आणि... नर्मदा मला बोलवित होती
आणि... नर्मदा मला बोलवित होती


सुबोध आजही दचकुन उठला. घशाला कोरड पडली… तसाच उठला डोक्याशी असलेला पाण्याचा तांब्या उचलला आणि घटाघटा पाणी प्यायला. बाजूलाच त्याची आई पडून होती. पलीकडच्या भिंतीला टेकून पिठवरती एक दिवा ठेवला होता. तो विझू नये म्हणून त्याभोवती एक वीट अन् लोखंडी पाटी त्यावर पालथी घालून ठेवली होती. दिवा पेटता होता. हे त्या पाटीखालून येणाऱ्या मिणमिणत्या प्रकाशामुळे कळत होतेच. तरीही सुबोधने पाटी वर करून दिव्यातली वात सारखी केली. तेल घातले. दिवा आणखीनच उजळला. त्याबरोबर समोरची त्याच्या अण्णांची गुलाल बुक्का वाहिलेली अन् तुळशीचा हार घातलेली तसबीर उजळून निघाली. हो… सुबोधचे अण्णा श्रीधरपंत आठ दिवसांपूर्वीच निजधामास निघून गेले होते. कसला आजार नाही की काही नाही. गेल्या वर्षी कंपनीतून रिटायर झाल्यापासून जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य. नेहमीच आपल्या मित्रपरिवारात रमणारे. एक दिवस सकाळी अजून का हे उठले नाहीत म्हणून सुबोधच्या माई उठवायला गेलेल्या अन् त्यांच्या हंबरड्यानेच सुबोधला जाग आली. डॉक्टरला बोलावणे वगैरे मानसिक समाधान... आता काही उपयोग नाही हे त्याने ओळखलेच होते.
सगळे सोपस्कार झाले... बघता बघता आठ दिवस झाले. झोप लागत नव्हतीच... त्याने उगाचच कूस बदलून पाहिली. अण्णांची एक ना अनेक रूपं डोळ्यासमोर येत होती. मला बालक मंदिरात नेऊन बसवणारे अण्णा, मी व्यवस्थित शिकावे म्हणून प्रसंगी आपल्याला ओरडणारे अण्णा, आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू, खाऊ आणणारे, आपले सगळे हट्ट पुरवणारे अण्णा... मला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळावा म्हणून झटणारे अण्णा, कॉलेजच्या फीसाठी अर्ज काढणारे अण्णा... एक ना दोन किती रूपं आपल्या जन्मदात्याची. मला नोकरीला लागून ३ वर्षे झाली पण त्यांनी माझ्याकडे कधी काही मागितल्याची कुठलीच आठवण नाही... एकही नाही? असेच अनेक विचार करत तो पडून राहिला. पहाटेच्या सुमारास कधीतरी डोळा लागला त्याचा…
दुसऱ्या दिवशी अण्णांच्या ग्रुपमधील काही लोक सुबोधला भेटायला आले. ह्याआधीही ते सारे येऊन गेले होतेच. पण उद्याच्या १० व्याला काही मदत लागणार आहे का ते विचारण्यासाठीच ते आले होते. थोडावेळ थांबून दुसऱ्या दिवसाची रूपरेषा ठरवून ते निघाले. तोच सुबोधने त्यांचे निकटचे स्नेही देशपांड्यांकडे पाहिले अन् म्हणाला "काका थोडं बोलायचं होतं." देशपांडे बसले... बाकीचे निघून गेले.
सुबोध म्हणाला "काका मला गेले आठ दिवस स्वप्नं पडतायत... मला त्यांचा अर्थ लागत नाहीये. कालसुद्धा पुन्हा तेच स्वप्न पडलं होतं. कसलीतरी अनामिक ओढ वाटत होती कोणीतरी बोलावीत होतं पण कोण तेच कळत नव्हतं. अण्णांची काही इच्छा राहिली आहे का?"
देशपांडे "मला तरी तसे काहीच बोलल्याचं आठवत नाहीये" म्हणाले.
सुबोधला काहीच उलगडा झाला नाही. आता उद्या जर पिंडाला कावळा शिवला नाही तर बघू काय करायचे असे म्हणून विषय सोडून दिला... १० व्याच्या दिवशी सगळे विधी झाले. काही केल्या पिंडाला कावळा शिवला नाही. म्हणून मग वाट बघून बघून शेवटी दर्भाचा कावळा करून त्याने पिंडाचा काकस्पर्श केला. त्याच वेळी सुबोधने अण्णांच्या अस्थि विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची काय इच्छा राहिलीय ते त्याला शोधायचे होते. अस्थींचे मडके घेऊन घराबाहेरच्या झाडाला बांधून त्याने इतरांचा, नातेवाईकांचा रोष पत्करला होता.
