STORYMIRROR

Suhas Khare

Action Crime Thriller

5  

Suhas Khare

Action Crime Thriller

बळी विरुद्ध अहिंसावादी

बळी विरुद्ध अहिंसावादी

17 mins
15

"बळी तो कान पिळी", "अहिंसा परमो धर्मः" अशी परस्पर विरोधी वाटणारी सत्य वचने आपल्या संस्कृतीत सांगितली आहेत. पण जेव्हा ही परस्पर विरोधी वाटणारी सत्यवचने एकमेकांसमोर उभी ठाकतात तेव्हा काय होते? या गोष्टीचा प्रत्यय मराठवाड्यातील एका निम प्रगत नगरातील लोकांना आला.


वेळ सकाळी साधारण ७ ची. रोज सूर्यनारायणाशी उठायची स्पर्धा हरणारा संदीप आज तब्बल दोन तासाच्या फरकाने त्याच्याशी जिंकला होता. रोज रोज उशिरा येण्याबद्दल सरांच्या हातून होणारा अपमान एखाद्या सन्मानासारखा मिरवणारा दांडगट संदीप आज शिस्तीत वेळे आधी पोहोचायला तयार झाला होता. अर्थातच, कॉलेजच्या परीक्षेचा पेपर द्यायचा होता. रोज शेकडो सूर्यनमस्कार, बैठका मारणारा संदीप सध्या परीक्षेच्या काळात व्यायामाला पूर्ण मुकला होता. तरीही, त्याच्या शरीराची बळकटी तसूभरही कमी झाली नव्हती.

एवढे लवकर उठून ही कॉलेज ला उशीर होतो की काय या विचाराने आधीच त्याच टाळकं फिरलं होतं. टाळकं फिरलेल्या संदीप कडून आज पर्यंत बऱ्याच जणांना महाप्रसाद मिळाला होता. आता पुन्हा काही नवीन प्रकरण निर्माण होतं का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संदीप ची बाईक खराब झाली होती. शेवटी त्याने पायीच पटापट कॉलेज ला जायचं ठरवलं. त्याच कॉलेज साधारण अर्ध्या किलोमीटर च्या अंतरातच होतं. पटापट चालता चालता त्याची टक्कर एका दुधवाल्या भैया बरोबर झाली. भैया म्हणजे त्याची दुखरी नस. मराठी माणसाच्या पोटावर पाय देणाऱ्या भैयांवर खार खाणाऱ्या प्रजातींपैकी संदीप एक होता. बिचारा भैया, संदीप च्या रेल्वे इंजिन सारख्या धावत येणाऱ्या आडदांड शरीराला ठोकून धाडकन खाली पडला. सगळ्या पिशव्या इथे तिथे सांडल्या. अर्थातच संदीपला त्याचं भरधाव इंजिन तसंच पुढे पळवत ठेवायला काहीच अडथळा आला नाही. पण धक्का लागल्या मुळे त्याच्या हातातले नोट्स खाली पडले आणि एकच संतापाची लाट त्याच्या डोक्यातून गेली. त्याने आपल्या सुसाट रेल्वे गाडी ला ब्रेक लावला आणि तसाच १० पावलं भैय्याच्या दिशेने उलटा धावत आला. भैयाला उभा राहू, आपल्या पिशव्या गोळा करू का तसाच पळून जाऊ कळेनासे झाले. संदीप ने दोन्ही हातानी भैयाचे दंड पकडून त्याला ताडकन उभे केले...

संदीप: "क्या कर रहे हो भैया, देख के नही चल सकते क्या?"

भैया: "माफ करो सरकार, हम तो अपने राह से हो रहे थे.. गलती हो गायी.. माफी दे दो.."

संदीप: "अरे भाई कही लगी तो नही? (भैया चे हात पाय स्वतः च्या हाताने झटकत)"

भैया: "जी नही.. बस ये सारा दूध नीचे गीर गया...."

संदीप ने भैयाला दूध उचलायला मदत केली. पुन्हा जाताना नमस्कार करून त्याची माफी मागत मागत गेला...



काही तासांनंतर - जस जसे विद्यार्थी आपला पेपर संपवून येत होते तस तशी बाहेर गर्दी वाढत होती. संदीप ला यायला उशीर झाला होता पण त्याची गॅंग त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर झाडाखाली वाट पाहत होती. अखेर संदीप ची स्वारी कट्ट्यावर धडकली.

स्वामी: "या या साहेब. या वेळेस काय कॉलेज चे सगळे रेकॉर्ड तोडून पास व्हायचं ठरवलंय का? एवढा वेळ कोण पेपर लिहितो का?"

संदीप: "रेकॉर्ड कसला? पास झालो तरी खूप आहे. तुला माहितीये ना मॅथ्स मला घंटा कळत नाही. सगळं कॅल्क्युलेशन करायला किती वेळ लागतो..."

आदित्य: "अरे माठ्या मग उशिरा का आलास पेपर ला? आधीच तुला एवढा वेळ लागतो तर यायचं ना वेळेत तरी?"

