Supriya Waray

Horror

4.6  

Supriya Waray

Horror

ओएसिस (Oasis)

ओएसिस (Oasis)

10 mins
674


चढ गेल्यावर प्रतापने समोर पाहिले आणि करकचूऽन ब्रेक दाबला. त्याच्याकडे फक्त काही सेकंदाचा अवधी होता. त्याने जीप रस्त्याच्या कडेला घेतली. तो जीपमधून उतरला. जीपच्या मागच्या भागात काही ताडपत्रीवजा सामान होते. तो पटकन दोन सीटच्यामध्ये असलेल्या जागेत शिरला. जमेल तितके स्वत:चे शरीर आक्रसून घेतले. ताडपत्री डोक्यावर ओढून घेतली मात्र; त्याला आतमध्ये जाणवला वार्‍याचा वेग. वाळूचे सपकारे पाठीवर, पायांवर पडत होते. प्रतापने समोर पाहिल्याक्षणी त्याला ते तांबूस अक्राळविक्राळ वाळूचे वादळ त्याच्या दिशेने येताना दिसले होते. जीप उघडी होती आणि स्वसंरक्षणार्थ त्याच्याकडे काहीच नव्हते. खूप घाईत निघाला होता तो. तसे मोठे कामदेखील नव्हते. त्याला फक्त एक छोटे पार्सल गावच्या मुखियाच्या घरी द्यायचे होते. सैन्याच्या सामानाबरोबर दिल्लीहून आले होते ते पार्सल. ते तर त्याच्या पॅंटच्या खिशात मावले होते. त्याला उत्सुकता होती – काय असेल त्यात? पण आपण हुकमाचे ताबेदार. आपल्याला काय करायचंय? असा विचार करून साहेबाची आज्ञा त्याने तुरंत अंमलात आणली.

पण हे काय मधेच वादळ आलं? काही पूर्वसूचनाही नव्हती. नाहीतर तो तयारीनिशी बाहेर पडला असता. किती वेळ चालणार आहे हे वादळ कुणास ठाऊक? त्याला पुढची कामे डोळ्यासमोर दिसू लागली. छे! फुक्कट वेळ जाणार या छोट्या पार्सलच्या नादात. आता त्याच्या शरीरावर वाळूची पुटे चढू लागली. कितीही वाचवले, तरी डोळे, नाक, कानात वाळू शिरू लागली. शिंका येऊ लागल्या, डोळ्यांची जळजळ होऊ लागली, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डोके दुखू लागले. तो सैरभैर झाला. आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. वातावरणात फक्त तांबूस वाळू भरून राहिली होती. त्यात हा भणाणणारा वारा! जीप थडाथड हालत होती. एखादा खरखरीत कागद अंगावरून फिरवावा, तसा वालुकामय वारा बोचत होता.

भारत-पाक सीमेवरील राजस्थानमधल्या जेसलमेरजवळ त्याचे पोस्टिंग होते. प्रशिक्षित सैनिक होता तो. घाबरला नव्हता, पण वैतागला होता. निधड्या छातीचा होता; शत्रूशी दोन हात केले असते. शत्रूबरोबर चकमकी, लढाया, युद्ध, बचाव, गनिमी कावा त्याला नवीन नव्हता. शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत जन्म झाला होता त्याचा; त्यांच्या शौर्यगाथा ऐकत मोठा झाला होता. पराक्रम त्याच्या रक्तात होता. पण इथे परिस्थिति वेगळी होती. त्या छोट्या पार्सलखातर हे सर्व घडत होते. त्याला राग आला स्वत:चाच. आपण संध्याकाळी जायला हवे होते, मुखिया संपतरामच्या घरी. कुठून दुर्बुद्धी झाली आणि लगेच जीप काढून निघालो.

एव्हाना वादळाने अजून जोर पकडला होता. जीपमध्ये साठलेली वाळूची पातळी वाढू लागली. त्याने सीटवर चढून ताडपत्रीमध्ये स्वत:ला गुरफटून घेतले. हा त्याचा बचाव अपुरा पडू लागला. वाळूच्या मार्‍याने आपली शक्ती क्षीण होते आहे असे त्याला वाटले. अशी दृश्ये आपण फक्त भयपटात पाहिली होती. एका क्षणी तर या जीपसकट आपण वाळूत गाडले जाऊ असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. अंदाजे दोन तास झाले असावेत. डोळे उघडून घड्याळ बघायची संधीच नव्हती. परत जावे आपल्या छावणीवर. पण मग ते पार्सल? त्याचे काय करावे? त्या यक:श्चित पार्सलच्या नुसत्या विचारानेदेखील तो दमून गेला.

