बोंबल्या
बोंबल्या
आज शुक्रवार. गावचा आठवडी बाजार. बोंबल्याला शाळंला दुपारची सुट्टी. आय सकाळीच घरकाम आवरून जगू नानाच्या वावरात गहू खूरपायला गेली व्हती. शाळंतून आल्या-आल्या बोंबल्यानं दप्तर कोपऱ्यात भिरकावलं, हातपाय ओबांळलं नि भाकरीच्या टोपल्याकडं धाव घेतली. टोपल्यातून दीड भाकर घेतली, परातीत उतळीचं लालजरीत कढाण ओतलं, त्यात भाकर कुस्करली आणि काला बुलंट ट्रेनच्या स्पीडनं पोटात ढकलला. बुलंट ट्रेन बद्दल त्यानं मास्तराकडनं ऐकलं होतं. मास्तर म्हणालं होतं, बुलंट ट्रेननं माणूस परसाकडंच्या वेळात मुंबईवरनं अहमदाबादला पोहचंल! बोंबल्याला तव्हा प्रश्न पडला व्हता, फक्त मंबईच्या लोकांची परसाकडची सोय म्हणून सरकार बुलंट ट्रेन आणतंय की काय? आयला आम्हाला शाळंत जायला साधी मोडकी-तिडकी सायकल मिळंना अन् मुंबईच्या लोकांना परसाकडं जायला डायरेक्ट बुलंट ट्रेन?
जेवून झाल्यावर त्यानं हात धूतलं आणि आयनं कोप-यात ठेवलेलं आंड्याचं घमीलं घेतलं. रातच्यालाच आयनं घमील्यात भुस्काट टाकून त्यात घरच्या कोंबड्यांची आंडी रचताना बोंबल्याला बजावलं होत, बोंबल्या, एक कमी वीस आंडी हाईत. उद्या बाजारात विकून ये. पाच रुपयं परमानं तूच हिसाब लाव किती व्हतात ते. शंभरीक रुपयं येतील. बाजारात जाताना आंडी संभाळून ने, फूटतूट करू नको. त्यावरच आठवड्याची मीठमिरची भागवायची हाये. आलेलं पैसं घरी जपून आण, हरवू नको, खर्चू नको.
बोंबल्यानं बसकर म्हणून पोतडं घमील्यात ठेवून घमीलं डुईवर घेतलं आन् बाजाराची वाट तुडवू लागला.
बंडूनानानं त्याच्या पंक्चरच्या दुकानापुढून जाताना हटकलं, 'काय बोंबीलराव? काय घेऊन जाताय बाजारला? काय हाय घमील्यात?' बंडूनाना त्याला हमेशा बोंबीलराव म्हणूनच हाक मारायचा. त्यामुळं आपण कोणीतरी मोठं माणूस असल्याचा भास बोंबल्याला व्हायचा. त्याचं खरं नाव श्रीपती, तरी पुरं गाव त्याला बोंबल्या म्हणूनच हाक मारत व्हतं. श्रीपती म्हणून हाक त्याला फक्त शाळंतला मास्तरचं मारायचा तीही दिसातून एकदाच, सकाळची हाजरी घेताना. नंतर मास्तरही त्याला बोंबल्याच म्हणायचा. त्यानं आयला एक डाव विचारलं पण व्हतं, आये,घरकाम माव्हं नाव शिरपती हाय पण तुह्या सकट सार गावं मला बोंबल्या का म्हणतं गं? मग आयनं त्याला त्याच्या जन्माची कहाणी सांगितली होती. अरं पोरा, तू माह्या पोटात व्हता तव्हा तुव्हा बाप दुखण्यात गेला. मग घरची लई तारांबळ झाली, दोन वेळच्या भाकरीची मारामार असायची. कधी पोटभर खायला मिळायचं नाय बघ! म्हणून जनमताना तुपलं वजन कमीच व्हतं. तव्हा पासनं त्वा कधीच बाळसं धरलं नाय. तुहं आंग सदानकदा बोंबलागत वाळल्यालं राहिलं. म्हणून तुला बोंबल्या म्हणू लागली ते आजतागायत कायम राहिलं बघ. कधी-कधी शेजार-पाजारच्या बाया निवांत घडीला पारूबायीला म्हणजे त्याच्या आयला त्याच्या आंगकाठी वरनं चिडवून म्हणायच्या, काय गं बोंबल्याच्या आयी? बोंबल्याच्या वेळंला गरोदर असतानी त्वा बोंबील खाल्ले व्हते का काय? म्हणून तुहं पोरगं बोंबलासारखं निपजलं. मग पारूबायी म्हणायची, आत्याबायी, तुमच्यापासनं माझं काय झाकरीत हाय का? अव्हं भाकरीच्या तुकड्याची मारामार व्हती त्या वख्ताला. बोंबलासारखं वश्याट कुठलं परवडायचं? मग आया-बाया तिला पोराला जरा जीव लावत जा सांगून जायच्या.
