Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others Thriller Tragedy

5.0  

Pandit Warade

Others Thriller Tragedy

एक अविस्मरणीय प्रसंग

एक अविस्मरणीय प्रसंग

5 mins
8.2K


अविस्मरणीय क्षण/प्रसंग.


        तो कोण होता?


    आठवले तर आजही अंगावर शहारे येतात. आजही मन थरथरते, अंगात कापरे भरते. वाटते, त्यावेळी तो नसता तर? 'तो नसता तर' हा प्रश्न आजही फार मोठा 'आ' वासून उभा राहतो. खरंच कोण होता तो?


    १७ मे १९८८! साक्षात मृत्यू खेटून गेला. भेटून गेला, परंतु दया भाव ठेऊन. वाळूजच्या औद्योगिक वसाहतीत 'गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड' कंपनीत काम करत असतांना एक दिवस अचानक तब्येत खराब झाली. डोके दुखायला लागले. विभागात कामाचे व्यवस्थित नियोजन करून विभाग प्रमुखांना भेटून सर्व परिस्थिती कथन केली. त्यांची परवानगी घेऊन घरी जाण्यासाठी निघालो.


    बाहेरच्या वाहनाने मध्यवर्ती बस स्थानकात आलो. तेथून शहागंज जाणारी शहर बस पकडली. बस शहागंजच्या एक दोन स्टॉप मागेच होती, कलेक्टर ऑफिसच्या जवळ. तिथल्या स्टॉप वर दोन इसम बस मध्ये शिरले आणि कंडक्टरला विचारू लागले, शहरात काही दंगल वगैरे झाली की काय? खूप लोक पळताहेत? तोवर बस शहागंजच्या अगदी जवळ आली होती. खरोखर लोकं सैरावैरा पळतांना दिसू लागले होते. बसमधील लोकंही चालत्या बसमधून उतरून पळायला लागले. बस शहागंज स्थानकात येत असतांनाच तेथून सिडको, चिकलठाणा कडे जाणारी बस बाहेर पडत होती. हिंदू-मुस्लिम दंगलीचा तो काळ होता. तो भाग सारा मुस्लिम वस्तीचा. तेथे जास्त वेळ राहणे धोक्याचे होते. चालत्या गाडीतून उडी मारून चिकलठाणा कडे जाणाऱ्या बसमध्ये शिरलो. 


    बस मार्गक्रमण करत होती. दरवाज्यात लटकून मी बाहेरचे दृश्य भीतीयुक्त नजरेने बघत होतो. पोलीस जवान, होम गार्ड, srp चे जवान काठ्या चालवत होते, मात्र दंगेखोर पाठीत पडणाऱ्या काठीची पर्वा न करता खाली वाकून उचललेला दगड मोठ्या जोशाने, मोठ्या त्वेषाने गाडीवर भिरकवत होता. भयानक दृश्य होते सारे.

    

    आमची बस चालत होती, बसवर दगडफेक सुरू होती. काचा फुटत होत्या. प्रवाशांना मार लागत होता. अशातच एक दगड भिरभिरत येऊन माझ्या पाठीवर जोरात आदळला. डोळ्यापुढे अंधारी आली. पण जिवाच्या भीतीने तशाही परिस्थितीत हात सोडला नाही. बस एका दरवाजा जवळ (ज्याचे नांव 'रोशन गेट') पोहोचली होती. ड्रायव्हरच्या समोरची सोडून गाडीच्या सर्व काचा फुटल्या होत्या. गाडी दरवाजाच्या आतून जाणार होती. दरवाजात गाडी गेल्यावर जर काही अडवणूक झाली असती तर, किंवा जाळपोळ झाली असती तर फार मोठा अनर्थ घडला असता, बाजूला Srp ची राहुटी होती. ड्रायव्हरने राहुटीत संरक्षण घ्यायला सांगितले. 


    आम्ही सारे खाली उतरलो. राहुटीत शिरलो. दंगेखोर फारच चवताळलेले होते srp लाही जुमानत नव्हते. म्हणून srp दलाने आम्हाला 'घर जवळ करण्याचा' सल्ला दिला. आम्ही तिथून पळत निघालो. दोन मार्ग होते. एका बाजूला जवळपास १००% मुस्लिम वस्ती, तर दुसऱ्या बाजूला ५०-५०%. साहजिकच दुसऱ्या बाजूच्या रस्त्याने पळत निघालो. 


    जीव घेऊन पळत होतो. तेवढ्यात समोरचे दृश्य पाहून जागच्या जागी थिजलो. समोरून एक रिक्षा येत होती. तिच्यातील प्रवाशाला रिक्षातून बाहेर ओढून जमावाने खाली पाडले, आणि मारायला सुरुवात केली. एकाने बाजूला पडलेला मोठा दगड दोन्ही हाताने उचलला, खाली पडलेल्या इसमाच्या डोक्यात घातला. आम्ही खूप घाबरलो, परत फिरलो. दुसऱ्या रस्त्याने जाण्यासाठी निघालो.


     आम्हाला परत फिरलेले पाहून दंगेखोरही आमच्या मागे धाऊ लागले. आम्ही पुढे ते मागे, जिवाच्या आकांताने धावत होते. संकट काळी सर्व इंद्रियांची शक्ती एकवटते याची जाणीव त्यावेळी झाली. आम्ही दुसऱ्या मार्गावर धावत होतो. मागे दंगेखोर पळत होतेच. संकटं एकाच वेळी सगळी कडून हल्ला करतात. समोर क्रिकेटची टीम. तीही मुस्लिमांचीच पोरं. बॅट आणि स्टंप घेऊन दंग्याच्याच तयारीत. 


    आता मात्र हात पाय गळाल्यासारखे झाले. 'मागे वाघ पुढे सिंह'! कोणी आले तरी खाणारच. अशी अवस्था झाली. पळत जाऊन क्रिकेट टीम मध्ये जाऊन उभा राहिलो. लांडग्यासमोर हरणाच्या पडसासारखा.


    टीम कॅप्टनने पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळले. डोके दुखत असल्यामुळे कानाला, डोक्याला मोठा रंगीत रुमाल बांधलेला होता. त्याने अचानक प्रश्न केला,

   " क्या नाम है तेरा?" घाबरलेलो होतोच. प्रश्नाने आणखीच गर्भगळीत झालो. 

    आमच्या गावातही दुसऱ्या वस्तीत मुस्लिम लोकं राहायचीत, पण त्यांच्याशी फारसे काम पडायचे नाही. त्यांची नांवे काय काय असतात याचीही जास्त माहिती नव्हती. माझ्या मुखातून अचानक उत्तर आले, 

     "कलीम".


   "अरे वो झूट बोलरा रे" मागच्यापैकी एकजण ओरडला. 


    आता काही खरे नव्हते. वाटलं, 'संपलं आता सारं'!


    पण? नाही कुणीतरी होतं, माझ्या पाठीशी. माझ्या मुखातून नांव सांगणारं. माझ्यासाठी कॅप्टनचे स्क्रू फिरवणारं. कॅप्टननं पुन्हा एकदा मला न्याहाळलं, आणि ओरडला, 


    " जा. भाग जलदी"


    पडत्या फळाची आज्ञा समजून मी जोरात पळत सुटलो, जिवाच्या आकांतानं. 

सुरक्षित अंतरावर आल्यावर उभा राहून मागे पाहू लागलो. 

    

     मागे सारे पेटले होते. कुठे धूर, कुठे मोठमोठ्या ज्वाळा दिसत होत्या. किंकाळ्या ऐकू येत होत्या. मी मात्र सुरक्षित होतो. मृत्यूच्या दाढेतून परत आलो होतो. 


   माहीत नाही, मी आलो होतो की मला कुणी आणलं होतं. पण मी वाचलो होतो.


   मी विचार करत होतो, कोण होतं ते? ज्यानं माझ्या मुखातून ते नांव सांगितलं? मला आजही आठवतं, तो आवाज माझा नक्कीच नव्हता. माझ्या तोंडून नांव सांगणारा दुसराच कुणी तरी होता, एवढं मात्र नक्कीच.


    खरंच कोण होता तो?



पंडित वराडे,

औरंगाबाद

१२.०८.२०१८ प्रसंग


Rate this content
Log in