गेले ते दिन गेले "
गेले ते दिन गेले "
पूर्वीचे ते पाहात फोटो
पुन्हा पुन्हा ती हळहळली
तारुण्याची पुन्हा पालवी
मनी एकदा सळसळली
शेंगच होते चवळीची मी
मजवर होते फिदा किती
काय वर्णू मी एकेकाच्या
प्रेमाच्या त्या अजब रिती
थांबत नाही काळ कधी पण
हा तर तारुण्याला शाप
आठवले ते जुने दिवस अन्
बसले घेऊन फोटो व्याप
चिरतरुण का कोणी झाले
कहाणीत ते फक्त असे
क्षणागणिक ते ओसरताना
फक्त मला आरशात दिसे
आरसा हा तर खरे बोलतो
कशास त्याला टाळायाचे ?
आला क्षण तो गोड समजुनी
जीवन पुस्तक चाळायाचे
आज कुणी मज म्हणता काकू
मीच मनाशी हसते रे
किती थापले लेप मुखावर
जग काही का फसते रे ?
वाढू दे वय खुशाल देवा
मनास ठेवी सदा तरुण
परावलंबी करू नको अन
कधी नको रे करू करुण
चार अवस्था मानवजन्मी
कुणालाच नाही चुकल्या
चला दाखवा ऐश्या व्यक्ती
तारुण्याला नाही मुकल्या !!!!
