Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dattaprasad Satao

Drama Inspirational Tragedy

4.9  

Dattaprasad Satao

Drama Inspirational Tragedy

अपघात - एक प्रेरणा

अपघात - एक प्रेरणा

14 mins
2.1K


आयुष्यात घडणारा कुठलाही अपघात एक दुःखद घटना समजून आयुष्य जगणे कितपत योग्य? अपघातात तुमचे आयुष्य थांबवण्याची सुद्धा ताकद आहे आणि तुमचे आयुष्य उत्स्फूर्तपणे जगवण्याची सुद्धा ताकद आहे. दुःखद घटनेची दुसरी बाजू बघितली तर अपघात तुमच्यासाठी नक्कीच एक प्रेरणा ठरू शकतो.

            क्रिकेट टुर्नामेंट फायनल मॅच सुरू होती. आमच्या संघाला ६ चेंडूत १४ धावांची गरज होती. बॅट माझ्या हातात होती. सर्व प्रेक्षक आणि आमचा संघ अशी सर्वांची नजर माझ्यावर होती. आणि मलाही माझ्या संघाला विजय मिळवून द्यायचा होता. उरलेल्या ६ चेंडूपैकी पहिला चेंडू टाकण्यास बॉलर तयार होता आणि मी तो खेळण्यास. पहिला चेंडू पडला, मी मारला. बॉल सीमारेषेपर्यंत पोहचला पण एका खेळाडूने उत्तम क्षेत्ररक्षण केले. ३ धावा घेण्याचा विचार होता, परंतु दुसरी धाव घेताना दुसऱ्या बॅट्समन ची माझ्यासोबत धडक झाली. त्याची बॅट माझ्या तोंडाला लागली. आम्ही दोघेही पडलो. कसेतरी उठून आम्ही दुसरी धाव पूर्ण केली. माझ्या संघातील काही खेळाडू लगेच माझ्याजवळ पाणी घेऊन आले. माझ्या हनुवटीला लागले असल्याचे माझ्या मित्राने मला सांगितले. माझ्या हनुवटीतून रक्त निघत होते. मी लगेच रुमाल काढून हनुवटीला लावला. रुमाल खाली घेऊन बघतो तर काय, त्यावर रक्ताने मस्त दिल निघाला होता. माझे मित्र मला चिडवायला लागले आणि माझ्या चेहऱ्यावर लगेच हसू आले. आमच्या संघाचा कर्णधार माझ्यासमोर उभा राहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मला प्रोत्साहित करण्यासाठी म्हणाला,

 " कर्तव्य, तू आणि फक्त तूच आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतोस. तुला ही मॅच काढावीच लागेल. तुला तुझ्या प्रेमाची शपथ!" 

एवढे बोलून आमचा कर्णधार निघून गेला. माझा आत्मविश्वास वाढला होता, आणि माझ्यावर ठेवलेल्या विश्वासावर मी खरा उतरलो. मी १ चेंडू बाकी ठेऊन मॅच जिंकून दिली. आमचा सर्व संघ माझ्याकडे धावत आला. मला उचलले आणि आनंद साजरा करत होते. कर्णधाराने माझे कौतुक केले आणि सर्वांना हॉटेल वर जेवणासाठी आमंत्रण दिले. आम्ही सर्वजण खुपच आनंदीत होतो.

            संध्याकाळी बाहेर जेवायला जाणारच, त्याआधी मला एक फोन आला. ज्या व्यक्तीच्या प्रेमाची निशाणी म्हणून, जो रक्ताचा दिल माझ्या रुमालावर पडला होता...ज्या व्यक्तीच्या प्रेमाची शपथ मला मॅच मध्ये मिळाली होती, त्या व्यक्तीचा तो फोन होता. मी तिला ही मॅच कशी मजेदार झाली ती सर्व गोष्ट आनंदाने सांगितली. मी पुढे तिला म्हणालो, "तुझ्या शपथ मध्ये किती ताकद आहे बघ...बघ मी तुझ्यावर किती प्रेम करतो." त्यावर ती मला म्हणाली, 