संदीप: "अरे यार, तो पण एक सीन झाला... घरातून निघताना वाटलं बाईक ने जाऊ, पण बाईक ने माती खाल्ली. शेवटी धावत पळत आलो लिटरली. त्यात पण एक भैया तडमडला मध्ये. त्याच्याशी ठोकर झाली आणि अजून ५ मिनिटे वाया गेली..."

चेतन: "काय गरज होती सकाळी सकाळी मारामारी करायची... पेपर महत्वाचा नाही का?"

संदीप: "नाही रे... नाही मारलं त्याला... त्याला नुसतं माझ्या धडकेनीच लागलं... म्हणून थोडी मदत केली आणि आलो..."

स्वामी: "सूर्य पश्चिमेला उगवला की काय... लोकांना धु धु धुणारा चक्क मदत करून आला?"

आदित्य: "नाही रे... त्याला सध्या अहिंसेचं वेड लागलंय... दुसरं काही नाही..."

चेतन: "का रे बाबा... एवढी बॉडी काय अहिंसावादी बनायला कमावलीस का? हे भूत कुठून आलं तुझ्या डोक्यात..?"

संदीप: "माहित नाही रे.. पण हल्ली वाटू लागले.. हे शरीर, ही शक्ती किती दिवस टिकणार आहे... शिवाय आपण कितीही शरीर कमावलं तरी आपल्या पेक्षा वरचढ कोणी ना कोणी असतोच की... मागच्या महिन्यात मी गावी गेलो होतो, तेव्हा हे प्रकर्षाने जाणवलं..."

चेतन: "म्हणजे... काय झालं गावाला?"

संदीप: "अरे गावी माझे आजोबा... खूप जण मानतात माझ्या आजोबांना.. मी गेलो होतो तेव्हा काही गरीब शेतकरी त्यांच्या कडे आले आणि साकडं घातलं... गावातला सावकार त्या शेतकऱ्यांना कर्ज परतफेडी साठी त्रास देत होता... शेतकऱ्यांनी त्याला सवलत देण्या साठी खूप विनंती केली पण त्याने अजिबात ऐकले नाही... अख्या गावात सावकाराचा दबदबा असतो... कारण त्याने ३ - ४ पेहेलवान ठेवले आहेत वसुली साठी. प्रत्येक पहेलवान एवढा मस्तावलेला आहे की मी स्वतः किस झाड की पत्ती त्यांच्या पुढे... पण माझे आजोबा... ते तडक सावकारा कडे गेले आणि त्याच्या घरा समोर आमरण उपोषणाला बसले... २ दिवसात सावकाराचं हृदय परिवर्तन झालं आणि त्यांनी बिनशर्त बऱ्याच शेतकऱ्यांचे २० % कर्ज माफ केले आणि मुदत वाढवून दिली... हे मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं आणि तेव्हा पासूनच मला अहिंसावाद आकर्षित करू लागला... ते म्हणतात ना.. अहिंसा परमो धर्म:"

स्वामी: "अरे वा खूप चांगलं आहे... पण अहिंसावाद काही प्रत्येकाला झेपण्या सारखी गोष्ट नव्हे बरं का... तुला किती जमेल??"

संदीप: "जमेल... नक्की जमेल... मी पण माझ्या आजोबांचा नातू आहे..."

स्वामी ला थट्टा करायची लहर आली. चेतन सोबत त्याने कुजबुज केली आणि...

स्वामी: "चल तर मग आपण तुझी परीक्षा घेऊ या..."

असं म्हणत स्वामी आणि चेतन ने जोरात संदीप च्या टपलीत मारली आणि पळू लागले... पण संदीप ने फक्त डोकं चोळलं आणि आहे तसाच बसून राहिला. स्वामी चेतन ला आश्चर्य वाटले की संदीप ने खरंच काहीच प्रतिक्रिया नाही केली. त्यांना हुरूप आला आणि ते पुन्हा संदीप जवळ आले आणि अजून ५ - ६ चापट्या जोर जोरात मारल्या. संदीप त्यांचा मार सहन करत होता. तेवढ्यात...

आदित्य: "(स्वामी आणि चेतन च्या मार्गात येऊन)... थांबा रे बाबांनो. आपलाच मित्र आहे म्हणून एवढे छळतात का त्याला..."

स्वामी आणि चेतन मारायचं थांबले. संदीप ला सॉरी बोलले आणि पाठीमागून गळ्यात पडून कडकडीत मिठी मारली. स्वामींचा मोर्चा आता आदित्य कडे वळला...

स्वामी: "काय रे... तू तर संदीपचा कॉपी कॅट मित्र आहेस ना... तू कधी बनतोयस मग अहिंसावादी??"

