Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pradnya Labade-Bhawar

Crime

4.3  

Pradnya Labade-Bhawar

Crime

माझिया मना जरा थांब ना

माझिया मना जरा थांब ना

8 mins
1.0K


रोहन, फिल्म इंडस्ट्रीमध्ये कथा लेखक म्हणुन नाव कमावू पाहणारा नवखा तरूण. अत्यंत मेहनती, मनमिळाऊ. सध्या त्याने लिहिलेल्या एका कथेवर त्याचं काम चालू होतं. त्याच्या स्वभावामुळे तो सर्वांचा आवडता होता. मेकअपचे थरावर थर लावून वावरणाऱ्या सौंदर्यवतींच्या गराड्यात राहणारा तो खऱ्या सौंदर्यापासून अनभिज्ञ होता. रोहनची चुलत बहीण 'सुप्रिया' हिच्या लग्नासाठी गावी येण्याचा योग आला. नवीनच काम असल्यामुळे दोनच दिवस सुट्टी ॲडजेस्ट करून त्याने गावी यायचं ठरवलं.. त्याला येण्यासाठी रात्री बराच उशीर झाला होता .रोहनचे आई-बाबा तेथे अगोदरच बऱ्याच दिवसांपासून हजर होते. उशीर झाल्यामुळे त्याने पटकन जेवण आटोपलं व तेवढ्यात रोहनच्या काकूने त्याला झोपण्यासाठी अंथरून घातले. सवय नसल्याने रोहन रात्रभर जागत होता, त्यात एवढा मोठा वाडा. रोहन रात्रभर वाड्यात चकरा मारत होता. 


पहाट होत आली आणि त्याला हलकीशी झोप लागली. परंतु तेवढ्यात इतर जण उठले आणि त्यांच्या आवाजाने पुन्हा रोहनला जाग आली. आणि आता झोपणं शक्य नाही म्हणून तो लगेच उठला.  रेडिओवर आशा भोसले यांनी स्वरांकित केलेलं सुंदर गाणं सुरु होतं.

  

   माझिया मना जरा थांब ना 

   पाऊली तुझ्या माझिया खुणा 

   तुझे धावणे अन मला वेदना 


 पहाटेचा मंद प्रकाश, हवेतील गारवा आणि देवघरातील अगरबत्तीचा सुगंध त्या गाण्याची गोडी द्विगुणित करत होते.  तेवढ्यात त्याचं लक्ष अंगणात बहरलेला पारिजातकाकडे गेलं. पुर्ण अंगणात पारिजातकाचा सडा पडला होता. आणि तीथे फुले वेचणारी एक आकृती त्याला दिसते. लांबसडक काळेभोर केस, टपोरे डोळे, गुलाबाच्या पाकळीप्रमाणे ओठ, कमनीय बांधा, चेहऱ्यावर असणारा एक स्मित हास्य आणि गालावर पडणारी मनमोहक खळी. इतकं निखळ सौंदर्य आणि हे पवित्र वातावरण त्यांनी पहिल्यांदाच अनुभवलं होतं. रेडिओवर सुरू असणाऱ्या गाण्याप्रमाणे त्याचं मनही तिच्याकडे धावत होतं. जणू काही ते गाणं त्याच्यासाठीच चालू होतं. रोहन तसाच पावले टाकत तिच्या दिशेने चालू लागला. रोहन अगदी तिच्या जवळ आला. तेव्हा ती पाठमोरी झालेली होती. रोहन तिच्याशी बोलणार तेवढ्यात रोहनची आई त्याला आवाज देते.


 "रोहन, लवकर ये नाश्ता तयार आहे ."


 रोहन होकारार्थी मान हलवतो आणि पुन्हा मागे बघतो तर ती तिथून निघून गेलेली असते. रोहन जरा नाराज होतो.


 रोहन- " ओह! बॅड लक, चलो नेक्स्ट टाईम मिलेंगे"असं म्हणत तो मनाला समजावतो आणि तिथून निघतो. 


 संध्याकाळी संगीत कार्यक्रम असतो. त्यामुळे सगळे तयारीला लागतात. दिवसभर अनेक पाहुणे मंडळी येतात. कार्यक्रमाची तयारी, पाहुण्याच्या भेटीगाठी यात दिवस निघून जातो.

