Laxmi Mahajan

Drama Inspirational

4.2  

Laxmi Mahajan

Drama Inspirational

वन वे पासपोर्ट

वन वे पासपोर्ट

4 mins
487


संदीप बायकोला म्हणाला "अगं उद्या सकाळी बँकेत जायचं आहे."

"मग जा की" संगीता गुरगुरली.

"येडे दोघांनाही जायचंय, मॅनेजरने अर्जंट बोलावलंय, KYC करायचंय म्हणाला"

"त्यासाठी उन्हातून का तडमडत जायचं? ऑनलाईन होतं की सगळं. विनू आला की करेल."

"त्याचा भरोसा नाही कधी येईल. तोपर्यंत लेट होईल. अकाउंट ब्लॉक होईल. आणि ऑनलाईन नको. कुठे अडकलं तर डोक्याला ताप. जाऊ सकाळीच"

बरं! पण यायला उशीर झाला तर जेवण नाही हां मिळणार वेळेवर. मग तणतण नको.

"चालेल, थोडं ताक घेईन बरोबर"

बँकेत गेल्यावर संदिप, बायकोला एका बाकावर बस म्हणून सांगून मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. थोडया वेळाने दार किलकीलं करुन तिलाही बोलावून घेतलं.

मध्येच काही झेरॉक्स आणायला तो दोनदा बाहेर जाऊन आला. सगळे सोपस्कार उरके पर्यंत दीड वाजले.

"अरे वा! संगीता, एकदम मालामाल झालीस तू आज. सगळी खाती, डिपॉजिट, डीम्याट माझ्या जोडीने तुझीही झाली."

"तशी नॉमिनी आहोतच आपण एकमेकांना"

"Pagal नॉमिनी वेगळा नि होल्डर वेगळा, आता तू ATM, चेक साइन करू शकतेस. माझी गरज नाही."

"का तुम्हाला ट्रम्पने बोलावलंय प्रचाराला?"

संगीता मनापासून हसली.

"वा छान विनोद! करा चेष्टा! सगळी खाती ताब्यात आलीना. तुम्हा बायकांना बाकी हातात पैसा असला की एकदम सुरक्षित वाटतं." संदीप मिश्किल हसला आणि रिक्षाला हात दाखवला.

"अहो रिक्षा कशाला ढेंगभर जायला?"

"चल, पंगतला जाऊ, बरेच दिवस कुर्ली लॉलीपॉप नाही खाल्ले. मस्त तिथेच जेऊ"

"एकदम खुशीत आलाय. त्यादिवशी वाढदिवस करूया म्हटलं तर किती नाटकं केलीस"

"छ्या, तो किरिस्टावासारखा केक फेक नाही आवडत मला. मग वाईन बियर का नाही ठेवत? नुस्ता सोईस्कर दिखावा"

"काही गोष्टी दुसऱ्यांसाठी कराव्या."

"करतोयना! पंगतमे पार्टी."

"सायब, हाय वेनेच घेतो. मधला ब्रिज बंद आहे."

"अरे रिक्षा घेऊन कुठे फॉरेनला गेला होतास? परवा उदघाटन झालं नव्या ब्रिजचं"

नव्या ब्रिजवरून एस्टी डेपो टाकून रिक्षा पंगत समोर थांबली. उरलेले पैसे ठेव सांगून संदिपने रिक्षावाल्याची पाठ थोपटून झपकन एसी फॅमिली सेक्शन मध्ये जाऊन छोटं टेबल पकडलं.

हात तोंड धुवून आलेल्या सांगितकडे मेनू कार्ड सरकवून बघ काय हवं अशी खूण केली व स्वतः दुसरे कार्ड चाळू लागला. वेटर येताच दोघांनी ऑर्डर दिली.

तुडुंब जेवून दोघे बाहेर पडले

"चार पावलं चालूया. ताबडतोब रिक्षा नको." संगीता बोलली.

ती दोघं सुमारे पंधरा मिनिटं चालली नि वीस योजना आखल्या.

सांगितला अशा गजराच्या पुंगिंची चांगलीच सवय झाली होती.

घरी आल्यावर संदीप कॅलेंडर आणि डायरी घेऊन बसला.

संगीताने मस्त ताणून दिली. रिटायर झाल्या पासून ही नवी सवय तिला लागली होती.

संध्याकाळी चहा झाल्यावर संदीप डायरी घेऊन संगीताजवळ बसला.

त्याने पाहुण्यांची नावं काढली होती. चक्क चार लिस्ट होत्या.

त्या संगीताला दाखवत तो म्हणाला

" या तारखा बघ. आधी तुझा वाढदिवस, मग तुझी रिटायरमेन्ट. पुढच्याच महिन्यात माझी. मग पंचवीस जानेवारी आपल्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस..... सगळे दणकावून साजरे करायचे. "

डोळे मोठठे करुन संगीता आश्चर्य वाटून थोडया रागानेच म्हणाली

"असे पैसे उधळून खाली करायला माझ्या नावावर खाती केलीत?"

