अधुरी कहाणी
अधुरी कहाणी


"आसिफा,तुला समजलं का?.."
"काय गं?.."
"अगं, भाई शादी करतोय म्हणे!..."
"हो,मला माहिती आहे..."
"अगं, इतकं शांतपणे कसं सहन करू शकतेस तू?.."
"मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे निलू?..
मी रडू??...ओरडू?...की सगळा मोहल्ला जमा करू?..
सांग ना!..नक्की काय करू यातलं?..."
आता मात्र शांत राहण्याची पाळी निलोफरवर आली..
"बरं, बरं... जाऊदे..
मला वाटलं,तुला माहीत नसेल म्हणून मी...
माझं चुकलंच..चल,कॉफी पिते है।..."
असं म्हणून निलू बळेबळेच तिला कॉफी प्यायला घेऊन नेहमीच्या मिलन कॅफे मध्ये गेली...
हे त्यांचं नेहमीचं आणि आवडतं कॅफे...
इथली कॉफी जबरदस्त असायची..एका बाजूला कॉलेज आणि दुसऱ्या बाजूला कोर्ट..दोन्हीच्या मधोमध असलेलं हे हॉटेल नेहमी गजबजलेलं असायचं..
निलू आणि आसिफा या अगदी बालपणापासूनच्या घट्ट मैत्रिणी...
दहावी झाल्यावर दोघींनी एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला...
तेव्हापासून याच हॉटेलमध्ये त्या कॉफी प्यायला येत...
"आसिफा,तुला काय झालंय?...मला सांगशील का?..नेमकं काय बिनसलंय तुझं?.."
"अगं काहीही झालेलं नाही..मी ठीक आहे..."
"तू अजिबात ठीक नाहीयेस..मी तुला आज ओळखत नाही..तू अशी नाहीस..
गेल्या काही दिवसांपासून तू सगळ्यांना टाळतेस..एकटी एकटी राहतेस?..क्यू कर रही है ऐसा?...मी इतक्या दिवसांनंतर भेटले तरी बोलत नाहीस नेहमीसारखी.. "
"काहीच नाही..तू कितीही वेळा विचारलंस तरी हेच उत्तर आहे माझं..मेहेरबानी कर मुझपर..अकेला छोडो मुझे..".
असं म्हणून आसिफा उठली आणि तरातरा निघूनसुद्धा गेली..
निलू पहातच राहिली..
आसिफा..एक बुद्धिमान आणि सुंदर व्यक्तिमत्व असलेली तिची मैत्रीण..
तिचे अब्बा सय्यद इनामदार बडं प्रस्थ..त्यांचा ट्रान्स्पोर्टचा मोठा बिझनेस..
आसिफासह त्यांना सहा मुली..त्यांच्या पाठीवर मुलगा अब्बास..
आसिफा सर्वात मोठी...खूप समजूतदार..तिच्या अम्मीसारखीच..रूप आणि गुण दोन्ही अम्मीचे उचललेले तिनं..
अब्बा मोठे खतृड.. एकही मूल त्यांच्या वाऱ्यालासुद्धा उभं रहायचं नाही..
नजरेच्या धाकात असायचे सगळे..
पण आसिफाच्या हुशारीचा त्यांना अभिमान होता..इसको मैं बहुत पढाउंगा असं नेहमी म्हणायचे..
आसिफाचा स्वभाव बोलका होता..त्यामुळे ती जगमैत्रीण झाली होती...
कॉलेजमध्ये सर्वांना अगदी हवीहवीशी वाटायची..लवकरच त्यांचा एक मोठा ग्रुप तयार झाला..मित्र,मैत्रिणी यात ती अगदी आवडती झाली..त्यात आणखी एक जमेची बाजू होती..ती म्हणजे तिचा सुरेल आवाज..लता मंगेशकर ची गीतं ती अशी खास शैलीत म्हणायची की फक्त ऐकत रहावं असं वाटायचं..
बघता बघता एक वर्ष संपलं आणि बारावीच्या अभ्यासाला सुरुवात झाली..
कॉलेज सुरू होऊन थोडे दिवस झाले आणि एक दिवस वर्गात एक नवीन चेहरा आला..
कॉलेजमध्ये नवीन केमिस्ट्रीचे सर बदलून आले..पटेल सर..त्यांच्या मुलानं जिग्नेशनं यांच्या वर्गात प्रवेश घेतला..
निळ्या डोळ्यांचा,जॅकी श्रॉफ सारखा चेहरा असलेला उंचापुरा जिग्नेश बघून सगळेच त्याच्याकडे आकर्षित झाले..
