अनामिका
अनामिका
"आई येते ग ", असे म्हणत मी घराबाहेर पडले . ऑफिसची वेळ ९ ची . आजचा पहिलाच दिवस .आत्तापर्यन्त बस ने प्रवास करणारी मी आता ट्रेन ने जाणार होते. ८ वाजता निघून १५ मिनिटात मी स्टेशन वर पोहोचले . ८ ३० ला ट्रेन मिळाली . तीनच स्टेशन असल्यामुळे मी ऑफिसला अगदी १० मिनिट अगोदर पोहोचले . आता माझा हा रोजचा नित्यक्रम झाला होता. मी सकाळी नेहमी एकाच मार्गाने जायची . थोडा वळणावळणाचा मार्ग होता पण शांत , खूप झाडी असलेला होता . आज जरा मी लवकरच घरातून निघाली होती . एका वळणावर एक आंबेडकर उद्यान लागायचे . माझ्या एक लक्षात आले कि रोज जाताना तिथे एक भिखारीन बसलेली असायची . ती त्या बागेच्या बाहेर अगदी गेटच्या मधोमध बसायची. तसे मी तिला आधीही बघितले होते पण लक्ष नीटसे दिले नव्हते .खरे तर तिचे काही वर्णन करावे असे काही सांगता येत नव्हते. डोक्यावर ओढलेली ,घट्ट बांधून घेतलेली ओढणी , कधी एखादे फटके कापड तिचे डोकं आणि चेहरा झाकून ठेवायचं , डोळे फक्त काय ते उघडे असावेत , तेही पुसटसे दिसायचे , कारण ती शक्यतो वर बाघायचीच नाही . हातही कपड्याने गुंडाळलेले , बोटही ना दिसणारी, अगदी पूर्ण अंगच झाकलेले असायचं म्हणायला हरकत नाही. माझे मन साशंक व्हायचे . मुद्दाम भीख मागण्यासाठी लोकं असे करत तर नाही ना? कारण खूप गोष्टी कानावर पडायच्या . काम न करता अशी लोकांना भीक मागायची सवय लागते आणि आपणच त्यांना अजून दुर्बल बनवतो असे काही….आणि धडधाकट लोकांना भीख द्यावी यातले मी नव्हते, पण तिच्याकडे लक्ष जाता माझे मन का कोण जाणे विचलित व्हायचे . काहीही असो इतके स्वतःला बांधून कुणी इतका वेळ कसे बरं राहू शकतो? नाना प्रश्न सतावायचे,
आठवड्याभरानंतर एके दिवशी मला रस्त्यात १० रुपयाची नोट मिळाली , आता ती कुणाची हे विचारण्यासाठी कुणीच नव्हते . हातात घेतली खरी, पायदळी कुणाच्या जाण्यापेक्षा ,एखाद्या देवळात किंवा गरजू ला द्यावी या उद्देश्याने , कधी कुणाचे काही मिळाले मग ती वस्तू असो वा पैसे ते चांगल्या मार्गी दान करावे त्याच्या नावाने…..ही बाबांची शिकवण आज कमी आली. बाबा नेहमी म्हणत ज्याचे हरवलेले असते ते त्याच्यासाठी खूप मौल्यवान असते . ते हरवल्याचे त्याचे दुःख, ती सल आपण घेऊन कधीच आनंदी राहू शकत नाही .त्याच्या नावाने ते देऊळ वा गरजवंताला दिले तर त्यालाच पुण्य मिळेल, आणि आपल्या पदरात चांगल्या कर्माची एक भर पडेल , अगदी सोप्या भाषेत शिकलेली ही गोष्ट आठवता माझ्यासमोर तिचा चेहरा आला. पुढे जाऊन मला ती भिखारीन नेहमीच्या ठिकाणी दिसली , तिच्या चेपलेल्या वाडग्यात मी ती नोट ठेवली . तिने कदाचित अपेक्षाही केली नसावी हे तिच्या डोळ्यात मी पहिले .