"बरसला पाऊस सखे"
"बरसला पाऊस सखे"
बरसला मनसोक्त रात्रभर सखे ग पाऊस वळीवाचा..
दरवळला आसमंती मृदगंध आत्तरी सावळ्या आईचा..१
उमटली पांदीत खोल मुक्या पाऊलांची खुर नक्षीदार..
बहरली वनराई नवरी जशी शालू हिरवा नेसलेली नार..२
सुरु झाली खेळी लपाछपी ती ऊन-पाऊस सावल्यांची..
किलबिल मधूर किती ऐक चकोर चिमणी राघवांची..३
भ्रमर हर्षी भिरभिरती उनाड कोकिळा मंजुळ अलापी..
क्षणात सर एक पावसाची बघ होऊन संगमी मिलापी..४
दवबिंदु चमकती बघ सळसळून गवताची पातळ पाती..
करी नृत्य मुक्तछंद मोर रानी भोर जुळवून नितळ नाती..५
हात जोडून उभी भोवती कृष्ण धवल ढगांच्या राशी..
सप्तरंगी इंद्रधनु करी स्वागत गर्द निळ्या या आकाशी..६
बघ ना सखे निसर्गाची ही किमया नजरी सहज आज..
कात टाकते सावज जशी अवनीने चढविला नवा साज..७
तृप्त झाली अधीर धरणीमाय पिऊन पहिली सरी..
येना सखे नदीतीरी तू पाहण्या नीर वाहे अमृतधारी..८