टाईम ट्रॅव्हल
टाईम ट्रॅव्हल
"अरे! पार्थ इथे माझ्या प्रयोगशाळेत लुडबुड करू नको! विनाकारण कुठे हात लावशील,धडपडशील, खूप मेहनतीने बनवलेले एकेक आविष्कार आहेत माझे. एका बाजूला बस बरं गुपचूप!",पार्थ चे बाबा त्याला दटावत म्हणाले.
पार्थचे बाबा खूप मोठे वैज्ञानिक आहेत,त्यांनी वेगवेगळे अद्भुत शोध लावलेले आहेत. त्यांनी असं रसायन शोधलं होतं की जे पिल्यावर आठ दिवस भूक लागणार नाही, एक असं रसायन शोधलं की जे पिल्यावर आठ दिवस झोप येणार नाही, एक असं रसायन बनवलं होतं की ज्याचं प्राशन केल्यावर व्यक्ती मुंगी सारखी बारीक होऊन जाईल,असे अनेक अजब-गजब शोध पार्थ च्या बाबांनी लावले होते. त्यांनी आणखी एक गजब शोध लावला होता तो म्हणजे टाईम मशीनचा, त्या मशीन च नाव त्यांनी 'टाईम ट्रॅव्हल' असं ठेवलं होतं. त्या मशीन ची खासियत अशी होती की जेवढे आकडे त्या मशीन च्या स्क्रीन वर आपण टाईप करू तेवढे वर्ष ती मशीन आपल्याला मागे किंवा पुढे नेऊ शकत असे. समजा मशीन स्क्रीन वर 50 टाईप केलं की 50 वर्षे आपण पुढे जाऊ शकत असू आणि 50- केलं की 50 वर्ष आपण मागे भूतकाळात येऊ शकत असू. पण हे करण्याआधी आपल्याला त्या मशीन जवळच एक घड्याळ घालणं आवश्यक होतं म्हणजे जेव्हाही आपल्याला वर्तमान काळात यायचं असेल तेव्हा आपण घड्याळावरच बटन दाबायचं. पार्थ ला त्याच्या बाबांच्या प्रयोगशाळेविषयी फार कुतूहल होतं त्यामुळे बरेचदा तो तिथे येत असे. आताही तो एका कोपऱ्यात निरीक्षण करत बसला होता. थोड्यावेळाने त्याचे बाबा कुठल्यातरी प्रयोगात मग्न झालेले त्याने बघितले आणि हळूहळू तो टाईम मशीन कडे येऊ लागला,पटकन त्याने तिथलं घड्याळ हातावर बांधलं आणि मशीन वर 100- टाईप केलं,तसा त्या मशीन मधून आवाज येऊ लागला आणि स्क्रीन वर वर्तुळ दिसू लागलं. ते वर्तुळ खूप वेगात फिरू लागलं आणि त्याच्याकडे बघत पार्थ ची शुद्ध हरपली,आणि त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो एका झाडाखाली झोपला होता,कुठल्या तरी शेतात तो होता,त्याने उठून सगळीकडे बघितलं,सगळीकडे फळांनी फुलांनी लगडलेले झाडं होते,पक्षी इकडे तिकडे उडत होते. काही लोकं शेतामध्ये काम करण्यात गुंतले होते. जवळच एक खळखळता झरा वहात होता,बाजूलाच एक विहीर होती. पार्थ चं मन हे सगळं बघून प्रफुल्लित झालं होतं,पार्थ ने मस्त एका झाडावरून आंबे तोडून खाल्ले,मग झऱ्याचं पाणी पिलं. आणि एका झाडाच्या पारावर मस्त मजेत तो बसला. तेवढयात काही बायका बोलत बोलत तिथे आल्या, आणि पारावर थोडं बाजूला त्यांची शिदोरी सोडून बसल्या, पार्थला दिसत होतं, शिदोरीत भाकऱ्यांची चळत होती, त्याच्यावर ठेचा होता,झुणका होता, एका काळ्या मातीच्या भांड्यात ताक होते. त्यातल्या एका बाईने एका हाताने कांदा धरून दुसऱ्या हाताच्या मनगटाचा एक दनका मारून तो कांदा फोडला. पार्थ हे सगळं कुतूहलाने बघत होता पण त्या बायकांना वाटलं की ह्याला भूकच लागलीय म्हणून हा बघतोय,म्हणून त्यांनी त्याला जेवण्याचा आग्रह केला,
"घे लेकरा! खा! भाजी भाकर आमच्या संगं!"
"नको काकू! मला भूक नाही लागली",पार्थ
"अरे घे लाजू नको,इथला दिसत न्हाई तू , तुझे कापडं विलायतेचे वाटतात,इथे सगळे बापे सदरा धोतर घालतेत आन तू तर साहेबावानी शर्ट पॅन्ट नेसली,म्हून म्या म्हनलं",त्यातली एक बाई म्हणाली.