लवकरच तो सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला..आधीच रुबाबदार,त्यात श्रीमंत..बोलका.. मग काय यांचा ग्रुप ऑफ पिरियडला कॅफे गाठायचा..धमाल करायचा..
जिग्नेश पक्का गुज्जू होता..खाण्या पिण्याचं त्याला खूपच वेड होतं..
त्याच्या घरचं वातावरण मोकळं असल्यामुळं तो आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन घरी यायचा..
त्याच्या आईला खाऊपिऊ घालण्याचा नाद होता..हिराबेनला आसिफा आवडायची..ती काकूंना मदत करायला पुढे व्हायची..
जिगुला आसिफाबद्दल आतून काहीतरी वाटत होतं..
इकडं आसिफाचीही तीच गत होती..त्याच्या निळ्या डोळ्यांच्या डोहात ती आकंठ बुडून गेली होती...
त्यावर्षीच्या गॅदरिंग मध्ये तिनं "ये आखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है"..हे गाणं म्हणून जिगुवरच्या प्रेमाची एकप्रकारे कबुलीच दिली..आणि मग हे प्रेमाचं गुपित फुटलं...दोघेही प्रेमात न्हात होते...
सगळ्या ग्रुपमध्ये ही बातमी पसरली आणि कॉलेजमध्ये ही कुजबुज सुरू झाली..
भिंतीलाही कान असतात,त्याप्रमाणे ही गोष्ट आसिफाच्या घरापर्यंत पोचली...
अब्बांना समजू नये याची पुरेपूर काळजी घेऊनसुद्धा त्यांच्या कानावर ही गोष्ट गेलीच..
आता आपलं आणि आपल्या मुलीचं काही खरं नाही हे अम्मीनं जाणलं...
पण यावेळी उलटं घडलं..अब्बा काहीच बोलले नाहीत..ते कुठल्यातरी विचारात होते..
रात्री त्यांनी आपले पाय दाबायच्या निमित्ताने आसिफाला खोलीत बोलावलं..
"बेटी,आ..आजा..जरा पाव दबा..."
आसिफा खालच्या मानेने पाय दाबू लागली...पण छातीत नुसती धडधड होत होती..
वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ही..
आता काय होईल आपलं?..मारतील का?..का कॉलेज बंद करतील?..
मनात प्रश्न थैमान घालत होते...
अब्बा का बोलत नाहीत?..
खरं तर बरोबर आहे की चूक आहे हे समजण्यापूर्वी आपण प्रेमात पडलो...
आपली जातच नाही तर धर्म वेगळे,परंपरा वेगळ्या... पराकोटीची भिन्नता आहे ..पण तरीही आवडतो तो आपल्याला...
आता जर अब्बांनी विचारलं तर काय उत्तर द्यायचं?...
"आसिफा,बेटा, क्या सोच रही हो?..."
दचकलीच ती या प्रश्नाने...
"कुछ नहीं अब्बा..वो... मैं... क्या..."
तोंडातून शब्दच फुटेना तिच्या..
"रहने दो अब...मुझे निंद आ रही है..."
ठीक है..असे म्हणत सुटका झाली या भावनेनं ती उठली आणि ओढणी सावरत बाहेर निघाली सुद्धा...
"रुक बेटा..."
आता मात्र तिला घाम फुटला...
अब्बा उठून बसले होते..
"जरा इधर तो आ..."
ती लटपटत्या पावलांनी परत आली..
"बैठ जरा..
सुन आसिफा,तू मेरा अभिमान है..मैने बहुत उम्मीदें रखी है तुझसे.. ऐसा कोई भी काम मत करना, जिससे मेरी इज्जत मिट्टी में मिल जाये... बाकी तू सयानी है.."
"जी अब्बा.."असं म्हणून ती बाहेर पडली..
डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या...
अब्बा किती विश्वास ठेवतात आपल्यावर...
खरं तर त्यांना आपलं हे प्रकरण माहीत झालं असलं पाहिजे..
पण कोणताही गदारोळ न करता,आपल्या आत्मसन्मानाला धक्का न पोचवता त्यांनी किती व्यवस्थित हाताळलंय...
प्रेम आंधळं असतं हे खरं..पण समाज डोळस आहे....
आपलं पाऊल जर वाकडं पडलं...काही भलं बुरं घडलं तर खरंच अब्बा सहन करू शकतील का?..
आपला समाज जगू देईल का सन्मानानं त्यांना...
रात्रभर विचार करकरून ती थकली...
यापुढं विचार करूनच पाऊल टाकायचं असं तिनं ठरवलं...
इकडं जिग्नेशच्या घरी देखील ही गोष्ट समजली...
हिराबेनला आसिफा आवडत होती,पण ती जिग्नेशच्या मैत्रिणीच्या रूपात..
त्याची कायमची साथ देणारी म्हणून नव्हे...
त्यांनी खूप गोंधळ केला..जिग्नेशला खूप बोलल्या...
त्यानं काहीच उलट प्रतिक्रिया दिल्या नाही..अशा परिस्थितीत शांत राहणं जास्त सोईस्कर वाटलं त्याला...
"हे वयच असं असतं.. प्रेमापेक्षा आकर्षण जास्त असतं.. मुलं जसजशी मोठी होतील तसतसं हे आकर्षण कमी होईल..
काळजी करू नकोस..आम्ही अशी कित्येक प्रकरणं हाताळली आहेत.".असं त्याच्या बाबांनी सांगून आईची समजूत घातली..
जिग्नेशला एकट्याला बोलावून चार समजुतीच्या गोष्टी ऐकवल्या...
त्या दिवसांनंतर दोघांचंही वागणं थोडं बदललं....
आसिफाला जिग्नेशला भेटण्याची ओढ तर वाटत होती,पण भीतीही तितकीच वाटत होती..
तो समोर दिसला की अब्बू डोळ्यासमोर यायचे...
मग ती जिगुला टाळण्याचा प्रयत्न करायची...
त्याच्या हे लक्षात आले...
एक दिवस त्यानं तिला कॉलेज संपल्यावर थांबवलं..
नेहमीच्या कॅफेत नेलं..कॉफीची ऑर्डर दिली..
"आशू..."
हे त्याचं लाडकं नाव होतं...
"अगं, तू अशी गप्प का?..काहीतरी बोल..."
आसिफाला अगदी भरून आलं..
आपण याला टाळतोय खरं, पण विसरणं शक्य नाही..
"अगं काय झालंय?..अब्बा काही बोलले का?..मारहाण केलीय का?.."
"नाही रे..."
"मग काय झालंय?..
तू का टाळतीयस मला?.."
आसिफानं घडलेलं सांगून टाकलं..
जिग्नेशनं तिचे हात हातात घेतले..
"लक्षात ठेव आशू,माझ्याकडून तुझ्या घरच्यांची इज्जत जाईल अशी कुठलीच गोष्ट घडणार नाही...
पण हे ही तितकंच खरं की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत...मला अशी टाळू नकोस..."
आता मात्र तिच्या संयमाचा बांध फुटला..ती खूप रडली..
रडून मन थोडं हलकं झालं..कॉफी पिऊन त्याला न टाळण्याचं वचन देऊन तिथून निघाली..
त्यानंतरही त्यांचं प्रेम तसंच राहिलं.. पण सावधपणे ते भेटू लागले..
या सर्वांची साक्षीदार होती निलू...
बारावी होताच आसिफानं लॉ. करायचं ठरवलं..
तर जिग्नेशनं बी.कॉम करायचं ठरवलं...
ती पुण्याला गेली...निलू इथंच नगरमध्ये राहिली..
तिनं सुद्धा बी कॉम करायचं ठरवलं..
अधून मधून त्यांच्या भेटी व्हायच्या..जिग्नेश तिच्या ओढीनं पुण्याला जायचा..
आता त्यांचं प्रेम परिपक्व झालं होतं..
जिग्नेशच्या आईबाबांनी ओळखलं होतं आपल्या मुलाच्या मनातलं..
शेवटी मुलाचं सुख ते आपलं सुख असं पत्नीला समजावून बाबांनी आईला गप्प केलं होतं..
आसिफाच्या घरी मात्र असं वाटत होतं की तिनं जिगुचा नाद सोडून दिलाय..
सर्व काही सुरळीत चालू असलेलं नियतीला पाहवलं नाही..
एक दिवस झोपेतून उठता उठता सय्यद भाईंना पॅरॅलिसिस चा ऍटॅक आला..
डावी बाजू पूर्णपणे लुळी पडली...
सगळं होत्याचं नव्हतं झालं..
मुलगा लहान...भावांनी दगा दिला...
ट्रान्स्पोर्टचा धंदा बळकावला...
त्यांना तर बोलता पण येत नव्हतं..
ज्या नजरेच्या धाकात उभं घर होतं, ती नजर व्याकूळ झाली होती..
अम्मी बिचारी काय करणार?..जिनं घराचा उंबरठा कधी ओलांडला नाही ती बाई घराची जबाबदारी कशी पेलू शकणार?..
आसिफाचं शेवटचं वर्ष होतं.. तिनं शिक्षण सोडून देण्याचा निर्णय घेतला...जिग्नेशला ही गोष्ट समजली..त्याचा जीव आसिफा आणि तिच्या पूर्ण होत आलेल्या शिक्षणासाठी खूप तुटत होता..
तो तिच्या घरी गेला..तिच्या अब्बाना भेटला..त्याला पाहून सय्यदभाई फक्त रडू शकले..बोलण्यासाठी ओठांची हालचाल करण्याचा प्रयत्न केला...त्यांना काय म्हणायचंय हे जिग्नेशला समजलं..त्यानं हळुवारपणे त्यांचा हात हातात घेऊन थोपटला... त्याचा तो आश्वासक स्पर्श जणू समजला त्यांना...
मग मात्र जिग्नेशने मनाशी ठाम निश्चय केला आणि आसिफाला भेटला..
"आसिफा,तुझं शिक्षण तू सुरू ठेव..इकडची काळजी अजिबात करू नकोस..."
"अरे,म्हणणं सोपं आहे..पण करणार कोण आणि कसं?..मला तर विचार करून करून वेड लागायची पाळी आलीय..."
"पण तू शिक्षण अर्धवट सोडून काय करणार?.."
"काय करावं हे सुचत नाही..पण शिकवणी घेणं हा एकच पर्याय माझ्यासमोर आहे.."
"अगं, शिकवण्या घेऊन तू किती पैसे कमावू शकणार आहेस?.."
"तू माझ्यावर सगळं सोड..तुझं हे शेवटचं वर्ष आहे..शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वाभिमानाने जगता येईल इतकी कमाई तू नक्कीच करू शकशील.."
आसिफा समोर दुसरा पर्याय नव्हता..तिनं जिग्नेशचं ऐकायचं ठरवलं..
जिग्नेशनं आपल्या बाबांना विश्वासात घेऊन सर्व परिस्थिती सांगितली..
त्यांच्याकडून काही रक्कम कर्जाऊ म्हणून घेतली आणि कॉलेजजवळ छोटं स्टेशनरीचं दुकान सुरू केलं..
त्याच्या बोलक्या स्वभावामुळे लवकरच त्यानं जम बसवला..
येणाऱ्या नफ्यातून तो आसिफाच्या कुटुंबाला मदत करू लागला..
भिन्न धर्माचा,भिन्न जातीचा आपला कोणीही नसलेला मुलगा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतो आणि ज्यांना आपण आपलं समजलं,जे रक्ताच्या नात्यानं नातेवाईक आहेत त्यांनी मात्र आपल्याला दगा दिला,आपल्याला लुबाडलं..व्यर्थ अभिमान बाळगला...संकटसमयी जे मदत करतात ते खरे आपले..हे आज समजलं..
सय्यदभाई मनातल्या मनात स्वतःला दोष देत होते..आपण इज्जत इज्जत करत होतो..आज काय परिस्थिती ओढवली आपल्या कुटुंबावर.. असा विचार करत करत खंगुन खंगुन शेवटी अल्लाला प्यारे झाले..
आसिफा वकील होऊन प्रॅक्टिस करत करत कुटुंबाचा चरितार्थ चालवू लागली..
जिग्नेशचा व्यवसाय चांगलाच चालू लागला...आपल्या छोट्या दुकानाचं रूपांतर त्यानं मोठया दुकानात केलं..एक चांगला व्यावसायिक म्हणून त्याला व्यापारी जगात चांगला मान मिळू लागला...
दोघांमध्ये प्रेम होतंच.. ते अधिकाधिक परिपक्व झालं होतं..दोघांच्याही कुटुंबात आता कटुता नव्हती..आसिफाची भावंडं त्याला हक्कानं भाई म्हणून काय हवं नको सांगत..हळुहळू तो जिगू भाई म्हणून सर्वांमध्ये परिचित झाला...
आसिफाच्या पाठच्या बहिणी लग्नाच्या वयाच्या झाल्या.. आसिफानं त्यांच्या लग्नाचं मनावर घेतलं..
चांगली स्थळं बघून त्यांची लग्न करून दिली...
जिग्नेशच्या आईबाबांनी त्याच्या मागे लग्न कर,लग्न कर म्हणून लकडा लावला...
तो काहीतरी करून विषय टाळायचा प्रयत्न करायचा...