बोंबल्या बाजारात पोहचला. बाजार चांगलाच भरला व्हता. गिऱ्हाईक आज मायदंळ दिसत व्हतं. त्यानं रस्त्याच्या कडंला जागा बघून पोतडं आंथरलं आन् त्यावर घमीलं ठेवून गिऱ्हाईकाची वाट बघत बसला. त्याच्या म्होरंच पुढच्या लाईनीत वरच्या आळीतल्या धुरपद आक्काची त्याच्याच वर्गातली सुमी पोताड्यावर शेवग्याच्या शेंगा घेऊन बसली व्हती. दोघांची नजरानजर व्हताच ती गालात हसली तशी बोंबल्याच्या काळजातं जेष्ठातलं विजाड चमकून गेलं. तेव्हड्यात गिऱ्हाईकानं त्याला हटकलं, पोरा कशी लावली रं तुही आंडी? असं म्हणताच समोरची सुमी तोंडात ओढणी कोंबून खुदूखुदू हसू लागली. च्यायला सुमी जरा जास्तच आघाव हाय असं मनातली मनात म्हणत त्यानं गिऱ्हाईकाला आंड्याला पाच रुपयं भाव सांगितला. गिऱ्हाईकही जरा बेरकीच होतं. म्हणलं, पोरा, पलीकडच्या लाईनीत तर चार रुपयाला एक देत्या
त की, तू एक रुपया कशाचा रं जास्त घेतोस? बोंबल्याही मग वैतागला. म्हणला आहो काका, पाच रुपये भाव हाय, परवडली तर घ्या नाय तर घेऊ नका. तसं गि-हाईक म्हणलं, दे मग चार आंडी. बोंबल्यानं त्याला चार आंडी दिली अन् आलेली वीस रुपयाची नोट कपाळाला लावून खिशात घातली.
आणखी एक दोन गिऱ्हाईक केल्यावर चाळीसंक रुपयाचा गल्ला बोंबल्याकडं जमला. उन्हं कलून गेली व्हती. तेव्हड्यात पलीकडच्या लाईनीत गोंधळ उडाला. गावात मोकाट सोडलेल्या दोन पोळांची झुंज लागली. बाजारात एकच गोंधळ उडाला. जो तो वाट फुटंल तिकडं पळू लागला. बोंबल्यानं सुमे पळ, पोळं तुडवतील म्हणत आरोळी ठोकली अन् आंड्याचं घमीलं तिथंच सोडून पळू लागला. बाजारातली लोकं दुस-याचा विचार न करता एकमेकाला तुडवत पळू लागले. बाजार उधळून गेला. विकायला आणलेला भाजीपाल्याचा चेंदामेदा होऊन गेला, धान्य विखूरलं गेलं. पोळ गेल्यावर जो तो आपलं सामान परत येऊन गोळा करु लागला. बोंबल्याही त्याच्या जागंवर वापस आला तर त्याला घमीलं पालथं पडल्यालं दिसलं अन् त्याच्या भोवती फुटलेल्या आंड्याचा सडा दिसला. सडा पाहून त्याच्या पोटात खड्डा पडला. आता संध्याकाळच्याला आपली काय खैर नव्हं म्हणत मोकळं घमीलं आन् पोताडं घेऊन चालू लागला. आयला कितीही बोल्लं तरी विश्वास बसायचा नाय आन् आपला मार काय चुकायचा नाय असा विचार करत घरी आला. हातपाय धुतलं, खुराड्यात जाऊन कोंबड्याला दानं टाकलं आन् दारात बसून आयची वाट पाहू लागला.
