पावित्र्याच्या_शोधात_निघालेली_
पावित्र्याच्या_शोधात_निघालेली_
संध्याकाळी सहा, साडे-सहाची वेळ.
ती, सुरेख लाल जरीची साडी नेसलेली, लांबसडक केस, मनमोहक सौंदर्य आणि चेहऱ्यावर स्मितहास्य लेऊन कशाच्या तरी शोधात निघाली होती.
समोर तिला एक घर दिसते. सुखवस्तू कुटुंब घरात कशाचीही कमी नाही. ती त्या घरात प्रवेश करते आणि दारातच क्षणिक थांबते.
घरामध्ये सर्व सुखसोयी उपलब्ध होत्ता परंतु एकीकडे सासु-सुनांचे भांडण चालू होते. घरातील मुले एकमेकांची खोडी काढण्यात व वस्तू तोडण्यात मग्न होते. त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. वृद्धआजी बाई पाण्यासाठी आवाज देत होत्या परंतु त्यांना कोणीही दाद देत नव्हते. घरातील पुरुष घराशी जणू आपला काहीच संबंध नाही असं दुर्लक्ष करून टीव्ही बघत बसले होते.
उदास वाटणारे तुळशीवृंदावन ,ओस पडलेले देवघर आणि सर्व सुखसोयी असतानाही निस्तेज अपवित्र वाटणारे हे घर.
तिला अगदी नकोसं वाटलं. घरात एक पाऊल टाकणं ही तिला जड झालं. आणि ती तशीच माघारी फिरली.
पुन्हा आपल्या शोधात चालू लागली. तेवढय़ात तिच्या कानावर बोबडे बोल ऐकु आले. आणि ती त्या आवाजाच्या दिशेने गेली.
तो आवाज एका घरातून येत होत। अत्यंत साधा विटांचं बांधकाम असलेले घर. तिने हळुवार घरात प्रवेश केला.
दोन छोटी मुले देवासमोर आपल्या बोबड्या आवाजात शुभंकरोती म्हणत
होती. सुनबाई आताच घरातील सर्व झाडलोट स्वच्छता करून स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती. सासूबाई प्रसन्न मनाने तुळशीसमोर दिवा लावत होत्या. घरातील पुरुष मंडळी आनंदाने वृद्ध आजीसोबत गप्पा मारत बसलेले होते.
ती हे सर्व दारातून स्मित हास्य करत न्याहाळत होती .
अत्यंत गरीब कुटुंब तरीही घरात पवित्र वातावरण होते.
तिचे मन प्रसन्न झाले.
सर्वांनी तिला बघितले आणि तिचे छान स्वागतच केले. संध्याकाळी आलेले पाहुणे म्हणजे लक्ष्मीचे रुप असं आजी म्हणाली.
सर्वांनी तिचा छान पाहुणचार केला.
तुमच्या घरातून मुलांचा खूप छान आवाज येत होता म्हणून मी इकडे आले असं कारण तीने सांगितलं आणि सर्वांचा निरोप घेतला.
ती शरीराने त्यांचा निरोप घेते. परंतु सुख ,समृद्धी आणि लक्ष्मी रूपाने तिथेच स्थित होते.
कारण ती होती लक्ष्मी.
रूप बदलून आलेली खऱ्या पावित्र्याच्या शोधात.
आपल्या अनेकांच्या आयुष्यातही असंच होतं .आपण आपल्या कामात, समस्या, वादविवादात इतके व्यस्त असतो की साक्षात लक्ष्मी ,सुख समृद्धी आपले दार ठोठावते परंतु आपण तिला ओळखू शकत नाही आणि ती आपल्याकडे येण्याचे टाळते.
त्यामुळे अत्यंत प्रसन्न मनाने कुणाशीही काहीही वैर न ठेवता तिचे स्वागत करा. ती नक्कीच कोणत्या ना कोणत्या रुपात तुम्हाला भेटेलच.