 

  संध्याकाळ होते. संपूर्ण वाडा नानाविध फुलांनी सजवलेला होता. त्याचबरोबर वाड्यात वेगवेगळे विद्युत रोषणाई केलेली होती. सनईचे सूर संपूर्ण वाड्यात पसरले होते .काही मुली अंगणामध्ये रांगोळी काढत होत्या. शेजारीच काही चिल्ली-पिल्ली मुले मोठमोठ्याने हसत-खेळत वाडाभर सैरभैर पळत होते. बायकांची आपण इतरांपेक्षा सरस दिसावं यासाठी लगबग चालू होती. सुप्रियाच्या मैत्रिणी तिची तयारी करत होत्या व त्यांची चेष्टा मस्करीही चालू होती. रोहनचे बाबा, काका व रोहन सर्वांच्या खाण्यापिण्याची सोय पाहत होते. परंतु त्यातही रोहनची नजर फक्त तिला शोधत होती. 


  सकाळची संध्याकाळ झाली होती परंतु दिवसभर ती त्याला दिसलेली नसते. तिला एक क्षण बघण्यासाठी रोहन व्याकूळ झालेला होता. परंतु बराच वेळ होऊनही ती दिसत नाही. शेवटी रोहन संगीत कार्यक्रम सुरू होणार असल्याने आवरायला रुममध्ये निघून जातो. काही वेळाने त्याच्या कानावर गाण्याचे सूर येतात.


  मेहेंदी रंगली ग गौर पुजली ग

  शुभ मुहूर्ताची सनई वाजली ग

  हिरव्या चुड्यात भरजरी शालूत

  गोड गोजिरी हि नवरी सजली ग


 तो बाहेर येतो. तर समोर काही मुली छान नृत्य करत असतात. आणि त्याचा चेहरा अचानक खुलतो. कारण समोर त्या मुलींमध्ये असते एक 'ती'.  सोनेरी रंगाची साडी नेसलेली, केसात पारिजातकाचा गजरा माळून मनमोहक नृत्य करत. रोहन संपूर्ण मांडव फिरत तिला न्याहळत असतो. अचानक सर्वकाही स्तब्ध झालं असं त्याला वाटू लागतं. सर्व जग थांबलं होतं. त्या दोघांसाठी. ती सुरेख नृत्य करत होती. आणि तो तिच्या भोवती फिरत होता. 


................................


सर्व काही स्तब्ध झालेलं होतं. रोहन डान्स करणाऱ्या तिच्याकडे पाहात होता. तेवढ्यात ती थांबते आणि दोघांची नजरानजर होते. 

गाणं सुरू होतं -


दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके 

सबको हो रही हैं खबर चुपकेचुपके 


आणि दोघे एकमेकात रंगुन जातात.


रोहन तिला नाव विचारणार असतो तोच त्याला कोणाचा तरी धक्का लागतो आणि तो खडबडून जातो. (रोहन हे सर्व आपल्या मनात रंगवत असतो.)  समोर मुलींचा डान्स संपुन दुसरा डान्स सुरु असतो . रोहन हलकेच स्वतःच्या कपाळावर मारतो आणि मनातच गोड हसतो. आणि पुन्हा त्याची नजर तिला शोधू लागते. ती घाईघाईने कुठेतरी चाललेली असते. घाबरलेली ,भेदरलेली ती साडी सावरत कशीतरी वाड्याबाहेर पडते. रोहन आश्चर्यचकित होतो. तिला अचानक काय झाले असावे त्याला कळतच नाही. तो ही तीच्या मागे जातो. ती भरभर पावले टाकत चाललेली असते आणि रोहन तिच्या मागे असतो. अचानक ती दिसेनासी होते. रोहन बराचवेळ तीचा शोध घेतो. परंतु ती त्याला कुठेही दिसत नाही. रोहन घरी येतो तोपर्यंत कार्यक्रमही संपलेला असतो. तो तसाच पारीजातकाकडे पाहत बसून राहतो. 

 

सकाळ होते. रोहनला रात्रभर तिच्या विचारात झोप लागलेले नसते. थोड्या वेळातच हळदीचा कार्यक्रम व संध्याकाळी लग्न त्यामुळे घरात खूप गडबड चालू असते. सर्वजण आपापल्या तयारीत असतात. स्वयंपाकाचा सुवास संपूर्ण वाडा भर पसरलेला असतो. रोहन उठून पटकन आवरतो व कार्यक्रमाची तयारी बघायला लागतो. तेवढ्यात तेथे बाई परत येते. ती बाई जोरजोरात ओरडत व रडत असते.

 बाई- इथं आली का हो ती. माझी प्राजू, आली का इथे.