त्याने अंदाज घेत हळूहळू डोळे उघडले, तेव्हा बाहेर वादळाचे नामोनिशाण नव्हते. डोळे चोळून त्याने परत पाहिले. ताडपत्री नव्हती, उडून गेली असणार बहुतेक. जीपही नव्हती, रस्ता नव्हता. मग सर्व गायब कसे झाले? अंधार पडू लागला होता. भारतीय पुरातत्व खात्याचे उत्खनन चालू होते वाळवंटात. पण ती जागा काही मुखियाच्या घरच्या वाटेवर नव्हती. मी तर ते पार्सल द्यायला निघालो होतो. त्याचा हात अभावितपणे खिशात गेला. खिशात ते पार्सल सुरक्षित होते. त्याला थोडे हायसे वाटले. कुठे आहे मी? त्याने आजूबाजूला पाहिले. भग्न दगडी बांधकाम होते. बर्‍याच छोट्या खोल्या असाव्यात. खूप वर्षे कोणाचाही वावर नसावा तिथे. झाडे अस्ताव्यस्त वाढली होती. वेली वाढल्या होत्या; इथून तिथून लोंबकळत होत्या. धुळीचे साम्राज्य पसरले होते. भयाण शांतता होती. जिथे छत होते, तिथे वटवाघळांचे वास्तव्य होते. त्यांच्या फडफडण्याचा आवाज येत होता तेवढाच. त्याची पंचेंद्रिये कानोसा घेत असता, त्याला जाणवले, वातावरणात कुबट वास भरून राहिला होता. त्याच्या बाजूला एक पडझड झालेली भिंत होती. कोणत्याही क्षणी ती आपल्या अंगावर पडेल, असे त्याला वाटले. पटकन उठण्यासाठी त्याने जमिनीवर हात टेकला. हाताला काहीतरी ओले, चिकट लागले.  

ताजे रक्त होते ते. आजूबाजूच्या दगडी, राखाडी, अंधार्‍या पार्श्वभूमीवर त्याचा लालभडक रंग उठून दिसत होता. एवढ्यात एक मानवाकृती त्याच्या दिशेने येताना दिसली. तिचे हातपाय रक्ताने माखले होते. त्याला काही कळेना. भूऽऽत! त्याला जोरात ओरडावेसे वाटले. पण तोंडून शब्द फुटेना. ती आकृती अचकट-विचकट हसत त्याला म्हणाली, “ए पावन सिंग बहादुर, मला माहीत होतं तू येणार. आता भोग तुझ्या कर्माची फळं!” ती आकृती त्याला फरफटत एका खोलीत घेऊन गेली. खोली कसली? तुरुंगामध्ये असते तशी कोठडी होती. एका बाजूला लाकडी खुर्ची होती. त्याला खुर्चीवर बसवून बांधले गेले. त्या आकृतीने त्याच्या दोन्ही हाताच्या पंजातून लाकडामध्ये खिळे ठोकले. त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. रक्ताचे पाट वाहू लागले. “काय चूक होती माझी? मी फक्त केलेल्या कामाचा मोबदला मागत होतो; भीक नव्हतो मागत. ज्या हातांनी मागत होतो, त्याच हातांना ही शिक्षा? कसं वाटतंय आता? बस या खुर्चीला जखडून. उद्या जिवंत राहिलास तर अजून खिळे! हा हा हा!” प्रतापला सांगायचे होते, “मी नाऽही पावन सिंग, आणि मी काहीच केलेलं नाहीये.” पण तो फक्त विव्हळत राहिला, अतीव वेदनांनी.

