STORYMIRROR

Umesh murkar

Comedy Classics

4  

Umesh murkar

Comedy Classics

एक नंबर ,मकरंद साहेब

एक नंबर ,मकरंद साहेब

8 mins
6

एक नंबर, मकरंद साहेब!

"मार्च महिना आला की कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामापेक्षा 'बॉसची मर्जी' सांभाळण्याचीच शर्यत सुरू होते. पण जेव्हा एखादा धोरणी बॉस अप्रेजलची अंतिम परीक्षा बंद केबिनऐवजी थेट आपल्या आलिशान फार्महाऊसवर ठेवतो... तेव्हा भल्याभल्या मॅनेजर्सचे मुखवटे कसे गळून पडतात, याची ही एक खमंग आणि अतरंगी गोष्ट!"

भाग १: ऑफिसमधील रुबाब आणि ५:४५ चा बॉम्ब!

मार्च महिना जवळ आला की मुंबईतील 'आदित्य इन्फोटेक' या पन्नास जणांच्या कंपनीत एक वेगळीच हवा वाहायला लागायची. बाहेरून अत्यंत शिस्तबद्ध आणि कॉर्पोरेट दिसणाऱ्या या ऑफिसच्या काचेच्या भिंतींमागे मात्र चार अतरंगी नमुने आपल्याच धुंदीत वावरायचे.
या ऑफिसमधला पहिला नमुना म्हणजे ऑपरेशन हेड कुलकर्णी सर. वजन तब्बल ११५ किलो, पण काम करण्याची इच्छा मात्र शून्य! खुर्चीवरून न हलता संपूर्ण ऑफिसला—आणि खासकरून मालवणहून आलेल्या गंगाराम या साध्याभोळ्या प्यूनला—अख्खा दिवस पळवण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हतं.
कालचाच दिवस बघा ना! कुलकर्णी सरांनी गंगारामला ऑफिसच्या कामापेक्षा स्वतःच्या घरच्या कामांसाठीच जास्त नाचवलं होतं. सकाळपासून त्यांनी गंगारामला चार वेळा कडक चहा आणायला लावला—आणि प्रत्येक वेळी "साखर कमी आहे", "चहा थंड झाला" म्हणून त्याला पुन्हा पळवलं. दुपारी तर कहरच झाला! ऑफिसमधून गंगारामला दोन वेळा स्वतःच्या मुलांना शाळेतून आणून घरी सोडायला पाठवलं.
संध्याकाळी सौभाग्यवतींचा फोन येताच कुलकर्णी सरांनी गंगारामला हाक मारली—
"अरे गंगाराम, इकडे ये! ही चिठ्ठी घे आणि बाजारातून आठवड्याभराचा भाजीपाला आणून माझ्या घरी नेऊन दे."
बिचारा गंगाराम चिठ्ठी घेऊन बाजारात पळाला. ३ किलो बटाटे, २ किलो कांदे, १ किलो टोमॅटो, १ किलो वांगी, १ किलो भेंडी, १ किलो गवार आणि वरून ताज्या मेथीच्या दोन मोठ्या जुड्या—असा तब्बल १० किलोचा बाजार उचलून तो टॅक्सीने कुलकर्णी सरांच्या बिल्डिंगपाशी पोहोचला. तिथे गेल्यावर कळलं की बिल्डिंगची लिफ्ट बंद आहे! शेवटी ते १० किलोचं जड ओझं खांद्यावर टाकून गंगाराम धापा टाकत चार मजले जिने चढला आणि भाजी देऊन आला.