तिच्या डोळ्यातल्या आनंदाला टिपता आले .पाहिल्यान्दाच आमच्या डोळ्यांची नजरानजर झाली होती , पाणी तरळलेले दिसले. तो पूर्ण दिवस माझा संवेदनशील होता . तिची गरज, व्याकुळता , परिस्थिती ही कुठंतरी मला तिच्या डोळ्यात दिसली होती. संध्याकाळची माझी घरी यायची वेळ बेभरवशाची असायची .पण त्या दिवशी मी ५. ३० ला वेळेतच निघून तिला भेटण्याच्या आतुरतेने माझे पाय धावत होते . तिथे खूप गर्दी होती , फुगेवाले , खाऊवाले अजूनही खूपजण ..वेळ संध्याकाळची होती .. लहान मुले आणि पालक पूर्वी सार्वजनिक बागेतच यायचे मनोरंजनासाठी आणि म्हणूनच भिकाऱ्यांची संख्याही जास्तच. मी तिला शोधत होते पण ती कुठेच दिसत नव्हती . तिची ती रिकामी जागा पाहून खचित मनाने घरी गेले .दुसऱ्या दिवशी ती दिसेल हे स्वतःलाच समजावत …
आणि ती पुन्हा दिसली . पण आज माझा हात माझ्या स्वतःच्या purse मध्ये गेला होता . हाताशी रुपयाचे नाणे लागताच थांबून तिच्या वाडग्यात गेले होते. आज मला खूप आनंद झाला होता .स्वच्या कमाईतून कुणीही न लागणाऱ्या एखाद्यासाठी काहीतरी करण्यातला आनंद माझ्या मनात दरवळत होता , आता हे रोजचेच झाले . मी घरातून निघतानाच पैसे हातात काढू लागले .ती मला हातानेच आशीर्वाद दिल्यासारखे करू लागली , माझे वय अगदीच लहान , ट्रैनिंग घेऊन practically प्रोजेक्ट वर काम करायला मिळणे हाच काय तो आनंद , त्यामुळे ३ आकडे असलेला पगारात मला परवडेल त्यातून काहीतरी कुणासाठी करायला मिळणे हा आनंद द्विगुणित होता माझ्यासाठी .आता तिची खूप सवय झाली होती. कधी कधी माझ्या वेळेत ती दिसायची नाही, पण तो रस्ताभर माझं भाबडं मन तिच्या शॊधात राही , एक दिवस उशीर झाला असता मी रिक्षेतून चालली होती , मी रिक्षेवाल्याला आतल्या रस्त्याने घ्यायला सांगितल्यावर तो खरं तर खूपच चिडला होता , हे त्याच्या बोलण्याने जाणवत होते , क्या मॅडम , शिधा रास्ता झोडके आप मुझे क्यो गोल गोल घुमा राही हो, मेरे धंदे मे खोटी …. असे काहीतरी बडबडत होता, पण माझे लक्ष फक्त अनामिकेच्या जागेवर खिळले होते, हो अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही…..”अनामिका “. ती आता माझ्यासाठी नाव माहित नसलेली अनामिका झाली होती, भिखारीण शब्द तिच्यासाठी मला योग्य वाटत नव्हता. का कुणास ठाऊक ? मी रस्त्याच्या वळणावर यायला आणि तिने तिचा चेहऱ्यावरची ओढणी बाजूला सारत पाणी प्यायला एकच वेळ झाली होती . पहाते तर काय मी भाम्बावूनच गेले होते. तिने मला नव्हते पाहिले . मी तिच्या जागेवर जाईपर्यंत ती पूर्ववत झाली होती. मी रिक्षा थांबवली आणि तिच्या वाडग्यात नाणे ठेवले थरथरत्या हाताने , पाणावलेल्या डोळ्याने…. तिचे हात धन्यवाद म्हणू लागले .