१३ वं १४वं झालं. सगळी आवरा आवर झाली. अण्णांच्या अस्थी तश्याच बाहेर झाडाला लटकून होत्या. माईसुद्धा सुबोधला सांगून कंटाळल्या. आवरा आवरी करताना सुबोधला आण्णांची जुनी डायरी सापडली. खूप वर्षे अण्णा डायरी नियमित लिहित होते. गेल्या काही वर्षांमधेच त्यांनी ते बंद केले होते. काही पाने चाळता चाळता तो मधेच एखादे पान वाची... त्यासंदर्भातील आठवण ताजी होई... पुन्हा पान उलटले जाई. कित्येक छोट्या छोट्या गोष्टी अण्णांनी मनामध्ये आणि साहजिकच डायरीमध्ये कोरून ठेवल्या होत्या. काही कटू तर काही गोड आठवणींची पाने उलटली जात होती. अन् एक पानावर तो थबकला.
अण्णांनी लिहिले होते:
आज आमचा सगळा ग्रुप नर्मदेला भेट द्यायला गेला... नर्मदा परिक्रमेला गेला. सगळ्यांनी बिनपगारी रजा घेतल्या आहेत. माझी सुद्धा खूप इच्छा होती पण गेल्याच महिन्यात सुबोधच्या कॉलेज प्रवेशासाठी कंपनीतून घेतलेल्या कर्जामुळे ते शक्य नाही. मला असणारे ह्या परीक्रमेबद्दलचे वेड आणि मला कायम मनात रुंजी घालणारी नर्मदा. माझ्या वडिलांबरोबर माझ्या लहानपणी मी केलेली ती परिक्रमा अन् तेव्हापासून माझ्या मनात असणारी ओढ खरंच शब्दात व्यक्त करता येत नाही... कारण ती अनुभवायलाच हवी. खरंतर साहेबांना विचारले असते तर ते नाही म्हणाले नसते कदाचित... पण पण आपला भिडस्त स्वभाव. असो. एकदा हे कर्ज फिटले अन् सुबोधचे शिक्षण झाले की मी निवांतच होणार आहे. मग सुबोधला हक्काने सांगेन मला नर्मदा परिक्रमा घडवून आण म्हणून. आज देशपांडेच्या हातात हात देऊन तेवढी माझ्यासाठी बाटलीभरून का होईना नर्मदा आण म्हणून सांगताना आपला स्वर किती कातर झाला होता. त्याने विचारले सुद्धा अरे श्रीधर काय झाले म्हणून पण मी मानेनेच काही नाही म्हणून सांगितले. जायची इच्छा खूप होती. माझ्या आप्पांच्या खांद्यावर बसून पाहिलेलं ते नर्मदेच पात्र, तिच्या पवित्र पाण्यात स्नान करणारे साधू-संत, परिक्रमा करणारे लोक अन मला साद घालणारी नर्मदा... हे चित्र सहज डोळ्यापुढे उभे राहते…
पुढे अण्णांनी काही लिहिले नव्हते. काही टिपं गळून पडल्याची साक्ष मात्र डायरीचे ते पान मात्र नक्की देत होते. काहीतरी ठरवल्यासारखे सुबोध उठला माईला हाक मारली अन् आपला प्लान सांगितला. माईने बाकी काही विचारण्यापुर्वीच त्याने तिच्यासमोर आण्णांची डायरी धरली. डोळे भरल्या सुबोधचा चेहरा पाहून माईंनी ते पान भरभर वाचून काढले. अन् मुकपणेच त्याला अनुमोदन दिले.
सकाळीच आवरून त्याने बाहेर पडताना अण्णांच्या अस्थी व्यवस्थित बॅगेत ठेवल्या. दारात निरोप द्यायला उभ्या माईला सुबोध म्हणाला "आयुष्यभर त्यांनी कधीच काही मागितले नाही... नेहमीच देत आले. आपली स्वप्नं इच्छा... कशाचाच विचार केला नाही. खरंतर अण्णाच मला हे सुचवत होते स्वप्नांमधून, मलाच हे कळायला उशीर लागला. मी उगाच घाबरत होतो त्या स्वप्नांना... खरे तर अण्णांची इच्छा पूर्ण करायची होती आणि म्हणूनच… नर्मदा मला बोलावीत होती.”