पण आज सकाळी जेव्हा गंगारामने टॅक्सीच्या भाड्याचं व्हाउचर सहीसाठी पुढे केलं, तेव्हा कुलकर्णी सरांनी चष्मा नाकावर सरकवत ते व्हाउचर भिरकावून दिलं.
"कंपनीच्या पैशाने माझ्या घरच्या भाजीची टॅक्सी पास करू? चालत जायचं होतं ना! हे व्हाउचर पास होणार नाही, चल निघ!"
गंगाराम बिचारा अपमान गिळून शांत राहिला. इतकंच नाही, तर कालच कुलकर्णी सरांनी स्वतःचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट रिपोर्ट आळसापायी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मकरंदच्या गळ्यात मारला होता, आणि किरकोळ चुकीवरून एका ज्युनिअर क्लार्कला उगाचच झापलं होतं— "कुत्र्यासारखं तोंड करून काय उभा आहेस? काम कर!"
ऑफिसमधला दुसरा नमुना म्हणजे अकाउंट्स मॅनेजर वासंती टांगेवाले. कधीही न हसणाऱ्या वासंती मॅडमना प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागायची. नियम म्हणजे त्यांच्यासाठी ब्रह्मवाक्य! आज सकाळीच त्यांनी गंगारामला बोलावून एका ऑडिट फाईलच्या ५० झेरॉक्स काढायला लावल्या. बिचाऱ्या गंगारामने धावपळ करून ५० प्रती काढून आणल्या. वासंती मॅडमनी त्या तपासल्या आणि त्यातली फक्त एकच प्रत थोडी तिरकी आली आहे हे पाहताच त्यांनी रागाने तो संपूर्ण ५० प्रतींचा गठ्ठा गंगारामच्या तोंडावर भिरकावला!
"डोळे फुटलेत का रे तुझे? एक प्रत वाकडी आलीये! जा, सगळ्या ५० प्रती परत काढून आण!"
एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. दुपारी एका ज्युनिअर क्लार्कने चहाच्या बिलाचं व्हाउचर आणलं, ज्यात दोन रुपये जास्त लागले होते. वासंती मॅडमनी त्याला अख्ख्या ऑफिससमोर इतकं सुनावलं की तो बिचारा रडवेला होऊन आपल्या डेस्कवर जाऊन बसला.
ऑफिसमधला तिसरा नमुना म्हणजे सेल्स हेड रोहित—कॉर्पोरेट पॉलिटिक्सचा चालता-बोलता विद्यापीठ! तो चहाच्या मशीनपासून ते बॉसच्या केबिनबाहेरपर्यंत सगळीकडे सतत हजर असायचा. प्रत्येकाला एकमेकांविरुद्ध भडकवून स्वतःचा फायदा करून घेण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नव्हतं.
कुलकर्णी सरांच्या केबिनमध्ये जाऊन तो हळूच म्हणायचा, "सर, त्या वासंती मॅडमना आणि मकरंदला ना साधं कामही जमत नाही. सगळ्या कामासाठी माझ्याकडे येऊन रडतात, मीच मदत करतो बघा!"
आणि लगेच वासंती व मकरंदकडे येऊन तो रंग बदलायचा— "अरे, कुलकर्णी सर तर पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहेत! त्यांना साधा एक्सेलमधला फॉर्म्युलाही कळत नाही, सगळं मलाच करून द्यावं लागतं."
गंगारामकडे जाऊन तो खोटा कळवळा आणत म्हणायचा, "अरे गंगाराम, ती वासंती मॅडम अशीच खडूस आहे रे, किती काम वाढवून ठेवलंय तिने तुला!" आणि पुढच्याच मिनिटाला वासंती मॅडमकडे जाऊन कान भरायचा— "मॅडम, तो गंगाराम एक नंबरचा कामचोर आहे! जरा कडक शिस्त लावा त्याला."