घरातील सर्व व्यक्ती तेथे जमा होतात. आणि लगेच धोंडिबा येतो. धोंडीबा म्हणजे रोहनच्या काकांच्या शेताची राखण करणारा आणि ती बाई त्याची पत्नी 'रखमा'. धोंडिबा (रोहनच्या काकुला)- माफ करा ताई, तुम्हाला तर माहिती आहे ना हीची परिस्थिती. गावात कुणाचंही लग्न असलं की असंच वागते.


रोहनच्या काकूला सर्व कल्पना असल्यामुळे ते धोंडीबाला रखमाला घेऊन जायला सांगतात.


धोंडीबा रखमाला घेतो आणि निघून जातो.


रोहन -काकू, अगं कोण आहे हे लोक?


काकू- अरे आपल्या शेताचा राखणदार आहेत. त्यांची मुलगी प्राजक्ता मैत्रिणीच्या लग्नाला गेली आणि पुन्हा घरीच नाही आली बघ. पाच वर्षे झाली काय झालं पोरीचं अजून काहीच पत्ता नाही. तेव्हापासून रखमाची ही अशी अवस्था आहे. रोहन हळहळ व्यक्त करतो परंतु त्याच्या मनात तिचा विचार चालू असतो त्यामुळे तो धोंडीबाकडे दुर्लक्ष करतो.


थोड्या वेळाने रोहनची आई रोहनला, सुप्रियाला व तिच्या काही मैत्रिणींना शेतातील देवाचं दर्शन करून आणायला सांगते. रोहन त्यांना सोबत घेतो आणि शेतात देवदर्शनासाठी जातात. शेतातील छोट्याश्या मंदिराशेजारीच धोंडीबाचं घर असतं. रोहन सुप्रिया व तिच्या मैत्रिणी तेथे पाणी घेण्यासाठी थांबतात. रोहन अंगणात बसलेले असताना त्याचं लक्ष घरातील एका छोट्या फोटोकडे जातं. आणि त्याच्या हातातील ग्लास खाली पडतो. कारण त्या फोटोत असते 'ती'. जी रोहनला पारिजातकाची फुले वेचताना, संगीत कार्यक्रमात डान्स करताना दिसलेली असते. रोहन फोटो बघून गोंधळुन जातो आणि त्याला काकूचे शब्द आठवतात.


 रोहन (मनात) - जर ही पाच वर्षांपासून बेपत्ता आहे तर मला कशी दिसली?


........................


तिला फोटोत पाहून रोहन आश्चर्यचकित होतो. जर ही पाच वर्षांपासून गायब आहे, तर आपल्याला कशी दिसू शकते?. घरी कार्यक्रम असल्यामुळे रोहन काहीही न बोलता सुप्रिया व तीच्या मैत्रिणींना घरी घेऊन येतो. त्याच्या मनात अनेक प्रश्न असतात. परंतु तो सर्व कार्यक्रम आटोपण्याची वाट पाहत असतो. हळद व लग्न समारंभ व्यवस्थित पार पडतात. घरातील पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून जातात. रोहन तिथे काही दिवस थांबणार असल्याचं आई बाबांना सांगतो. रोहन सर्व आटोपून सकाळी धोंडीबाच्या घरी येतो. तेथे धोंडिबा शेतात काम करत असतो व त्याची बायको रखमा घरात असते. रोहन धोंडिबाकडे जातो व प्राजक्ताबद्दल चौकशी करतो. तेव्हा त्याला कळते की प्राजक्ता पाच वर्षांपूर्वी तिची मैत्रीण राधाच्या संगीत समारंभासाठी गेलेली असते आणि त्या दिवसापासून ती त्यांना पुन्हा दिसलीच नसते. धोंडिबा रोहनला सांगतो की त्यांनी खूप चौकशी केली तेव्हा समजलं की कार्यक्रमाला गेले होते तिथे एक छान गाण्यांवर डान्सही केला आणि अचानक कुणालाही न सांगता तिथून निघून गेली ती आजतागायत सापडली नाही.


रोहन राधाचा पत्ता घेतो व चौकशी करण्यासाठी तिच्या घरी जातो. राधाचं लग्न झालेलं असल्या कारणाने ती तेथे नसते परंतु तिची आई रोहनला भेटते. रोहन राधाच्या संगीत कार्यक्रमाबद्दल विचारतो तर लगेच राधाची आई रडायला लागते. रोहनला काय झाले काहीच कळत नाही. तो त्यांना धीर देतो आणि रडण्याचे कारण विचारतो.

राधाची आई - काय सांगू, बाबा. आमच्या आयुष्यात तो दिवस एक शाप बनून आला होता की काय माहित. त्याच दिवशी माझा मुलगा अजय हा हार्टअटॅकने गेला.


