डंख
डंख


तांबडं फुटलं, नी दिस वर आला. सखू लगबगीनं उठली. सुगीचा दिस होता. एवढा येळ तिला कधीच होत नव्हता. रातच्याला तिचा डोळा लागला नव्हता. कूस पालटता पालटता कधी झापड लागली, तेच तिला कळलं नव्हतं. एव्हाना तुक्यानं चुलीत लाकडं सारली. आग रणरणत होती. सखूनं चहाचं पातेलं वर ठेवलं. काळाकुट्ट चहा दोघांना बी पेल्यात वतला. तुकोबा म्हणाला, सखू, आज शिवारात येरवाळीच गेलं पाहिजेत, भात कापायला, म्हणजी उन्हं व्हायची नाहीत. मी चलतो तू ये आटपून तवर. सखूनं मानेनच होकार दिला. तशी कमी बोलणारी सखू. तिचं मन आज थाऱ्यावर नव्हतं. तिचा पोरगा नी सून यायची होती गावाला. दिवाळीच्या सुट्ट्या पडून चार दिवस झाले होते. धाकटी सून गावातच होती. घरातलं काम आवरून ती घरकामाला जायची. तिनं बी आज लवकरच आवरलं. लेकीला घेऊन ती बी निघाली. आत्या दुपारपतूर येतो, तवर तुम्ही भात कापा. सांच्याला मी हाय, असं म्हणत ती बी दिसंनाशी झाली. घाईगडबडीत चुलीवरचा भात कधी वतू गेला, हे सखूच्या लक्षातच आलं नाही. लगबगीनं भांडं उतरलं, नी डाळ टाकली चुलीवर. कसबसं आवरून सखू शिवारात पोहोचली.
सखू तहान लागलीया, पाण्याचा तांब्या जरा म्होरं कर, असं म्हणत, तुकोबानं आरोळी दिली. पाण्याचा तांब्या पुढं करत सखूनं खुरपं हातात घेतलं विचारांना जशी धार आली, तसा तिच्या हातातल्या खुरप्यानं देखील वेग घेतला. खुरपं वेगानं चालू लागलं. तसं तिचं मन आपल्या बाहेरगावाहून येणाऱ्या मुलाच्या नी नातवंडांच्या विचारात गढून गेलं. धाकटा मुलगा काविळीत गेला नी घरचं घरपण हिरावल्यासारखं झालं. मुळातच शांत स्वभावाची सखू हवालदिल झाली. कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या थोरल्या संभानं तिला आपल्याबरोबर नेलं. मुळातच नवरा-बायको दोघं बी कामाला जात असल्यानं त्यांना बी घरात माणूस हवंच होतं. त्याच्या दोन लहान मुलांत सखूचा जीव अडकलेला असायचा. जन्मापासून अंगाखांद्यावर खेळलेली ती मुलं. त्यांना सोडून ती कधी राहिलीच नव्हती. शेताच्या कामात हयात गेल्यानं कामाच्या दिवसात ती गावाकडं राहायची. तिचं डोळं मात्र धाकटी नात संजनाकडं लागलं होतं.
उन्हं वर आली. तसं खुरप्याचा वेग वाढला. हाताला जरा चावल्यासारखं वाटलं. तशी तिची तंद्री भंग पावली.हात झटकला नी तशीच ती कामाला लागली. उन्हाचं चटकं बसू लागलं तशी तुक्याची कायली झाली नी भुकेची आठवण झाली. उन्हं झाली, आटीप लवकर, चल घरी, असं म्हणत तुक्याने आवरतं घेतलं. सखूपण गपगुमान त्याच्या मागोमाग चालू लागली. घरी पोहोचताच, हाताला मुंग्या आल्यागत झालं. तसं तिनं तुक्याला सांगितलं. तुक्यानं बघितलं पण नेमकं काय झालं हे साध्याभोळ्या तुक्याच्या लक्षातच आलं नाही. त्यानं आपल्या भावाला हाक मारली, तात्या, आरं तात्या, बघ जरा, हिच्या हाताला कशानं सूज आलीया. इतक्यात तंबाखूचा तोबरा थुंकत तात्यानं बघितलं नी म्हणाला, हे काय इपरितच दिसतंया? रामूस दाखवाय पाहिजे.
गावच्या वाडीवर रामूशिवाय दुसरा वैद्यच नव्हता. तशीच ती तात्याला संगं घेऊन रामूच्या घरी गेली. नुकताच जेवून वामकुक्षी घेणारा रामू दुपारच्या येळला कोण आलं हे पाहून हबकलाच. काय तरी इपरित असल्याशिवाय एवढ्या दुपारी नदीकाठच्या घरी सहसा कोणी येत नसे. काय र, गडबड, असं म्हणत रामू उठून बसला. सखूनं हात पुढं केला नी म्हणाली, ’बघा हो भाऊ, काय झालंया माझ्या हाताला. असं म्हणत हात पुढं केला. हात हातात घेताच रामू चपापलाच. तो म्हणाला, वहिनी हे कायतरी जनावर चावलंया. तू आपली डॉक्टरकडे जा पाहू. जनावर म्हटल्यावर तिच्या काळजाचा ठोकाच चुकला आणि विचारांचा विषारी डंख तिच्या मनाला बसला अन् आल्या पावली ती आपल्या धाकट्या सुनेकडे निघाली. घरकाम करून थकलेली सुमन वाटेतच भेटली. झाल्या गोष्टीचा पाढा सखूनं सुमनला वाचून दाखवला. तिनं लागलीच रिक्षा बोलावून जवळच्या दवाखान्यात नेलं. डाॅक्टरनं लगेचच चेकअप करून लागलीच तालुक्याला न्यायची सूचना केली. सुमनला काहीच सुचेना. गोंधळलेल्या सुमनने परगावी असलेल्या आपल्या दिराला फोन करून बातमी दिली. अन् तालुक्याच्या दवाखान्यात ऍडमिट केलं.
गावाला यायचं म्हणून बाजारहाट करण्यात अडकलेल्या संभानं आपलं चंबूगबाळ गोळा करुन बायको-मुलांसह गाव गाठण्याचं ठरवलं. दवाखाना म्हटल्यावर पैशाचा प्रश्न. आयत्यावेळी हातखर्चाला पैसे लागणार याची त्याला कल्पना होतीच म्हणून त्यानं मेहुण्याकडून पैशांचा बंदोबस्त केला नी वाटेला लागला.
इकडे विषारी डंखाने घायाळ झालेली सखू डोळ्यात तेल घालून मुलाची नी त्याच्या कुटुंबाची वाट पाहू लागली. सुनेच्या हजरबाबीपणाने मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या सखूने सुटकेचा निःश्वास सोडला. इतक्यात कुणीतरी कुजबुजलं पेशंटचे नातेवाईक आल्यात भेटायला पण दवाखान्याचा रुबाब बघून त्याला खर्चाचा अंदाज झाला नी त्याचं हातपाय गारठलंच. तो ICU च्या दरवाज्यासमोर कसाबसा पोहोचला.लांबूनच त्यानं आईला हात केला. जवळच उभ्या असलेल्या भावजयीला बोलावून तूच सर्वकाही पुढं होवून कर, नाहीतर मला बघून डाॅक्टरचा आकडा वाढंल. मी तसा इथंच हाय. असं म्हणत, तो बाजूला झाला. काचेतून लेकाला बघताच तोंडावर तेज आलेल्या आईच्या चेहऱ्यावर निराशेचे ढग जमू लागले. भेदरलेले डोळे मुलाला शोधू लागले.
थोड्या वेळानं तो आईजवळ आला. इतक्यात कुणीतरी म्हणाल, कोण बघाय आलंया? आईच्या तोंडातून शब्द बाहेर पडायच्या आतच संभा बोलला, मी त्यांच्या शेजारचा हाय. शेजारच्या या शब्दानं सखूच्या काळजाला विषारी जनावरानं जेवढा डंख मारला नव्हता, तेवढा डंख मारला नी तिचं काळीज चर्ररकन फाटलं. एकेकाळी स्वतः मृत्यूच्या दाढेत असताना जन्म दिलेल्या मुलानंच शेजारचा या एकाच शब्दानं तिला आज परकं केलं होतं. मित्रांनो, मला शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं ज्या आईनं रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवलं तिच्याशी व्यवहार करू नका तिला पैशात मोजू नका.