पाणी रे पाणी तेरा रंग कैसा...
पाणी रे पाणी तेरा रंग कैसा...
दिवाळीतला 'अल निनो' आणि सोसायटीचा कल्ला! हुकलाईन: जेव्हा मिलियन्स व्ह्यूजवाला युट्युबर आणि प्राईम टाईम न्यूज अँकर एकाच सोसायटीत शेजारी राहतात, आणि ऐन दिवाळीच्या पहाटे नळाचं पाणी गायब होतं—तेव्हा सुरू होतो अस्सल कोकणी सेक्रेटरीच्या 'मशेरी'चा आणि सोसायटीतल्या नमुन्यांचा भन्नाट तमाशा! ऐन नरक चतुर्दशीची पहाट! संपूर्ण वसई-विरार परिसरातील सोसायट्यांमध्ये उटण्याचा सुगंध आणि फराळाची लगबग सुरू होती. पण आमच्या 'सागर दर्शन' सोसायटीत मात्र सकाळी सहा वाजल्यापासूनच रणधुमाळी माजली होती. कारण एकच—गेल्या दोन दिवसांपासून सोसायटीच्या नळातून थेंबभरही पाणी आलं नव्हतं. या सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर आमने-सामने दोन मोठे 'सेलिब्रिटी' राहतात. एक म्हणजे मिलियन्स व्ह्यूजवाला युट्युबर आणि इन्स्टा इन्फ्लुएन्सर राकेश उर्फ 'रॉयल रॉकी', आणि दुसरे एका नामवंत न्यूज चॅनलचे प्राईम टाईम अँकर बापूराव देशमुख उर्फ 'ब्रेकिंग बापू'. बाहेरच्या जगासाठी हे दोघे मोठे स्टार असले, तरी आज घरात या दोघांचीही अवस्था केविलवाणी झाली होती. राकेशच्या घरात आई, बहीण आणि वडील अंगावर उटणे लावून रिकाम्या बादल्यांकडे बघत बसले होते. वैतागलेल्या आईने राकेशला चांगलाच धारेवर धरलं, "अरे राक्या, काय उपयोग तुझ्या त्या दहा लाख फॉलोअर्सचा? घरात आंघोळीला पाणी नाही, तुझं ते इन्फ्लुएन्स जरा पाण्याच्या टाकीवर टाक की!" तिकडे शेजारच्या फ्लॅटमध्ये ब्रेकिंग बापूंचीही तीच गत! कपाळाला उटणे लावून बसलेल्या बापूंच्या पत्नीने टोमणा मारला, "अहो, टीव्हीवर तर मोठमोठ्या नेत्यांना घाम फोडता, आणि इकडे दोन दिवसांपासून नळाला हवा येतेय! दाखवा ना तुमचा चौथा स्तंभ!" घरातून मिळालेल्या या सणसणीत टोमण्यांमुळे दोघांचाही 'प्रोफेशनल इगो' प्रचंड दुखावला गेला. राकेशने तर थेट टेरेसवर जाऊन सोसायटीच्या कोरड्या पडलेल्या पाण्याच्या टाक्यांचे फोटो आणि रील काढून सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकायला सुरुवात केली—"गाईज, बघा आमच्या हाय-फाय सोसायटीची दिवाळी! टाक्या पूर्ण सुक्या आहेत!" ही पोस्ट ग्रुपवर पडताच डिजिटल धुमाकूळ सुरू झाला. कोणी रागाचे इमोजी टाकले, कोणी "सेक्रेटरी हाय हाय" लिहिलं, तर कोणीतरी चुकून "शुभ दिपावली, तुमचे जीवन असेच पाण्यासारखे निर्मळ राहो" असा फॉरवर्ड मेसेज टाकून आगीत तेल ओतलं! मग काय, हातात सेल्फी स्टिक घेऊन राकेश आणि गळ्यात चॅनलचा बुम माईक अडकवून बापूराव—दोघेही एकाच वेळी तळमजल्यावर राहणाऱ्या सोसायटीचे सेक्रेटरी तात्या सावंत यांच्या दारात धडकले. तात्या सावंत म्हणजे पक्का कोकणी माणूस! त्यांच्या आणि चेअरमनच्या घरात पाण्याचे ड्रम आधीच तुडुंब भरलेले होते. तात्या बाहेरच्या व्हरांड्यात आरामात बनियनवर बसून डाव्या तळव्यावर मशेरी चोळत होते. बापूरावांनी गंभीर आवाजात सुरुवात केली, "सावंत साहेब, ही सोसायटी आहे की सहारा वाळवंट? दोन दिवस झाले पाणी नाही, आणि तुम्ही इथे आरामात