खरंच, आदित्य आणि संदीप एकमेकांचे कॉपी कॅट मित्र होते. वर वर बघता दोघांमध्ये काहीच साम्य नव्हते. पण त्यांच्यात काहीतरी अव्यक्त गोष्ट होती जी या दोघांना एकमेकांचे बेस्ट फ्रेंड बनवून ठेवत होती. बहुतेक दोघांचा दृढ निश्चयी पणाच ती गोष्ट असावी, ज्या गोष्टी मुळे या दोघांचा एकमेकांना नितांत आदर वाटायचा. आणि कळत नकळत किती तरी गोष्टी हे दोघे एकमेकांप्रमाणे करू लागायचे...

आदित्य: "कधी बनतोय काय? बनलोच समज... संदीपने त्याचा आक्रमक स्वभाव बदलून या मार्गाचा स्वीकार केला आहे... मला त्याचा अभिमान आहे..."

चेतन: "हो का..."

असे म्हणत चेतन ने आदित्य च्या जोरात टपलीत मारली आणि दात दाखवत हसत बसला... आदित्यने काहीच विलंब न करता चेतनच्या कानाखाली लगावली आणि तो पण हसत बसला...

चेतन: "हे काय... आत्ताच तर तू बोललास ना की तू पण अहिंसावादी म्हणून..?"

आदित्य: "हो पण ते अन्याया विरुद्ध... तू जी केलीस ती थट्टा मस्करी होती... हा हा हा.."

चेतन गाल चोळत बसला...

चेतन: "संद्या, ह्या आड्या वर भरोसा ठेवशील आणि मरशील एक दिवशी... तू एकटाच स्वतः च्या हिम्मती वर अहिंसावाद करत बस... हा नुसता बोलायला अहिंसावादी..."

आदित्य: "वेळ आली तर मी दाखवून देईल बघ मी किती मोठा अहिंसावादी आहे ते..."



एकमेकांच्या खेचाखेची चा कार्यक्रम बराच वेळ चालू राहिला.. आणि सगळे आपापल्या घरी जायला बाईक पार्किंग जवळ आले. संदीप ने बाईक आणली नव्हती. आदित्य कडे बाइकच नव्हती. त्यामुळे चेतन आणि स्वामी दोघांना डबल सीट सोडणार होते.

स्वामी: "अरे यार, ही बुलेट काय रस्त्यावर आडवी पडून आहे? आता आपली बाईक कशी बाहेर काढणार..."

चेतन: "संद्या, बुलेट आहे भावा... तूच उचलून बाजूला कर..."

संदीप ने आपल्या शक्तीनिशी बुलेट उचलून बाजूला उभी केली आणि स्वामीच्या मागे बसायला जाणार तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर टप टप करत बोलवले.

तो इसम: "काय झालं रे बाळ्या... माझ्या बुलेट ला तू बाजूला केलं का?"

संदीप: "हो... इथे पडली होती रस्त्यावर आडवी. म्हणून मी नीट तिथे उभी केली..."

संदीप च वाक्य पूर्ण होतं ना होतं तोच एक सण्ण असा कानाखाली आवाज झाला... संदीप च्या डोळ्यापुढे काही सेकंद अंधारी आली... कान कूSS आवाज करत वाजू लागले... रस्त्यावर सगळे जागच्या जागी थांबून राहिले... संदीप चे मित्र चड्डी ओली व्हावी तसे एकाच जागी गारठले. आज पर्यंत संदीप ला त्याच्या मित्रांनी कधीच असा मार खाताना बघितले नव्हते. याउलट संदीप च्या हातून किती जणांना मरे पर्यंत मार खाताना त्याच्या मित्रांनी सोडवले होते. त्यामुळे एकच धाकधूक सगळ्यांच्या मनात लागून राहिली. संदीप एक मिनिटात सावरला.

संदीप: "अहो भाऊ, आम्ही नाही पाडली तुमची बाईक. ती आधीच पडली होती..."

इतक्यात दुसऱ्या गालावर उलट्या हाताची खणखणीत चपराक पडली आणि संदीप च्या हिरड्यांमधून थोडा रक्तस्राव होऊन तोंडातून थोडे रक्त बाहेर आले. कोणाला काय चाललंय समजेच ना. एक तर संदीप ला एवढं मवाळ वागताना आधी कोणी पाहिले नव्हते. आणि त्यातच हा इसम संदीप ला का मारतोय याचा काहीच सुगाव लागत नव्हता. तो इसम शरीराने बऱ्यापैकी आडदांड होता. पण संदीप त्याच्या सारख्या दोघांना एकाच वेळी आडवे पाडेल एवढा बळकट नक्कीच होता. असे असून पण तो इसम संदीप ला मारायची एवढी हिम्मत करत होता म्हणजे तो नक्कीच कोणीतरी गुंडा मवाली असणार याची सगळ्यांना खात्री झाली.

संदीप: "भाऊ, तुमचा काहीतरी गैर समज होतोय... तरी पण माफ करा मला.."

तो इसम: "तुझी हिम्मतच कशी झाली चंदू भाई च्या बुलेट ला हात लावायची? आपली बुलेट पडून राहील नाही तर काही पण होईल... तुला शहाणपणा करायला कोणी सांगितला?"

