसोबत सेल्फी काढून स्मित करत ती सेल्फी कडे पाहत राहिली.