बसला आहात?" लगेच राकेशने कॅमेरा तात्यांच्या तोंडावर धरला, "व्हॉट्स अप पब्लिक! मी आत्ताच वरच्या रिकाम्या टाक्यांचे फोटो टाकलेत, आणि हे आहेत आमचे सेक्रेटरी, ज्यांनी आमची दिवाळी ड्राय करून टाकलीये!" तात्या सावंतांनी आरामात दातांना मशेरी लावली, तोंडातला आकडा सांभाळत शांतपणे म्हणाले, "हं... बोलत रवा! तुमचा बोलून झाल्यावर सांगा, मग मी थुंकून बोलतंय!" दोघांचाही पारा चढला. पण चतुर तात्यांनी दोघांच्याही अहंकाराला अशी काही फुंकर घातली की, सेक्रेटरी बाजूला राहिले आणि हे दोघे आपापसातच भिडले! तात्या हळूच बापूरावांना म्हणाले, "अहो देशमुख साहेब, हा राक्या मगाशी म्हणत होतो की, आजकाल टीव्ही कोण बघता? मी एक रील टाकलंय तर मिनिटात टँकर येऊन उभा राहील!" आणि लगेच राकेशकडे वळून म्हणाले, "आणि राक्या, हे देशमुख साहेब म्हणत होते की या पोरांचे फक्त टाईमपास व्हिडिओ असतात, खऱ्या समस्या सोडवायला आमच्यासारखा मीडियाच लागतो!" आता दोघांच्यात 'कोणाची ताकद जास्त' यावरून जुंपली. या आरडाओरड्याने सोसायटीतले इतर नमुनेही आपापली दारं उघडून बाहेर जमा झाले. दात घासायचा ब्रश तोंडात ठेवून आलेले वाघमारे काका राकेशचे रिकाम्या टाकीचे फोटो बघून म्हणाले, "बघ बाबा, तुझंही एकदम बरोबर आहे, पुरावाच दाखवलास तू!" आणि लगेच बापूरावांनी संविधानाचा दाखला दिल्यावर त्यांच्याकडे वळून म्हणाले, "तेही शंभर टक्के बरोबर आहे देशमुख साहेब!" हा गोंधळ सुरू असतानाच पाचव्या मजल्यावरून सावंत (दुसरे) धापा टाकत खाली आले. राकेशच्या फोनमधले रिकाम्या टाकीचे फोटो बघून त्यांचा जीव टांगणीला लागला होता. ते तात्यांना म्हणाले, "अहो सेक्रेटरी, पाणी नेमकं कधी येणार ते सांगा! मी कधीपासून वॉशिंग मशीनमध्ये कपडे भिजवून, 'स्टार्ट' बटनवर बोट ठेवून बसलोय! अचानक फुल प्रेशरने पाणी आलं तर मशीन फुटायची! प्रेशर आलं तर काय करू?" तात्यांनी मशेरी लावलेले दात विचकत उत्तर दिलं, "सावंता, इकडे सकाळची मशेरी धुवूक दोन थेंब पाणी नाय, आणि तुका मशीनच्या प्रेशराची पडली आसा! मशीनवर बसून राहा, पाणी आला की सांगतंय!" तेवढ्यात सोसायटीचा वॉचमन बहादूर गंभीर चेहरा करून पंपहाऊसकडून आला आणि सॅल्यूट मारून म्हणाला, "सेक्रेटरी साहेब... सब चेक किया, मोटर भी देखी, व्हॉल्व्ह भी घुमाया... पर पाणी अभी तक नही आया!" बहादूरचं हे वाक्य संपतंय न संपतंय, तोच चौथ्या मजल्यावरून कुलकर्णी जोडपं एकमेकांच्या मागे धावत खाली आलं. सौ. कुलकर्णी तावातावाने सेक्रेटरींना म्हणाल्या, "अहो सेक्रेटरी, मगाशी मला वाटलं आमच्या 'यांनी' बाथरूमचा कॉक चुकून बंद केलाय, म्हणून मी सणसणीत लाटणं फेकून मारलं! नंतर राकेशने ग्रुपवर टाकलेले रिकाम्या टाकीचे फोटो बघितले आणि बाजूच्या जोशीबाईंनी सांगितलं की बिल्डिंगलाच पाणी नाहीये! आता हेच लाटणं घेऊन हे माझ्या पाठीमागे लागलेत! ही सगळी सुखं तुमचीच!" तात्या थंड डोक्याने म्हणाले, "अहो वहिनी, तुम्ही आपापली लाटणी जरा सांभाळून ठेवा, दिवाळीच्या फराळात आणि पुढच्या युद्धात कामाला येतली! पण यात चूक माझी नाय, ही