दुपारी कंपनीचे मालक देशमुख साहेब यांनी रोहितला केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं, "रोहित, आपण लवकरच एक महत्त्वाचा नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहोत. कुलकर्णी तुला याचे पुढचे डिटेल्स देतील. तू पॉवरपॉईंट चांगलं करतोस, त्यामुळे प्रेझेंटेशनसाठी तुझा उपयोग होईल. पण ही गोष्ट आत्ता कोणाला सांगू नकोस!"
केबिनमधून बाहेर पडताच रोहितने छाती फुगवून अख्ख्या ऑफिसमध्ये हवा पसरवली—
"बघा हं, साहेबांनी मला एका मोठ्या नवीन प्रोजेक्टचा हेड बनवलंय! या प्रोजेक्टमध्ये माझ्या टीममध्ये कोण-कोण राहील, हे मीच ठरवणार आहे!"
या तिघांच्या गोंधळात अत्यंत शांत, साधा आणि प्रामाणिक होता तो फक्त मकरंद. मकरंदने कोणाचीही चुगली न करता कुलकर्णी सरांनी गळ्यात मारलेला रिपोर्ट रात्री जागून पूर्ण केला होता. दुपारी देशमुख साहेबांनी मकरंदला केबिनमध्ये बोलावलं. साहेबांचा मूड जरा गरमच होता.
"मकरंद, मी काल सांगितलेला तो प्रोजेक्ट रिपोर्ट अजून पूर्ण का झाला नाही?" साहेबांनी विचारलं.
मकरंदने शांतपणे टेबलवर ठेवलेल्या फाईलकडे बोट दाखवत अदबीने उत्तर दिलं, "साहेब, तो रिपोर्ट पूर्ण होऊन त्याची हार्ड कॉपी मी तुमच्या टेबलवर ठेवली आहे."
साहेब चिडून म्हणाले, "मला हार्ड कॉपी नको, मला मेल पाठवा!"
मकरंद चेहऱ्यावर कोणताही ताण न आणता शांतपणे म्हणाला, "साहेब, मी सकाळी ठीक ८:०० वाजता ऑफिसमध्ये आलो आहे आणि बरोबर ८:३० वाजता तुम्हाला तो रिपोर्ट मेलही केला आहे. आपण एकदा इनबॉक्स चेक केलात तर बरं होईल."
देशमुख साहेबांनी लॅपटॉप उघडून पाहिलं, तर खरोखरच सकाळी ८:३० वाजता मकरंदचा अचूक रिपोर्ट मेलवर आलेला होता! इतकंच नाही, तर हा रिपोर्ट कुलकर्णीला बनवायला सांगितला होता आणि तरीही मकरंदने कुलकर्णींची चुगली न करता त्यांना सावरून घेतलंय, हे अनुभवी साहेबांच्या एका सेकंदात लक्षात आलं. साहेबांनी नाइलाजाने मान डोलवत म्हटलं, "हं... गुड! ठीक आहे, जा तू."

केबिनमधून बाहेर येताच वासंती मॅडमनीही मकरंदला बोलावलं आणि कडक आवाजात विचारलं, "मकरंद, 'अजिंक्य शर्मा' या क्लायंटचा रिपोर्ट कुठे आहे? ताबडतोब आणून दे!"
मकरंद शांतपणे म्हणाला, "मॅडम, तो रिपोर्ट मी कालच तयार करून कुलकर्णी सरांना पाठवला आहे."
वासंती मॅडम अहंकाराने म्हणाल्या, "कुलकर्णीला दिला आहे म्हणजे काय? मग इथे मी कोण आहे?"
"सॉरी मॅडम, कुलकर्णी सरांनीच तसं सांगितलं होतं. तुम्हाला हवा असेल तर मी आत्ता सेंड करतो," मकरंद म्हणाला.
वासंती मॅडम डोळे मोठे करत कडाडल्या, "मला हवा आहे म्हणूनच तुला बोलावलंय, की इथे मी तुझ्यासोबत टाईमपास करायला बसलेय?"
मकरंदने चेहऱ्यावर मंद स्मित आणत, अत्यंत अदबीने पण धारदार स्वरात उत्तर दिलं, "मॅडम, जर तुम्ही टाईमपासबद्दल म्हणत असाल... तर काल जेव्हा मी कुलकर्णी सरांना तो रिपोर्ट मेल केला, तेव्हा त्या मेलमध्ये तुम्ही पण 'CC' मध्ये आहात! एकदा इनबॉक्स चेक करा, प्लीज!"
वासंती मॅडमचा चेहरा बघण्यासारखा झाला! तोंडावर आलं होतं, पण बोलता येईना! त्यांनी ओठ चावत मान खाली घातली आणि विषय टाळला.
संध्याकाळी ऑफिस सुटताना मकरंदने त्या रडवेल्या ज्युनिअर क्लार्कचं चहाचं व्हाउचर व्यवस्थित करेक्ट करून दिलं. आणि ज्या गंगारामकडे घरी जायला टॅक्सीचे पैसे नव्हते, त्याला स्वतःच्या बाईकवर बसवून घरापर्यंत लिफ्ट देऊन सोडलं.
तिकडे बरोबर सायंकाळी ५:४५ वाजता—ऑफिस सुटायच्या १५ मिनिटे आधी—देशमुख साहेबांचा ऑफिसच्या ग्रुपवर एक मेसेज धडकला:
"अभिनंदन! कुलकर्णी, वासंती, रोहित आणि मकरंद—तुम्ही चौघे यंदाच्या अंतिम अप्रेजलसाठी निवडले गेला आहात. उद्या सकाळी ठीक ९ वाजता माझ्या कर्जतच्या फार्महाऊसवर हजर राहा. तुमचं प्रमोशन तिथेच ठरेल. (टीप: लॅपटॉप किंवा प्रेझेंटेशन आणू नये.)"