सांच्याला आय कामावरून घरी आली. डुईवर सरपणाचा भारा व्हता. तिनं भारा उतरायला त्याला हाक मारली. भारा उतरवल्यावर आयनं विचारलं, बोंबल्या; आंड्याचं किती पैसं आलं रं? बोंबल्यानं आयच्या हातावर चाळीस रुपयं टेकवलं. एवढंच कसं रं? एक कमी वीस आंडी व्हती की! बाकीचं पैसं काय केल मुडद्या? बोंबल्यानं बाजार उधळ्याचं सांगितलं तरी तिचा विश्वास बसंना. बोंबल्याच्या खोडी तिला माहीत व्हत्या. बोंबल्यानंच पैश्याची नासाडी केली असं वाटू लागलं. सरपणातलं लाकूड काढलं आन् त्याला बदडू लागली. बोंबल्या आयीला 'खरंच सांगतोय' म्हणत होता तरी तिचा हाथ थांबत नव्हता. थकल्यावर तिनंच लाकूड फेकून दिलं. बोंबल्या कण्हत पाठाड चोळत रडत बसला. थोडा वेळ कोणंच कोणासंग बोल्लं नाय.
बोंबल्याच्या आयनं चूल पेटवली अन् भाकरी थापायला बसली. बोंबल्या आजूनही कन्हतंच व्हता. तेव्हड्यात अगं ये पारूबाय! म्हणत धुरपत आक्का घरात आली.
'पारूबाय, तुह्या बोंबल्यामुळंच आज माही सुमी वाचली बघ! ह्यानं तिला सावध नसतं केलं तरं माही पोरगी तुडवली गेली असती. तुहं पोरगं खरचं लई गुणाचं हाय.'
हे ऐकून पारूबायी तिला म्हणाली,
'म्हंजे? खरंच बाजार उधळला व्हता म्हणायचा.'
मग आक्कानं तिला विचारलं,
'तुला बोंबल्या बोल्ला नाय व्हयं बाजार उधळल्याचं?'
तर पारूबायी म्हणली,
'मस सांगितलं होतं गं आक्का त्यानं, पर मला खोटं वाटलं आन् त्याला मार-मार मारलं बघं.'
'अशी कशी गं पारूबायी तू? एकुलत्या एका लेकराला मारत्यात व्हंय कुठं? पोरगं सांगतयं तर विश्वास तरी ठेवायचा की त्वा' म्हणून धुरपद आक्का निघून गेली. आक्का निघून गेल्यावर बोंबल्याला आयनं जेवायला वाढलं. बोंबल्या न बोलता मुकाट्यानं जेवू लागला. त्याला मनातनं आयचा बक्कळ राग आला व्हता पण भूकही सपाटून लागली व्हती. त्यामुळं खाली मुंढी घालून जेवू लागला.
रातच्याला आयनं त्याला कुशीत ओढलं. बोंबल्याला जाणवलं की आयच्या डोळ्यातन पाणी गळतयं . आपली आय रडतीय पाहून त्याचा राग कुठल्या कुठं पळून गेला. आयला म्हणला, 'आये, पाठ लई दुखतीय गं! जरा तेल चोळ की.' आयनं तेलाची वाटी घेतली, त्यात थोडी हळद टाकली आन् चुलीतल्या विस्तवावर गरम केली. बोंबल्याच्या पाठीवरच्या वळावर चोळता-चोळता म्हणाली, 'लई लागलं का रं माझ्या लेकरा? मी पण कशी कैदासीन, पोटच्या पोराला गुरा सारखं बदडलं. पण काय करु पोरा? तुव्हा बाप गेल्या पासनं संसारात लई ओढताण व्हती रं. कधी-कधी माव्हा जीव पार कावून जातो. एक डाव तुह्या आयला माफ कर' म्हणून रडू लागली. आयला रडताना बघून बोंबल्याही रडायला लागला आन् खालची गोधडी ओली होऊ लागली.