२ मिनिटे कोणीच काहीच बोलले नाही. संदीप ने अहिंसावादाचं व्रत घेतलं होतं आणि म्हणून बळाचा वापर करायचा नाही या मतावर तो ठाम होता. संदीप काहीच न बोलता निमूट पणे आपल्या मार्गाने जायला निघाला. पण ते म्हणतात ना, "बळी तो कान पिळी" . संदीप सारख्या दांडगट मुलावर आपण किती सहजपणे भारी पडलो या गोष्टीचा उन्माद चंदू गुंडा च्या डोक्यात गेला. शून्य प्रतिकारा मुळे त्याच्या राक्षसी वृत्ती ला अजूनच खतपाणी मिळालं. संदीप सारख्या दांडगटाला कायमची अद्दल घडवली तर आपली भीती लोकांमध्ये अजून पसरेल अशी अघोरी इच्छा त्याच्या मनात झाली…

चंदू गुंडा (तो इसम): "(पाठमोऱ्या संदीपच्या खांद्याला आपल्या हाताने जोरात पकडून मागे खेचत)... काय रे ए xxxx, समजत नाही का तुला xxxx.... xxxx, १२ हाफ मर्डर आणि ४ फुल मर्डर केलेत आपण. इकडचे सगळे पोलीस आपण खिशात घालून फिरतो... आणि तुझी एवढी हिम्मत तु चंदू भाई बोलत असताना निघून जातोस...? "

चंदू गुंड्याने संदीपचा खांदा आणि शर्ट ओढत पुन्हा त्याला मोकळ्या रस्त्यात खेचत आणले आणि पाठीत लागोपाठ चार पाच गुद्दे मारले. संदीप ला मारत मारत जमिनीवर गुढगे टेकून उभा केला. संदीप बरोबर जे काही होत होते ते एकदम भयंकर दिसत होते आणि त्याच्या मदतीला यायची कोणाचीच हिम्मत होत नव्हती.

चंदू गुंडा : "बस xxxx असाच गुढग्यावर... xxxx मिशी फुटली नाही तर लगेच शाने समाजात स्वतःला..."

मांजराने उंदराशी जसे खेळावे तसे चंदू गुंडा लोकांसमोर संदीप ला जास्तीत जास्त छळून आपली वट वाढवत होता. या सगळ्यात खेदाची एकच बाब होती, ती म्हणजे संदीप चा परम मित्र आदित्य. काहीच मिनिटांपूर्वी तो म्हणाला होता - 'वेळ आली तर मी दाखवून देईल बघ मी किती मोठा अहिंसावादी आहे ते..' आणि आत मात्र तो निमूट पणे आपल्या मित्राचा होणारा तमाशा बघत होता...

संदीप काही मिनिटे तसाच गुढग्यावर उभा होता. त्याला वाटू लागले की आपले काहीतरी चुकत आहे म्हणून अहिंसावाद काम करत नाहीये. आपण या गुंडांचे हृदयपरिवर्तन व्हावे असे काहीच प्रदर्शन केले नाहीये. म्हणून त्याने एक प्रयत्न करून बघितला.

संदीप: "(चंदू गुंड्याचे पाय पकडत) चंदू भाई, मी तुम्हाला शरण येतो. मला अजून ५ - १० फटके मारा पण कृपया मोठ्या मनाने मला माफ करा आणि सोडून द्या..."

आपण सामान्य लोकांची विचार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. पण हैवानांचे डोके कोणत्या पद्धतीने विचार करते हे सामान्यांना जन्मात कधी कळणार नाही. संदीप ने जो विचार करून चंदू गुंड्याचे पाय पकडले त्याचा उलटाच परिणाम चंदू गुंड्या वर झाला. अर्थातच चंदू गुंड्याने संदीप ला लगेच माफ करून त्याला सोडून देणे म्हणजे चंदू गुंडा म्हणावा तेवढा भीतीदायक नाही आहे असा सरळ सरळ अर्थ झाला असता. आणि एवढा मार खाऊन पण संदीप चंदू ला अजून ५ - १० फटके मार म्हणतोय म्हणजे आत्ता पर्यंत चंदू गुंड्याने जे काही मारले झोडले होते ते काहीच नाही असा सरळ सरळ संदेश संदीपने जमलेल्या लोकांना दिला आणि आपली सगळी ऐट  एका फटक्यात धुळीत मिळवली असा चंदू गुंड्याने अर्थ काढला.

चंदू गुंडा हृदयपरिवर्तन व्हायचे सोडून अजूनच खवळला. आता संदीप ला ५ - १० फटके काय ना २० - ३० मारले काय, आपली धुळीत मिळालेली ऐट एवढी सहजा सहजी आपल्याला परत मिळवता येणारच नाही असे चंदू गुंड्याला वाटू लागले.

चंदू गुंडा: "xxxx, xxxx च्या मायला... तू समजतोस काय र स्वतःला, xxxx ची औलाद... गुखाव..."

चंदू गुंड्याने आता संदीपला लाथा बुक्याने छाती आणि पोटावर मारायला घेतले. संदीप पुरता जमिनीवर लोळला. चंदू गुंड्याच्या नाका डोळ्यातून आग निघत होती आणि आता तर तो संदीप ला कायमची अद्दल घडवण्यासाठी काहीतरी भयानक करायला निघणार होता याची जाणीव संदीप सकट सगळ्यांना झाली. त्याने खिशातून रामपुरी चाकू काढला आणि पुढे काही करणार इतक्यात... आदित्य चंदू गुंड आणि संदीप च्या मध्ये धावत पळत येऊन स्वतः गुढग्यावर हात जोडून बसला...

आदित्य: "भाई, भाई माफ करा... तुमच्या एवढं मोठं खरंच कोणी नाही आहे या गावात.. चूक झाली आमच्या कडून... माफ करा... माफ करा..."

चंदू गुंडाने विचार केला... एकाच वेळी दोन दोन जणांवर वर्चस्व दाखवले तर लोकांवर अजून चांगला परिणाम होईल. म्हणून त्याने चाकूने तडका फडकी काही क्रिया करण्यापेक्षा ह्या दोघांना जास्तीत जास्त दाबून ठेवले.

चंदू गुंडा: "(आदित्य च्या सटासट ४ - ५ कानाखाली मारत) बस xxxx तू पण गुढघ्यावर..."

आदित्य आपला मित्र संदीप ची अहिंसावादी संघर्षामध्ये साथ द्यायला रणांगणात उताराला होता. ४ - ५ मिनिटे संदीप आणि आदित्य भर रस्त्यात गुढग्यावर उभे राहिले आणि चंदू गुंडा १ - १ मिनिटाने त्यांना शिव्या आणि चापटी देतच होता. काही वेळाने तिथे एक पोलीस हवालदार आले. आदित्यने त्यांना बघताच.

आदित्य: "पोलीस दादा, पोलीस दादा... आम्हाला वाचवा..."

चंदू गुंडा पोलीस आला म्हणून आणि त्या पेक्षा जास्त आदित्य ने पोलिसांकडे मदत मागायची हिम्मत केली म्हणून  जास्त चकित झाला. चंदू चा संताप झाला आणि त्याने जोर जोरात चुटकी वाजवून पोलिसाला बजावले...

चंदू गुंडा: "ए पांडू... चल निघून जायचं इथून... तुला माहितीये ना चंदू भाई कोण आहे... जा चल..."

आदित्य: "(घाबरून) पोलीस दादा... नका जाऊ पोलीस दादा... चंदू भाई आम्हाला मारेल... तुम्ही थांबलात तर नाही मारणार... प्लिज नका जाऊ..."

चंदू गुंडा: "xxxx, आयला तुझ्या.. xxxx तुला काय वाटलं पोलिसा समोर तुला मारणार नाही काय xxxx...? (पोलिसा कडे बघत)... थांबे पांडू... इथेच राहून बघत बस..."

चंदू गुंडाने पोलीस समोर आजू ५ - ६ लाथा बुक्क्या मारून दोघांना खाली लोळवला. पुन्हा ३ - ४ मिनिटं संदीप आणि आदित्य गुढग्यावर उभे राहिले. आदित्य ला वाटू लागले हे किती वेळ चालणार... आपण काही तरी बोलायला हवे...

आदित्य: "चंदू भाई.. प्लिज आम्हाला सोडा.. मला माहित आहे तुमच्या कडून एखादा खून झाला असेल चुकून.. पण तुम्ही मनाने चांगले आहात. तुम्ही पुन्हा असं काही नाही करणार. आमचं चुकलं. आम्हाला लवकर सोडा आता..."

बापरे, जी चूक संदीप ने केली होती तीच आदित्य ने केली. किंबहुना जास्तच. संदीपच्या हुन अर्ध्या शरीरयष्टीचा आदित्य आणि एवढी हिम्मत? चंदू गुंडा प्रचंड खवळला. आता त्याला कोणीच रोखू शकले नसते एवढा क्रोध त्याच्या डोक्यात संचारला...

चंदू गुंडा: "काय बोललास xxxx, चुकून एक खून केला मी? xxxx ४ जणांना फुल प्लॅनिंग करून मारलंय... तू कोण आलास xxxx मला बोलणारा की मी परत खून नाही करणार? xxxx"

चंदू गुंडाने रामपुरी चाकू काढला आणि जोर जोरात चालत आदित्य ला मारायला आला. क्षणात वीज चमकून जावी तसं काही कळायच्या आतच आदित्यने आपल्या डाव्या हाताच्या पंजाने चंदू गुंडा च्या उजव्या हाताची चाकू धरलेली मूठ अशी पकडली की जास्तीत जास्त जोर चंदू च्या अंगठ्यावर पडला. अंगठ्यावर जोर पाडून चाकूचे टोक मारेकऱ्याकडेच वळवणे सोपे जाते. किंवा मारेकऱ्याला आपल्या कडे चाकू वळवून द्यायचा नसेल तर स्वतःहून मूठ सैल सोडणे भाग पडते. आदित्य कडून अचानक झालेल्या अशा प्रतिकाराने सेकंदाच्या अर्ध्या हिस्स्यात चंदूचा चाकू खाली पडला... सेकंदाच्या दुसऱ्याच हिस्स्यात जमिनीवरून ९० अंशाने रॉकेट लाँच व्हावे तशी आपल्या उजव्या हाताची घट्ट मूठ आदित्यने चंदू गुंडाच्या पोटापासून वेगाने वर नेत थेट त्याच्या जबड्याच्या खाली जोरदार प्रहार केला... चंदू गुंडाच्या दाताखाली जीभ अडकून घळाघळा रक्त तर बाहेर आलेच शिवाय १ दात पण खाली पडला. आदित्यने पुढच्या २ - ३ सेकंदातच चंदू गुंड्याला आपल्या खांद्याने ढकलून खाली पाडले.

४ - ५ सेकंदात अचानक डाव एवढा पलटलेला पाहून लोकांनी आश्चर्याने बोटं तोंडात घातली. किती जणांनी टाळ्या वाजवल्या. चंदू गुंडा ला आज पर्यंत कधी न झालेला एवढा अपमान पाहून पूर्ण वेडावल्या सारखे झाले. काहीही करून आता सिद्ध करून दाखवायचेच होते की चंदू भाई कोण आहे ते. चंदू गुंडा पुन्हा उठला आणि आपल्या हातांनीच आदित्यचा गळा दाबून जागच्या जागी चेचून काढायचं ठरवून धावत सुटला. आदित्य दोन पावलं मागे झाला आणि चंदू आपल्या आवाक्यात येताच उजव्या पायाने १०० अंशाच्या कोनात अशी लाथ थेट चंदू च्या छातीत मारली की चंदू कोसळूनच पडला. ४ फुल मर्डर आणि १२ हाफ मर्डर करणारा चंदू भाई क्षणात जमिनीवर खात्मा होऊन पडला…

एवढं सगळं अचानक आणि अनपेक्षित पणे घडून गेल्याचा एक परिणाम असा झाला की बघ्या सारखा उभा असलेल्या पोलीस हवालदाराची कर्तव्यदक्षता ताडकन जागी झाली. तो ओरडत ओरडत आदित्य कड़े येऊ लागला आणि आदित्यने लगेचच आत्मसमर्पण करत स्वतःहून आपले दोन्ही हात हातकडी लावण्यासाठी समोर केले. हवालदाराने तरी पण आदित्य वर २ - ३ लाठी चे वार करून पोलीसपणाचे सुख उपभोगले. काही मिनिटातच घटनास्थळी ५ - १० पोलीस जमा झाले आणि चंदू गुंड्याला नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स खास त्यांच्या कडूनच मागवण्यात आली. इथे संदीप मार खाऊन खाऊन बेजार पडलेला पण त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी स्वामी आणि चेतन ला स्वतः व्यवस्था करावी लागली.



नंतर आदित्य ला एका छोट्या जेल मध्ये एकट्याला डांबून ठेवले गेले. खरं तर त्याच्या विरुद्ध अजून कोणता FIR वैगेरे दाखल केला गेला नव्हता. चंदू गुंड्याचे सहकारी, त्याचे मायबाप नेते मंडळी वैगेरे यांची पोलीस ठाण्यात रेलचेल चालू व्हायला लागली होती. आदित्य ला कसा अडकावयाचा जेणे करून त्याला फाशीची शिक्षा होईल, भले ते मग खोट्यानाट्या आरोपाने का होईना, याची डाळ शिजत होती. काही वेळाने स्वामी आणि चेतन भराभर पोलीस ठाण्यात आले. ठाण्यात जो काही कुकारस्थानाचा कार्यक्रम चालू होता याची त्यांना जाणीव झाली आणि ते खूप घाबरले. त्यांनी एका पोलीस हवालदाराला आदित्य ला भेटायची इच्छा व्यक्त केली. आदित्य बरोबर कदाचित यांना सुद्धा या प्रकरणात गोवता येईल असा असुरी विचार त्या हवालदाराच्या मनात आला. त्याने त्यांना आदित्यला तात्पुरता जेल मध्ये जाऊन भेटायची परवानगी दिली.

चेतन: "अरे आदित्य हे काय करून ठेवलंस? आणि कोणतं हे रूप तुझं? आम्हाला माहीतच नव्हते तुला कराटे वैगेरे येतात ते."

आदित्य: "कराटे बिराटे काही नाही येत रे मला. २ वर्षा पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वसंरक्षणाचे धडे घेतले होते. तेव्हा पासून मी स्वसंरक्षणावर खूप मेहनत घेतली आहे. म्हणूनच आज जे काही झालं त्यात स्वतःला आणि संदीपला वाचवू शकलो."

स्वामी: "अरे पण मित्रा... चंदू गुंड्याची माणसं बाहेर आली आहेत... ती सोडणार नाही रे तुला असंच दिसतंय..."

