तुझ्या पदराचे चांदणे
तुझ्या पदराचे चांदणे


सखे तू निरागस चंद्रमा
देऊ आणि काय उपमा
चांदणे अंगणात रोजचे
बाळगू कशाची मग तमा
संधीकाली हात हाती तुझा
तुझ्यासवे रम्य नभाची प्रभा
किणकिण कंकणाची ऐकता
खोडीस मग मिळतेच मुभा
मंद हसणारी ती ओठपाकळी
जणू नुकतीच फुललेली कळी
समर्पणाला कारण स्मित तुझे
रोजचाच जातो मी सहज बळी
सोबत तुझी हेच धन पामराचे
सरीतेस्तव खुले बाहु सागराचे
होते जेव्हा मीलन दोन अधराचे
खुलते चांदणेही तुझ्या पदराचे