कविता... आपली
कविता... आपली


कविता असते का उतरत फक्त,
लेखणीतून कागदावर?
कविता पाझरते का फक्त,
प्रेमाने वक्षावर?
कविता स्फुरते का फक्त,
वरदानाने आयुष्यभर?
कविता घालते का लोटांगण फक्त,
श्रीमंत प्रशंसेने....पावलांवर?
कविता मनवते का फक्त,
राग फुलला असता नाकावर ?
पाहिलंत का तरी?
कविता सणकून उतरते कधी,
मेंदूतून चेहर्यावर..
उष्ण उष्ण ओघळते कधी ,
डोळ्यांतून सुकल्या गालांवर...
गळ्यातून अडखळत उतरते,
पोटातल्या भुकेवर...
फाटक्या खिशातून सांडतेही,
पावलांशी जोडलेल्या रस्त्यावर...
फक्त तिला
लपवावी लागते आपणच,
हसवावी लागते आपणच,
पचवावी लागते आपणच,
वेचावी लागते आपणच,
आपली .....आपल्यासाठी.