आता यांना टाईम मशीन बद्दल कसं सांगणार असा विचार करून पार्थ म्हणाला,
"हो मी शहरातून आलो,गावाचा मला अभ्यास करायचाय न म्हणून, तशी भूक नाही मला पण तुम्ही एवढा आग्रह करताच आहात तर खातो दोन घास"
त्या बाईने पार्थच्या हातात एक भाकरी त्यावर थोडा झुणका आणि ठेचा दिला, थोडं ताक एका पानाच्या द्रोणात दिलं. पार्थ ने ते मोठ्या चवीने खाल्लं,झुणका भाकरी खूपच चविष्ट झाली होती. त्याने विचार केला की आपल्या घरी पण आई झुणका भाकरी करते कधीकधी,पण ही चव काही औरच आहे. तेवढ्यात त्याला ठसका लागला,ठेचा खूपच तिखट होता,त्याने द्रोणातलं ताक पिऊन टाकलं तरी जिभेची आग जाईचना मग तो झऱ्याकडे पळाला आणि भरपूर पाणी पिऊन आला. त्याने बघितलं त्या बायकांनी पूर्ण जेवण होईपर्यंत मुळीच पाणी पिलं नाही,त्यांना सवय असल्याने त्या मजेत कोशिंबिरीसारखा तो तिखट ठेचा खात होत्या. त्या बायकांचे आभार मानून,आणि निरोप घेऊन पार्थ पुढे निघाला,शेतातून बाहेर पडल्यावर त्याला एक गाव दिसलं,त्यात अनेक कौलारू घरं ओळीने मांडल्यासारखी बांधली होती.
सकाळची वेळ होती,काही जण आपले घर शेणाने सारवत होते,कोणी घराच्या भिंतीवर चुन्याने वारली पेंटिंग करत होते,सगळं वातावरण प्रसन्न होतं,छान हवा वहात होती, वातावरणात एक टक्का सुद्धा प्रदूषण नव्हतं,सगळे जण सायकलवर किंवा बैलगाडीत किंवा पायीपायीच फिरत होते त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नच नव्हता. एका घराच्या पडवीत एक वृध्द स्त्री काहीतरी शिवणकाम करत होती,चष्मा न वापरता ती अगदी सहजपणे सुईमध्ये दोरा ओवत होती. पार्थला आश्चर्य वाटले,त्याने विचार केला एवढ्या वृद्ध स्त्री ची दृष्टी एकदम स्वच्छ आहे आणि मला तर दहावीतच चष्मा लागला. काही बायका जात्यावर ओव्या म्हणत धान्य दळत होत्या, काही बायका ओट्याजवळ उभे न राहता खाली बसून स्वयंपाक करत होत्या, घरातील मंडळी सुद्धा खाली मांडी घालून जेवायला बसले होते. तरुण मंडळी त्यांच्या त्यांच्या नित्य कामात गुंतली होती, काही मुलं मोकळ्या मैदानात खेळत होते,काही शाळेत गेले होते,एक आजोबा तर मस्त कडाकड जर्दाळूच्या बिया दाताने फोडत होते,सगळे जण मिळून मिसळून वागत होते बोलत होते,सगळीकडे एक positive energy खेळत होती.
इथे मशिन्स नव्हत्या,स्मार्टफोन्स नव्हते,टीव्ही नव्हते तरी सगळे आनंदाने राहत होते. 'मला बोअर होतेय' असं कोणीच म्हणताना दिसत नव्हतं. जसजसा काळ पुढे जात राहिला तसतशी मानवाची भौतिक प्रगती झाली पण त्याचे अनेक side effects पण झाले जे आपण आता सहन करतोच आहोत,हवेचं प्रदूषण,आवाजाचं प्रदूषण,विचारांचं प्रदूषण. 'जुनं ते सोनं' म्हणतात ते खरंय, शेवटी समाधान हे वस्तूत नसून मनात आहे असा विचार करत असताना कोणी एका लहान मुलाने कुतूहलाने पार्थच्या घड्याळाचे बटण दाबले आणि पार्थ परत वर्तमानात आला. डोळे किलकिले करून त्याने बघितलं तर त्याचे आईबाबा त्याच्या कडेच बघत होते,
"तुला म्हंटल होतं न मी इथे कशाला हात लावू नको म्हणून,पुन्हा माझ्या प्रयोगशाळेत पाय ठेवला तर खबरदार!",पार्थ चे बाबा त्याला रागावले.
"ठीक आहे बाबा यापुढे मी येणार नाही इथे पण मी जो अनुभव घेतला या टाईम मशीन चा तो तर ऐका",असं म्हणून पार्थ आईबाबांना सगळा वृत्तांत सांगत राहिला.