आदित्य ची मुद्रा शांत होती. तो काहीतरी विचार करू लागला म्हणून काहीच बोलला नाही.

चेतन: "अरे त्या चंदू गुंड्याने त्याची बुलेट पार्किंग च्या ठिकाणी आडवी का पाडली? त्याचीच चूक होती. त्यानी विनाकारण प्रकरण वाढवलं आणि मेला. आदित्य निर्दोष आहे."

स्वामी: "अरे तो गुंड मवाली होता. ते लोक सटकेल असतात. लोकांना त्रास व्हावा म्हणून काहीपण करत असतात सतत. मान्य आहे हे सगळे प्रकरण त्याने सुरु केले. पण भांडण नक्की कशावरून सुरु झाले, पहिली चूक कोणाची या वरून ह्या केस वर काहीच जास्त परिणाम होणार नाही रे. ही मनुष्यवधाची केस आहे."

आदित्य विचार मंथनातून बाहेर आला...

आदित्य: "स्वामी, संदीप ला साथ देण्यासाठी मी मैदानात उतरण्या आधी तुला गुपचूप फेसबुक लाईव्ह करायला सांगितलं होतं. ताबडतोब तुझ्या मोबाईल मध्ये तो विडिओ डाउनलोड कर आणि कमी कमी ५० एक जणांना तो विडिओ त्यांच्या त्यांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायला सांग. फेसबुक काही पण कारण देऊन तो विडिओ उडवून लावेल. आपल्या साठी तो विडिओ खूप महत्वाचा आहे..."

स्वामी: "हो, तू बोलल्या प्रमाणे सगळी रेकॉर्डिंग व्यवस्थित अपलोड झाली आहे. मी आत्ताच आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये सगळ्यांना डाउनलोड करायला सांगतो..."

आदित्य: "आणि चेतन, तुला पण मी तेव्हाच पोलिसांना घटनास्थळी बोलवायला पाठवले होते. बरं झालं तुला एका पोलीस हवालदाराला तिथे आणायला फार वेळ लागला नाही. तुझ्या या कामाची खूप मदत होईल आपल्याला..."

चेतन: "हो तसं थोडं मेहनतीचंच काम होतं ते. त्यांना जेव्हा मी बोलवायला गेलो आणि सांगितलं की तिथे चंदू गुंडाची गुंडागर्दी चालू आहे कृपया तुम्ही चला, तर कोणीच तयार होत नव्हते. मग तू सांगून ठेवल्या प्रमाणे मी एका हवालदाराला कोपऱ्यात घेऊन ५०० ची नोट दिली आणि म्हणालो की तुम्ही पाहिजे तर काही कार्यवाही करू नका, नुसते बघायला या. तेव्हा तो यायला तयार झाला.

पण आदित्य, मला एक समजत नाही, हवालदाराला तिथे नुसतं बघायला यायला सांगून काय फायदा झाला? तो लिटरली फक्त बघायलाच आला. शिवाय तू जेव्हा चंदू गुंड्याला संपवलास तेव्हा त्यानेच तुला पाहिले होते म्हणून अटक केले"

आदित्य: "(थोडे मिश्किल हसून) तिथेच तर तुझी समज थोडी कमी आहे मित्रा... मी जेव्हा मैदानात उतरलो तेव्हाच पूर्ण परिस्थिती पडताळून घेतली होती. आपली लढाई केवळ शरीररूपी चंदू गुंड्याशी नसून त्याच्या मागे असणाऱ्या अदृश्य शक्तींशी देखील आहे हे मला चांगलच माहित होतं. काहीही करून जर एका पोलिसाला चंदू गुंड्यासामोर निष्क्रिय अवस्थेत जर आपल्याला रेकॉर्ड करता आला तर माझी स्वसंरक्षणाची केस खूप भक्कम होईल याची मी आधीच आखणी केली होती. आणि उलट त्या हवालदाराने माझ्या अंगावर धावून येऊन, माझ्यावर लाठीमार करून माझी बाजू अजूनच भक्कम करून दिली..."

चेतन: "वाह रे मित्रा... पण तुला वाटतं तू यातून सुखरूप सुटशील?"

आदित्य: "आपल्याला सोशल मीडिया ची ताकद पूर्ण पणाला लावावी लागेल. पण शेवटी जीत आपलीच होईल हे नक्की. मी जे काही केलं ते स्वसंरक्षणार्थ केलं ते पण शेवटचा उपाय म्हणून याला कोणीच नाकारू शकत नाही..."

स्वामी: "पण या सगळ्यात, जर पोलीस हवालदार यायच्या आधीच चंदूने तुझ्यावर जीवघेणा हल्ला केला असता तर? आपली सगळी प्लँनिंग फसली असती..."