रिक्षावाल्याच्या आवाजात एकदम फरक जाणवला मला . सॉरी म्हणता येत नसेल पण सॉरी शब्दाच्या भावनेने मला बोलू लागला , मॅडमजी पहलेही बताना था हमें। अजून असेच काहीतरी ….पण माझे गलबललेले शब्द काही प्रतिउत्तर देतच नव्हते . मग स्टेशन वर उतरताना त्याला न राहवून " सॉरी मॅडम "हा शब्द कानावर माझ्या पडला .कदाचित त्याला त्याचीच लाज वाटली असावी . त्याच्यावर रागावले नाही , हे त्याला कळण्यासाठी मी बोलले कि पहले बताती मैं ,तो क्या तुम सचमे समज पाते ???? तो निरुत्ततर झाला . त्याचा ओशाळलेला चेहरा पाहून उतरताना मीच बोलले वापस कभी मिल ना , आता अपराधी भावना जाऊन स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले होते . कधी कधी शब्दांच्यात ही आपलेपणाची भावना असावी लागते हे खरं…..
तो जरी शांत मनाने गेला तरी माझे मन दिवसभर अशांत, अचल ,, कामात दुर्लक्ष , ना भूक जाणवत होती . तिचा न पाहिलेला चेहरा आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर होता . माझे आतले मन तिला मदत करण्याच्या ओढीने रोज धावणारे माझे मन आता ठसा उमटलेल्या पानासारखे सुस्पष्ट झाले होते. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे साशंक मनाची खात्री पटली होती . एखाद्याला भीक देऊन ,मागायला अजून दुर्बल न करणे या ठाम मताची मी …. आतल्या आत माझे मन तिच्यात दडलेल्या ,झाकलेल्या चेहऱ्यामध्ये रोज ओढले जात होते , आणि आज तिचे खरे रूप डोळ्यासमोर ,,,,, काय मार्ग होता तिच्यापुढे भीक मागण्याशिवाय ? कसे काम केले असते तिने ? कुणी समोर उभे तरी केले असते का? प्रश्नावली डोक्यात घुमू लागली माझ्या …. तिचा चेहरा इतका विद्रुप , कि कुणी पहिला असता तर तो लांबच पळून गेला असता, नाक चेपलेले , कानही आहे का नाही कळत नव्हते . डोळ्याखालपासून चेहरा जळालेला कि काय काहीच समजत नव्हते .काही सेकंदात तीच रूप इतकच काय ते स्पष्ट . भीक मागण्याशिवाय काहीच पर्याय नसावा त्यावेळी. हाताला बोटेही नाहीत . कुष्ठरोगी असावी का? पण माझे मन आता तिच्यासाठी अजून आवर्जून आठवण काढू लागले. ती माझ्या दैनंदिन जीवनाचा एक छोटा हिस्सा होऊन गेली कळलेच नाही.
आता माझी सॅलरी वाढली . मग तिच्या वाडग्यात माझ्याकडून अजून जास्त भर पडू लागली . असे काही वर्ष सतत होत राहिले . माझी पगारवाढ मी तिच्याशी share करत आले . न बोलता ना सांगता ... वाडग्यात भर पडलेली पैश्याची वाढ पाहून तिलाही चाहूल लागायची बहुधा .. जणू मी तिच्याबरोबर माझा आनंद साजरा करत होते . जो तिचा आनंदित चेहरा माझ्या डोळ्यांना दिसत होता तो कदाचित सांगूनही कुणाला पटणार नाही ,शब्दात वर्णन करायला शब्द कमीच पडतील. आताशा ती माझी छान मैत्रीण झाली होती . तिला पहिले नाही तर माझा दिवस कासावीस व्हायचा. आता तिला माझी सकाळची वेळ कळत असावी बहुतेक . तिचे डोळे वाट बघताना माझ्या लक्षात आले होते . आता दुवा देणारे हात कशी आहेस , बरी आहेस ना हेही विचारू लागले. आमच्यातली ही गौप्य भाषा कुणालाही उमगत नसावी. working days ला आम्ही भेटायचो पण सुट्टीच्या दिवशी मात्र खंड पडायचा . मग मी तिला आदल्या किंवा पुढच्या दिवशी त्या दिवसाचा हिस्सा मी द्यायची . आता आठवड्यातून एक दिवस मी तिला माझ्या डब्यातले जेवण देऊ लागले. गुरुवारी उपवास असल्याने आई माझी उपवासाचे पदार्थ देऊ लागली, माझ्या कडक उपवासाचे पथ्य काही आईच्या ममतेला पटत नव्हते . मग आईचे मन राखून तिला न दुखावता ते मी मैत्रिणाला देऊ करताना तिच्या चेहऱ्यावरची झळाळी पाहत आले.
माणसाला पुढे जायचे असले कि स्वतःला update करावे लागते . असेच काहीतरी म्हणून काही वर्षांनी माझी नोकरी बदलली .ट्रेन च्या जागी ऑफिस बसने प्रवास सुरु झाला . नंतर घराचे ठिकाणही बदलले .मग अनामिका आणि माझी भेट खूप क्वचित होऊ लागली .मग भेटल्यावर नाण्याच्या ठिकाणी काही नोटांनी जागा घेतली. कधीतरीच भेटणार तर जरा बरी रक्कम तिला थोपवताना होणार आनंद पण रोज भेट होत नाही याचे दुःख तिचे डोळे आणि माझा चेहरा भरभरून बघत होते, नजरेतले हावभाव बोलत होते. थबकले माझे पाय निघतां निघत नसायचे .पण वेळ आणि संधी दोघींची मैत्री झाली असती तर किती बरे झाले असते हे प्रकर्षांने जाणवले त्यावेळी . आता आमच्यात अगदीच दुरावा आला होता . काही महिन्यांनी मी मुद्दाम अर्धा दिवस ऑफिस ला उशिरा जाण्याचा विचार करून तिला भेटायला गेले . ती बाग, तिची जागा आज अगदीच रिकामी होती. मुद्दाम भेटायला गेलेले माझे मन खट्टू झाले. ती थोडी उशिरा येईल . चुकामुक होऊ नये म्हणून बागेत तास दीड तास बसून राहिले . पण व्यर्थ , मग बागकाम करणाऱ्या माणसाला चौकशी करताना कळले कि अशी व्यक्ती आधी यायची पण गेले काही महिने त्यानेही बघितले नाही. धस्स झाले…. काय झाले असेल, कुठे भेटेल , कशी असेल ???? उदास मनाने ऑफिसला न जाता पुन्हा पाय घरी वळले.
लग्नानंतर पुन्हा एकदा त्या जागेला पाहायला म्हणून गेले पण पुन्हा तीच निराशा पदरी पडली . तिच्या असण्याने कधीच कुणाला फरक पडला नसावा पण तिच्या नसण्याने मनात एक पोकळी निर्माण झाली माझ्या ..
ना संवाद , ना चेहरेपट्टीची ओळख असलेली ही मैत्री ,
ना बोललेले शब्द ना ऐकलेली वाणी अशी ती मैत्री ,
ना नावाची देवाणघेवाण , ना माहित राहण्याचे ठिकाण ,
नजरेतील फक्त ओळख , हावभावांची हालचाल
आणि डोळ्यांतल्या आनंदाश्रूची पावती
हीच काय ती होती अबोल मैत्री ….अनोळखी असूनही परिचित
तो हरवलेला आनंद आजवर कुठल्याही मैत्रीत सापडला नाही, आजही शोधात आहे मी , आजही न पाहिलेल्या तिला मी ओळखते , कुठेतरी कधी समोर येईल का म्ह्णून वाट बघते, पुसटसा पाहिलेला चेहरा समोर आलाच तर ओळखू शकेल का ?
स्वतःलाच मी विचारतेय , तिच्या नवीन मार्गावर तिला दुसरी कुणीतरी "मी " मिळाली असेल का?
निखळ मैत्रीतला अथांग आनंद देऊन गेली ही मैत्री ,,, नाव नसलेली ही "अनामिका "
तरंगलेल्या लहरी पुन्ह्यांदा बागेपाशी जाऊन थांबल्या होत्या…अनामिकेच्या शोधात
