माझं स्वप्न
माझं स्वप्न


माझ्या शेतकरी बापाचं होतं सपन मोठं,
लेकरं शिकूण मोठी व्हावी,पहावं त्यांचा थाट.
याच सपनापाई,बाप राबला जन्मभर,
घेऊन गरीबीचा शाप,कर्जाचा डोंगर.
पहात होतो डोळयांनी,बापाचं ते हाल,
बाप सांगायचा आम्हा,शिक्षणाचं मोल.
शिकूण साहेब व्हा पोरांनो,हेच सपन माझं,
सांगून माझा बाप,राबराबायचा रोज.
केली एकच जिद्द,बाचं सपन पूर्ण करण्याची,
साहेब होऊन,श्रण आईबापाचे फेडण्याची.
रात्रंदिस अभ्यास,नाही डोळ्याला झोप,
साहेब व्हायचं! एकच सपन होतं.
कलेक्टर व्हायच म्हणून,मोठी परीक्षा दिली,
आईबाबासह मला ओढ निकालाची लागली.
आनंदानं नाचू लागलो,पहिला नंबर राज्यात,
सपन बाच पूर्ण केलं,फोटो आला पेपरात.
पेढे घेऊन धावत,गाठंलं आधी घर,
बाप होता शेतात,घरी तो सावकार.
गेलो बाच्या भेटीला,विश्वासच बसत नव्हता,
गळफास घेतलेला बाप,झाडाला लटकत होता.
कोसळलो धरणीवर,झाला साराच अंधार,
कर्जापायी बाप माझा,गेला सोडून सारं.
सपन बाचं पूर्ण केलं, बाच सोडून गेला,
स्वप्नांचा माझ्या कसा, चुराडाच हा झाला...!