रोहन- काय? (आश्चर्यचकित होऊन) 


राधाची आई - हो, काय झालं काय माहीत? तो अचानक कार्यक्रमातून निघून गेला. रात्री उशीरा घरी आला. त्याचा मित्र गोविंद त्याला घरी सोडून गेला. खूप घाबरलेला होता आणि अचानक काही वेळाने छातीत दुखू लागले आणि तो कायमचा आम्हाला सोडून गेला.


राधाची आई पुन्हा जोरा जोरात रडायला लागते. रोहनला काय अंदाज लावावा काहीच कळत नाही आणि त्याला गोविंदाचं नाव आठवतं.


रोहन - गोविंद, तो कुठे आहे? त्याचं काय झालं? 


राधाची आई - अजय गेला आणि गोविंद खूप दुःखी झाला. तो गाव सोडून निघून गेला आता शेजारच्याच गावात राहतो.


रोहन काहीतरी काम आहे सांगून गोविंदाचा पत्ता व माहिती घेतो व अजयच्या आईचा निरोप घेऊन गोविंदचे घर गाठतो. गोविंद संध्याकाळ असल्यामुळे घरीच असतो. रोहन गोविंदकडे अजयबद्दल चौकशी करतो परंतु गोविंद कोणत्याही अजयला ओळखत नसल्याचा आव आणतो आणि रोहनला तेथून जाण्यास सांगतो. रोहन त्याला प्राजक्ताबद्दल विचारतो तसा गोविंद घाबरतो.

गोविंद - प्राजक्ता कोण? मला नाही माहीत. भेदरलेल्या गोविंदाला बघून रोहन अंदाज लावतो त्याला नक्कीच काही तरी माहित आहे परंतु वारंवार विचारूनही गोविंद काहीच सांगत नाही शेवटी वैतागून रात्र झाल्यामुळे रोहन घरी जातो.


गोविंद असं काही त्याला सांगणार नाही हे रोहनला लक्षात येतं. त्यामुळे तो त्याच्या बालपणीचा मित्र जो सध्या पोलीस असतो त्यांच्याशी चर्चा करतो आणि ते दोघे सकाळी गोविंदाच्या घरी जाण्याचं ठरवतात.  रोहनने त्याच्या पोलिस मित्राला प्राजक्ताबद्दल काहीच सांगितलेलं नसतं. फक्त गोविंदांवर संशय असल्याचं रोहन सांगतो आणि ते दोघे सकाळीच गोविंदाच्या घरी जातात. पोलिसांना बघून गोविंद घाबरतो. पोलिस चौकशी करतात तर गोविंद लगेच सगळ्या गोष्टी सांगायला लागतो.


गोविंद - त्या दिवशी अजयच्या बहिणीच्या लग्नात तिची मैत्रीण प्राजक्ता आली होती. प्राजक्ता दिसायला खूप सुंदर. त्यामुळे अजयची नजर तिच्यावरुन हटतच नव्हती आणि प्राजक्ता काही कारणासाठी घरात गेली असता अजयने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती कशीबशी तेथून निसटली आणि घराबाहेर पडली. अजय तसाच तिच्या मागेमागे गेला आणि एका निर्जन ठिकाणी त्याने तिला गाठलं. आजूबाजूला कुणीच नसल्याचा अजयने फायदा घेतला आणि दोघांच्या भांडणात प्राजक्ताचा पाय घसरला आणि ती दगडावर पडली आणि जागेवर गेली. मीही तिथेच होतो आम्ही खूप घाबरलो आणि मग आम्ही दोघांनी मिळून तिला रोहनच्या काकांच्या घरासमोरील पारिजातकाच्या झाडाखाली पुरून टाकलं. कारण रोहनचे काका व त्यांचे कुटुंब काही कारणासाठी मुंबईला गेलेले होते. अजय खूप घाबरला होता आणि त्याच गोष्टीचा धसका घेऊन त्याचा मृत्यू झाला.


पोलीस गोविंदला ताब्यात घेतात. प्राजक्ताच्या आई-वडिलांना ही माहिती कळते. ते खूप रडतात आणि तिच्या मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार करतात. कदाचित आपल्या आई वडिलांना आपली माहिती मिळावी म्हणूनच की काय प्राजक्ता इतके दिवस तिथे थांबलेली होती. आता ती मुक्त झाली होती. रोहन पुन्हा आपल्या कामावर परततो आणि पुन्हा ती त्याला कधीच दिसत नाही. आता ती त्याच्यासाठी फक्त एक आभास होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime