Pradnya Labade-Bhawar

Others

3  

Pradnya Labade-Bhawar

Others

म्या सून कमिली हाय.

म्या सून कमिली हाय.

4 mins
586


    यमुना दारात बसुन खुप वेळ सुरेखाची वाट पाहत होती. तिच मन अगदी चलबिचल झालं होतं. बऱ्याच वेळाने समोरून तिला सुरेखा येताना दिसते. यमुना पळत सुरेखा कडे जाते आणि विचारते, “काय गं बाय, काय हाय त्याच्यात “

सुरेखा- “आई मी परीक्षा पास झाले ”


सुरेखा एमपीएससी परीक्षा पास झालेली असते. यमुना एैकते आणि तिला काय करू आणि काय नाही असे होते. ती शेजारच्या बायकांना आवाज देते. “अगं ये, रखमे, हौसा, धुरूपे बघा माही सून मोठी परीक्षा पास झाली हाय, अगं इकडं या साऱ्याजणी.”


बायका जमा होतात. यमुना पळत जाऊन घरातून साखरेचा डबा घेऊन येते व सगळ्यांच्या हातावर साखर ठेवू लागते. .


यमुना- “सुरखे, जावं बाय चहा टाक सगळ्यासनी. म्या आले गावात साखर वाटून.”


सुरेखा सगळ्यांना बसायला सांगते व आत जाते.


तेवढ्यात रखमा यमुनाला म्हणते-


रखमा- “यमुने सून हाय यवढ डोक्यावर घेणं बरं नव्हं”.


यमुना नाक मुरडते व तिच्याकडे दुर्लक्ष करून साखर वाटायला निघून जाते.


यमुना, कधीही शाळेत न गेलेली. पानगावात राहणारी अत्यंत कष्टाळु बाई. लग्नानंतर काही वर्षातच पतिचे निधन झाले. पदरात एक मुलगा- सदा आणि म्हातारे सासु-सासरे यांची जबाबदारी तिच्यावर पडली. तिने सुद्धा खुप जीव लावुन सासु-सासर्‍यांचा संभाळ केला. काही वर्षाने दोघेही एका पाठोपाठ एक गेले. यमुना खुप दुःखी झाली होती परंतु मुलाकडे बघुन धीर धरला. आणि मनाशी पक्क ठरवलं मुलाला खुप शिकवायचं आणि स्वताच्या पायावर उभं करायचं.


सदा शाळेत जाऊ लागला परंतु त्याचं शाळेत मन रमत नसे. यमुनाला त्याची खुप काळजी वाटु लागली. सदाने पास-नापास करत करत आपलं शिक्षण पुर्ण केलं. आणि यमुनाने ओळखीने त्याला एका ठिकाणी नोकरीला लावलं


खंडोबा, यमुनाचा चुलत भाऊ त्याने रामासाठी सुरेखाचं स्थळ आणलं. सुरेखा अगदी सोज्वळ, गुणी व लाघवी मुलगी.


सदा व सुरेखा चं लग्न झालं. सुरेखाने काही दिवसांतच सासूला अगदी आपलंसं केलं होतं. तिच्या येण्याने यमुनाचा बराचसा भार कमी झाला होता .काही महिण्याने घरात पाळणा हलला. सुरेखा व सदाला एक गोंडस मुलगी झाली. सगळं अगदी व्यवस्थित चालु होतं. परंतु त्यातच यमुनाच्या संसाराला दृष्ट लागली. सदाला गावातील काही लोकांच्या संगतीने दारूचं व्यसन लागलं. सुरेखा व यमुना दोघीही त्याला समजावून सांगत होत्या पण त्याचं दारूचं व्यसन काय सुटतच नव्हतं.अगदी काही दिवसांनी त्याने नोकरीवर जाणं सुद्धा बंद केलं होतं. सदा दारूच्या पूर्ण आहारी गेला होता त्याला आता कशाचीही जाण राहिली नव्हती. अनेक महिने असच चालु राहिलं आणि शेवटी काळाने घाला घातलाच. दारुच्या नशेतच सदाचा म्रुत्यु झाला. यमुना व सुरेखावर जणू दुखा:चा डोंगरच कोसळला.


घरात लहान लेकरु. त्यात पैशाची चणचण भासू लागली .यमुनाने परत कामावर जाण्याचा निर्णय घेतला सुरेखा ही तिला मदत करत असे. असेच एक दिवस यमुना व सुरेखा कामावर गेल्या असताना त्यांना सुरेखाच्या शाळेतील शिक्षक भेटले. त्यांनी सहज बोलताना यमुनाला सांगितले . सुरेखा म्हणजे खूप हुशार मुलगी. शाळेत नेहमी पहिल्या तिनात असायची पण घरची परिस्थिती बेताची आणि त्यात चांगलं स्थळ आलं आणि हुडां पण द्यावा लागणार नव्हता त्यामुळे शिक्षण सोडून आई वडिलांनी लग्न करून दिलं. .


यमुना व सुरेखा संध्याकाळी घरी आल्या.यमुना सतत सरांचं बोलणं आठवत होती. तिला वाईटही वाटत होतं. आपण खरचं एवढ्या चांगल्या हुशार मुलीचं नुकसान केलं असं तिला सारखं वाटत होतं. परंतु जे आपण भोगलं ते सुरेखाच्या वाटेला येऊ नये अशी तिची खुप ईच्छा होती.आणि यमुना असाच विचार करत करत झोपी गेली.


सकाळ झाली. सुरेखाला यमुना कुठेच दिसत नव्हती. सुरेखा तिच्या पुढच्या कामाला लागली.


यमुना सुरेखाच्या शिक्षकांकडे गेली होती. तिने सरांकडून सगळी माहिती घेतली व तिने ठरवलं होतं की सुरेखाचं शिक्षण पूर्ण करायचं आणि तिला तिच्यस पायावर उभा करायचं . सरांना यमुनाचा निर्णय खूप आवडला त्यांनी यमुनाला सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.


यमुनाने शिक्षकांच्या ओळखीने तालुक्याला सुरेखा साठी अभ्यासिकेची सोय करून घेतली. कारण घरी लहान बाळ त्यामुळे यमुनाला माहिती होतं कि घरी काय सुरेखाचा अभ्यास होणार नाही.आणि सुरेखाच्या शिक्षकानी सुचवलं कि तालुक्याच्या ठिकाणी गेली तर अनेक शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनही मिळेल.


दोघींचा दिनक्रम चालू झाला.


यमुना पहाटे उठायची आणि स्वतः सर्व स्वयंपाक करून सुरेखाच्या हातात डबा देऊन तिला अभ्यासिकेत पाठवायची. सुरेखाला घरातील काम करण्यास अगदी मनाई होती.सुरेखा सकाळी सहा वाजता घराबाहेर पडायची व रात्री आठ वाजता घरी यायची.तोपर्यंत घरातील सर्व कामं, मुलांचा सांभाळ यमुना करत असे. सुरेखाच्या शिक्षणासाठी यमुनाने जमीन दागिने विकले. इकडे सुरेखाचा ही छान अभ्यास चालू होता.दोघींनीही अगदी मनाशी ठरवलं होतं.काही झालं तरी आता मागं हटायचं नाही.


सुरेखाची परीक्षा झाली. पेपर छान गेले आणि आज सुरेखाच्या परीक्षेचा निकाल लागला होता. सुरेखा पासच नाही तर जिल्ह्यात प्रथम आली होती. यमुना व सुरेखाच्या कष्टाचं सार्थक झालं होतं.


सुरेखा गावात साखर वाटून घरी येते. तिला दारात लगबग दिसते .ती बघते तर त्यांच्या घरी सुरेखाची मुलाखत घ्यायला पत्रकार आलेले होते. सुरेखा त्यांना सांगत होती


सुरेखा – “आज, मी जे यश मिळवले ते फक्त आणि फक्त माझ्या सासूबाई मुळेच त्यांनी माझ्या शिक्षणासाठी होती नव्हती तेवढी जमीन विकली अंगावरील सोनं मोडले व मला शिकवलं” .


सुरेखाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि आईसारखी सासू मिळाली म्हणून तिला अभिमानही वाटत होता.


सुरेखाची मुलाखत झाल्यावर पत्रकार यमुनाकडे जातात आणि विचारतात.


पत्रकार- “काय वाटतंय, आज तुमची सून एमपीएससी परीक्षा पास झाली तिने या यशाचे पूर्ण श्रेय तुम्हाला दिले आणि तुम्ही तिच्यासाठी तुमचे दागिने व जमीन विकली तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळालं असं वाटतं का ?”


यमुना – “भाऊ ,परीक्षा सुरेखा नाय म्या पास झालीए असं वाटतय.. म्या फकस्त तिला होईल तेवढी मदत केली. म्यां माही जमीन इकली दागिने इकले अनं सुनेला शिकवलं. आज माह्याकडं काहीच नाय पण म्या आज ह्या जगातील सर्वात शिरीमंत बाई हाय, कारण लोकं सोनं कमितेत घरदार, पैकाअडका कमितेत पण म्या आज माही सून कमीली हाय.”


यमुना आपल्या पदराने डोळे पुसते. सुरेखा व यमुना एकमेकींच्या गळ्यात पडतात आणि पत्रकार बातमी देत असतात- खरचं जे एका अडाणी बाईला जमलं ते सुशिक्षित असुनही लोकांना का जमत नाही.


Rate this content
Log in