सगळी चूक त्या 'प्रिन्सिपलटी'ची आसा!" लगेच ब्रेकिंग बापूंनी माईक सरसावत भर घातली, "जी हां दर्शकों, सूत्रों के हवाले से बडी खबर आ रही है कि प्रशासनाचा निष्काळजीपणा याला जबाबदार आहे!" हा कल्ला ऐकून वरच्या मजल्यांवरून तीन कामवाल्या बाया हातातले झाडू-पोछे आपटत खाली उतरल्या. पाणी नसल्याने त्यांनी काम सोडून घरी जायचा निर्णय घेतला होता, आणि त्यांच्या मागे त्यांच्या तिन्ही प्रांतांच्या मालकिणी धावत आल्या होत्या! गुजराती मालकीण (श्रीमती शाह) गयावया करत म्हणाल्या, "अरे शांताबेन, नथी जावानुं! दिवाळी छे ने, बहुत काम पडा है!" यूपीवाली मालकीण (श्रीमती तिवारी) म्हणाल्या, "अरे कमला, चाहे तो डबल पैसा लेना, पर मत जाओ!" तर अस्सल काव्यप्रेमी मराठी मालकीण (सौ. देशपांडे) नाट्यमय स्वरात आपल्या कामवालीला म्हणाल्या, "अगं यमुना... ऐन सकाळी, 'यमुना तेरी घागर रिकामी'..." त्यावर यमुनाबाईंनी कमरेवर हात ठेवून सुनावलं, "अहो बाई, तुमच्या या कविता तुमच्याकडेच ठेवा! त्या कागदावर लिहा, निदान दिवाळीच्या चकल्या बांधायला तरी उपयोगी पडतील! मी चालली घरी!" संकटातही संधी शोधणारे आपले दोन्ही मीडिया वीर लगेच पुढे सरसावले. ब्रेकिंग बापूंनी त्या वैतागलेल्या मालकिणींच्या तोंडासमोर माईक धरून विचारलं, "भाभीजी, आपको इस वक्त कैसा महसूस हो रहा है?" तर राकेशने यमुनाबाईंच्या मागे धावत सेल्फी स्टिक पुढे केली, "गाईज, यमुनाबाईंचं स्वॅग बघा! यमुनाबाई, जाते-जाते बोल दो ना—रॉकीला फॉलो करा आणि लाईक करा!" दारामधला हा वाढता बाजार बघून सेक्रेटरी तात्यांची बायको सुलभावहिनी पदर खोचून बाहेर आल्या, "अहो, आमचं घर म्हणजे काय तुम्हाला जत्रा वाटली काय? चला, सगळे आपापल्या घरी!" चारचौघांत आपला रुबाब दाखवण्यासाठी तात्या बायकोवरच ओरडले, "अगं, तुका काय कळता राजकारणातला? तू आपली आत जा बघू! मी बघतंय काय हवा असा " सुलभावहिनींनी दारात उभ्या असलेल्या तिन्ही मालकिणींकडे बघत सणसणीत टोला लगावला, "होय, कळता मका सगळा! सकाळ-सकाळ दारात या सकमया-रकमाया जमा झाल्या, म्हणजे तुमची कळी खुलली असतलीच! आत येवा मग बघतंय तुमका.. बायकोने जाहीर पाणउतारा केल्यावर तात्या सावंत जरा खजिल झाले. पण तेवढ्यात सोसायटीच्या राजकारणातला विरोधी गट—म्हणजे मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले तिसऱ्या मजल्यावरचे साठे काका—आपल्या समर्थकांना आणि भिजलेल्या कपड्यांच्या बादलीला घेऊन दारासमोर आले आणि बादली आपटत जोरात घोषणा देऊ लागले— "तात्या सावंत हाय हाय! जोपर्यंत पाणी येणार नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही! आज मी इथे आमरण उपोषण करणार!" तात्या सावंतांनी एकदम नाटकी आणि भावनिक चेहरा करत हात जोडले, "अहो साठे काका, काय करताय हे? तुम्ही आम्हाला गुरुतुल्य माणसं! तुमच्याच मार्गदर्शनामुळे आम्ही इथपर्यंत आलो! आता या प्रसंगी सर्वांना सहकार्य करायचं सोडून असे वागू लागलात तर कसं? एका निवडणुकीत पराभव झाला तर त्याचं दुःख होणं समजण्यासारखं आहे... पण आमच्या हृदयाला घरं पडतील असं