"तुझे माझ्यावर किती प्रेम आहे दिसतेच आहे. म्हणूनच इंजिनिअर होऊन आज तुला दोन वर्ष झालीत तरीही तुला जॉब नाही. तुला मी हवी असती तर तू काहीतरी पैसे कमवले असतेस. पण तुला मी नाही ते क्रिकेट आवडीचे आहे. मी म्हणालो, 

"अगं, अशी रागावू नकोस. मी किती खुश आहे आता ते तर बघ. आम्ही टुर्नामेंट जिंकलो." ती पुन्हा भडकली आणि आता मात्र तिचा राग अनावर झाला होता. म्हणाली, "तुला अजूनही त्या क्रिकेटच च पडलं आहे ना. ठीक आहे तू खेळ क्रिकेटच. कोणीतरी जॉब वाला येईल आणि मला घेऊन जाईल." मी लगेच उत्तरलो, "असा कसा नेईल कोणी तुला माझ्यापासून दूर. आणि तेही मी तुझ्यावर इतके प्रेम करत असताना?" तिच्यावर माझे प्रेम असल्याचे मी सांगण्याचे खुप प्रयत्न करत होतो. पण ती ऐकून घ्यायला तयारच नव्हती, "मला माहिती आहे, तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. मला तुझ्याशीच लग्न करायचे होते." मी म्हणालो, "होते म्हणजे? आता करायचे नाही का? तुझे प्रेम नाही का माझ्यावर?" ती उत्तरली, "नाही माझे प्रेम तुझ्यावर, तुझ्याशी लग्न करण्याची माझी इच्छा नाही आता. पण तुला माझ्या मनातील एक गोष्ट सांगायची आहे. जी आज पर्यंत मी तुला नाही सांगू शकली." मी विचारात पडलो की असे काय असेल जे ४ वर्षात ही आपल्याला सांगू शकली नाही.


आता तिचे मनातील बोलणे सुरू झाले. लपलेल्या सगळ्या गोष्टी उघडकीस होऊ लागल्या. "मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण माझ्या आयुष्यात एक व्यक्ती अशी आहे जी माझ्यावर खूप प्रेम करते. त्याने माझ्यासाठी स्वतःच्या ध्येयाचा त्याग केला आणि लवकर जॉब शोधला. तो आता महिन्याला ४५०००/- कमावतो. आणि तू बघ अजून कशातच काही नाहीस. तू स्वतः पैसे कमावून तुझेच शोक पूर्ण नाही करू शकत. अरे शोक दूरच, तू तुझ्या गरजा सुद्धा पूर्ण नाही करू शकत. तर तू माझ्या गरजा आणि माझे शोक कसे पूर्ण करशील? जा, मला नाही करायचे तुझ्याशी लग्न. आणि यानंतर माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करू नकोस." तिने फोन ठेवला. मला धक्काच बसला. पायाखालची जमीनच सरकली. मी खुप रडलो. आतापर्यंतची तिची प्रत्येक गोष्ट मला खेळ वाटायला लागली. मला माझाच राग यायला लागला. तेवढ्यात मित्र आला, आणि जेवायला चल म्हणाला. मी त्याला नाराज दिसलो. त्याने मला तिथे तर काही विचारले नाही, पण जबरदस्तीने उठवून नेले आणि रस्त्याने जातांना एका ठिकाणी गाडी थांबवून मला विचारू लागला. मी त्याला सर्व काही सांगितले. तो सुद्धा काही वेळासाठी दुःखी झाला. पण त्याने माझी समजूत काढली आणि मला जेवायला नेले. जातांना एवढे म्हणाला की आता बाकी मित्रांना नको माहिती पडू देऊस. चेहरा जरा नीट आणि हसरा ठेव. मी ठीक आहे म्हणालो. आम्ही जेवायला गेलो. मी मॅच जिंकून दिल्यामुळे सर्व मित्र माझे कौतुक करत होते. परंतु मी मात्र माझ्या वेगळ्याच दुनियेत होतो. मी कसेतरी स्वतःला सांभाळले. आणि आम्ही जेवण आटपून सर्वजण आपापल्या घरी आलो. आज मला झोप लागणे कठीण होते. मीच मला टोकत होतो. खरंच मी काहीच पैसे कमवत नाही, मी आजपर्यंत खरंच काय केले. असे विचार मनात यायला लागले होते. आणि तिनेही माझ्यावर पैश्यासाठी च प्रेम केले असणार का, अश्या बऱ्याच प्रश्नांनी मी त्रस्त होतो. माझी रात्र रडण्यातच गेली.

          बरेच दिवस उलटून गेलीत. मी आता स्वतःला दुसऱ्याच्या नाही पण स्वतःच्या लायकीचा बनविण्याचा निर्णय घेतला होता. मी आता अभ्यास करायला लागलो होतो. मित्र आणि क्रिकेट बाजूला ठेवले होते. मी कॉम्प्युटर इंजिनिअर असल्यामुळे मी माझ्या क्षेत्रातील अभ्यास सुरू केला. इंजिनीयरिंग च तर कशीतरी पूर्ण केली होती म्हणून सुरवातीला मला खूप त्रास झाला. पण आता मी सर्व प्रकारचा त्रास सहन करण्याचा निर्णय घेतला होता. मी थोडे थोडे शिकत गेलो. बऱ्याच कंपनी मध्ये मुलाखती दिल्या. पण माझी निवड होत नव्हती. परंतु आता कुठलेच अपयश मला थांबवू शकणार नाही असा माझा ध्यास होता. मी प्रयत्न सुरू ठेवले. खूप छोट्या छोट्या गोष्टी पासून अभ्यास सुरू केला. मित्रमंडळी माझ्यापासून लांब झाले होते. मी मात्र माझ्या धेयाप्रती खंबीर होतो. परत एक वर्षानंतर मी कंपनी मध्ये मुलाखती साठी गेलो. आज मला थोडे यश आले होते. महिन्याला ६०००/- रुपये मिळतील असे म्हणाले. मी मान्य केले. माझे खोलीभाडे आणि खानावळ यातच ४०००/- रुपये खर्च होऊ लागले. मी विचार केला माझ्यात आणि ४५०००/- रुपये कमावणाऱ्यात काय फरक असेल? असे काय असेल जे त्याला जमतंय पण मला नाही. मी आता तो अभ्यास सुरू केला. भरपूर अभ्यास. माझ्या टीम मधील हुशार व्यक्तींकडून मी ते सर्व शिकायला लागलो. मला जमायला लागलं. काही महिन्या नंतर मी पुन्हा मुलाकात द्यायचे ठरवले. त्यात माझा पगार २२०००/- रुपये प्रति महिन्यावर पोहचला. मी थोडा खुश होतो. माझ्यासोबत आई बाबा सुद्धा खूप खुश होते. मी चांगल्या मार्गावर लागल्याचे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर होते.

           असेच एके दिवशी माझ्या मित्राला माझ्याबद्दल माहिती झाले, जो इंजिनिअरिंग मध्ये माझ्यासोबत होता. त्याचे नाव कुणाल. त्याची बदली पुण्याला आमच्या परिसरातच झाली होती. त्याला माझ्या खोलीमध्ये राहायला यायचे होते. मी होकार दिला. कुणाल खूप हुशार होता. त्याला पगारही माझ्यापेक्षा भरपूर जास्त होता. काही महिने उलटुन गेली. एके दिवशी तो संध्याकाळी लॅपटॉप वर काम करत होता. त्याच्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाले होते, तो ते सोडवण्याचा प्रयत्न करत होता. पण तो त्या प्रॉब्लेम ला घेऊन खूप त्रस्त होता. जेवणासाठी आवाज दिला असता चक्क नाही म्हणाला. मी उठलो, त्याच्या बाजूने जाऊन बसलो. प्रॉब्लेम समजवून घेतला. त्याचा फोन वाजला. तो उठून गेला. काही वेळा नंतर आत आला. मी त्याला म्हणालो आता तू जेवला नाहीस तर मी सुद्धा जेवणार नाही. तो जेवायला बसला. आमची जेवणं झाली. आज त्याचा डब्बा धुवायला मी घेतला. आणि त्याला म्हणालो, जा बाबा तू कर तुझे काम. तो कसातरी चेहरा करून लॅपटॉप जवळ गेला. मी त्याच्याकडे बघतच होतो. लॅपटॉप कडे बघितल्या बरोबर त्याच्या चेहऱ्यावर हसू आले आणि तो आच्छर्यचकित झाला. मला म्हणाला हा प्रॉब्लेम तू कसा दूर करू शकला? मी हसलो आणि म्हणालो, अरे एवढे काय कठीण होते त्यात. झाला ना प्रॉब्लेम दूर, चल झोप आता शांत. तो थांबला नाही, पुढे म्हणाला, तुला ह्या गोष्टी जमू शकतात तर तुला सारेच काही जमू शकते. त्याने माझ्यासमोर एक ऑफर ठेवली. जर तू हो म्हणत असणार तर मी आजच हा जॉब सोडायला तयार आहे आणि तुझ्यासोबत नविन कंपनी उभी करू शकतो. मी सुद्धा त्याच्या गोष्टींकडे वेगळ्याच नजरेने बघू लागलो. तो म्हणाला, की हे लोकं जेवढा पगार आपल्याला देतात तेवढा पगार आपण लोकांना देऊ शकतो. रात्रभर तो मला सर्वकाही सांगत बसला. मग मी सुद्धा काहीतरी नवीन करण्याचा विचार केला. कारण मला एवढ्यावरच थांबायचे नव्हते. आम्ही दोघांनी तो महिना पूर्ण होऊ दिला आणि दोघांनी जॉब सोडला.

            नवीन कंपनीचे काम सुरू झाले. आम्ही बाहेरचे प्रोजेक्ट शोधू लागलो. पण आम्हाला कोणीच प्रोजेक्ट देत नव्हते. कोणीच आमच्यावर विश्वास ठेवत नव्हते. आम्ही फक्त प्रोजेक्ट च्याच शोधात होतो. काही महिने उलटुन गेली होती. आमचे पैसे सुद्धा संपत आले होते. काय करू सुचत नव्हते. पण यश आमच्यासाठी अशक्य नव्हते. बऱ्याच प्रयत्नानंतर आम्हाला एक छोटासा प्रोजेक्ट मिळाला. आम्हाला यशाचा मार्ग दिसला. आम्ही दोघांनी त्यावर काम सुरू केले. आमचे काम पाहून त्याच व्यक्तीकडून आम्हाला दुसरा प्रोजेक्ट मिळाला. आमचे काम वाढू लागले. आम्हाला देशाबाहेरील प्रोजेक्ट्स मिळायला लागले. आम्ही दोन वर्ष खोलीवरूनच काम केले. नवीन ऑफिस घेऊन लोकं कामावर ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला. १५ जून ला कंपनीचे उद्घाटन होणार होते. ठिकाण, कंपनीचे नाव, पैसा अश्या सर्व गोष्टी ठरवून झाल्या होत्या. उद्घाटन म्हणजेच आमच्या नवीन आयुष्याचे दार उघडणे आता फक्त १५ दिवसांवर होते, आणि.. आज १ जून ला हायवे वर माझा अपघात झाला आणि मी बेशुद्ध झालो. मी खोलीवर पोहचलो नाही म्हणून कुणाल ने मला फोन लावला. फोन कुणीतरी उचलला आणि माझ्या अपघाताबद्दल सांगितले. बातमी ऐकताच क्षणी तो हादरून गेला. लगेच दवाखान्यात आला. मला बेड वर बघून तो खूपच घाबरला, कारण अपघात खूप मोठा होता आणि ते माझ्या अवस्थेवरून दिसत होते. मला शुद्ध येत नव्हती. डॉक्टर म्हणाले, शुद्धीवर यायला वेळ लागू शकतो. कुणाल जास्तच घाबरु लागला. आई बाबा आणि माझे इतर मित्र तिथे पोहचले. सर्व फक्त एकच काम करत होते, ते म्हणजे रडण्याचे. पण आई बाबांना रडतांना पाहून माझ्या मित्रांनी स्वतःचे रडणे बाजूला ठेवले. आणि माझ्या आई बाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. आई बाबा काही वेळा नंतर थोडे शांत झाले.

      बऱ्याच तासानंतर माझे डोळे उघडले. माझे उघडलेले डोळे बघून आई बाबा खुप रडायला लागले. मित्रांनी आई बाबाला सांभाळले. मला रूम मध्ये नेण्यात आले. मी माझ्या बेडच्या बाजुच्या बेडवर बघतो तर काय, माझा मित्र कुणाल तिथे पडलेला. मी घाबरलो. मित्रांना विचारले असता कुणी काहीच सांगायला तयार नव्हते.

       काही दिवस उलटून गेलीत. कुणालला लवकर सुट्टी झाली. माझा पाय तुटलेला असल्यामुळे मला काही दिवस उशिरा सुट्टी झाली. मला पाहायला आलेल्या लोकांना आई बाबा माझ्या लपून गोष्टी सांगत होते. त्या २८ दिवसानंतर मी थोडे बोलायला लागलो. मी आई ला एक दिवस अट मांडली की मला पूर्ण गोष्टी आणि खरोखर नाही सांगितल्यास तर मी जेवणार नाही. आई रडायला लागली आणि तिथून निघून गेली. मी न जेवणाचा हट्ट धरल्यामुळे आई ने माझ्या एका मित्राला मला सर्व काही सांगण्याची परवानगी दिली.

       तो म्हणाला, "कर्तव्य, तुझा फक्त पायच तुटलेला नव्हता. अपघातात तुझ्या दोन्ही किडन्या गेल्या होत्या. डॉक्टर ने तुझे वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत असे सांगितले. अश्या वेळी कर्तव्य तुझा प्रत्येक मित्र तुझ्यासाठी समोर आला, आणि म्हणाला, डॉक्टरसाहेब माझी किडनी घ्या पण माझ्या मित्राला वाचवा. सर्व हॉस्पिटल शांत झाले होते. डॉक्टर विचारात पडले होते आणि आई बाबा त्याहून. पण तुझ्या आई बाबांनी आम्हा कुणालाच होकार दिला नाही. तेवढ्यात मागून आवाज आला, डॉक्टरसाहेब मी देणार माझी किडनी. आणि तो आवाज होता तुझा कंपनी पार्टनर कुणालचा. आई बाबांचे हाल पाहण्यासारखे नव्हते. आई बाबा नाही म्हणाले असता कुणालच्या आई बाबांनी कर्तव्य आमचा दुसरा मुलगा असल्याचे म्हटले. आणि कर्तव्य तुला किडनी दिली. बस एवढेच घडले. एवढे ऐकून आता मला फार त्रास व्हायला लागला होता. मी कुणालकडे बघून रडणार म्हणून कुणाल माझ्यासमोर येत नव्हता.

         आई बाबा माझ्या जवळ आले आणि मी त्यांच्याकडे बघून हास्य दिले. आई बाबा दोघेही रडत होते पण मी मात्र हसतच राहिलो. तोंडाला मार लागला आहे हे माहिती झाले असता माझे तोंडाचे ऑपरेशन झाले. माझे तोंड २८ दिवसांसाठी बंद असणार, अन्नाचा कण पोटात नसणार, फक्त लिक्विड वर माझे जीवन असणार असे डॉक्टर म्हणाले. त्यामुळे आई बाबा जास्तच रडायला लागले होते.

         मला बोलताही येत नव्हते म्हणून आई-बाबा नेहमी रडायचे. पण माझे सर्व मित्र आई बाबांना खूप धीर देत होते. मी त्यांना जिवंत दिसतोय हेच त्यांच्यासाठी खूप मोठे आहे असे ते त्यांना समजावत होते. माझा पुनर्जन्म झाला होता. माझ्या मित्रांची धावपळ बघून मला रडायला यायचे. पण मी ते सुद्धा अश्रू डोळ्यात येऊ दिले नाहीत. पायाला आणि तोंडाला होत असलेला त्रास सहन होत नव्हता म्हणून माझी डोक्याखालची उशी रात्रीला माझ्या आसवांनी ओली व्हायची. हाताला बराच मार लागला असल्यामुळे पहिले दहा दिवस मोबाईल उचलण्याची सुद्धा ताकद हातात नव्हती. काही दिवसांनी थोडे बरे वाटले. हाताच्या जखमा भरून निघत होत्या. मोबाईल उचलण्याइतकी ताकद आली. मित्रांबद्दल काहीतरी लिहिण्याची इच्छा झाली.

*...मित्र - माझे श्वास...*

मित्र साले मित्र लाभले,

मित्रासाठी तर हे देवाशीही भांडले.

भांडण जिंकून मला मृत्यूच्या दारातून खेचून आणले,

साल्यांनी परत हे आयुष्य जगायलाच लावले.

स्वतः त्यांच्याकडे नसतांना यांनी कुठून आणला,

अरे माझ्या आई बाबांना यांनी धीर कुठून दिला.

माझी ही अवस्था बघून स्वतः साल्यांनी अश्रु लपवले,

पण काही झालेच नाही असे दाखवून मला मात्र हसायला लावले.

मित्र साले मित्र आहेत,

नवीन दिलेल्या जन्माचा हे आता श्वास आहेत.


           काही महिने उलटुन गेली. मी कुणाल ला म्हणालो, तू कंपनी चे उद्घाटन कर आणि कंपनी सुरू कर. कुणाल मला नाही म्हणाला. कंपनी आपण दोघांनी सुरू केली आहे, प्रत्येक क्षणाला आपण सोबत असणार, असे तो म्हणाला. मला घरी आणले. तो मात्र रूम वरूनच काम करत होता.

           मला बरेच लोकं आणि माझे मित्र भेटायला येऊन गेलेत. माझ्या बऱ्याच मित्रांना माझ्याबद्दल माहिती होते. मी अभ्यास का केला, पैसे कमावण्याचा निर्णय का घेतला, मी घर का सोडले होते हे देखील त्यांना चांगलेच माहिती होते. पण माझ्या वाट्याला अडथळा आला होता. माझा अपघात सुद्धा जीवनाच्या नवीन वळणावर झाला होता. सर्व मित्र माझी समजूत काढत होते. मला धीर होते. एके दिवशी माझी एक मैत्रीण मला घरी भेटायला आली. कॉलेज मैत्रीण. तिला माझ्या अपघाता बद्दल माहिती झाले तेव्हा ती लगेच मला भेटायला आली. मी तिला पाहून आश्चर्यचकित झालो. विधी तिचे नाव. बेड वर उठून बसण्याचा मी प्रयत्न केला पण तीने लगेच मला थांबवले आणि माझ्या जवळ येऊन बसली. बरेच काही बोलत बसली. माझे दुःख कमी व्हावे म्हणून आपले दुःख लपवून कॉलेज मधील जुन्या गोष्टी सांगत बसली. मी एवढा तुटल्यावरही ती मला सावरण्याचा प्रयत्न करत होती. कॉलेज मधील माझ्याच कविता मला ऐकवत होती, ज्या तिने खुप सांभाळून ठेवल्या होत्या. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी पूर्णपणे मनाने तुटल्याचं तिला जाणवत होतं. त्यावर तिने प्रवासात माझ्यासाठी लिहिलेली कविता मला ऐकवली.

-: इश्वरी इंसान :-

उगते हुए सूरज की कोमल किरणे तो देख।

साथ ही खुले आसमान में उड़ते पंछियोकि ख़ुशी तो देख।

ना डर है उन्हें पंख टूटने का,

ना ही डर है उन्हें निचे गिरने का,

ऐ इंसान, उनका बुलंद आत्मविश्वास तो देख।

कल गिरा था तू,

आज भी गिरेगा।

आने वाले कल तु दौड़ने के सपने तो देख,

एक बार, बस एक बार तु उठकर तो देख।

तु शब्द है, तु कविता है,

तु पाठ है, तु कहानी है।

अपने अंदर छुपे हुए शक्ति से मिलकर तो देख,

अपनी जिंदगी को एक बार तु लिखकर तो देख।

क्यों कहता है, मेरे जिंदगी में अँधेरा है,

कोशिश की एक मिसाल जलाकर तो देख।

छुपी है जो रोशनी ईश्वर के रूप में,

एक बार अपने अंदर अच्छेसे झांक के तो देख।

         आणि समोर म्हणाली, "जेव्हा मला जगणे नकोसे व्हायचे तेव्हा मी तुझ्या कविता वाचायची. मला तुझ्या कवितेतून प्रेरणा मिळायची. मला माहिती आहे, माझी कविता तुझ्या इतकी प्रेरणा देणारी नाही. परंतु हा माझा छोटासा प्रयत्न!" मी काही क्षणासाठी निःशब्द झालो. माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी आले. पण तिने मात्र स्वतःचे अश्रू लपवूनच ठेवले होते. परत जाण्याआधी ती मला म्हणाली, "तुझ्या प्रत्येक कवितेतून आणि तुझ्या वागण्यातून मला प्रेरणा मिळायची. आता तू खचून जाऊ नकोस. मला तुझे प्रेरणेचे रूप पुन्हा पाहायचे आहे. मला माहिती आहे, आणखी काही महिने तू बेडवरून उठू शकणार नाहीस. पण तुझ्याकडे एक अशी शक्ती आहे जी तुला सर्व काही देऊ शकते. तुझा वेळ वाया गेला आणि तू काहीच करू शकला नाहीस, असे तुला वाटणार नाही. ते म्हणजे तुझी 'लिहिण्याची कला'. कर्तव्य तू छान लेखक आहेस. तुला लिहावे लागणार. आणि तुझ्यासाठी Storymirror या संकेस्थळावर एक स्पर्धा आहे. त्यात तुला सहभागी व्हायचे आहे. मी जातांना तुला एवढेच सांगून जाईल, की तू हरला नाहीस. तू तुझी कंपनी तर मोठी करणारच आहेस. परंतु तुझा हा अपघात तुला वेगळे काही देऊन जाईल. तुझा हा अपघात माझ्यासाठी प्रेरणा बनेल. कर्तव्य तू लिहत रहा. तु मोठा लेखक झालेला मला पाहायचे आहे." एवढे बोलून ती भेट घेऊन निघून गेली.

          मी विचारातच पडलो. कॉलेज टायमिंग मधील माझ्यातील लेखक तिने जागृत केला होता. मी लिहायला सुरुवात केली. आजूबाजूच्या घडलेल्या काही गोष्टी लक्षात घेऊन मी कथा लिहिली. कथेचे नाव होते, 'प्रेम - एक गुंतवणूक'. माझी कथा पूर्ण झाली. मी ती कथा विधीला पाठवली. ती खूप खुश झाली आणि तिने मला ही कथा Storymirror या संकेस्थळावर अपलोड करायला सांगितली. मला स्पर्धेत जिंकण्याची अपेक्षा नव्हती. मला फक्त विधीसाठी कथा लिहायची होती. काही दिवसांनी निकाल लागला. माझ्या कथेची निवड झाली आणि Storymirror ने मला एक लेखक बनविले. वाचकांपर्यंत पोहोचणं माझ्यासाठी अवघडच होतं, परंतु Storymirror ने मला त्या योग्य समजून एका लेखकाची पदवी दिली. मी त्यांचे खूप आभारही मानले. आता सर्व लोक माझ्याकडे एक लेखक म्हणून बघू लागले. हे फक्त विधीमुळे शक्य झाले. माझा अपघात एक प्रेरणा ठरला.

          माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे Storymirror वर अपलोड केलेली माझी ' प्रेम - एक गुंतवणूक ' ही कथा मुंबई च्या एका फिल्म प्रोडूसर ने वाचली. आणि मला डायलॉग राईटर ची ऑफर दिली. त्यासाठी सुद्धा मी Storymirror चे आभार मानले.