शेवटी एक दिवस बाबा त्याला म्हणाले,.."जिगू,असं किती दिवस टाळणार आहेस?...
आम्हाला माहिती आहे,तुझं आसिफावर खूप प्रेम आहे..त्या पोरीनं खूप सोसलंय..
तू तिच्याशी लग्न करून सुखी होणार असशील तर आमची,माझी आणि तुझ्या बा ची मुळीच हरकत नाही...
तू बोलून बघ तिच्याशी.."
जिग्नेशच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलं..
आता आसिफाच्या घरच्यांची परवानगी काढू..अम्मी.. त्या तर बिचाऱ्या गरीब आहेत.. त्यांचा नकार येईल असं वाटत नाही..आसिफाला मात्र तयार करायला थोडा वेळ लागेल,पण मी तेही नक्की करेन...असा विचार करून तो आसिफाच्या घरी पोचला...
पाहतो तर घरात गोंधळ सुरू..आजूबाजूच्या बायका जमा झालेल्या...
अम्मी सकाळी नेहमीप्रमाणे उठली..
तोंड धुवायला बाथरूम मध्ये गेली आणि पाय घसरून पडली..डोक्याला जबरदस्त मार लागला होता...
मनातले विचार मनातच दाबून त्यानं अम्मीला दवाखान्यात हलवलं...
मेंदूला मार लागल्यामुळं त्या कोमात गेल्या होत्या..
आता तर परिस्थितीनं आसिफा आणि जिग्नेश च्या वाटेत काटेच पसरले जणू..
जवळजवळ एक महिना दवाखान्यात ठेवल्यावरही त्या कोमातून बाहेर पडल्या नाहीत..
डॉ.नी घरी घेऊन जायला सांगितलं...
आसिफाचं जीवन आता फक्त आणि फक्त अम्मी, घर,जबाबदाऱ्या यात गुरफटले...
तरीही एक दिवस हिंमत करून जिग्नेशनं तिला लग्नाबद्दल विचारलं..
"आसिफा,मला माहितीय तुला विचारलं की तू रागावणार आहेस..तरीही विचारतो..आपण लग्न करूया का?..
घरचे खूप मागं लागलेत..आणि आता किती दिवस अम्मी बरी होण्याची वाट पहायची?..आता हा विरह सहन नाही होत..
तुझ्याशिवाय नाही गं जगू शकत मी.."
"तुझ्या भावना समजताहेत मला..पण माझ्या जबाबदाऱ्या इतक्या आहेत की मी लग्नाचा विचारदेखील करू शकत नाही..."आसिफा...
"अगं पण आशू,तुझ्या जबाबदाऱ्या त्या माझ्या पण आहेत..आपण मिळुन पार पाडू त्या...
याच्या पलीकडे स्वतःचं आयुष्य आहे हे विसरली आहेस तू..असं नको करुस..माझा,माझ्या आईचा विचार कर ना!..तिचं पण आता वय झालंय .."
" जिगू,मी अब्बास,अम्मी यांना एकटं नाही सोडू शकत..त्यांना माझी गरज आहे..
तू माझ्यावर मनापासून प्रेम केलं आहेस..मी सुद्धा...तुझ्याशिवाय जगणं मलाही अशक्य आहे..पण आता मनाची तयारी करायला हवी जिगू..आता आपली वाट एक नाही..तू माझ्यासाठी तुझ्या आईबाबांना नाराज करू नकोस.."
" मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे?.."
"मला विसरून जा..
तू लग्न कर..तुमच्या जाती धर्माची मुलगी पाहून..तरच सुखी होशील तू..मी तुला फक्त दुःखच देऊ शकते.."
इतकं बोलून आसिफा झटकन निघून गेली...
जिग्नेशने त्यानंतर तिला खूप वेळेस समजावण्याचा प्रयत्न केला,पण तिनं तोंडात मिठाची गुळणी धरली ती सोडलीच नाही...
लग्न करत नाही म्हणून विचारा विचारात आजारी पडली..तिनं अंथरुण धरलं..
शेवटी नाईलाजानं जिग्नेश लग्नाला तयार झाला..
निलूला मन्या सांगत होता....
कारण निलू लग्न झाल्यावर पुण्यात रहात होती..ईदला माहेरी आली अन तिला हे सगळं समजलं..
आसिफा आणि जिग्नेशच्या प्रेमाची कहाणी अधुरीच राहिली होती..
आसिफा जगणार होती फक्त जबाबदारीचं ओझं वाहत...
आणि जिग्नेश जगणार होता आईवडिलांच्या इच्छेखातर..