दाह
दाह


आज तिला गिळवत ही नव्हतं,सगळं अन्न कडू कडू नुसतं. मायेन जवळ घेणारी कमीच होती तशी, त्यात हा आजार कायमचा सोबती जणू. विस्कटलेल्या डोळ्यांनी छप्पर चाचपून झालं आणि धाप लागली परत,पण पाणी द्यायला सुद्धा जवळ कोणी नव्हतं.
शेवंता नाव तिचं, आईबापाला एकटीच.पण दारू पिऊन बाप गेला आणि आई खुळी झाली, खुळी काय आणि शहाणी काय? मेल्यातच जमा .ती पण गेली सोडून एक दिवस. मग शेवंतानं बऱ्याच वाटा पालथ्या घातल्या, पण जन्माचं पोरकंपण सुटलं नाही.
शहरात कुठल्याशा वस्तीत राहिली मग मोलमजुरी करून,सगे नाही आणि सोयरे पण गेले. आज दम्याला औषध नाही मिळालं तर मरेल अशी अवस्था. रस्त्यातल्या धुरानं आणि झाडूकाम करून हृदयात घर केलेल्या मातीनं पण साथ सोडली होती.
त्या धुराच्या अंधुक वाटेत तिच्या शरीराचा दाह व्हायचा, पण पचवायची ती. आज मात्र रात्र असावी शेवटची त्याच धुरात राख होण्याची. मातीत माती मिसळली आणि एक कथा आज संपली.