          काही दिवसांनी मी पूर्णतः बरा झालो. कुणाल माझी वाट बघतच होता. आई बाबांकडून परवानगी घेऊन मी आणि कुणाल ने कंपनी स्थापन केली. आम्हाला प्रोजेक्ट्स मिळू लागले. आम्ही लोकांना जॉब देऊ लागलो. काही लोक इतर कंपनी सोडून आमच्या कंपनी मध्ये यायला लागले. सर्व काही मस्त सुरू झाले. आमची कंपनी आता मोठी व्हायला लागली. माझ्या सर्व मित्र मंडळी मध्ये माझी चर्चा होऊ लागली.

          एक दिवस मला एका व्यक्तीचा फोन आला.म्हणाली, "कर्तव्य, मी चुकली. मला माफ कर. मी तुला फार कमी लेखलं होते. मी तुझी लायकी काढून तुला काहीही बोलली होती. मला माफ कर. मी आजही तुझी व्हायला तयार आहे." तो फोन माझी पहिली प्रेयसी अवनी चा होता, ज्या मुलीवर मी खूप प्रेम करत होतो. मी कमवत नाही म्हणून जी मला सोडून गेली होती. आज ती माझ्याकडे परत आली होती. याचे एक कारण म्हणजे मी आज कमवत होतो आणि दुसरे कारण म्हणजे तिचा तो प्रियकर त्याची पहिली कंपनी सोडून माझ्या कंपनी मध्ये जॉईन झाला होता. ४५०००/- च्या जागी, आता ७००००/- कमवायला लागला होता. पण तरीही अवनी माझ्याकडे आली होती, कारण तिच्या प्रियकराला एवढा पगार मिळणाऱ्या कंपनीचा मी 'मालक' होतो. मी फोन ठेवला आणि थोडा वेळ घेऊन तिला एक मेसेज पाठविला,

... स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ...

व्हावी फक्त माझी तू

यासाठी आता नडणार नाही

नको मांडूस पुरावे माझी असल्याचे

पाहायला ते आता मी असणार नाही


हवं असलेलं प्रेम मिळाल्याने

एकटं तुला वाटणार नाही

नको असलेलं माझं प्रेम

मनात तुझ्या आता दाटणार नाही


नको फिरुस एकटी आता, थांब जरा

या जगी मी शोधून सापडणार नाही

एकटं सोडून जगाला, आठवणीत माझ्या रडायला

आता तुलाही परवडणार नाही


आधी गम्मतच म्हणायची

तुझ्याशिवाय माझं भागणार नाही

आता मात्र आठवू नको मला

कारण मला आता उचकिही लागणार नाही


आयुष्यात तुझ्या विघ्न टाकायला

पुनर्जन्म मी घेणार नाही

आज देतोय ' स्वातंत्र्य ' तुला

पुढे त्रास माझा होणार नाही


नको जपू नाव माझे

हाक कानापर्यंत पोहचणार नाही

नको रडुस ग अवनी आता

पुसायला अश्रु तुझे, हात माझे उठणार नाहीत


         एवढे बोलून मी तिला नकार दिला. आणि माझ्या आयुष्याकडे एक मोठी स्माईल देऊन बघू लागलो. आज मलाच माझा अभिमान वाटत होता. लेखक म्हणून थोडे संपर्क वाढले होते. परत एका ' राजदंड ' स्पर्धेत सहभागी झालो. त्यात माझ्या ह्या वरील कवितेची निवड दिवाळी विशेषांक २०१९ मध्ये झाली. मी आज कवी सुद्धा झालो.

         मी आज माझ्या आयुष्याकडे बघून स्वतःला सांगू लागलो, "चुकीच्या व्यक्तीवर झालेले प्रेम आणि गाडीवरून पडणे, हे दोन्ही अपघात मला प्रेरणाच देऊन गेले. पहिल्या अपघाताने पैसा कमवायला शिकवले आणि दुसऱ्या अपघाताने मान-सन्मान मिळवायला शिकवले."

म्हणून माझ्यासाठी "अपघात - एक प्रेरणा" आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama