लिपस्टीक
लिपस्टीक
भाग -१
" अगं ये कार्टी . काय झालं रडायला. सदा भोकाड पसरूनच का?"
"का पैदा झाली काय माहित कैदाशिन ,तुझ्यापेक्षा एक पोरगा जन्माला आला असता तर बर झालं असत...!"
(सुलभा धावत किचन मधुन बाहेर येते पोरगी खेळता खेळता अंगणात पाय घसरुन पडलेली असते)
सुलभा:- "कुणी मारलं माझ्या परी ला?. कुठे पडलीस? पायाला लागलं का माझ्या राणी ला." ?
(असं म्हणत तिला नादवण्यासाठी तिच्या हातात टेबलावर पडलेली लिपस्टीक व बाहुली देते.)
"तू नगं लक्ष देऊस तिच्याकडं! घटकाभर रडल अन् गप पडल."
तू आपलं कामाचं बघ... अन् यंदाच्या पारीला मुलगाच हवा बर का सूनबाई...!"
वंशाला दिवा मिळावा म्हणून घरच्यांच्या हट्टापायी मुलाची आशा एका स्त्रीला किती वेदना देत असेल. आई म्हणून ती या सर्व वेदनांना सहन करत असते. या कथेतील सुलभा देखील यापैकी एकच.एकापाठोपाठ एक तिला तीन मुली झाल्या होत्या. पण मुलगा होत नाही म्हणून सासरी कायम हिणवलं जायचं. घराण्याला वंश हवा या सासरच्या हव्यासापायी सुलभा पुन्हा एकदा गरोदर राहिली होती. मुलगा व्हावा म्हणून कित्येक व्रत वैकल्ये उपवास देखील केले. शेजारपाजारच्या बायका रमाक्काचे (सुलभाची सासु) कान भरवत असायच्या.
(एक दिवस रमाक्का,सखू, सुमन पाटलाच्या ओढ्यावर कपडे धूत असताना )
सुमन :- "अगं रमाक्का, कितवा महिना म्हणायचा बाई तुझ्या सूनाला?
रमाक्का:- "अग सुमन सातवा हाय".
सुमन :- "यंदाच्या खेपेला पोरगा होऊ दे म्हणावं. म्हंजे कसं झाक होईल बघ,नुसता पोरींचाच रतीब लावलाय.....!"
"त्या येरुआईकडं घेउन जा की, तिला बाहेरचंच काहितरी असेल बघ, नाहीतर एवढ्या पोरींची रांग नसती लावली."
सखू:- "व्हय सुमे मला बी तसचं वाटतंया". अगं माझ्या सुनाला पहिल्याच खेपेला नेलं होत बघ. येरूआईची किरपा झाली अन् पहिलंच पोरग झालं."
हे ऐकून रमाक्काच्याही मनात विचारांचं खलबत सुरू झालं. शेजारपाजारच्या बायकांच्या सांगण्यावरून तिलाही वाटू लागलं येरूआईचा कोप असेल म्हणून. रात्रभर त्याच विचारात असलेली रमाक्का शेवटी सुलभा ला येरूआई कडे नेण्यास तयार होउन बसते.
गावाबाहेरील माळरानाकडे एका वडाच्याझाडखाली येरुआईचं ठाण होतं. एकदम ओसाड पडलेल्या डोंगरकपारीत वडाच्या झाडाखाली शेंदूर फासलेेली पाच दगड, वडाच्या बुंध्याला गोलाकर गुंडाळलेली हिरवी साडी त्यावर अडकवलेल्या लिंबाचा हार बांगड्या असं काहीतरी त्या देवीच स्थान होतं.
गावभर बातमी कशी पसरली कुणास ठाऊक दुसऱ्याच दिवशी दारावर जोगतीण आली.
हिरवीगार नऊवारी साडी, गळ्यात कवड्याची माळ, हातात परडी त्यात शेंदुर फासलेले दगड, एक तांब्या, रंगीत सजवलेल्या वस्त्राने झाकलेली ती परडी त्यावर चमकदार गोलाकार आरसे. तिच्या भाळी हळदीचा लेप व भांगेत कुंकवाचा मळवट असा काहीसा तिने वेश परिधान केलेला होता.
जोगतिण:- "येरू आईच्या नावानं, जोगवा दे गं माय !"
जोगवा येरु आईचा जोगवा.."
आवाज ऐकून रमाक्का हळदी कुंकवाच ताट घेऊन येते. ताटात वाटीभर गव्हाच पीठ, थोडी साखर अन् गोडेतेल घेउन उंबऱ्यावर उभी राहते. व सुलभा ला आवाज देते.
रमाक्का:- "सुलभा, अग ये सुलभा येरुआई आली दारात जरा तांब्या भरून घेउन ये.." (आज पहिल्यांदा सुलभाने सासूच्या तोंडून इतकं गोड नाव ऐकल होतं)
इतक्यात सुलभा देवघरातील पितळी तांब्या भरून आणते. व पाय धुण्यासाठी खाली वाकते. पण जोगतीन मागे हटून नकार देते कारण गरोदर बायकांचा स्पर्श देवीला विटाळ असायचा. त्यामुळे डोक्यावर पदर घेउन रमाक्का पाय धुते, हळद कुंकू लावते व परडीत पीठ, तेल टाकून देते. व नमस्कार करत म्हणते,
"आये, इडा पिडा काय असल तर टळु दे ग, घराला पोरांचं पायगुण लागू दे तुझी सेवा करीन ग येरुआई..!"
जोगतीण:- " लय वंगाळ झालं बघ आक्का, येरुआई कडं पाठ फिरवलीस म्हणून झालं बघ. कायतरी चुकलं-माकलं असल बघ. पाचव्या माळेला घेउन येसा तुझ्या सुनेला."
(असं म्हणत ती जोगतिण दुसऱ्या दारी निघून जाते)
"काय ग..? पांढऱ्या पायाची अवदसा, पोरापायी राहिलं माझं लेकरु तुझ्यापायी... नुसत्या पोरीचा रतीब लावलाय..."
असं हिनवत रमाक्का शेजारच्या सखू कडे निघून जाते.
जावेचा आणि सासूच्या तोंडाचा पट्टा दिवसभर चालूच असायचा.
या जाचाला सुलभा देखील कंटाळली होती. या त्रासापायी तिला देखील वाटू लागत असायचं की, यंदा तरी मुलगा जन्माला यावा. साऱ्यांची अपेक्षा लागलेली होती. अंधश्रद्धेने बरबटलेल्या सासुच्या या कर्मठ विचारांच्या त्रासापायी शेवटी वैतागून ती मोठ्या धीराने येरुआई कडे जाण्यास स्वतःहून तयार होते.
क्रमशः