प्रतापला जाग आली, तेव्हा सूर्य तळपत होता. आपण जिवंत आहोत? आपल्या हातापायावर तर खिळे ठोकले होते. कुठे आहे रक्त? पावन सिंग कोण? इतक्यात आवाज आला, “चल पावन सिंग” आवाजात जरब होती. आवाजाच्या दिशेने त्याने पाहिले – सर्वांगावर फोड असलेली अतिभयानक मानवी आकृती त्याला खुणावत होती. तिच्या फोडांमधून पू झाला होता. त्याची दुर्गंधी पसरली होती. प्रतापला क्षणभरही तिथे थांबवेना. एवढ्या टळटळीत दुपारी भूत? भूतांचा वावर रात्री असतो ना? कोणत्याच प्रश्नाची उत्तरे मिळत नव्हती. प्रताप येत नाही म्हटल्यावर ती जवळ आली आणि तिने प्रतापला खेचायला सुरुवात केली. तिचा तो गिळगिळीत, ओलसर स्पर्श! शी! असा आर्द्र, घाण स्पर्श त्याने पूर्वी कधी अनुभवला नव्हता. आता तो बाहेर आला जिथे बांधकाम चालू होते. मोठे दगड पडले होते. “हं, कपडे काढ. उचल ते दगड. ते तिथे नेऊन टाक.” सूर्य आग ओकत होता. दगड खूप तापले होते. ते कसे उचलणार? “उचल, माझ्या अंगावर हे दगड उचलून फोड आले, तेव्हा तुला काही वाटलं नाही ना नराधमा? मग आता का थांबलास? उचल.” त्याने निमूटपणे कपडे काढायला सुरुवात केली. पहिल्या दगडाला हात लावल्यावर चटका बसला. दगड हातात धरवेना. सैन्यात त्याला कठोर परिश्रमांची सवय होती. पण एकेक दगड उचलताना आणि ठेवताना हाताला, शरीराला दगडाचे आणि पायाला वाळूचे चटके बसत होते, अंगाची लाहीलाही होत होती. ती आकृती मात्र खदखदा हसत त्याच्यावर नजर ठेवून होती. मधूनच त्याला जाणवले, तिची नजर त्याच्या कपड्यांवर पण होती; जसे काही कपडे काळजीपूर्वक सांभाळावे. याला काय करायचंय माझे कपडे सांभाळून? सूड उगवल्याचा विकृत आनंद त्या फोडभरल्या चेहर्‍यावर होता. कसला सूड होता हा? माझ्यावर सूड उगवायला मी पावन सिंग कुठे आहे? आता मात्र प्रतापला भीती वाटू लागली होती. यातून कसे सुटावे? गरम दगडांचा ताप, वरून उन्हाच्या झळा, त्याला साहवेना.

आता तो एका छोट्या कोठडीत होता. कोठडीला जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एवढाच दरवाजा होता. बापरे! अंधाराची भीती नाही; अज्ञाताची आहे. अजून किती भुते आहेत इथे? ती आपल्याला किती त्रास देणार आहेत? हातात ठोकलेले खिळे, गरम दगडांचे चटके. ही सर्व भुते मला पावन सिंग का समजताहेत? पावन सिंगशी काय दुश्मनी आहे यांची? पुढे काय वाढून ठेवलं आहे? मला इथे बंदी बनवून का ठेवलंय? या विचारात असताना कोठडीमध्ये अचानक भरपूर सर्प सोडण्यात आले. बाहेर दरवाजातून एक मानवाकृती गरजली, “पापी माणसा, तुझं नाव पावन कुणी ठेवलं? एक तरी पवित्र कृत्य केलं आहेस का तू? हे साप अत्यंत जहरीले आहेत. एक जरी डसला, तरी खेळ खल्लास. विष भिनत जाईल, तोंडाला फेस येईल, डोळ्यासमोर काजवे चमकतील.” प्रतापला ते सर्व ऐकायला वेळ होता कुठे? तो वर शोधत होता. त्याला एक छोटी खुंटी दिसली. तो तिकडे झेपावला. “घे टांगून स्वत:ला हात साथ देतील तोवर. आठव मला कसं शेकडो सापांनी डसलं होतं; ते जहरी डंख मला यमसदनाला घेऊन गेले होते. मग मी तुला कसं सोडेन? मर आता, भीतीने नाहीतर सर्पदंशाने.” विखारी हसत तो निघून गेला. खाली मृत्यू आणि बुडत्याला काडीचा आधार असावा अशी ती जीर्ण खुंटी. खुंटी आधी तुटणार की हात, एवढाच प्रश्न होता.

प्रताप भानावर आला, तो एका रांगेत उभा होता. बर्‍याच अमानवी आकृत्या होत्या, रांगेत, भुतेच ती! एकाचंही शरीर धड नव्हतं. कुणाच्या देहाला बाक, कुणाचे हातपाय तुटके, कुणाचा भयानक विद्रूप चेहरा, शरीरभर जखमांच्या खुणा. प्रतापला वाटले, फक्त तो धडधाकट आहे त्या रांगेत. म्हणजे बाकी भुतं आणि तो भूत नाही? उलटे पाय आहेत का त्यांचे? इतक्या गडबडीत तो बघायचं विसरला होता. खाली बघणार तोच त्याला ढकलले गेले खोलीत. १० बाय १० च्या खोलीत जवळपास १५० च्या वर माणसे कोंबली गेली. आणि दरवाजा लावला गेला. “असंच घृणास्पदरीत्या मारलं गेलं मला. अत्यंत निर्दयी पद्धतीने. कितीतरी अजून माणसे मारली गेली, गुदमरलो आम्ही, चेंगरलो, चिरडलो गेलो जे बलवान होते, त्यांच्याकडून. पाच दिवसांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा फक्त तीनजण उरले होते, ते ही अर्धमेले. काय मिळालं असं करून तुला पावन सिंग, इतक्या जणांचा आक्रोश तुला ऐकू नाही आला? अन्न, पाणी, हवा यांच्यावाचून आमची तडफड झाली; आणि तू मात्र तेव्हा रंगमहालात मदिराप्राशन करत होतास, इतक्या जणांचे शाप घेतलेस तू; तुझी अवस्था अजून वेगळी काय होणार? नरकात जाशील नीचा.” प्रतापचा श्वास घुसमटत होता. आता आपण नक्की मरणार. आधीच्या हालअपेष्टा सोसून जिवंत राहिलो खरे, आपले पण यांच्याप्रमाणे भूत होणार! आपण पावन सिंग नसताना आपल्यासोबत हे काय घडत आहे? आपण जीव तोडून सांगतोय पावन सिंग नाही म्हणून, पण कोणाला ऐकू जात नाही. हा काय गजब प्रकार आहे? कसली भुताटकी? कुठे फसलो मी? आपले चेक-पोस्ट कुठाय? माझी जीप कुठाय? मला सोऽऽडवा यातून कुऽणीतरी. नऽको या यातना.

“मी आहे पावन सिंग.” संपूर्ण नग्न आणि जणू बर्फाचा माणूस असावा, असा तो पावन सिंग, प्रतापसमोर उभा होता. त्याचे असे लाकडासारखे आखडलेले भीतीदायक शरीर पाहून प्रताप थिजला. थोड्या वेळाने त्याच्या मेंदूपर्यंत पोचले की आपल्या समोर जो आहे तो पावन सिंग आहे. नाही, म्हणजे त्याचे भूत आहे. अशा काही अमानवी घटना घडत होत्या की त्याला एकामागून एक धक्केच बसत होते.       

“मी तुला आमची भयकथा सांगणार आहे. घाबरू नकोस. माझ्याकडे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. पण मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे.”

आधीच्या सर्व भूतांनी त्याला पावन सिंग समजून त्याच्यावर सूड उगवला होता. म्हणजे पावन सिंग काही चांगला माणूस नव्हता. मी याच्यावर कसा विश्वास ठेवू? माझ्याकडे दुसरा पर्याय आहे का?

“प्रताप, तुला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. मी एकच सांगतो, इतक्या मरणप्राय यातना भोगून सुद्धा तू जिवंत, धडधाकट आहेस ना?” पावन सिंग म्हणाला.

याला माझं नाव कसं माहीत? पण हा म्हणतो ते बरोबर आहे. याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा दिसतोय.

“जर तुला साधे खरचटले ही नाहीये, म्हणजे यामागे माझी काहीतरी योजना आहे, हेतु आहे. पटतंय का तुला? मला वचन दे, मी सांगेन ते तू करशील.”

ज्या पावन सिंगने इतकी नीच, भयानक कृत्ये केली असतील, त्याला वचन द्यायचे? नाही दिलं तर या बर्फाशी मी लढू तरी कसं? या लाकडाला मी कसं मारणार? हा मेलेलाच आहे.

“लवकर वचन दे. माझ्याजवळ जास्त वेळ नाहीये. तुला तुझ्या जीपपर्यन्त सोडण्याची जबाबदारी माझी!” पावन सिंग गरजला.

जीप? माझी जीप! हो! मला जायचंय तिकडे. त्याची स्वत:च्या जगात जाण्याची भावना उसळून आली.

“दिलं वचन. काय करायचंय सांग आणि सोड मला आता.” प्रतापने विनवणी केली.

