STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Others

4  

Ganesh G Shivlad

Others

अरे श्रावणा.. तू येशील ना..

अरे श्रावणा.. तू येशील ना..

2 mins
146

वैशाख वणवा भडकला होता.. 

धरणी आईवर पेटून..

काळी झाली भाजून भाजून.. 

गेली ती माय करपून..

काळे घन आषाढाचे.. 

आले होते गर्द ओथंबून..

अन् नुसतीच आशा लावून.. 

गेले निराशा देवून..

भेग पडली भुईला.. 

ती अजून बुजलीच नाही.. 

अजूनही ती होरपळते आहे.. 

तहान तिची भागलीच नाही..

अरे श्रावणा.. 

आता सारी मदार तुझ्यावरच रे..

तू घेशील का रे.. तिचं खुळ मन जाणून..

तू येशील का रे.. तिला भिजवायला.. 

सत्वर धावुन.. पाऊस घेवून..

पूर्वीसारखाच रिमझिम..


अरे सख्या श्रावणा..

पाऊस म्हणजे कोण रे..?

पाऊस म्हणजे जीवन.. पाऊस म्हणजे तूच की रे..

तूच तर आणतोस.. पाऊस पाण्याला.. 

विजेच्या चमकणाऱ्या.. आतिषबाजीत सजवून..

त्यांच्याच कडकडणाऱ्या ढोलताशात.. 

नाचत नाचत धरणीवर.. पालखीत बसवून..

जसा तो श्रावण बाळ.. काशीला नेत होता..

त्याच्या मायबापाला.. कावडीत बसवून..

पण त्याला तर राजा दशरथाचा बाण लागला..

अन् तो गेला.. जिवानिशी सोडून..

तसा बाण तुला तर.. नाही ना लागला..?

होय श्रावणा.. 

तुला बाण लागलाय.. आम्हा मानवांचा..

आणि त्यामुळेच तू हल्ली बरसत नाहीस..

बरोबर ना..

पूर्वीसारखाच रिमझिम..


पूर्वी तू यायचास.. 

काळया आईला न्हाहू माखू घालायचास..

तिला हिरव्या शालूचा आहेर आणायचास.. 

तिची ओटी भरायचास.. 

मग ती धरणीमाय तुझ्या प्रेमाने अंकुरायची..

फुलायची.. बहरायची.. नवा साज चढवायची.. 

नव लेण मिरवायची.. नवरीसारख नटायची..

पूर्वी तू.. रिमझिम धारा घेऊन यायचास..

त्या धारा.. झाडांवेलीवर फुलांपानांवर ओतायचास..

पण ती झाडे वेली आता राहिलीच नाहीत..

आम्ही झाडांची जंगले नष्ट केली..

अन् सिमेंटची उभारली..

वेलींच्या सावल्या उध्वस्त केल्या.. 

अन् पत्र्याच्या उभारल्या..

तर मग तु तरी कुठे बरसणार.. 

पूर्वीसारखाच रिमझिम..


अरे श्रावणा..

यामुळेच तर.. तू खुप बदलला आहेस..

पूर्वीसारखा रिमझिम पडत नाहीस..

कुठे कमी तर कुठे जास्त..

कुठे कुठे तर मुळीच नाही तू जात..

आठवणी आहेत अजुन ताज्या..

बाईंनी गुरुजींनी खुप जीव लावून..

शिकवल्या श्रावण कविता.. शाळेत माझ्या..

द रेनी डेज कम्स अगैन..श्रावण मासी हर्ष मानसी..

या ओळी आता पुस्तकातच भिजून गेल्यात..

रेडिओवर सुद्धा तू स्पेशल असायचास तेंव्हा..

श्रावणात घन निळा बरसला..रिमझिम गिरे सावन..

हे सुध्दा हल्ली क्वचितच ऐकू येत.. तुझ्यासारख..

पण श्रावणा.. तू जर असाच बरसला नाहीस..

तर हिरवळ कोठे दाठणार.. 

त्यावर रंगीत रंगीत फुलपाखरे कुठून येणार.. 

लहान मुले कशी बागडणार..

अन् रान पाखर कसे गाणार.. 

जर तू नाहीच बरसला..

पूर्वीसारखाच रिमझिम..


रिमझिम पाऊस कोणाला नाही आवडत..?

आहे कोणी..? कोणीच नाही..

पण माझी मुलगी कालच विचारत होती..

बाबा.. हे रिमझिम काय असते..?

आता काय सांगू तिला? तूच सांग..

पण हल्ली तूच येणं.. बंद झाल्यात जमा आहे..

म्हणूनच लहान मुलांना माहितच नाही..

रिमझिम पाऊस..

आणि अजुन एक..

माझ्यासारख्या सामान्य नवोदित कवीने.. 

जायचे तरी कुठे..

आम्हाला तुझ्या वर कविता कशा सुचणार..

आणि मग त्यांच्या ओठांवर असेच शब्द येणार..

तू येशील ना परत.. 

पूर्वीसारखाच रिमझिम..


पण श्रावण राया.. 

आम्ही आता भानावर आलोय..

पुन्हा नव्याने जागे झालोय..

आता आम्ही झाडे लावणारच.. 

जोपासणार.. त्यांना मोठही करणार.. 

तुझ्यासाठी.. फक्त तुला मनसोक्त बरसण्यासाठी.. 

तू बरसलास तरच.. या कवींचे शब्दही बरसतील.. 

अरे श्रावणा.. तू येशील ना.. परत तसाच.. 

पूर्वीसारखाच.. रिमझिम..


Rate this content
Log in