भाग २: फार्महाऊसवरील तमाशा आणि ऑफिसमधील 'लाईव्ह' धमाल!

दुसऱ्या दिवशी सकाळी चौघेही मोठ्या उत्साहात कर्जतच्या आलिशान फार्महाऊसवर हजर झाले. पण तिथे ना कोणती मीटिंग रूम होती, ना प्रेझेंटेशनची सोय! हिरवळीवर एका मखमली गादीवर देशमुख साहेबांची लाडकी लॅब्राडोर कुत्री 'ज्युली' एखाद्या राणीसारखी विराजमान झाली होती. देशमुख साहेब कॉफीचा घोट घेत मिश्किल हसत म्हणाले—
"यंदा अप्रेजलची जबाबदारी मी ज्युलीवर सोपवली आहे! प्रत्येकाने आळीपाळीने ज्युलीसमोर आपलं टॅलेंट दाखवायचं. ती खुश होऊन दोन वेळा भुंकली, तर प्रमोशन आणि पगारवाढ पक्की!"
चौघांनाही वाटलं इथे साहेब आणि ज्युलीशिवाय कोणीच नाही, त्यामुळे इज्जतीची भीती नाही—बिंदास काहीही करा! ...पण त्यांना हे अजिबात माहीत नव्हतं की देशमुख साहेबांच्याच सांगण्यावरून हे सगळं मुंबईच्या ऑफिसमधील कॉन्फरन्स रूममध्ये मोठ्या स्क्रीनवर ५० जणांच्या स्टाफला 'लाईव्ह' दाखवलं जात होतं!
पहिला नंबर लागला ११५ किलोच्या कुलकर्णी सरांचा. त्यांनी साहेबांकडे दोन चान्सेस मागितले. पहिल्या चान्समध्ये त्यांनी कंबरेवर हात ठेवत कव्वालीच्या ठेक्यावर आपलं अवाढव्य पोट सांभाळत गाणं सुरू केलं— "मेरे 'टॉमी' कमर... कर दे कृपा नजर... मेरा प्रमोशन कर दे तू आज!" आणि आपली कंबर मटकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला!
तिकडे मुंबईच्या ऑफिसमध्ये स्क्रीनवर हा प्रकार पाहून ज्युनिअर स्टाफ पोट धरून हसला आणि मागून कोणीतरी ओरडलं— "अरे सर, ज्युलीचं सोडा... आधी स्वतःची कंबर सांभाळा, लचक भरेल!"