आदित्य: "(पुन्हा मिश्किल हसत) तुला काय वाटतं त्याने का माझ्यावर जीवघेणा हल्ला केला? माझ्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द मी विचारपूर्वक बोलत होतो. तो फक्त माझ्या बोलण्या नुसार मला हवा तसाच वागत गेला. जेव्हा मला वाटलं की सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे तेव्हाच मी त्याला शेवटच चवताळवलं..."

स्वामी: "म्हणजे... म्हणजे तू त्याला मॅनिप्युलेट केलं?"

आदित्य: "का रे, अचानक मानवाधिकार जागा झाला का तुझ्या मनात? त्याने उघड उघड सांगितले त्याने ४ खून आणि किती तरी हाफ मर्डर केले आहेत. संदीपला तर त्याने जवळ जवळ देवाघरी पाठवलेच असते. सगळं सिस्टिम त्याच्या खिशात आहे. तुझं काय म्हणणं आहे की मी त्याच्याशी फेअर प्ले करायला हवा होता?"

स्वामी: "हं... तसं नाही रे... पण"

आदित्य: "त्याला संदीप ने निघून जाण्यासाठी खूप याचना केली होती आणि मी पण केली होती. तो कधी पण थांबू शकला असता. पण त्याच्यातला हैवानाला ते मान्य नव्हतं. तो माझ्या मॅनिप्युलेशन ने नाही स्वतःच्या असुरी वृत्ती पायी मेला आहे..."

स्वामी: "माफ कर मित्रा, मला तसं म्हणायचं नव्हतं... पण तुझी हरकत नसेल तर अजून एक प्रश्न विचारू?"

आदित्य: "हो विचार ना..."

स्वामी: "तू ज्या पद्धतीने हे सगळं हाताळलं त्याबद्दल मला तुझा खूप अभिमान आहे. पण या सगळ्यात एकच गोष्ट सिद्ध झाली. जेव्हा चंदू गुंड्या सारखा बळी आपले कान पिळायला लागतो तेव्हा तुझ्या सारख्याला अहींसावाद वेशी ला टांगून महाबळी बनावेच लागते... हो ना?"

आदित्य: "अहिंसावाद, जो संदीप सारखे अनेक मूर्ख अघोरी पणे पाळतात तो अहिंसावाद मला कधीच मान्य नव्हता. अशा लोकांना वाटत की अहिंसावाद सगळ्या समस्येवर रामबाण उपाय आहे. हे लोक वेळ प्रसंगी स्वतःचा नाहक बळी तर देतातच पण एकूण समाजाला पण दुर्बल बनवून ठेवतात..."

स्वामी: "पण तूच तर सकाळी म्हणाला होता की संदीप सारखा तू पण अहींसावादी आहेस म्हणून?"

आदित्य: "सगळ्यात पहिले... दुर्बलांच्या तोंडून अहिंसेची भाषा शोभत नाही. मला माझ्या सामर्थ्यावर विश्वास आहे की वेळ प्रसंगी मी कोणाशी पण दोन हात करील म्हणून त्या सामर्थ्याच्या जोरावर मी माझी पहिली निवड म्हणून अहिंसेला मान्यता देतो. अहिंसा हा मार्ग माणसांच्या अन्यायाविरुद्ध काम करेलही. पण हैवानांच्या पुढे त्याचा टिकाव लागणं मुश्किल आहे."

स्वामी: "पण अहिंसा परमो धर्म: वैगेरे जे बोलतात ते काय"

आदित्य: "बऱ्याच जणांना हा श्लोक पूर्ण माहितीच नसतो, तर काही जणांना माहित असून पण अघोरी अहिंसावादाच्या उदात्तीकरणासाठी जाणून बुजून अर्ध्याच श्लोकाचा प्रचार केला जातो... पूर्ण श्लोक असा आहे...

अहिंसा परमो धर्मः

धर्म हिंसा तथैव च:

म्हणजे अहिंसा हा मनुष्याचा परम धर्म आहे. पण धर्माच्या रक्षणासाठी हिंसा करणे त्याहूनही श्रेष्ठ आहे. माझ्या मित्राला वाचवणे, भ्रष्ट न्यायव्यवस्थे विरुद्ध उभे राहणे हा माझा धर्मच होता..."

स्वामी आणि चेतन यांना आपला मित्र आदित्य बद्दल खूप भरून आले आणि तिघे एकमेकांना जेल मध्ये कडकडून मिठी मारून रडू लागले...



पुढील बरेच दिवस स्वामी, चेतन आणि संदीप ने आदित्य साठी दिवस रात्र मेहनत घेतली. सोशल मीडिया आणि आपली इतर सगळी शक्ती पणाला लावली व महिन्या दोन महिन्यातच आदित्यला निर्दोष सोडवून दाखवले. या प्रकरणामुळे गुंड कंपनी वर एवढा परिणाम झाला की अर्धा एक वर्ष भर कोणीच सामान्य दिसणाऱ्या कोणत्याच माणसावर डोळे वटरायची पण हिम्मत केली नाही...


-- सुहास खरे

© सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.ही कथा मूळ रूपाने सर्वप्रथम 'प्रतिलिपि' (Pratilipi) या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 










साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action