वागू नका हो!" साठे काका चिडून म्हणाले, "मागच्या निवडणुकीत मीच निवडून आलो असतो! पण ऐन वेळी तुम्ही सर्वांना दारू पाजलीत, हे काय कळलं नाही का मला?" तात्यांनी कानाला हात लावत अतिशय सोज्वळ चेहरा केला, "छे, छे! मी इतका नीच आणि ओंगळ आहे का? अहो, दारूच्या साध्या वासाने मला चक्कर येते! दारुडा जवळून गेला तरी मला उलटी होते! माझ्यासारख्या सज्जन माणसावर असा आळ घेताना तुम्हाला थोडं तरी तारतम्य बाळगायला हवं होतं!" साठे काका खोचकपणे हसत म्हणाले, "तुम्ही आणि सज्जन? मागच्या होळीला तुम्ही आणि तुमचा ग्रुप दारू पिऊन फटाके वाजवत होतात! पोलीस आले तेव्हा तुम्ही थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन बसलात! तिकडून तुम्हाला खाली उतरवण्यासाठी चक्क फायर ब्रिगेड आणावा लागला होता! आणि सज्जनपणाच्या गोष्टी मला शिकवता?" सगळी सोसायटी श्वास रोखून बघू लागली. पण तात्या सावंत जराही न डगमगता, अस्सल लखोबा लोखंडेच्या थाटात मिश्कील हसत म्हणाले— "साठे काका, तुम्ही कितीही आरडाओरडा केलात, कितीही आरोप केलेत, तरी तुम्हाला एक निरीक्षण सांगतो—तो मी नव्हेच!" आणि हे बोलून तात्या विजयी मुद्रेने व्हरांड्यातल्या प्लास्टिकच्या टेबलावर उभे राहिले आणि एखाद्या नेत्यासारखं भाषण द्यायला लागले— "तर सोसायटीवासीयांनो! आज आपल्या बिल्डिंगमध्ये जो पाणीप्रश्न उभा राहिलाय, आणि राक्याने ज्या रिकाम्या टाक्यांचे फोटो टाकलेत, ती कोणाची चूक नाय... तो जगात अचानक सक्रिय झालेल्या 'अल निनो' चा परिणाम आसा!" 'अल निनो' हे नाव ऐकून गर्दीतले जोशी काका मान डोलवत गंभीरपणे म्हणाले, "अरे हो! तरीपण मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो की त्या निनो दादाच्या नादाला नका लागू! आता बघा, बंद केलं ना त्यांनी पाणी!" तात्या टेबलावरूनच वैतागून ओरडले, "अहो जोशी, तुम्ही गप्प बसा हो! 'अल निनो' म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? कोणाला माहिती आहे का 'अल निनो' म्हणजे काय ते?" सोसायटी चो मेंटेनन्स दहा रुपयांनी वाढलो की फुकटचा ज्ञान देऊक सगळे येतले.. आणि xxx च्यांना अलनिनो म्हणजे माहिती नाय.. शाळेत मास्तर शिकवी होतो तेव्हा जर लक्ष दिला असता तर आता माझ्या दारात जमायची गरज नव्हती.. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. कुणालाच काही कळेना! शेवटी राकेशने न्यूज अँकर बापूरावांना खोचकपणे विचारलं, "तुम्ही तर मोठे पत्रकार आहात ना? सांगा ना लोकांना, 'अल निनो' म्हणजे काय ते!" ब्रेकिंग बापूंनी घसा खवखवला, कॉलर टाईट केली आणि तोंड वाकडं करत म्हणाले, "वो हमारा सब्जेक्ट नहीं है... मी फक्त क्राईम रिपोर्ट करतो!" राकेशचा पारा चढला आणि त्याने एक भारी वाक्य फेकून मारलं, "मग भाड्या, इकडे कोणता क्राईम झालाय? चल, भाग यहां से!" सगळी सोसायटी हा संवाद ऐकून खळखळून हसू लागली. तेवढ्यात बरोबर दहाव्या मिनिटाला पुन्हा वॉचमन बहादूर धावत आला, पण या वेळी त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं—"सेक्रेटरी साहेब! गुड न्यूज! टँकरवाला