कव्वालीवर ज्युलीने जांभई दिल्याने कुलकर्णी सरांनी दुसरा चान्स घेतला. कुत्रीचं नाव 'ज्युली' आहे हे कळताच त्यांनी टाय कपाळाला बांधला आणि जुन्या ठेक्यावर गाणं सुरू केलं— "ज्युली... ज्युली... कुलकर्णी का दिल तुमपे आया ज्युली!" ज्युली भुंकत नाही म्हणून ते नाचता-नाचता ज्युलीभोवती तीन गोल राऊंड मारू लागले!
इकडे ऑफिसमध्ये तर हास्याचा स्फोट झाला. एक ज्युनिअर ओरडला— "अगं ज्युली, बघ... तुझा कुलकर्णी-जॉनी नाचतोय गं!"
तर मागच्या रांगेत उभ्या असलेल्या मालवणी प्यून गंगारामने कमरेवर हात ठेवत ठसक्यात डायलॉग मारला— "ह्यो कुलकर्णी आमका दिवसभर नाचवता... आणि आता ह्यो दादा स्वतः कुत्र्यासमोर नाचता!"
आणि काल ज्या क्लार्कला कुलकर्णी सरांनी 'कुत्रा' म्हटलं होतं, त्याच्या इशाऱ्यावरून अख्खा ५० जणांचा हॉल एका सुरात दणाणून गेला— "भू... भू... भू... भू..."
कुलकर्णी सर धापा टाकत बाजूला होताच, दुसरा नंबर लागला खडूस वासंती टांगेवाले यांचा! कोणी बघत नाही या भ्रमात त्यांनी पदर खोचला, ओठांचा चंबू केला आणि ज्युलीसमोर कॅटवॉक करत बोबडं बोलायला सुरुवात केली— "ओले माझा ज्युली बाबू, गोड गोड पिल्लू!"
ऑफिसमध्ये तर एकच जल्लोष झाला! चहाच्या व्हाउचरचा मार खाल्लेला क्लार्क ओरडला— "इन कुत्तो के सामने मत नाचना बसंती... सॉरी, वासंती टांगेवाले!"
लगेच गंगारामने तडका दिला— "मॅडम, त्या ज्युलीभोवती बरोबर ५० फेरे मारा! एक जरी कमी पडला ना, तर परत पन्नास फेरे मारावे लागतील!"
आणि अख्खा ५० जणांचा स्टाफ एका तालात ओरडू लागला— "बसंती... भू... भू...! बसंती... भू... भू...!"
तिसरा नंबर लागला पक्का पॉलिटिशियन रोहितचा. त्याने आधी हात पसरून गाणं सुरू केलं— "आइए मेहरबान, सुनिए मेरी जान... दो बार भौंक के बना दो मेरी शान!" पण ज्युलीने ढुंकूनही पाहिलं नाही. प्रमोशन हातातून जातंय हे पाहून रोहित थेट गुडघ्यावर आला, दोन्ही हात जोडले आणि अत्यंत लाचार होऊन आळवू लागला— "तेरी मेहरबानियाँ, तेरी कदरदानियाँ... ज्युली की वफादारी, दिलाएगी प्रमोशन भारी!"
ऑफिसमध्ये काल रोहितच्या पुढे-पुढे करणारे सगळे कर्मचारी हे पाहून हसून बेजार झाले. एक जण स्क्रीनकडे बघत ओरडला— "अरे रोहित सर, हे गाणं सुरू करण्यापेक्षा ज्युलीची थोडी चाटा की! म्हणजे नक्कीच दोनदा भुंकेल!"
आता शेवटचा नंबर होता आपला हिरो मकरंदचा! ऑफिसमधला ५० जणांचा हसणारा हॉल मकरंद स्क्रीनवर येताच एकदम शांत झाला. मकरंद शांतपणे ज्युलीच्या गादीसमोर उभा राहिला. ना त्याने डान्स केला, ना लाचारी केली. त्याने ज्युलीकडे बघत ठाम आणि मिश्किल आवाजात म्हटलं—
"सॉरी ज्युली, मला या शर्यतीत नाही उतरायचं. मी वर्षभर प्रामाणिकपणे काम केलंय. यंदा प्रमोशन नाही मिळालं तरी चालेल... यापेक्षा मी पुढच्या वर्षी डबल मेहनत करीन आणि माझ्या कामाच्या जोरावर प्रमोशन घेईन!"

मकरंद हे बोलून मागे वळणार इतक्यात—
ज्युली: "भौ! भौ!"
पूर्ण फार्महाऊसवर एकच शांतता पसरली! कुलकर्णी, वासंती आणि रोहितचे डोळे विस्फारले. देशमुख साहेबांनी मिश्किल हसत टाळ्या वाजवल्या आणि हातातील रिमोटचे बटण दाबले. समोरचा भव्य एलईडी स्क्रीन सुरू झाला—त्यावर ऑफिसमधील ५० च्या ५० कर्मचारी उभे राहून जोरजोरात टाळ्या वाजवत होते!
देशमुख साहेब हसत म्हणाले—
"ही 'स्पेशल लीडरशिप टेस्ट' फक्त माझ्यासमोर नव्हती, तर माझ्याच सांगण्यावरून ऑफिसमधील ५० कर्मचाऱ्यांना लाईव्ह दाखवली जात होती! कोणी पाहत नसतानाही जो स्वतःचा स्वाभिमान विकत नाही, तोच खरा लीडर! मकरंद, यू आर प्रमोटेड!"
स्क्रीनवर सर्वात पुढे उभा असलेल्या प्यून गंगारामचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने दोन्ही हात उंचावले आणि अस्सल मालवणी ठसक्यात तो ओरडला—
"एक नंबर, मकरंद साहेब!"
आणि त्यासोबत ५० च्या ५० कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट केला! इकडे कुलकर्णी, वासंती आणि रोहित या तिघांचीही तोंडं बघण्यासारखी झाली होती... तर मकरंद मात्र मंद हसत आपल्या खऱ्या यशाचा आनंद घेत होता!

समाप्त 
पूर्ण कथा काल्पनिक 
लेखक उमेश चंद्रकांत मुरकर 
जीवदानी मातेचा उदो उदो 
केळबाई मातेचा उदो उदो 
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Comedy