हा हा हा! पावन सिंग हसला, “ऐक. ही अमरगढ़ संस्थानची हवेली. जिने अनेक मृत्यू पाहिले, जिवंतपणीच्या मरणयातना पाहिल्या, आक्रोश ऐकला, किंकाळ्या ऐकल्या. मला अजूनही स्पष्ट दिसतंय सारं. सुमारे १०० वर्षापूर्वी इथे कैदी ठेवले जायचे. मी राजाकडे आश्रित होतो. माझी नेमणूक झाली होती या कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मरणाच्या दारात नेऊन ठेवण्यासाठी. शिक्षा जितकी कठोर, तितकी माझी बिदागी जास्त. प्रथम मला खूप वाईट वाटायचे. मदिरा प्राशन करून मी हे काम करत असे. रात्र रात्र झोप येत नसे. मरणार्‍यांच्या किंकाळ्या कानात घुमत असत. वाटायचे, हे पाप आपण का करत आहोत? पण छन्न छन्न मोहरा दिसल्या की जाणिवा बोथट व्हायच्या. हळूहळू काही वाटेनासे झाले, एक प्रकारची नशा, झिंग येऊ लागली आणि मग माझे रूपांतर एक क्रूरकर्मा म्हणून झाले. किती कैद्यांना मी असा वरचा रस्ता दाखवला याची गणतीच नाही. माझ्या या पापाला क्षमा नाही.”

समोरचा बर्फ वितळताना प्रताप पहात होता. पावन सिंग भावुक झाला होता. त्याला मनोमन पावन सिंगची जमेल तितकी मदत करावीशी वाटली. पण मी कशी मदत करू शकतो? हे कोडे त्याला सुटेना.  

“त्या सर्व कैद्यांनी तुला एक झलक दाखवली, ते कोणत्या नरकयातनेतून गेले. त्यामुळे तू आम्हाला मदत करशील असे वाटले. राजपुत्राच्या सत्तेच्या हव्यासापायी त्याने राजाचा वध केला आणि तो गादीवर बसला. राजाशी एकनिष्ठ माणूस आमच्या राजपुत्राला कसा हवा असेल? दुसर्‍या क्षणाला मी त्याच कैदेत होतो. मला पूर्ण काळ्या संगमरवरी खोलीत नग्नावस्थेत ठेवण्यात आले. त्या खोलीत दुसरे काहीही नव्हते. मला फरशीवर बसावे, झोपावे लागे. कडाक्याच्या थंडीने माझा बर्फ होत असे. शरीर लाकडासारखे कडक बनले.”

पावन सिंगच्या बर्फाळ दिसण्याचे रहस्य हे होते तर!

“चल”, थंडगार बर्फ त्याला ओढून नेऊ लागला. हवेलीच्या एका बाजूला भग्न देवालय होते. कसलीशी तुटकी मूर्ति होती. प्रतापने नकळत हात जोडले.

“मी आत जाऊ शकत नाही. तू ज्या मुखियाला ते खिशातील पाकीट द्यायला जात होतास, त्याचे पिताजी मृत्युशय्येवर आहेत. म्हणून त्यांनी ते पाकीट मागवले होते. मला जेव्हा ते समजले तेव्हा मी तशी परिस्थिति निर्माण केली. तुला इथे आणले. अशी संधि आम्हाला परत मिळणार नव्हती. तू आत जा. खिशातील वस्तु काढ. आत एक कुपी आहे. त्यातले पाणी देवालयातील हवेत शिंपड. तुझं वचन पूर्ण कर. आम्हा सर्व दु:खी, शापित, अतृप्त आत्म्यांना मुक्ति हवी आहे. ती देणे तुझ्या हातात आहे. कारण तुझ्या खिशात पवित्र गंगाजल आहे.”

प्रताप देवालयात गेला, त्याने खिशातील कुपी काढली. थोडेसे गंगाजल हवेत शिंपडले, तत्क्षणी हजारो दु:खी आत्मे स्वतंत्र झाले. त्यांना इहलोकातून मुक्ति मिळाली. प्रतापवर त्यांनी पुष्पवृष्टी केली. प्रतापला प्रसन्न वाटले. त्याने डोळे मिटले. आपण अनुभवलेला त्रास तो विसरला. त्याला खोलवरून पावन सिंगचा आवाज ऐकू आला – जा प्रताप, बघ, तुझी जीप उभी आहे. बाहेर काळ थांबला आहे. लवकर जा. मुखिया संपतरामचे पिताजी गंगाजलासाठी आतुरले आहेत.


Rate this content
Log in

More marathi story from Supriya Waray

Similar marathi story from Horror