मेन गेटवर येऊन पोहोचलाय... पण तुमचं हे 'अल निनो'चं भाषण आणि यांची मारामारी बघायला सगळे गेटवरच गर्दी करून उभे आहेत, म्हणून त्याला गाडी आत घेता येत नाहीये!" हे ऐकताच हातात व्हाऊचरची फाईल आणि पेन घेऊन सोसायटीचे खजिनदार (ट्रेझरर) पटवर्धन काका गर्दी बाजूला सारत पुढे आले आणि म्हणाले, "अरे बाजूला व्हा रे! तुमचं 'अल निनो' आणि 'क्राईम' नंतर बघा... माननीय सेक्रेटरीआणि चेअरमन साहेब, माझ्या सत्यनारायणाच्या पूजेचे २००० रुपये तुम्ही दोघांनी मागच्या महिन्यापासून अडकवून ठेवलेत! आता या टँकरवाल्याचे पैसे द्यायचे असतील, तर आधी या माझ्या व्हाऊचरवर चुपचाप सही करा—नाहीतर टँकरचे पैसे आपल्या खिशातून भरा!" वरच्या गॅलरीतून डोकावत कंजूस चेअरमन नाडकर्णी ओरडले, "अरे तात्या, आधी त्या टँकरवाल्याला विचार दिवाळी डिस्काऊंट देतोय का, आणि या पटवर्धनचे दोन हजार पुढच्या महिन्यात बघू!" तात्यांनी टेबलावरून खाली उतरत कपाळावर हात मारला, "अरे देवा! इकडे अख्खी सोसायटी तडफडताय, आणि यांका डिस्काऊंट आणि पेढ्यांचे दोन हजार सुचतायत! दे रे बाबा पेन, सही करतंय, पण आधी त्या टँकरवाल्याक आत घे!"ब्लॅकमेल कसा करायचा ह्याचे क्लास घेऊक हवे तुका.. कधी कुठच्या टायमात कसली पाचर मारायची आणि आपला काम कसा काढून घ्यायचा का तू का बरोबर कळता.. दोन हजारात मी सकाळी चार वाजता जाऊन दादरला अक्का फुल मार्केट विकत घेऊन येईन.. बापाक xxx शिकवतत टँकर आत येऊन पाणी भरायला सुरुवात झाली. आणि इकडे ज्या दोघांनी दिवसभर फक्त भांडण केलं होतं, ते ब्रेकिंग बापू आणि रॉयल रॉकी लगेच टँकरसमोर उभे राहून आपापलं 'अँकरिंग' सुरू करते झाले! बापूरावांनी बुम माईक धरत गंभीर आवाजात सुरुवात केली— "तर दर्शकों, अशा प्रकारे आमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि मीडियाच्या दबावामुळे अखेर सोसायटीमध्ये पाणी आलेलं आहे! आमच्या मेहनतीची तुम्ही दखल घ्या, आम्ही सकाळपासून इकडे उभे आहोत! ओ सेक्रेटरी, तुमची तंबाखू-मशेरी बाजूला जाऊन थुंका आता!" सेक्रेटरी: जास्त बोलशील तर तुझं मेंटेनन्स डबल करेल सांगून ठेवतोय. मशेरी मी माझ्या पैशाची लावतोय..xxxx का घरात कुत्रा नाय विचारत आणि इकडे येऊन मोठेपणा करतत.. त्याच क्षणी राकेशनेही सेल्फी स्टिक बापूरावांच्या पुढे सरकवत लाईव्ह ठोकलं— "व्हॉट्स अप गाईज! बघा, हे टँकरचं पाणी फक्त आणि फक्त माझ्या रिकाम्या टाकीच्या रीलमुळे आणि आमच्या विनंतीमुळे आलंय! तर गाईज, पटकन मला फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा!" इकडे वरच्या गॅलरीतून हे दृश्य बघून राकेशची आई हसत म्हणाली, "अरे वा, राक्याला व्ह्यूज तरी मिळाले!" आणि बापूरावांची पत्नी ओरडली, "अहो, तुमचं अँकरिंग झालं असेल, तर उटणं सुकण्याआधी बादली घेऊन पळा आता!" आणि या सगळ्या गोंधळात वाघमारे काका दोन रिकाम्या बादल्या घेऊन पळत सुटले—"तेही बरोबर आहे, चला पाणी भरूया!" लेखक: उमेश चंद्रकांत मुरकर (ही संपूर्ण कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे.) आई जीवदानी मातेचा उदो उदो!