"वेडे, आपण काहीच धड साजरं केलं नाही आत्तापर्यंत. यावेळी ठरवून करू. अगदी इकोनॉमि. स्वस्तम मस्तम साजरे करू. पण तुझ्या माझ्या ऑफिस मित्र मैत्रिणींना सरप्राईज देऊ. बऱ्याच दिवसांनी एकत्र जमून मस्ती करू."

"एवढ्या लोकांना?"

"वेगवेगळ्या ग्रुपना बोलवायचे. तूझ्या वाढदिवसाला तुझे, माझ्या माझे"

"अनु -विनू?"

"त्यांना लग्नाच्या वाढदिवसाला. ओन्ली तुझे माझे नातेवाईक. निअर अँड डिअर "

मस्त प्लॅनिंग करुन संदिपने संगीताच्या मदतीने धमाल मस्ती करत वाढदिवस साजरे केले.

संदीप खूप दिवसांनी असा चेकाळला होता. नको नको म्हणतांना दोन पेग जास्त मारून कराओकेवर गाण्याची हौस भागवत होता. 

लग्नाच्या वाढदिवसाला मोजक्या शंभर जवळच्या माणसांना आमंत्रण होते.

पुण्याला ऑफिस असणारी मुलं अनु आणि विनू दोन दिवस आधीच आली होती. संगीता आणि संदिपची भावंडं आदल्या दिवशी आली.

खास हॉल घेऊन व्हेज-नॉनव्हेज जेवण, वाईन, आईस्क्रीमचा बेत होता. आहेर आणू नये अशी गोड तंबी दिलेली होती. घरचाच असलेल्या कॅटरर सुभाषने सर्व सोय मस्त केली होती. भावगीत नाट्यगीत गायला चिन्मय आपल्या मित्रां सोबत हजर होता.

अगदी रात्री बारा वाजे पर्यंत पार्टी लांबली. पाहुणे परतू लागले.

मात्र घरी जायला निघाल्यावर संदीप कुठे दिसेना.

संदीप बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला.

हॉस्पिटल मध्ये फॅमिली डॉक्टर म्हसकरांनी विनूला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. त्याच्या हातात एक फाईल ठेवली.

जरा बरे वाटल्यावर संदिपची भंकस व बडबड चालू झाली.

डिस्चार्ज मिळून घरी आल्यावर डॉक्टरांच्या उपस्थितीत आई, बहीण अनु यांना विनूने एकत्र बोलावलं.

विनूने खूण केल्यावर डॉक्टर बोलू लागले

"खरंतर फार पूर्वीच तुम्हाला विश्वासात घेवून मला हे तुम्हाला सांगायला हवं होतं. पण संगीता एकटीच असल्याने मी सांगायचं टाळलं. अनु विनू तुम्ही येणार म्हटल्यावर हे सांगू असा विचार केला. संगीता संदीप गेल्या काही महिन्यात अचानक ऍक्टिव्ह झाल्याचं तुला जाणवलं असेलच."

संगीताने डोळे मोठे करुन दुजोरा दिला.

"याला कारण..." डॉक्टर बोलू लागले "त्याला त्याचा मृत्यू कळलेला आहे."

संगीता आणि अनुने एकदम चमकून अविश्वासाने डॉक्टरांकडे पाहिले.

"हो. त्याला पॅंन्क्रियाजचा कॅन्सर झालाय. हार्डली दोन महिने आहेत त्याच्याकडे. म्हणून तो सर्व आवरायला लागलाय. नाती गोती मैत्री हिशोब.... सर्वकाही."

डॉक्टरांच्या डोळ्यातून अश्रू निखळले.

"ए म्हश्या! काय घाबरवतोयस माझ्या माणसांना? मी मस्त ठणठणीत आहे. मिनिमम ऐंशी वर्ष कुठे जात नाही."

थरथरत्या आवाजात संगीता म्हणाली

" संदीप, कुठून आणतोस लोकांना हसून छळण्याची ही ताकद? मला काहीतरी हिंट द्यायची. एवढा अविश्वास? "

"संगीता, तुमच्यावरच्या विश्वासानेच या मारणावर मी विजय मिळवलाय. त्याला भेटायला मी आनंदाने तयार झालोय. अगं सर्व म्हणतात माणसाचा जन्म नऊ महिने आधी कळतो मात्र मृत्यू अचानक घाला घालतो. झूट..... मला सहा महिने आधीच मृत्यूने खबर दिली. म्हणाला "चल आटप. हा घे वन वे पासपोर्ट, तुझ्या जन्माच्या वेळीच बनलाय. उरलं सुरलं जगून घे."

वेडयानो! 'मरणात खरोखर जग जगते.' मी खूष आहे... पुर्ण शुद्धीत, आनंदाने सर्वांचा निरोप घेतोय...... हां! पण पुनर्जन्मावर माझा ठाम विश्वास आहे. मी गेल्या नंतर तुम्हाला कुणी विनाकारण गुणगुणणारा दिसला किंवा अनोळखी माणसाशी अथवा लहान मुलाशी मस्ती करणारा कुणी पैशाने कफल्लक पण मनाने श्रीमंत माणूस दिसला तर बिनधास्त ओळखा ' साला संदीप जन्माला आला "


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama