अनामिका
अनामिका
"बाई ,बाई ,तुम्हाला माहित आहे ,आमच्याकडे ना, बाळ येणार आहे." तिसरीतल्या नरेशने मला सांगितलं आणि शाळेत आल्यापासून तो माझ्या भोवती का घुटमळत आहे ,याचे उत्तर मला मधल्या सुट्टीत मिळालं. आज तो खूप आनंदात होता.
नरेश सावळ्या रंगाचा पण नाकी डोळी रेखीव होता .बरेचदा त्याचे केस कापलेले असायचे. पण केसातून हात फिरवण्याची त्याला सवय होती. तसा अस्वच्छ असायचा पण इन शर्ट करायचा .शाळेने दिलेल्या 27 वस्तूंपैकी बऱ्याच वस्तू त्याच्या गायब होत्या. सतत नाक गळायचं पण कधी रुमाल वापरायचा नाही. शर्टाच्या बाह्यानेच नाक पुसायचा. अभ्यासात हुशार होता.
एकदा शिकवलेली गोष्ट त्याला वारंवार सांगावी लागत नसे. आकलन शक्ती चांगली होती त्याची. स्वतः बद्दलची माहिती सांगायचा.
माझे नाव नरेश सुरेश कुंचिकोर्वे आहे .
मी धारावी ट्रान्झिट कॅम्प मराठी शाळेत शिकत आहे.
मी इयत्ता तिसरीत आहे .
मला मोठा दादा आहे .
हे तो अगदी खणखणीत सांगायचा . पण घराचा पत्ता सांगताना मात्र शब्द कमी आणि त्याचे हातवारे जास्त असायचे .त्या तिथे शाळेच्या जवळ तों नाला आहे ना ,त्याच्या ना बाजूलाच आमचं घर आहे . तिथे आम्ही राहतो.
पण एखाद्या मुलाने त्याच्या वस्तूंना हात जरी लावला तरी खूप ओरडायचा व मारायचा. बऱ्याचदा विक्षिप्त वागायचा. मी वर्गात डबा खायला बसले की माझ्या तोंडाकडे केविलवाण्या नजरेने बघायचा, खायला दिलं की लगेच खायचा. माझ्या नेहमी अवतीभोवती असायचा . कधी पेन्सिल आणली नाही किंवा पाण्याची बाटली आणली नाही म्हणून जर मी बोलले तर कसनुसा हसायचा.
"बाई, मी आईबरोबर दवाखान्यात जाणार आहे, बाळ आणायला." हे तो मला रोज दिवसातून चार-पाच वेळा सांगायचा. आणि प्रत्येक वेळी त्याचा उत्साह मात्र तेवढाच असायचा. त्याने बाळाचं नाव सुद्धा ठरवून टाकले होते .मुलगा झाला तर अजिंक्य आणि मुलगी झाली तर दीक्षा. बाळ नेहमी आई आणि तो यांच्या मध्येच झोपणार हेही त्याने ठरवून टाकलं होतं.
एक दिवस त्याची दुसऱ्या मुलाबरोबर मारामारी चालू होती .मारामारी करताना तो सारखा त्या दुसऱ्या मुलाला बोलत होता ,"तू माझ्या दप्तराला हात का लावलास? का लावलास माझ्या दप्तराला हात ?"
मी दोघांची मारामारी सोडवली आणि विचारलं ,नुसता हात लावला तर काय झालं? त्यावर तो म्हणाला, "माझ्या दप्तरात बाळाची खेळणी आहेत ती तो घेत होता."
बाळाची खेळणी तू शाळेत का घेऊन आलास ,असं विचारल्यावर तो म्हणाला," आमच्या घराला दरवाजा नाही म्हणून चोरी होते .
मी व
िचारलं ,दरवाजा नाही ?
हो ,आमचं घर प्लास्टिकच्या कागदाचं आहे , त्या मोठा नाल्यावर". मी ऐकतच राहिले आणि त्याला विचारलं," बघू, कोणती खेळणी आहेत तुझ्याकडे ?"
त्याने त्याचे दप्तर माझ्यासमोर रिकामी केले. त्याच्यामध्ये मोडलेला खुळखुळा, चाक नसलेली छोटी गाडी, दोन वेगळ्या रंगाचे छोटे मोजे ,अशी अनेक तोडकीमोडकी खेळणी व वस्तू होत्या. बाळ येण्यापूर्वी त्याने बाळासाठी खेळणी जमवली होती .त्यानंतर मात्र मी त्याला कधीही त्याच्या दप्तरात काय आहे ते विचारलं नाही.
एकदा पालक सभा होती. सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या पालकांना घेऊन यायला सांगितले. हा लगेच उभा राहिला. "माझी आई नाही येणार .आईला बाळ होणार आहे ना. म्हणून तिला जास्त काम करावं लागतं ." तशी ही त्याची आई कधीच शाळेत आलेली नव्हती आणि आता तर त्याला निमित्तच झाले होते.
काही दिवसानंतर तो तीन दिवस शाळेत आला नाही. आल्यावर नेहमीसारखा माझ्याकडे आला नाही . माझ्याशी बोलला नाही अचानक मोठा झाल्यासारखा वाटला .शांतपणे आपल्या बाकावर जाऊन बसला कोणाशीच काहीच बोलला नाही .मला त्याचं हे वागणं थोडं खटकलं. पण मी तो बोलण्याची वाट पाहत राहिले. मी हजेरी घ्यायला सुरुवात केली 'नरेश 'नाव उच्चारताच 'हजर बाई 'असे तो हळूच बोलला. मी त्याच्याकडे बघितले .
मी त्याला विचारले ,"काय रे ,तीन दिवस शाळेत का आला नाही ?"
तो दबक्या आवाजात म्हणाला, "आई बरोबर दवाखान्यात गेलो होतो. आईला बाळ झालं."
मी म्हटले ,"अरे वा! भाऊ झाला की बहीण?"
.तो म्हणाला ,"मुलगी ".
"मग कशी आहे तुझी दीक्षा ?,"असे विचारल्यावर ,"मला माहीत नाही. आम्ही तिचे नाव नाही ठेवले ,"असे उत्तर त्याने दिले .
मी त्याला जवळ बोलावले विचारले ,"का रे ?"
त्यावर तो निर्विकारपणे म्हणाला," आज सकाळी आईने तिला विकले."
मी ओरडलेच,"काय ?"
त्याने पुन्हा सांगितले तितक्याच निर्विकारपणे.
मी विचारले ,"कोणाला?"
" एक स्कूटर घेऊन माणूस यायचा त्याला .आई म्हणाली, तू आणि दादा ,बाबा आणि मी आपल्या सर्वांसाठी हे घर आधीच लहान आहे. त्यात कधी कधी रात्री आपल्याला जेवायला मिळत नाही. जर आपण बाळाला विकले तर आपल्याला पैसे मिळतील. तुला खाऊ घेता येईल . चांगले कपडे घालता येतील." असं म्हणून तो आपल्या जागेवर बसला.
मी त्याच्याकडे बघतच राहिले डोळ्यात आलेले अश्रू गालावर येणार नाहीत याची काळजी घेत आणि तो मात्र काहीही घडले नाही अशा अविर्भावात वर्गात नेहमीसारखा पुन्हा रुळला.