पहिले प्रेम...!
पहिले प्रेम...!


बोलले मी कधीच नाही,
प्रेम तेच होते..
फांदीवरती मनातल्या,
बुलबुल गात होते...! १.
किती पहारे सज्ज अन्,
मज्जावही फार होते..
तरी ओढ अनामिक गोड,
ते बंधच अनुबंध होते...! २.
वळवावी कितीदा नजर,
तरीही डोळे तेच होते..
वळणावर प्रियाचे घर,
पाऊल तेथेच वळत होते...! ३.
नव्या फुलांचे नवते गंध,
किती दरवळ हळवे धुंद.!
नभाची ती पोकळी त्यात,
पाखरू फडफडे बेधुंद...! ४.
किती गोड अदमास अन्,
अंदाजही अनोखे होते..
सांगायचे टाळले मी पण,
'पहिले प्रेम' तेच होते...!! ५.