भिंतींना कान नाहीत
भिंतींना कान नाहीत


भिंतींना कान नाहीत
Written by Dr Subhash Katakdound
मन मोकळं करण्यासाठी
आता पूर्वीसारखं अंगण नाही
नाही त्या गप्पा गोष्टी
आणि भिंतींनाही कान नाहीत
पूर्वीसारखी कुठे
आता ती अंगत पंगत
पत्त्यांचे ते डाव ही
आता नाही रंगत
हरवली आहे आता
त्या मैत्रीची संगत
पूर्वीसारखी ती मनं
आतां ये जा करत नाहीत
नाही त्या गप्पा गोष्टी
आणि भिंतींनाही कान नाहीत
नाही बोलावत आता कोणी
साधं चहा प्यायला
मागत नाही कोणी आता
पेपर तो वाचायला
वेळ नाही कोणाला
शेजारी डोकावयाला
बाजूला कोण राहतं
शेजाऱ्याला ही नाही माहित
नाही त्या गप्पा गोष्टी
आणि भिंतींनाही कान नाहीत
पूर्वीसारखा आवाज नाही
दरवाजाच्या कड्यांना
काचा आता फुटत नाहीत
ओरडा नाही खोड्यांना
मनाचे दरवाजे बंद आणि
जाळ्या आहेत खिडक्यांना
नुसत्या त्या पोकळ बोलाचाली
मनं मात्र ती जुळत नाहीत
नाही त्या गप्पा गोष्टी
आणि भिंतींनाही कान नाहीत
गच्चीवर उभे राहून
पहातो उंच माड्यांना
डोळे झाले ओले आठवून
त्या अंगणातल्या सड्यांना
मन माझं विषण्ण होते
पाहुन मनातल्या तड्यांना
मनातल्या भेगा आता
पुन्हा कधीच भरणार नाहीत
नाही त्या गप्पा गोष्टी
आणि भिंतींनाही कान नाहीत